Sunday, June 19, 2011

संध्याकाळ


"दहा वीस तीस चाळीस . .. .. . . शंभर"
डबडा ऐसपैसमधे सुकडीवर राज्य होतं. सगळी मोठी मुलं नि आमच्यासारखी बारकीपण, एकत्र खेळत होती. मी, दिप्या, राणी आणि संगी आम्ही चौघंच बारकी. बाकी वाड्यातली सगळी मोठी पोरंपोरी. दादाला माझी काळजी. मला नेहमी सांगतो, एक कोणीतरी आऊट झाल्याशिवाय तू आउट होऊ नको. माझ्यावर  राज्य आलं तर मला पार पिदवतील ही त्याला काळजी. शाळांना सुट्टी असल्याने दुपारचा चहा झाल्यावर खेळ सुरू झाला होता.   
सुकडी जरा बावळटच आहे, आता किती वेळा डबडा उडतो नि किती वेळा तिला  राज्य घ्यायला लागतं” अशी चर्चा मोठया मुलीत चालली होती. मी तरी काय त्यांच्या तिथेच लपले होते म्हणून ऐकलं. सुकडी म्हणजे शकुंतला, संगी म्हणजे संगीता. चांगल्या नावांची वाट लावण्यात आम्ही एकदम बहाद्दर. दिप्याचा दादा खालून भसाया आवाजात माडीवरच्या सुरेशला ‘सुया अशी जोरदार हाक मारतो. दिप्याचे आजोबा म्हणतात, असली हाक म्हणजे पोटात सुरा खुपसल्यासारखंच वाटतं. तर असली ती नावं.
तेवढयात सुकडीचा आवाज आला,  म्या इस्टोप.  म्या बाहेर येईना. सुकडी शिरा ताणून ओरडत होती. मी लपले होते त्या माडीवरल्या कोप-यातल्या अडगळीतून खाली सुकडी दिसत होती. ती बोलत होती त्या दिशेला रम्याच्या शर्टची बाही दिसत होती. आश्चर्य म्हणजे तो हात हलत होता, सुकडीला बोलावत होता. सुकडी थोडी पुढे गेली. कचाकचा बोलण्यातिचं डब्याकडे दुर्लक्ष झालं आणि रम्याचा शर्ट दिसत होता त्याच्या विरुध्द दिशेनी येऊन रम्या डबडं उडवून पळाला. नक्कीच दुसऱ्या कोणीतरी त्याचा शर्ट घालून सुकडीला उल्लू बनवलं होतं. झालं, असं पाचसात वेळा तरी सुकडीला राज्य घ्यावं लागलं. पार रडायला आली. मग तिची ती कजाग (हा शेजारच्या काकूंचा शब्द) आज्जी बाहेर आली आणि तिनी मोठया पोरांचा जो उद्धार केला तो केला. सुकडीला घेऊन ती गेली. मग मजाच गेल्यासारखं झालं.
आम्ही बारकी पोरं लगोरी खेळायला लागलो आणि मोठया पोरंपोरी कट्ट्यावर बसल्या म्हणजे वेगवेगळ्या हं. हे एक मला कळत नाही, खेळतात तर एकत्र पण गप्पा मारताना मात्र वेगवेगळे. त्यातून पोरींची इतकी खुसपूस चालली होती की त्या बाजूने नुसताच फिसफिस आवाज येत होता. पोरांचा जोरदार गोंगाट सुरू होता. दिप्याचा दादा कधीतरी मारलेल्या सिक्सरची action करून दाखवत होता. “अय्या” सुमाताई एकदम म्हणाली. त्यावर ते साहेब एकदम गडबडले पण चेहऱ्यावरून एकदम खुश झालेले वाटले.   
सुकडी आणि तिची आजी बाहेर जाताना पोरांच्या तिथूनच गेल्या. “ताळतंत्र सोडलाय अगदी मेल्यांनी, आरडाओरडा काय करतील, फिदीफिदी काय करतील, घरातली इकडची काडी तिकडे करायला नको” आजींचा पट्टा जोरातच सुटला होता. तेवढयात शर्मा आंटींचा कमलेश त्याच्या जिमीबरोबर आला. जिमी म्हणजे तक्रारखोर, केसाळ कुत्रा, सारखा केकाटणारा. शर्मा आंटीच तेवढ्या आंटी आहेत, का कोण जाणे? बाकी साऱ्या काकू, मावशा नाहीतर माम्या. तेवढयात कमलेशच्या हातून जिमी सुटला आणि धावला तो थेट सुकडीकडेच. मग आजींचा लांब सुटलेला पट्टा एकदम छोटा होऊन थांबलाच. त्या भरभर चालत जाऊन दिसेनाशा झाल्या. पोरं हसून हसून पार पडायला आली.
जिमी परत आला आणि त्याने सम्याच्या पायाला खांब समजून आपला कार्यक्रम सुरू केला. मग सम्याची आणि कमलेशची चांगलीच जुंपली. आम्ही बारकी पोरं तर हसूनहसून लोळायला आलो होतो. मग सम्या आणखीनच चिडला. आमच्याकडे मोहरा वळवणार तोच त्याच्या बाबांची दणदणीत हाक ऐकू आली, मग तो पळालाच घरी.
मग कुणाकुणाचे बाबा आणि काही जणांची आईपण यायची वेळ झाली त्यामुळे  कुणीकुणी घराकडे जायला लागले. एव्हाना आम्ही कट्टयावर बसून पत्ते चालू केले होते. खेळायला जाम मजा येत होती. पण आता अंधारायलाही लागलं होतं. अजून आम्हाला कोणी बोलावलं कसं नाही हा विचार मनात येत नाही तोवर दिप्याला बोलावणं आलंच. आमची चौकडी मोडलीच. राणी म्हणाली म्हणून आम्ही पाच तीन दोन खेळायला लागलो पण काय मजा येईना. मग हळूहळू घरी निघालो ते उद्या संध्याकाळी कायकाय करायचं ते ठरवतच.    

Sunday, June 5, 2011

डबा

शाळेच्या दारापर्यंत पोचलेच होते तोवर शाळेची घंटा ऐकू आली. आमचं हे कायम असंच. कितीही लवकर निघा पण वाटेत मैत्रिणींना हाका मारतत्यांना बरोबर घेऊन येताना वेळ कुठे पळून जातो कळतच नाही. दारातल्या आजींकडून चिंचा घ्यायच्या होत्या पण घंटा ऐकून ताशी कितीतरी मैल की काय म्हणतात त्या वेगाने वर्गातच. पाचवीत आता कुठून कुठून आलेल्या मुली होत्या. वर्गात बरीच गडबड चालू होती. चष्मिस म्हणजे आमची मॉनीटर पोरींना शांत करत होतीतिला कोण दाद देत नव्हतं ते सोडा. तेवढ्यात प्रार्थनेचा टोल पडला. मग कायजादूची कांडी फिरवल्यासारखी शांतताच.

पाचवीत आल्यावर आपण फार मोठे झालोत असं वाटतंय. आज तर मी पोळ्याही लाटल्या आणि लाटताना आईला शंभर प्रश्न विचारले. त्यात पोळी गोल न होता माझंच बोलणं ऐकतेय असं वाटत होतं म्हणजे माझ्या बाजूनेच ती लांबलचक होत होती. मग आई म्हणालीचपोळी लाटता नाही आली तरी शिंगं फुटली आहेत म्हणून. बाबांनी पहिल्यांदा असं म्हटलं तेव्हा आमचा मुक्काम काळजीने आरशासमोरच. खूप खूप वेळ पाहूनही शिंगं दिसेनाच. तेवढ्यात नमीने हाक मारलीकाचा पाणी खेळायला. मग काय शिंगांचा विसरच. नमी माझ्या काचा घेऊन गेली आहे. आज तिच्याकडून घायच्याच.
मग वर्गातल्या सगळ्याजणी एकदम माझ्याकडे पाहायला लागल्याहाक मारू लागल्या. आपण तर काही नाही केलंमगतेवढ्यात बाईंचा आवाज आलाच, "झोप झाली नाही वाटतं." म्हणजे प्रार्थनाप्रतिज्ञा संपून हजेरीचा कार्यक्रम चालला होता. मी गडबडून हजर’ म्हणाले. आमचं हे असंच. डोक्यात काय काय सुरु झाल्यावर आपण कुठे आहोत हे विसरायलाच होतं. एकदा वर्गात खूप दंगा केला म्हणून बाईंनी मागच्या बाकावर उभं केलं होतं. बाई माझ्यापेक्षा बुटक्या दिसत होत्या. उंचावरून सगळ्या पोरींची डोकी मजेदार दिसत होती. कुणाच्या वेण्याकुणाचे बोसुटलेल्या रिबिनी. पुढच्याच बाकावर बसलेल्या सुलीच्या डोक्यातली ऊ पण दिसली. मजेत चालली होती बेटीजंगलातून पायवाटेकडे म्हणजे केसातून भांगाकडे. एकदम हसूच आलं मला. बाईनी रोखून पाहिलं एकदा. काही बोलल्या नाहीतपण त्यांना काय म्हणायचं ते मला नीट कळलं, “शिक्षा केली तरी पोरी दात काढतातकाय करायचं यांना इ. इ. तर आमची गाडी अशीच भरकटत असते.
हजेरी घेऊन बाई गेल्या. पाचवीत ही एक मजाच आहे. प्रत्येक विषयाला वेगळ्या बाई. इंग्लिशच्या बाई खूप छान आहेत. म्हणजे त्या बोलतात त्यातलं सगळंच कळत नाही तरी ऐकत रहावसं वाटतं. मग मधल्या सुट्टीपर्यंत कसले कसले त्रास म्हणजे तास झाले. तोपर्यंत पोटात कावळेच कावळे. कधी एकदा डबा खातोय असं झालं होतं. या शाळेत पारावर बसून डबा खायला मजा येते, गार गार सावलीत. 
डबा काढून बाकावर ठेवला तेवढ्यात पुढल्या बाकावरच्या शमी आणि सोनीचं भांडण सुरु झालंम्हणजे मारामारीच. दोघी ऐकेनात. झिंज्या ओढतचापट्या मारत मस्तच कार्यक्रम चालला होता. मग मला एकदम भुकेची आठवण झाली. डबा घ्यावा म्हणून पुढे झाले तोवर त्यांच्या झटापटीत तो लांब उडाला. टन टीन टन न्न्न्न्न्न्न्न्न...... डब्याने चांगलाच सूर लावला, निषेधाचा की काय तो. मी तर डोळे गच्च मिटूनच घेतले. डब्याचा आवाज थांबल्यावर डोळे उघडून पाहिलं तर तो आ वासून पडला होता, म्हणजे झाकण बाजूला आणि खाऊ सगळा बाहेर. मला तर रडूच फुटलं. तेवढ्यात क्लासटीचर आल्या, कशाला कोण जाणे? पण सगळा रागरंग बघून त्यांनी शमी सोनीची जी हजेरी घेतली ती घेतली. सांडलेला डबा आणि माझं रडणं पाहून त्या माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, "चल". “पण बाई मी काही नाही केलंअसं म्हणत मी जास्तच रडायला लागले. आज नेमकी डब्यात पोळी भाजी नाही हे वर्गात पसरलेला चिवडा सांगतच होता. 
"आता काय होणार? आपली आता वरातच की काय?" डोक्यात काय काय येत होतं. चालता चालता आम्ही मोठ्या बाईंच्या ऑफिसकडे जायला लागलो. मला भीतीच वाटायला लागली. पण बाई त्या बाजूनी मला टीचर्स रूममधे घेऊन गेल्या. कितीतरी बाई तिथे डबा खात होत्याच. आमच्या बाईंनी प्रेमाने मला त्यांच्या डब्यातला मसालेभात खायला दिला. माझा डबा सांडला हे कळल्यावर इतर बाई पण काय काय द्यायला लागल्याथालीपीठबर्फीचातुकडाकेळंराजगिरा वडीसाबुदाण्याची खिचडी आणि काय काय. मग तर काय एकीकडे रडू येत होतं आणि एकीकडे मस्त वाटत होतं. आग्रह करकरून त्यांनी मला खाऊ घातल्याने पोट टम्म भरलं. मग मी सगळ्यांना तो खाऊ खूप आवडल्याचं सांगितलं. त्यावर आता डबा सांडू नको असं सगळ्या म्हणाल्या. वर्गात परत येताना मी हवेतच. वर्गात आल्यावर रंगवून सगळ्यांना सांगितलं. न खाल्लेल्या पदार्थांचीही नावं ठोकून दिली. आपल्या बाई किती चांगल्या आहेत नाईअसं ऐकणारी प्रत्येकच मुलगी म्हणून जात होती. वर्गात माझी ऐट विचारूच नका.
घरी येऊन पुन्हा आमची रेकॉर्ड सुरुसगळ्यांनी माझ्या बाईना चांगलं म्हणल्यावर मगच टकळी थांबली. रात्री झोपताना डोक्यात तोच विषय. पण तेवढ्यात काहीतरी लखकन समजल्यासारखं वाटलं. दुपारी सगळ्या बाईंनी दिलेला खाऊ खाताना आणि नंतर ती गम्मत रंगवून रंगवून सांगतानाकोणत्याच बाईंच्या डब्यात पोळी भाजी नव्हती हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.