Sunday, February 20, 2011

आजादी-ए-निस्वॉ

आजादी म्हणजे काय? आपली आजादीची/स्वातंत्र्याची व्याख्या काय? अशा काही व्याख्या बघूयात?

पावसात मनमुराद भिजण्याचं स्वातंत्र्य, पोटभर खाण्याचं स्वातंत्र्य, लहान भावंडांना सांभाळायला न लागता भरपूर खेळण्याचं स्वातंत्र्य, इंग्लिश शिकण्याचं स्वातंत्र्य, शाळेत जाण्याचं स्वातंत्र्य, चित्रं काढण्याचं स्वातंत्र्य, पुस्तकं वाचण्याचं-नवीन कपडे घालण्याचं-धुणंभांडी न करण्याचं-मैत्रिणींशी गप्पा मारण्याचं स्वातंत्र्य इ.
ही आहे व्याख्या स्वातंत्र्याची, १२-१३ ते १६-१७ वयोगटातल्या मुलींची. या मुली आहेत हैदराबादमधल्या. निमित्त होतं जमीला निशातयांना भेटण्याचं. कामानिमित्ताने मी हैदराबादला गेले होते आणि संध्याकाळी हाताशी मोकळा वेळ होता. जमीलाजींचा आणि माझ्या नवऱ्याचा चांगला परिचय आहे. त्यांच्या काही कविता आधी वाचल्या होत्याच. त्यामुळे भेटायची उत्सुकता होती आणि भेटीचा योग जुळून आला.
शाहीनया त्यांच्या संस्थेच्या centre मधे मी गेले. मला receive करायला प्रीतीच आली होती, शाहीनची तरुण, चुणचुणीत कार्यकर्ती. जमीलाजींशी गप्पा नि त्यांच्या कामाशी ओळख हा माझा हेतू होता. शाहीन परिवाराला या निमित्ताने भेटता आलं. हैदराबादेतल्या दूरच्या वस्तीतून आपल्या शिक्षिकांसोबत किशोरवयीन मुलींचा गट आला होता. घट्ट हिजाबमधल्या मुली पाहून कसंतरीच वाटत होतं. या मुलींबरोबरच आजादीविषयी झालेली चर्चा सुरुवातीला दिली आहे. (निस्वॉ म्हणजे तरुण मुली, आजादी-ए-निस्वॉ म्हणजे तरुण मुलींचं स्वातंत्र्य)
शाहीनच्या कार्यकर्त्या त्यांची नि कामाची ओळख करून देत होत्या. आवश्यक तिथे जमीलाजी नेमके तपशील सांगत होत्या. यातून शाहीनचं काम उलगडलत गेलं. शाहीन म्हणजे भराऱ्या घेणारं पाखरू. शाहीनचं centre फार वैशिष्टयपूर्ण ठिकाणी आहे. चारमिनार जवळचा सुलतानशाही भाग. एका बाजूला मुस्लिम वस्ती, दुसरीकडे दलित वस्ती आणि तिसऱ्या बाजूला हरियाणातून स्थलांतरित झालेले एका समाजाचे लोक जे निजामाच्या काळात सफाई कामासाठी तिथे गेले. तिन्ही समाजात बाईचं स्थान खालच्या पातळीवर. मुस्लिम समाजात लवकर लग्न, सततची असुरक्षितता. दलित समाजात बाया-मुली कमावतात आणि तरुण मुलं त्यांच्यावर policing करतात. तिसऱ्या समाजात बिरादरीचं (जात पंचायत) खूप वर्चस्व आहे नि ती खाप पंचायतीसारखीच आहे. स्त्रियांवरच्या हिंसाचाराचा प्रश्न या वस्तीत मोठा आहे. याच बाबतीत शाहीन कार्यरत आहे. समुपदेशन, पोलीस, वैदयकीय मदत, निवारा हे थेट काम आहेच. त्याबरोबरच सतत करावं लागणारं प्रबोधनाचं काम शाहीन करत आहे.
पैशासाठी गरीब घरातल्या कोवळ्या मुलींची प्रौढ किंवा वृद्ध अरबांशी लग्न लावून दिली जातात. अशी rackets हैदराबादमध्ये आहेत. यासंदर्भातही शाहीनचा लढा सुरू आहे. शाहीनच्या कार्यकर्त्या याविरुद्धच्या एका sting operation मधे नुकत्याच सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी एका अरबाला पकडूनही दिलं. यामध्ये त्यांचाबरोबर स्थानिक मशिदीतले मौलवी सहभागी झाले होते, हे विशेष. मात्र यासाठी स्थानिक टोळ्यांचा बंदोबस्त आवश्यक आहे, ज्यात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे.
या सगळ्या संवादातून जाणवली ती शाहीनच्या कार्यकर्त्यांची समज आणि त्यांच्यात आलेलं धाडस. जमीलाजींनी अशा कार्यकर्त्यांची फळी घडवली आहे. सामाजिक कामाबरोबर त्यांचं साहित्यातलं योगदान महत्वाचं आहे. त्या समकालीन उर्दू साहित्यातील महत्वाच्या कवयित्री आहेत. त्यांच्याच कवितेचा काही भाग देऊन या पोस्टचा समारोप करते.....
बुर्खा पहनकर निकली, डिग्री भी मैने ले ली
कम्प्युटरभी मैने सिखा, और दुसरोंके आगे खुद को पाया
अम्मी भी खुश थी, अब्बा भी बहुत खुश
हर सांस ने पुकारा, मौज मस्ती मै करने निकली
थियेटरमें ज्यों ही पहुंची, डंडेने मुझे रोका
बुर्खा मना है लडकी
काली नकाबसे काला धुऑ सा उठा
उस वक्त वही पर
मैने बुर्खा उतार फेका

ही कविता जमीलाजींच्या 'लावा' या कवितासंग्रहातील आहे, ज्याच्या मुखपृष्ठाची प्रतिमा इथे दिली आहे.

2 comments:

  1. hyeeee.... khupch sundar....... sory.. khup late baghun sangitla.....

    ReplyDelete
  2. very interesting post. एका चांगल्या कामाची माहिती मिळाली.

    ReplyDelete