Wednesday, November 7, 2012

शिवाजी फाउंड इन भीमनगर मोहल्ला


अरेच्या नाटकाचं नाव बदललं की काय? अंडरग्राउंड चा फाउंड? शिवाजी प्रकटला (माफ करा) शिवाजी राजे प्रकटले की काय?
कुठून तरी जरब बसवणारा आवाज आला, कोण तो शिवाजी, शिवाजीराजे म्हणतोय? छत्रपती म्हणा, पायाशी तरी बसायची लायकी आहे का तुमची?
म्हणजेच आम्ही शिकलो; शिवाजी महाराज थोर होते, त्यांच्यापुढे उभं राहायची आपली लायकी नाही. आता लायकीच काढल्यावर; त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत होते तरी मनातले प्रश्न मनातच. जसे महाराज आम्हाला दाखवले गेले तसेच आम्ही बघितले. आम्हाला लहानपणापासून दिसलेला शिवाजी कसा? (पुन्हा चुकले; शिवाजी नाही शिवाजी महाराज!)

पुण्यात सोन्याचा नांगर चालवणारे शिवाजी महाराज!
स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवाजी महाराज!
शाहिस्तेखानाची बोटे तोडणारे शिवाजी महाराज!
अफझलखानचा कोथळा बाहेर काढणारे शिवाजी महाराज!
आग्र्याहून चातुर्याने सुटका करून घेणारे शिवाजी महाराज!
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ शिवाजी महाराज!
‘हिंदू’पदपातशहा शिवाजी महाराज!
जुलमी मुसलमान राजवटीविरुद्ध हिंदू धर्मरक्षणार्थ उभे ठाकलेले शिवाजी महाराज!
या सगळ्या वर्णनविहारात गरीब रयतेच्या कल्याणासाठी झटणारा तो राजा कुठे गेला? शिवाजीराजे कळले ते गड-किल्ले, मोहिमा, लढाया, गनिमी कावा या संदर्भातच. म.फुल्यांनी गौरवलेला कुळवाडी भूषण राजा आम्हाला समजलाच नाही कधी. शूद्र समजल्या गेलेल्या कुळात त्यांनी जन्म घेतला. जातीवादी व्यवस्थेत त्यांची अतुलनीय कामगिरी राज्याभिषेकासाठी पुरेशी ठरली नाही. राजपुतानातल्या शिसोदिया वंशाशी संबध दिसल्यावरच त्यांचे क्षत्रियत्व मान्य करण्यात आले. पण इथल्या ब्राह्मणांनी नाहीच मानले तेव्हा राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्टाना आणावे लागले.

शेतजमिनीची मोजणी करणारा राजा, शेतसाऱ्याची न्याय्य व्यवस्था बसवणारा राजा, दुष्काळात सारा माफ करणारा, परंपरागत उद्योगात अडकून पडलेल्या बलुते-अलुतेदारात स्वराज्याची भावना जागवणारा, त्यांना लढायला उभं करणारा आमचा राजा कधी ठळकपणे पुढे आलाच नाही. स्त्रियांच्या बाबतीत न्याय्य भूमिका घेणारा, त्यांचा सन्मान राखणारा राजा आम्हाला दाखवला गेला तो फक्त कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भात. (तोही त्यांच्या तोंडी घातलेल्या कपोलकल्पित अनुदार उद्गारातून – अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो वगैरे वगैरे) पण स्त्री सन्मानाची कैक उदाहरणे पुढे आलीच नाहीत.
शिवाजीराजांच्या कारभारातील मुद्द्यावर आम्ही क्वचितच बोललो. त्यांचा आर्थिक कार्यक्रम काय होता? अन्य राजवटीसंदर्भातली त्यांची धोरणे काय होती? त्यांनी रयतेला पाणीपुरवठा, पीक, सरंक्षण, बाजारव्यवस्था यासाठी नेमकं काय काय केलं, आम्हाला माहीत नाही. अनेक मावळ्यांना पारंपारिक उद्योगातून म्हणजेच जातीव्यवस्थेतून बाहेर काढून लढायला बळ देणारा राजा, आम्हाला दिसला नाही. काही संशोधकांनी हे प्रयत्न केले पण ‘शिवाचा अवतार म्हणजे शिवछत्रपती’ या भव्यदिव्य प्रतिमेची आम्हाला भूल पडली होती. आमचे इतिहासाचे ज्ञान म्हणजे पुस्तकी, तेही शालेय पुस्तकापुरतेच. सनसनावळ्या तोंडपाठ म्हणजे इतिहास पक्का. पुस्तकात इतिहासावर असलेले धडे शिकून आम्ही मार्क मिळवले पण इतिहासाने शिकवलेले धडे?

शिवाजी म्हणजे मुसलमानांना डिवचण्यासाठी असलेली ‘हिंदूंची’ जागीर नाही की अन्य जातींना कमी लेखण्यासाठी ‘मराठा’ जातीची, ना कोणत्या प्रांताची. आपला राजा अशी कोणाची मक्तेदारी नाही. तो सामाजिक समतेची आस असणाऱ्या साऱ्या लोकांचा राजा आहे. म्हणजेच हा राजा गोब्राह्मणप्रतिपालक नाही तर शूद्रांचा, नाडलेल्या रयतेचा राजा आहे, मग तो असणार त्याच्या गरीब-शोषित रयतेबरोबरच. म्हणूनच तो भीमनगर मोहल्ल्यात ‘भूमिगत’ नाहीये तर तिथे तो सापडलाय, त्याच्या रयतेच्या ज्ञानात, विचारात आणि कृतीत. मग भेटणार ना आपल्या राजाला?     
   
टीप: ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविषयी हा लेख आहे, हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच. Tuesday, August 28, 2012

उदरभरण आहे दृष्टी होण्या विशाल !!!!


वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्याला माहीत असतो. अनेकांनी लहानपणी म्हटलेला असतो. या श्लोकाची आधुनिक समतावादी आवृत्तीही आपल्याला माहीत असेलच;
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे
कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल
यातला ‘चित्त विशाल होण्यासाठी उदरभरण’ हा भाग मला फार भावतो. पण थोडं यापुढे जाऊन मी आता म्हणू शकते, उदरभरण हे दृष्टी विशाल होण्यासाठीही आहे. तुम्ही म्हणजे जे स्वच्छ बघू शकतात ते हं; कधी पूर्ण अंधारात या उदरभरणाचा म्हणजे जेवण्याचा अनुभव घेतलाय? अर्थात विजेच्या अवकृपेमुळे अनेकांनी तो घेतलाही असेल. मेणबत्ती लावून Candle light dinner म्हणून वेळ साजरीही केली असेल. पण मिट्ट काळोखात, जिथे काहीच दिसत नाही, जिथे बिलकुल उजेड नाही अशा ठिकाणी कधी मुद्दाम जाऊन तुम्ही जेवला आहात का?
हे ठिकाण आहे हैदराबादमधे. Dialogue in the Dark असं या जागेचं नाव. यात दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे Exhibition याबद्दल अधिक वाचा येथे गर्द सभोवती. दुसरा भाग म्हणजे अंधारातलं जेवण (Lunch/Dinner). जेवणासाठी आत प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी व्हीडीओ क्लिप दाखवली जाते. ताट म्हणजे घड्याळ समजून काही सूचना दिल्या जातात. उदा. ११ च्या बाजूला ताटाबाहेर पाण्याची बाटली, १ च्या ठिकाणी ताटात वाटी इ.इ. वर प्रेमळ भाषेत ‘काही तुटल्याफुटल्यास पैसे वसूल होतील’ हा इशारा.
स्वयंसेवक आपल्याला एका रांगेत (म्हणजे तुम्ही जितके असाल त्यांना) एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन जातात. या आधाराची गरज भासतेच करण आत गर्द अंधार. मग आपल्याला आतल्या मार्गदर्शक स्वयंसेवकावर सोपवलं जातं. तो आपल्याला योग्य जागी बसण्यास मदत करतो. जेवणाबाबत नेमक्या सूचना देऊन जेवण वाढायच्या तयारीला लागतो. जेवण म्हणजे Four Course Meal.
तिथे दिसत तर काहीच नव्हतं. मेनूही माहीत नव्हता फक्त Veg की Non-veg ही पसंती विचारली होती. त्यामुळे आपल्यापुढे काय येणार याची उत्सुकता होती आणि ते न पाहता अनुभवण्याचीही! प्रथम रजाकने सूप आणलं. मग स्टार्टर. त्यानंतर मेन कोर्स म्हणजे Veg fried rice सारखाच प्रकार. सर्वात शेवटी desert. जेवताना आम्हाला कुठे काय वाढलंय याबद्दल तो मोलाच्या सूचना करत होता आणि आस्थेने चौकशीही; जेवण आवडतंय ना इ.     
तसं अंधारात जेवताना, घास तोंडात जाण्याऐवजी नाकात जाणार नाही याची आपल्याला खात्री असते. पण एरवी जेवताना पदार्थाच्या वासाबरोबर त्याचे दृश्य रूपही आस्वाद घेण्यात महत्वाचे ठरते. स्टार्टर वगळता बाकी काही हाताने खायचं नव्हतंच त्यामुळे नेहमी जेवताना होणारा अन्नाचा स्पर्शही नव्हता. त्यामुळे गंध आणि चव म्हणजेच आपले नाक आणि जीभ यांचीच भूमिका महत्वाची होती. सारी ज्ञानेंद्रिये तिथे आपोआप एकवटल्यासाखे वाटले.
हा जेवणाचा अनुभव फारच वेगळा होता. एकतर आपले कान नीट शाबूत आहेत याची खात्री झाली, कारण मुख्य भिस्त त्यावर होती. आपल्याला दिसतं त्यामुळे इतर ज्ञानेंद्रियांवर आपण फार कमीवेळा अवलंबतो असं लक्षात आलं. दुसरं म्हणजे इकडे तिकडे बघायला काही नसल्याने जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. तिसरं म्हणजे जेवताना गप्पांचा अभूतपूर्व आनंद घेता आला. अभूतपूर्व यासाठी की इतकं विनाव्यत्यय जेवण आपण कधीच केलं नसल्याचं जाणवलं. चौथं म्हणजे पोट भरल्यावर आम्ही थांबलो. रोज जेवताना एखादा घास अंमळ जास्त झाला तरी तो पानात दिसत असल्याने सहसा आपण तो खाऊन टाकतो. पण इथे तसं झालं नाही. थोडे पदार्थ वाया गेले, पण त्या दृष्टीविहीन जगात आपल्या शारीर संवेदना फार सजगपणे अनुभवता आल्या आणि पोट भरल्याचे समाधान वाटताक्षणी आम्ही थांबलो.
छान जेवून बाहेर लख्ख प्रकाशात आलो. मागोमाग आलेल्या अंध रजाकने आमचे आभार मानले. क्षणभर मोह झाला त्याच्याबरोबर फोटो घ्यायचा, पण ती गोष्ट रजाकसाठी किती अप्रस्तुत आहे हे आम्हाला जाणवलं. त्याचा हात हातात घेऊन आम्ही त्याचा निरोप घेतला. या उदरभरणामुळे दृष्टी खरोखर विशाल होण्याचा हाच तो क्षण होता.

टीप: Dialogue in the Dark: Moving beyond sight! दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. यामध्ये अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. हैदराबादला गेलात तर हा अनुभव चुकवू नका. अधिक माहितीसाठी पुढील लिंक बघा;Sunday, June 17, 2012

माती


प्राथमिक शाळेत मातीकामाचा स्वतंत्र वर्ग होता. मातीकामाच्या तासाला मऊ चिकणमातीचा एकएक गोळा मिळायचा. मस्त असायची ती माती! एकदा थोडीशी चाखून पाहिली होती, काय छान चव होती! मग मातीकामाच्या तासाला चिमूटभर माती तोंडात जायला लागली, अर्थात सगळ्यांची नजर चुकवून हं. शाळा भरायच्या आधी शिपाईकाका रोज मातीचा गोळा बनवायचे. ते पाहायला, कधी कधी तुडवायला जाम मजा यायची.
एकदा सकाळी उठले तर डोळा हा सुजलेला, उघडेचना. रांजणवडी नव्हती किंवा डोळेही आलेले नव्हते, म्हणजे असं घरातले बोलत होते. मला तर डोळे आले म्हणजे काय कळतच नव्हतं, डोळे आहेतच की आपल्याला, मग आत्ता आलेत म्हणजे काय? पण ही बडबड तेव्हा कोणी ऐकून घेणार नाही हे माहीत होतं आणि सगळे माझ्याकडे देत असलेलं लक्ष उगीच प्रश्न विचारून कमी करायचं नव्हतं. मग चर्चा होऊन त्यावर तुळशीची माती लावण्यात आली. काय बरं वाटलं, गार गार माती डोळ्यावर ठेवल्यावर! मग माती आणखीन आवडायला लागली. मला पाटीवरची पेन्सिलही चाखायला आवडायची. तिच्या आणि मातीच्या चवीत साम्य होतं थोडं. पण बावळट लीलूला हे पटायचंच नाही, ती आपली माती ब्याक, माती ब्याक करत बसायची. मलाही कधी कधी माती घाण असं वाटू लागलं होतं. नेहमी छान असणाऱ्या मातीचा पावसाळ्यात जाम चिखल व्हायचा. कपड्यावरचे डाग जाता जायचे नाहीत, कितीही घासलं तरी. त्यातून मातीत जंतू असतात, त्यामुळे रोग होतात असं शास्त्राच्या पुस्तकात वाचल्याने मातीपासून दूर राहावं असं वाटायला लागलं. अभ्यासाच्या पुस्तकातून माती वेगळ्याच अर्थाने भेटायला लागली. माती केली म्हणजे वाट लावली, मातीमोल म्हणजे शून्य किंमत, माती चारली म्हणजे एखाद्याला हरवलं, माती खाल्ली म्हणजे वाईट काम केलं. पण मातीचं महत्वही अभ्यासातून कळत होतं. मातीचा थर नसेल तर वनस्पती वाढत नाहीत, धान्य पिकत नाही, मातीची धूप झाल्याने पर्यावरणाची हानी होते हे समजल्यावर पुन्हा बरं वाटलं.
माती खाणे हा आजार आहे असं कळल्यावर मात्र मी हबकले. म्हणजे आपण आजारी होतो की काय? पण आजार म्हणजे तर ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब वगैरे. कोणाकोणाला कावीळ, कांजिण्या असे काय काय आजार होतात. आपल्याला तर तसं काहीच होत नाहीये मग माती खाणे हा आजार कसा काय बुवा? मग याबद्दल ज्याला, त्याला विचारायला सुरुवात केली. खनिजाची किंवा आणखी कशाची तरी शरीरात कमी असेल तर माती खावीशी वाटते असं कळलं. जंत झाले तर माती खावीशी वाटते की माती खाल्ल्याने जंत होतात यावर एकमत नव्हतं. त्यामुळे डोक्यातला गोंधळ जोरातच वाढला.
माझ्या एका मैत्रिणीचा काका आदिवासींमधे काम करत होता. त्याचा जगभरच्या आदिवासींवर खूप अभ्यास होता म्हणे. त्याला मी विचारलं, माती खाणं हा आजार आहे का म्हणून. त्याने सांगितलं, हो आणि नाहीही. मी बुचकळ्यात, अशी दोन उतरं कशी काय, एकच उत्तर पाहिजे – हो किंवा नाही. शाळेत असंच तर शिकवतात. मग असं कळलं की काही समाजात हा आजार समजतात तर काही समाजात अशी चाल आहे. लहान मुलं आणि स्त्रिया, बहुतेकदा गरोदर स्त्रिया माती खातात. प्राणीही माती खातात, त्यातून शरीराला काही आवश्यक घटक मिळतात म्हणे. काही आदिवासी समाजात तर समारंभपूर्वक माती खातात म्हणजे खरीखुरी माती खातात. हात्तिच्या, म्हणजे योग्य-अयोग्य असं लोक ठरवतात होय? हे शाब्बास, माझी मातीची आवड परत उफाळून आली.  
एकदा एक विज्ञानकथा वाचत होते. परग्रहावरचे जीव येऊन जमेल तितकी पृथ्वीवरची माती घेऊन जातात, कारण काही उगवायला त्या ग्रहावर मातीच नसते. या कथेतले पृथ्वीवासीही माती म्हणजे घाण असं समजत असतात, पण हे पाहिल्यावर त्यांना मातीचं महत्व कळतं अशी काहीशी गोष्ट होती.
जन्मानंतर बाळाची नाळ मातीत पुरतात. काही धर्मात मेल्यावर माणसांना पुरतात हे पुढे कळत गेलं. ‘आपली माती’ चा अर्थ कळला. लोक कामानिमित्ताने जगभर जातात पण म्हातारपणी त्यांना आपल्या ठिकाणी परतावंसं वाटतं, आपल्या मातीची ओढ लागते हे कळलं. पण मोठा प्रश्न पुढे आहे तो म्हणजे ‘इतक्या वर्षांनी ती माती तशीच राहते की बदलते?’

Saturday, May 19, 2012

रस्ता


लहानपणी एकट्याने हिंडायची मर्यादा म्हणजे वाड्याचे दार. पुढेच रस्ता असल्याने आम्हा बारक्या पोरांना कोणी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडायला सक्त मनाई होती. त्यामुळेच की काय, वाड्यालगतच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन येणे हाही पराक्रम वाटायचा. मोकळ्या वेळात आमचा मुक्काम दारालगतच्या पायऱ्यांवर असायचा. रस्त्याचा तो पट्टा जणू पाठ झाला होता.
उन्हाळ्याच्या दिवसात रात्री मजाच, कारण सगळेच बाहेर बसत वा खेळत असल्याने रस्त्यावर मनमुराद भटकता येई. एकदा आम्ही असेच बसलेलो असताना एक साहेब विचारत आले, हा रस्ता कुठे जातो? आधी मला हसायलाच आलं. पण मग भीती वाटली खरंच रस्ता कुठे गेला तर? मी त्यांना म्हटलं, रस्ता कुठे नाही जात, इथेच असतो. हं त्यावरून माणसं मात्र इकडे तिकडे जातात. त्यांनी हसून मग मोठ्या माणसांकडे मोर्चा वळवला. मग कोणीतरी त्यांना सांगितलं, हा रस्ता मंडईकडे जातो. मला वाटलं रस्ते कसे चालतील? असं काय म्हणतात हे सगळे?
एकदा सकाळी रस्त्यावर, वाड्यापासून थोड्या लांब अंतरावर दोन तीन मोठे खड्डे दिसले. आम्ही उडालोच, कधी झाले हे खड्डे? असे कसे रस्त्यांना खड्डे होतात? मग आमची डोकी सुरु झाली. कुणी खड्डे पाडले असतील का? रस्त्याला त्रास झाला असेल. त्यावर पशा म्हणाला, चल छोड, रस्त्यांना काही दुखत नाही. रोज एवढ्या गाड्या जातात तेव्हा कधी आवाज तरी येतो का रस्त्याचा? मजबूत असतात ते?
मजबूत असतात तर मग खड्डे कसे होतात? कुणाची तरी शंका. मग आम्ही पुन्हा विचार करू लागलो. राणी म्हणाली,काल मी मंडईत गेले होते किनई, तिथे पण रस्त्याला असेच मोठे खड्डे होते. मग माझं विचारचक्र की काय ते जोरातच सुरु झालं. सगळे म्हणतात हा रस्ता इकडे जातो, तो तिकडे जातो म्हणजे रस्ता चालत असणार आणि त्यामुळेच ते मंडईतले खड्डे इकडे आले असणार. तसं मी म्हणाले, पण सगळ्यांना नाही तर राणी आणि दिप्याला फक्त. बाकी सगळे काय म्हणतील ते सांगता येत नाही. राणी आणि दिप्या विचारात पडले, असं कसं होईल? जादूच्या गोष्टीत नाही का गालीचा उडवतात? आणि त्या कोणीतरी नाही का भिंत चालवली? मग रस्ते न चालायला काय झालंय, हळूहळू त्या विचारात आम्ही घुसायला लागलो.
दुसऱ्या दिवशी बघायचे, खड्डे इथेच असतील तर मग रस्ते चालत नाहीत, पण खड्डे नसले तर चालतात, असे ठरले. मग कधी एकदा सकाळ होते यातच घरी गेलो. आईनी खीरपुरी केली होती जेवायला, मग काय! त्यात सगळं विसरायला झालं. रात्री मामाकडे जायचं ठरलं, मी तिथे राहण्याचा हट्ट करणार हे नक्की. आई तयारीतच होती. मामाकडे दोन दिवस कसे गेले कळलं नाही, रस्त्याचा पार विसर पडला. घरी येताना रस्त्याकडे नीट पाहिलं तर खड्डे गायब, रस्ता पूर्वीसारखाच गुळगुळीत. चला म्हणजे रस्ते चालतात तर, मी मनातल्या मनात टाळ्या पिटल्या. राणी नि दिप्याला बोलावलं, त्यांनी आधीच पाहिलं होतं. ही गम्मत कोणालाच सांगायची नाही असं आम्ही ठरवलं. 
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरात आवाज येऊ लागला, खण....खण....खण बाहेर जाऊन पाहिलं तर दोन तीन माणसे रस्त्याला काहीतरी करत होती. दिप्या म्हणाला, रस्ता खणतायत, नक्कीच दुखत असणार, केवढा ओरडतोय बघ तो रस्ता. आम्ही त्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांना काही सांगू लागलो तर त्या आवाजात काहीच कळेना. शेवटी त्यांनी आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही निमूट दुकानाच्या पायऱ्यावर जाऊन बसलो, ते काय करतायत ते बघत. मग त्यांनी रस्त्याला खड्डे पाडले, का कोण जाणे? म्हणजे रस्त्याला असे खड्डे पाडता येतात तर! आम्ही उत्सुकतेने बघू लागलो.    
तेवढ्यात एक काका येऊन त्यांना ओरडू लागले. परवाच या इथले खड्डे बुजवले, रस्ता चांगला केला नि आज परत कशाला खोदता वगैरे. आधी जिथे खड्डे होते तिथेच हात दाखवून ते ओरडत होते. म्हणजे ते खड्डे कोणीतरी बुजवले होते, रस्ता चालला नव्हताच. माझा हिरमोडच झाला.  पण मग वाटलं रस्ता चालत नाही म्हणजे हा रस्ता इथून कुठेच जाणार नाही, नेहमी राहणार आमची सोबत करायला, आम्हाला चालायला, रात्री खेळायला. डोक्यातलं चक्र थांबेपर्यंत ‘काम चालू रस्ता बंद’ झाला होता. ऐन दुपारी रस्ता एकदम मोकळा, मग काय ‘रस्ता बंद पण आमचा खेळ चालू’............!

   


         

Monday, April 16, 2012

वरसई

वरसई, ता. पेण, जि. रायगड. बाळगंगेच्या तीरावरचं चिमुकलं गाव. गावातला वैजनाथ (शंकर) पंचक्रोशीत प्रसिद्ध. शिवरात्रीला मोठा उत्सव असतो. शिवरात्र आणि त्रिपुरी उत्साहाने साजरी होते. कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच इथे मुख्यत्वे भातशेती आहे. भात निघाल्यावर वाल घेतात. या पट्ट्यातले कडवे वाल प्रसिद्ध आहेत. 

वरसई हे माझ्या आईच्या आत्याचं गाव. लहानपणी फार नाही पण किमान दोनतीन सुट्ट्यात तरी वरसईला गेल्याचं आठवतंय. तेव्हा वरसई फाट्यापर्यंतच एसटी होती. तिथून बैलगाडीत बसून पुढे. बरीच भावंडे एकत्र असल्याने खेळायला खूप मिळायचं. नदीवर जाणे, विहिरीचे पाणी काढणे, म्हशीचे नुकतेच काढलेले दूध पिणे ही शहरी आयुष्यात नसलेली आकर्षणंही होतीच. अर्थात लहान असल्याने, फार काम करावं लागत नसल्याने ते सुखाचं वाटत असणार. नाहीतर इतके पाहुणे आल्यावर घरच्या बाईचं जे होतं ते होतं. पुन्हा इतक्या छोटया गावात, सगळ्यांचे स्वयंपाक-पाणी करायचे म्हणजे..... पण त्या आजीच्या घरी नेहमी राबता असायचा. 

हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतीच शिवरात्रीला मी वरसईला जाऊन आले, अनेक वर्षांनी. देवळात गेल्यावर अनेक गोष्टी आठवू लागल्या. देवळात माडीवर सनई चौघडा चालू होता.  वैजनाथाच्या देवळात आम्ही दुपारी खेळायचो, तेव्हा एका दुपारी मी कुतूहलाने चौघड्यावर थाप मारली होती. तिथल्या काकांनी शुकशुक करून खाली जाऊन खेळायला सांगितलं होतं म्हणजे तिथून हाकललंच होतं. इतकी वर्षं झाली, हा प्रसंग मला कधी आठवला नव्हता. पण त्या जागी गेल्यावर क्षणात स्मृती सेवेला हजर झाली आणि तो प्रसंग समोर उभा राहिला. त्याचं नवल करतच दर्शन घेतलं. चांगलीच गर्दी होती. नंतरच्या गप्पात कळलं, आज उत्सवामुळे गावात गर्दी. दोन दिवसांनी गावातली नव्वद टक्के घरं कुलुपबंद. 

वरसई तसं कोणाला माहित असण्याची शक्यता नाही. या भागात १९८९ मध्ये मोठा पूर आला होता, ज्यात अनेक बळी गेले. त्या पुराचे उल्लेख स्थानिकांच्या बोलण्यात हमखास येतात. तेव्हा कदाचित वरसईचं नाव पेपरमध्ये आलं असेल. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना कदाचित 'माझा प्रवास' हे गोडसे भटजींचं पुस्तक माहित असेल. ५७च्या (म्हणजे १८५७) बंडाच्या ऐन धामधुमीत वरसई गावचे गोडसे भटजी उत्तरेत गेले होते. घरची अतिशय गरिबी होती. धर्मस्थळी जाऊन काही प्राप्ती होईल या विचाराने ते उत्तरेत निघाले. वाटेत झाशीला ते बंडात सापडले. पुढे सुखरूप परत आले. गोडसे भटजी कल्याणला भारताचार्य वैद्यांकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे पूजा सांगायला जात. भारताचार्य तेव्हा कॉलेजविद्यार्थी होते. गोडसे भटजींच्या तोंडून त्यांच्या प्रवासाच्या कथा ते नेहमी ऐकत. त्यांनी भटजींना हे सारं लिहून काढायला सांगितलं आणि संपादित करून यथावकाश ते पुस्तक स्वरुपात प्रकाशित केलं. मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन हा मान त्याला मिळाला. पण त्याबरोबरच त्या कालखंडाचा तो महत्वाचा दस्तावेज ठरला. कल्याणला माझे काका रहात असल्याने तिथे मी अनेकदा जाते, राहते. हे वैद्य कुटुंबही आमच्या माहितीचं. त्यामुळे वरसईचा धागा तसाही जोडला गेला आहे. 


(या पुस्तकावरील लेखासाठी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11939678.cms इथे जा)


आता बाळगंगेवर कामार्ली गावी मोठं धरण होतंय. नव्वद टक्के काम झालं आहे. त्यामुळे वरसई (आणि अनेक गावं) काही काळातच पाण्याखाली जातील. नुकसान भरपाईबद्दल नीट काही कळत नाहीये. काही गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. समितीला आपल्या मर्यादा माहित आहेत. धरण तर आपण रोखू शकणार नाही मग योग्य पुनवर्सन यासाठी धडपड चालू आहे. 

मन उदास व्हायला लागलंच. पण नंतर वाटलं, शब्दश: गाव आत्ता उठत असलं तरी ही प्रक्रिया केव्हाच सुरु झाल्ये. मुंबई-पुण्यात अनेक कुटुंबं फार वर्षापासून रहात आहेत, तिथलीच बनली आहेत. जगण्यासाठी, विकासाच्या संधीसाठी भारतातली अनेक गावं अशी वर्षानुवर्षं विस्थापित होतच आहेत. गावातली लोकंही हे जाणून आहेतच. प्रत्यक्षात नाही तर भविष्यात आपलं गाव मनात, स्मृतीत, श्रुतीत राहील हे लोकांनी पुरतं ओळखलं आहे. म्हणूनच गाव आहे तोवर शिवरात्रीला तरी येऊन, ते बघून जायची धडपड अनेकजण करतात, मी ही त्यातलीच एक........