Tuesday, August 28, 2012

उदरभरण आहे दृष्टी होण्या विशाल !!!!


वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्याला माहीत असतो. अनेकांनी लहानपणी म्हटलेला असतो. या श्लोकाची आधुनिक समतावादी आवृत्तीही आपल्याला माहीत असेलच;
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे
कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल
यातला ‘चित्त विशाल होण्यासाठी उदरभरण’ हा भाग मला फार भावतो. पण थोडं यापुढे जाऊन मी आता म्हणू शकते, उदरभरण हे दृष्टी विशाल होण्यासाठीही आहे. तुम्ही म्हणजे जे स्वच्छ बघू शकतात ते हं; कधी पूर्ण अंधारात या उदरभरणाचा म्हणजे जेवण्याचा अनुभव घेतलाय? अर्थात विजेच्या अवकृपेमुळे अनेकांनी तो घेतलाही असेल. मेणबत्ती लावून Candle light dinner म्हणून वेळ साजरीही केली असेल. पण मिट्ट काळोखात, जिथे काहीच दिसत नाही, जिथे बिलकुल उजेड नाही अशा ठिकाणी कधी मुद्दाम जाऊन तुम्ही जेवला आहात का?
हे ठिकाण आहे हैदराबादमधे. Dialogue in the Dark असं या जागेचं नाव. यात दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे Exhibition याबद्दल अधिक वाचा येथे गर्द सभोवती. दुसरा भाग म्हणजे अंधारातलं जेवण (Lunch/Dinner). जेवणासाठी आत प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी व्हीडीओ क्लिप दाखवली जाते. ताट म्हणजे घड्याळ समजून काही सूचना दिल्या जातात. उदा. ११ च्या बाजूला ताटाबाहेर पाण्याची बाटली, १ च्या ठिकाणी ताटात वाटी इ.इ. वर प्रेमळ भाषेत ‘काही तुटल्याफुटल्यास पैसे वसूल होतील’ हा इशारा.
स्वयंसेवक आपल्याला एका रांगेत (म्हणजे तुम्ही जितके असाल त्यांना) एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन जातात. या आधाराची गरज भासतेच करण आत गर्द अंधार. मग आपल्याला आतल्या मार्गदर्शक स्वयंसेवकावर सोपवलं जातं. तो आपल्याला योग्य जागी बसण्यास मदत करतो. जेवणाबाबत नेमक्या सूचना देऊन जेवण वाढायच्या तयारीला लागतो. जेवण म्हणजे Four Course Meal.
तिथे दिसत तर काहीच नव्हतं. मेनूही माहीत नव्हता फक्त Veg की Non-veg ही पसंती विचारली होती. त्यामुळे आपल्यापुढे काय येणार याची उत्सुकता होती आणि ते न पाहता अनुभवण्याचीही! प्रथम रजाकने सूप आणलं. मग स्टार्टर. त्यानंतर मेन कोर्स म्हणजे Veg fried rice सारखाच प्रकार. सर्वात शेवटी desert. जेवताना आम्हाला कुठे काय वाढलंय याबद्दल तो मोलाच्या सूचना करत होता आणि आस्थेने चौकशीही; जेवण आवडतंय ना इ.     
तसं अंधारात जेवताना, घास तोंडात जाण्याऐवजी नाकात जाणार नाही याची आपल्याला खात्री असते. पण एरवी जेवताना पदार्थाच्या वासाबरोबर त्याचे दृश्य रूपही आस्वाद घेण्यात महत्वाचे ठरते. स्टार्टर वगळता बाकी काही हाताने खायचं नव्हतंच त्यामुळे नेहमी जेवताना होणारा अन्नाचा स्पर्शही नव्हता. त्यामुळे गंध आणि चव म्हणजेच आपले नाक आणि जीभ यांचीच भूमिका महत्वाची होती. सारी ज्ञानेंद्रिये तिथे आपोआप एकवटल्यासाखे वाटले.
हा जेवणाचा अनुभव फारच वेगळा होता. एकतर आपले कान नीट शाबूत आहेत याची खात्री झाली, कारण मुख्य भिस्त त्यावर होती. आपल्याला दिसतं त्यामुळे इतर ज्ञानेंद्रियांवर आपण फार कमीवेळा अवलंबतो असं लक्षात आलं. दुसरं म्हणजे इकडे तिकडे बघायला काही नसल्याने जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. तिसरं म्हणजे जेवताना गप्पांचा अभूतपूर्व आनंद घेता आला. अभूतपूर्व यासाठी की इतकं विनाव्यत्यय जेवण आपण कधीच केलं नसल्याचं जाणवलं. चौथं म्हणजे पोट भरल्यावर आम्ही थांबलो. रोज जेवताना एखादा घास अंमळ जास्त झाला तरी तो पानात दिसत असल्याने सहसा आपण तो खाऊन टाकतो. पण इथे तसं झालं नाही. थोडे पदार्थ वाया गेले, पण त्या दृष्टीविहीन जगात आपल्या शारीर संवेदना फार सजगपणे अनुभवता आल्या आणि पोट भरल्याचे समाधान वाटताक्षणी आम्ही थांबलो.
छान जेवून बाहेर लख्ख प्रकाशात आलो. मागोमाग आलेल्या अंध रजाकने आमचे आभार मानले. क्षणभर मोह झाला त्याच्याबरोबर फोटो घ्यायचा, पण ती गोष्ट रजाकसाठी किती अप्रस्तुत आहे हे आम्हाला जाणवलं. त्याचा हात हातात घेऊन आम्ही त्याचा निरोप घेतला. या उदरभरणामुळे दृष्टी खरोखर विशाल होण्याचा हाच तो क्षण होता.

टीप: Dialogue in the Dark: Moving beyond sight! दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. यामध्ये अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. हैदराबादला गेलात तर हा अनुभव चुकवू नका. अधिक माहितीसाठी पुढील लिंक बघा;