Sunday, July 31, 2011

RSP


आठवीत आल्यावर आमच्या वर्गाला RSP आहे हे कळलं. आधी ते काय असतं माहीतच नव्हतं. दादा मागे एकदा म्हणाला होता RSP म्हणजे रेल्वे संडास पोलीस. म्हणजे पोलिसांचा गणवेश करून रेल्वेचे संडास साफ करायचे. पण संडास साफ करायला पोलिसाचा ड्रेस कशाला ते मला कळत नव्हतं, मग मी त्याला हजार प्रश्न विचारले. तो वैतागला असणार, पण थोडक्यात मला कळलं ते असं, रेल्वेतून खूप माणसं तिकीट न काढता प्रवास करतात आणि TC आल्यावर संडासात लपतात. त्यांना पकडायचं काम RSP चं. मला कितीतरी दिवस हे खरंच वाटत होतं. पण हळूहळू RSP म्हणजे काय ते कळलं. आठवीची शाळा सुरु झाल्यावर आम्हाला RSPचा युनिफॉर्म आणायला सांगितला. हे आम्ही घरी जाऊन सांगितल्यावर दादाला त्या चेष्टेची आठवण झालीच आणि त्याचं चिडवणं संपेचना. मी गळा काढायच्या बेतातच होते तोच त्याच्या मित्राने हाक मारल्याने तो निघून गेला. 
मग तो युनिफॉर्म म्हणजे शिट्टी, टोपी आणि shoulders आणले. मग एक दिवस एक पोलीससाहेब शाळेत अवतरले. त्यांनी RSP म्हणजे रोड सेफ्टी पेट्रोलबद्दल बरीच माहिती सांगितली. त्यातला रस्त्यावरची सुरक्षा हा भाग कळला पण पेट्रोल ही काय भानगड आहे ते कळत नव्हतं आणि त्या साहेबांचा आवाज किंवा जीभ जड असल्याने काही शब्द कळतच नव्हते. त्यातून मागल्या बाकावरच्या मुली इतक्या खुसफुसत होत्या की बास.
पुढल्या आठवड्यापासून एक हवालदार यायला लागले, ते एकदम खणखणीत बोलायचे. त्यांच्याकडून ते पेट्रोल नसून patrol म्हणजे सुरक्षित वाहतुकीसाठी केलेली फेरी असं काहीतरी असल्याचं कळलं. ग्राउंडवर ते आमच्याकडून काही व्यायाम प्रकार करून घ्यायचे, एक........दोन........तीन......चार वाले. त्यांची एक सवय म्हणजे ते सतत बोलायचे. व्यायाम प्रकार करताना ते "एक.......दोन......तीन...." चालू करणार आणि मधेच बोलायला लागणार. मग त्यांनी ४ म्हणलं का? हात खाली घ्यायचे का? अशी आमची चुळबुळ सुरु व्हायची. त्यात काही हात वर, काही खाली; काही खाली की वरच्या दुग्ध्यात खांद्यावर असं चालू असायचं. एकदा असंच आमचे हात वर असताना त्यांचा लांबच्या लांब पट्टा सुरु झाला म्हणजे तोंडाचा. सहज वर आभाळात लक्ष गेलं तर एक निळाशार पतंग उडताना दिसला, इतकं मस्त वाटत होतं बघायला. मी इतकी दंग झाले की पतंगाशीच पोचले म्हणजे मनाने. जागी झाले, म्हणजे संस्कृतच्या बाईंच्या शब्दात 'मर्त्यलोकात' आले तेव्हा पट्ट्यातून जोरात आवाज येत होताचार चार चार. दचकून मी हात खाली घेतले. म्हटलं आता आहे आपली, पण ते काय बोलले नाहीत. बाकीच्यांना काय, दात काढायला संधीच.   
दुसऱ्या सहामाहीत आम्हाला शाळेबाहेरच्या चौकात traffic control साठी न्यायला लागले. रहदारीला शिस्त लावणे आणि आधी ती आपल्या अंगी बाणवणे असा दोन कलमी की काय तो कार्यक्रम होता. सुरुवातीला सगळी रहदारी म्हणजे माणसं आमच्याकडे वळून वळून बघायची. लोकांना शिस्त लावण्याचं काम जोरातच सुरू होतं. “हीच शिस्त तुमच्याही अंगी कायम राहायला हवी, असेच देशाचे आदर्श नागरिक बनतात” असं आम्हाला आमचे हवालदार सांगत असायचे.
शाळेतल्या मुली हे काम करतायत म्हटल्यावर लोक ऐकायचे. कोणी रहदारीचा नियम तोडला की शिट्ट्या वाजल्याच. शिट्टी वाजवायला जाम मजा यायची, त्यामुळे त्याबाबतीत आमचा उत्साह दांडगा होता. कधी कधी एखाद्या बाजूच्या पाचसहा शिट्ट्या एकदम जोरदार वाजायच्या.  माणसं दचकून इकडे तिकडे व्हायची, कुणीकुणी आहे तिथेच थांबायची. दोनतीन छोटी मुलं घाबरून रडलीही होती एकदा. शिट्ट्यांनी गोंधळ वाढतोच आहे हे पाहून मग आमच्या शिट्टी वाजवण्यावर गदा आली. मग त्यातली मजाही कमी झाली.
शाळेच्या जवळच एक काका होते. ते आसपास फिरून चिवडा विकायचे. त्यांना आमचं फार कौतुक वाटायचं. दर शनिवारी ते आम्हाला चिवडा खायला द्यायचे, पैसे न घेताच आणि मग चिवडा विकताना जोरदार म्हणायचे, “चिवडा खाऊन पोरी हुश्शार.”
वार्षिक परीक्षा जवळ आली होती. RSPचं एक दोन दिवसांचंच काम बाकी होतं. एका संध्याकाळी मी शाळेकडे गेले होते, तिथल्या दुकानातून वह्यापेन वगैरे घ्यायला. शाळेपुढच्या चौकात गर्दी जमली होती, अपघात झाल्यामुळे. त्या दृश्याने मला घेरीच यायला लागली. त्या माणसावर  पांढरा कपडा टाकला होता. तरी डोक्यापासून रक्ताचा मोठा ओघळ वाहिलेला दिसत होता. त्या माणसाच्या चपला कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत होत्या. मला खूपच भीती वाटायला लागली. तेवढयात लोकांच्या बोलण्यावरून कळलंच, ते चिवडेवाले काका होते. काकांना टेम्पोची जोरदार धडक बसून ते जागीच ठार झाले होते. माझे हातपायच लटपटायला लागले. कशीबशी घरी पोचले ती आजाऱ्यासारखीच. नंतर दोनतीन दिवस शाळेत जाऊ नाही शकले. trafficचं कामही तोवर संपलं होतं. पण RSP चा अर्थ आणि त्याची गरज मला नीटच समजली होती.       

Tuesday, July 5, 2011

टेन्शन (फ्री)

सातवीची वार्षिक परीक्षा झाली. सुट्टीत छान आराम झाला आणि फिरणंही. आठवीत आता अभ्यासाचे विषय वाढले आहेत आणि इतरही काही गोष्टी. म्हणजे 'ते' काहीतरी होतं ना मुलींना या वयात. वर्गात काही मुलींची तर इतकी खुसपूस चालते ना? काही मुली म्हणजे ‘तशा’... स्वत:ला खूप मोठं झाल्यासारखं समजतात. अधून मधून पी. टी. च्या तासाला त्यातली एखादी तरी ‘ते’ कारण सांगून आराम करणारच. त्यांच्या गप्पा तर काय, काही तरी चावट बोलत असतात. एकदा सहज कानावर पडलं की आमच्या वर्गातल्या सुविला एका मुलाने friendship मागितली आहे. अशी friendship मागतात हे मला नवीनच होतं. मला वाटायचं ज्यांच्याशी आपलं पटतं, त्यांच्याबरोबर हळूहळू आपली मैत्री होत जाते, दिप्या, राणी, संगी आणि कितीतरी जणांशी माझी मैत्री आहे तशी. पण काहीजणींकडून कळलं ही friendship वेगळी. Friendship, प्रेम, लग्न असं ते असतं. त्यांना याबाबत असलेल्या माहितीबद्दल मला आदरच वाटला. कोण कुठल्या गोष्टींचा अभ्यास करेल सांगता येत नाही.  
मलाही आपल्याला ‘तसं’ होण्याची भीती वाटत होती. पण नंतर आई आणि आमच्या डॉक्टरबाईंनी समजावून सांगितलं. सगळं कळलं नाही पण भीती कमी झाली. आता प्रत्यक्ष होईल तेव्हा बघायचं. कधीकधी टेन्शन येतं, काळजी घेता येईल ना. त्यात मनात कायकाय वेगळंच येत असतं. मधूनच घाबरायला होतं. एकदा TV वर एक सिनेमा पाहत होते तर ते हिरोहिरोईन एकमेकांच्या इतके जवळ आले की माझ्याच छातीत धडधडायला  लागलं. या सगळ्या सिनेमात प्रेम हाच विषय कसा असतो? हा प्रश्न पडला तरी ते आपल्याला पाहायला आवडतं, ते का?
मला शाळा आवडते पण शाळेत यायला जायला नाही आवडत, म्हणजे तो रस्ता नाही आवडत. शाळेजवळच्या चौकात कायम मवाली पोरं उभी असतात आणि मुलींची टवाळी करत असतात. ते काय बोलतात त्या सगळ्याचा अर्थ कळत नाही पण काहीतरी घाणेरडं बोलतात. अस्सा राग येतो ना, पण भीतीही वाटते, कसली? जाऊदे किती त्रास होतो डोक्याला, हे विचार करून? तेवढ्यात शेजारची निमावहिनी आली. डोळे लाल झालेले, तिला सासुरवास आहे म्हणे. हे आणखी एक टेन्शन. बाईला असा त्रास का होतो, आणि तो सहन का करायचा? पेपरमध्ये हुंडाबळीच्या बातम्या येतात. कुठेतरी अशी काही वाईट लोकं असतात असं मला वाटायचं पण आमच्या शेजारच्या वाड्यातही असं घडलं. 
त्यानंतर लगेचच पुण्यात अशी एक घटना घडली, सुनेला मारून टाकण्याची आणि त्यावर पेपरमध्ये खूप लिहून आलं. महिला संघटना की काय असतात त्यांनी आवाज उठवला. त्या दिवशी शाळेतून येताना लक्ष्मी रोडवरून खूप मोठा मोर्चा चालला होता आणि आश्चर्य म्हणजे घोषणा, आवाज काही नव्हतं. त्यातल्या बायांनी स्वत:ची तोंडं बांधली होती. मूक मोर्चा, निषेधाचा. शांतताच होती सगळी, ती बघ्यांमध्ये पण पसरली होती. नेहमीच्या गडबड गोंगाटाच्या रस्त्यावरच्या त्या शांततेची मला भीतीच वाटली एकदम. अंगावर सरसरून काटा आला. शेजारच्या वाड्यातली घटना आठवली, निमावहिनी आठवली. बापरे म्हणजे असं कुठेही होऊ शकतं. छातीत धडधडत होतं तरी मोर्चा पाहताना बरंही वाटत होतं, का बरं वाटतंय ते नीट कळत नव्हतं.    
चौकातली ती मवाली पोरं, मोर्चा निघून गेला तरी गप्प उभी होती. तिथे जवळच बसणारी भाजीवाली एकदम उठली आणि कडाकडा त्या पोरांना बोलू लागली. ‘तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का, दिवसभर उभं राहून पोरीबाळींची छेड काढता, सुधारा पोरांनो. उद्यापासून इथे आलात तर बघा, त्या मोर्चा काढणाऱ्या संस्थेतच तक्रार करते, पोलीसातच देते तुम्हाला’, अशा अर्थाचं काहीतरी ती त्यांना बोलत होती. आजूबाजूची माणसंही तिला दुजोरा देत होती. त्या पोरांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर शाळेत जाता येता ती पोरं फारशी दिसायची नाहीत, असली तरी पानटपरीजवळ गप्प उभी राहायची. हळूहळू आम्हालाही तो त्रास थांबल्याची खात्री झाली. त्या दिवशी मोर्चा पाहताना नेमकं काय बरं वाटलं ते मला आता समजलं होतं, मोर्चा पाहून भाजीवालीला धाडस आलं आणि त्यामुळे मुलींची होणारी टवाळी थांबली. आम्ही मजेत शाळेत जातयेत होतो, त्या रस्त्यावरून जायचं टेन्शन आता उरलं नव्हतं.