Monday, March 21, 2011

Celebration

आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस नुकताच साजरा झाला. आता मार्चची अखेर आली आहे, एव्हाना सारे विसरलेही असतील. गेली काही वर्षे महिला दिन जोरदार साजरा होऊ लागला. एका दृष्टीने हे चांगलं अशासाठी की याला मान्यता मिळू लागली. पण हळूहळू त्यातला संघर्षाचा आशय हरवला आणि उत्सवीकरण चालू झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन वाजत गाजत पार पडला. वृत्तपत्रे रंगली, अन्य माध्यमांनीही ताल धरला. सगळ्यांचाच होता ‘स्त्री’त्वाला सलाम, स्त्री ‘शक्ती’ ला प्रणाम, स्त्रीच्या गुणांना (super woman असली तरच) अभिवादन. मग यशस्वी स्त्रियांच्या नावांची जंत्री वगैरे.......... मग काही celebrities चे interviews……. बहुतेकांची सुरूवात “मी feminist वगैरे नाही” किंवा “feminist भूमिकेतून मी बोलत नाही” म्हणजे मुद्दा मांडण्याआधीच सारवासारवीची घाई.
तर Post-Feminist उत्सवी समाजातले असे हे महिला दिन;
  • स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास अनुल्लेखाने मारणारे
  • सामाजिक रचितातील विषमतेबद्दल काही न बोलता, आपसुख निसर्गदत्त आहे त्याचाच उदो उदो करणारे, उदा. मातृत्व
  • निव्वळ ‘income generation’ म्हणजे सबलीकरण मानणारे उदा. बचतगट
  • वैयक्तिक यशाला महत्व देणारे, careerist, महात्वाकांक्षी स्त्रियांचे कौतुक करणारे
  • Celebrity महिलांच्या ‘मायलेक’ ष्टाईल मुलाखती छापणारे
आठ मार्चचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. यावेळी तर हा १०० वा महिला दिन साजरा झाला पण त्याची खबर Opinion makers ना नसावी बहुधा.
Celebrities च्याही बोलण्यात “आपण मनापासून परिश्रम केले की सारं मिळतं, विशेष सवलतींची काय गरज?” अशी विधाने वारंवार दिसतात. त्यांच्या शहरी, सुशिक्षित, मोकळ्या कुटुंबाच्या पातळीवर हे खरे असेलही. पण छोट्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या, मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या, शिक्षणासाठी कष्ट सोसणाऱ्या बायामुलींचे काय, शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे काय?
लिंगभावाच्या संदर्भात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.
पण थांबा हो, सध्या celebration चा मूड आहे!