Friday, February 3, 2017

पार्च्ड आणि पिंक


पार्च्ड आणि पिंक हे दोन्ही सिनेमे स्त्री-मुक्तीचा उद्गार म्हणून चांगलेच चर्चेत आले. एकतर ते साधारण एकाच वेळेत सिनेमाघरात होते आणि दोन्ही चित्रपटात काही वरवरची साम्ये दिसतात. दोन्ही चित्रपटात तीन नायिका (Protagonist) आहेत. दोन्ही चित्रपटातल्या नायिकांना पुरुषी अत्याचाराला सामोरं जावं लागलं आहे. पार्च्डमधल्या तीन स्त्री व्यक्तीरेखांचा दर्जा वेगवेगळा आहे, म्हणजे पुरुषांशी असलेल्या नात्यासंबंधात वेगवेगळा आहे, अर्थात त्यावर आजही स्त्रीचा सन्मान ठरतो हे खरे आहेच. रानी विधवा आहे, लाजो विवाहित पण मूल नसलेली आणि बिजली ही नर्तकी आणि वेश्याव्यवसाय करणारी आहे. चित्रपट म्हणून पार्च्ड, मला फारसा आवडला नाही. या चित्रकथेत काही बलस्थाने आहेत, जी पूर्वार्धात थोड्याफार प्रमाणात फुलतात. या भागात सिनेमा उत्सुकता चांगलीच टिकवून ठेवतो. मध्यंतर होताना रानी (तनिष्ठा बॅनर्जी) आपल्या मुलाला सांगते, “मर्द बादमे बन, पहले इन्सान बनने की कोशिश कर।” हे सरप्राइज वाटलं तरी ते सकारात्मक आहे. पार्च्ड मधल्या तिघींमध्ये मला त्यातल्या त्यात रानी ही व्यक्तिरेखा सशक्त वाटली. जीवनाच्या अनुभवातून तिला आलेलं शहाणपण परिपक्वतेकडे जातं. यामध्ये अर्थातच सुनेला, सासूच्या टिपिकल मानसिकतेतून वागवण्यासारखे टप्पे आहेतच. तरीही शेवटी ही रानी सुनेला, तिच्या प्रियकरासोबत रवाना करण्यासारखा निर्णय घेते, हे पाहणे फार ह्रद्य  आहे.
रानी-बिजलीसोबत मनसोक्त फिरणारी, अगदी चावट बोलणारी, बसमध्ये बसल्यावर खिडकीबाहेर डोके काढून मोकळी हवा चाखणारी लाजो (राधिका आपटे) स्वातंत्र्याकांक्षी वाटते, पण अत्याचारी नवऱ्याला मात्र कधीच विरोध करत नाही. पुरुषी अत्याचाराला कधीच प्रतिकार न करणारी लाजो, मूल हवे म्हणून अनोळखी माणसाशी संग करते ही बाब त्या व्यक्तिरेखेचा स्वाभाविक विकास वाटत नाही. रानीची १५ वर्षाची सूनही लग्न मान्य नाही म्हणून स्वत:चे केस बारीक कापून आपल्या परीने प्रतिकार करते. पण वयाने प्रौढ, भरतकामात प्रवीण आणि त्यातून कमावणारी लाजो मात्र नवऱ्याचा मार खातच रहाते.
बिजली (सुरवीन चावला) ही नौटंकीमध्ये नाचणारी आहे. पुरुषांच्या भावना चाळवणारे नृत्य करणे आणि जास्त पैसे देणाऱ्या गिऱ्हाईकांची शय्यासोबत करणे हा तिचा पेशा आहे. रानीच्या नशेत असलेल्या नवऱ्याला बिजली घरी पोचवायला जाते तेव्हा रानी तिच्याशी माणुसकीने वागते, तिला जेवायला देते. तेव्हापासून रानी आणि बिजली खास मैत्रिणी होतात (अर्थात हे बिजलीच्या बोलण्यातून कळते). रानी आणि लाजोही शेजारणी. एकमेकीशी सुखदु:ख, बहुधा दु:खच शेअर करणाऱ्या. मग या तिघी घट्ट मैत्रिणी होत जातात. त्यांच्या मजेदार सहलीत त्या रानीच्या सुनेलाही सहभागी करून घेतात तेव्हा खरेच माझ्या डोळ्यात पाणी आले.
किशन हा त्या गावातला तरुण, वेगळी वाट चालतो आहे. गावातल्या स्त्रियांना काही प्रशिक्षण/काम देऊन सक्षम करायचा प्रयत्न करतो आहे, त्याची पत्नी मणिपूरची आहे. तिला स्थानिक लोक विदेशी समजतात, स्थानिक तरुण ज्यात रानीचाही मुलगा आहे ते तिला कायम त्रास देत रहातात. पुरुषी अत्याचारी मानसिकता अधिक गडद करण्यासाठी या व्यक्तिरेखेची योजना केल्यासारखे वाटते. किशन ही एकमेव पुरुष व्यक्तिरेखा समंजस आहे. बाकी सगळे पुरुष अत्याचारी, बाईच्या मनाचा बिलकुल विचार न करणारे आहेत. लाजोच्या नवऱ्याला आपण मूल जन्माला घालू शकत नाही हे माहीत आहे. तरीही तो लाजोला वांझ म्हणून मारहाण करतो. तिला दिवस गेल्यावरही रांड म्हणून निर्दयपणे मारहाण करतो. त्यामुळे अत्याचारी पुरुष आणि बळी स्त्री अशाच घिस्यापिट्या प्रतिमा दिसत राहतात. लाजोचा अत्याचारी नवरा घरात अपघाताने जळून मरतो तेव्हा बाहेर रावणदहन सुरु असते ही अशीच गुळगुळीत प्रतिमा.
बिजली बिनधास्त आहे मात्र तिलाही स्पर्धा, पुरुषी अत्याचाराची भीती आहेच. तिला सामान्य आयुष्य जगावेसे वाटते. तिच्यासोबत काम करणारा राजू तिला जीवनात सोबत करेल असे वाटत असतानाच तो तिचा दलाल होऊ पाहतो. ‘खुदकी कदर करना सीख’ असे बिजलीला सांगणारा राजू, तिच्या शरीराच्या सौद्यातच रस दाखवतो तेव्हा इथेही शेवटी सगळे पुरुष असेच, हा विचार दिसतो.
या तीन स्त्रियांमधील सशक्त आणि एकमेकीना बळ देणारे नाते ही या कथेची जमेची बाजू. पण तरीही चित्रपटाचा शेवट अतिरंजित वाटतो. शेवटी तिघीजणी आपला मार्ग शोधायचे ठरवून एकमेकींच्या सोबतीने मोठ्या जगात (मुंबईत) जायचे ठरवतात. ही ही स्वातंत्र्याची एक गुळगुळीत प्रतिमा. या तीनही व्यक्तिरेखा, त्यांची सामाजिक-भौतिक परिस्थिती पहाता, खरेतर प्रतिकाराच्या किंवा अगदी स्वातंत्र्याच्या दिशेने जाणाऱ्या काही जागा त्यांच्या भवतालात आहेत, त्यांचा शोध या स्त्रियांसाठी स्वाभाविक ठरला असता. मात्र त्या निघून जायचे ठरवतात आणि त्याचे रानीच्या तोंडी येणारे स्पष्टीकरण फारच लंगडे वाटते. ‘किशनने आपल्याला कौशल्य शिकवले आहे त्याच्या बळावर कुठेही काम करून राहू’ हे रानीचे म्हणणे फार भाबडे वाटते, त्या व्यक्तिरेखेच्या शहाणपणाशीही ते जुळत नाही. अशा या ढोबळपणामुळे, गुळगुळीत प्रतिमांमुळे आणि व्यक्तीरेखांच्या अस्वाभाविक वर्तनामुळे पार्च्ड बेगडी वाटतो.   
आता पिंककडे बघू. पिंक मधल्या तिघी तरुणी शहरी, कमावत्या, स्वतंत्र विचारांच्या आणि बाईच्या पारंपारिक प्रतिमेत अजिबात न बसणाऱ्या आहेत. एकदा मीनल (तापसी पन्नू), फलक (कीर्ती कुल्हारी) आणि अँड्रीया (अँड्रीया तरीयांग) रात्री रॉकशो पहायला जातात. तिथे ओळखीच्या तरुणाबरोबर आलेल्या, त्याच्या मित्रांशी त्यांचा परिचय होतो. ते या तरुणींना डिनरला बोलावतात, सगळे ड्रिंक घेतात. ते तरुण चतुराईने तिघींना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन जातात. तिथे त्यांच्यावर जबरदस्ती करू पाहतात. बळजबरी करू पहाणार्‍या तरुणाच्या डोक्यात मीनल बाटली फोडते, तो गंभीर जखमी होतो. त्या पोलीस तक्रार करू पाहतात पण पोलीस त्यांना परावृत्तच करतात. त्यानंतर या मुलींवरच खुनाचा प्रयत्न, वेश्याव्यासाय यासारखे गुन्हे दाखल होतात. आधी घाबरलेल्या पण प्रतिकार केल्याशिवाय ही छळवणूक थांबणार नाही याची जाणीव झालेल्या त्या लढतात. यात एक अनुभवी निवृत्त वकील, दीपक सहगल (अमिताभ बच्चन) त्यांचं वकीलपत्र घेतो.
मला पार्च्डपेक्षा पिंक आवडला आणि तो महत्वाचा वाटतो ते दोन-तीन कारणांसाठी.....
·      तरुणींचे/स्त्रियांचे’ स्वातंत्र्य पिंक अधोरेखित करतो, ते करताना साचेबद्ध प्रतिमांना तो आव्हान देतो. उदा. अमिताभच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद; एखादी तरुणी रात्री बाहेर असेल, तरुणांबरोबर डिनरला गेली असेल, ड्रिंक घेतलं असेल तर जणू काही ती शरीरसंबंधासाठी उपलब्ध आणि तयार आहे असे गृहित धरणाऱ्या मानसिकतेवर पिंक प्रश्नचिन्ह लावतो. असे पुरुषाने केले तर त्यात फारसे वावगे ठरत नाही या दुटप्पीपणावरही नेमकेपणाने बोट ठेवतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीनेही पैसे घेतले पण नंतर तिने संमती मागे घेतली तर तो अधिकार तिला असायला हवा इथपर्यंत पिंक पोचतो.
·      म्हणजेच पिंक तथाकथित नैतिकतेच्या घोळात; स्त्रीचे चारित्र्य आदि अडकत नाही, तर व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार हा मुद्दा प्रमाण धरून सिनेमातली अर्ग्युमेंटस पुढे जातात. इथे नाट्यमय पद्धतीने हा वकीलच, मीनलला तिच्या कौमार्यासंबंधी प्रश्न विचारतो. त्या प्रश्नोत्तरातून तिचे आधी झालेले शरीरसंबंध हे तिच्या संमतीने झाले आहेत, तिच्या इच्छेविरुद्ध नाहीत हे फार स्पष्टपणे पुढे येतं आणि ‘नो’ म्हणजे ‘नो’ च, तो नकारच आहे आणि पुरुषांनी तो मान्य करायलाच हवा हे ही. 
·      मेट्रोसिटी मध्ये स्वतंत्र रहाणाऱ्या तरुणींपुढचं गुंतागुतीचं वास्तव सिनेमा प्रभावीपणे दाखवतो. तिन्ही तरुणी या वेगळ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. त्यातली एक हिंदू, एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन आहे. मीनल दिल्लीची, दिल्लीत कुटुंब असूनही स्वतंत्र राहणारी. फलक लखनौची, बऱ्याच आर्थिक विवंचना असलेली आणि अँड्रीया मेघालयची आहे ज्याला आपण सरसकट नॉर्थइस्ट म्हणतो. तिच्या निमित्ताने तिकडच्या तरुणींना अन्य भारतीय तरुणींपेक्षा पुरुषी छळाचा अधिक सामना करावा लागतो हे चित्र पुढे येतं. सुनावणीतही इतर कोणाला त्यांचे राज्य विचारले जात नाही फक्त मेघालयाच्या तरुणीला विचारले जाते, हेही वास्तव पुढे येतं. 
·   त्या तिघी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढायचं ठरवतात किंबहुना त्यांना कायदेशीर लढाई लढावीच लागते. अर्थातच हा प्रतिकार कायद्याच्या मार्गाने जाणारा वैयक्तिक प्रतिकार आहे.
इथे मला Third wave feminism च्या वैयक्तिक प्रतिकाराच्या नीतीची आठवण येते. पाश्चिमात्य जगात स्त्रीवादी चळवळीच्या तीन लाटा किंवा टप्पे दिसतात. पहिला टप्पा होता स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा या लढ्याचा. चळवळीच्या दुसर्‍या टप्प्यात लिंगभावाच्या सत्तासंबंधांचे भान आले. ‘जे जे वैयक्तिक ते ते राजकीय’ हा वाक्प्रयोग यावेळी आला म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न हे निव्वळ ‘वैयक्तिक’ नसून ते ‘व्यवस्थात्मक’ पातळीवरील सत्तासंबंधाचे प्रश्न आहेत हे भान या टप्प्यावर आले. त्यानंतर नव्वदच्या दशकात स्त्रीवादाची तिसरी लाट आली असे सर्वसाधारणपणे मानले जाते. भारतातील स्त्री-वादी चळवळीचे असे टप्पे होतात का हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मात्र पिंकमधल्या तिघी, त्यांची जीवनशैली आणि त्यांची प्रतिकाराची नीती ही तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादाच्या नीतीसारखी आहे, त्याची मला वाटणारी कारणे अशी......
·      पहिल्या व दुसर्‍या लाटेतल्या स्त्री-वादी, ज्या बदलांसाठी लढल्या ते तिसर्‍या लाटेतील स्त्री-वाद्यांना जन्मजात मिळाले आहेत, त्यामुळे त्या स्वत:कडे सक्षम आणि खंबीर म्हणून पहातात. हा स्त्री-वाद ‘अधिक संधी आणि कमी लिंगभेद’ अशा आत्मविश्वासावर उभा राहिला. पिंक मधल्या मुली दिल्लीसारख्या शहरात स्वतंत्रपणे रहात आहेत. साहजिकच त्या सक्षम आणि खंबीर आहेतच. आजच्या तरुणींना त्यांच्या आई-आजीपेक्षा निश्चितच जास्त संधी मिळाली आहे, कमी भेदभाव वाट्याला आले आहेत म्हणूनच त्या हवे ते शिकून, मनाजोगतं काम करू शकत आहेत.
·      हा स्त्री-वाद स्त्रियांमधील भिन्नता आणि बहुविधतेकडे, बहुविध अस्मिता असलेल्या स्त्रियांच्या  अधिकारांकडे तो सजगपणे बघतो. पिंक मधील तिघीही अशा वेगवेगळी ओळख असलेल्या आहेत. या स्त्रीवादाच्या मते ‘राजकीय’ हे अपरिहार्यपणे ‘वैयक्तिक’ आहे. त्यामुळे बहुविध अस्मिता घेऊन वैयक्तिक संघर्ष करण्यावर इथे भर आहे. पिंक मधील तिघींचा लढा वैयक्तिक आहे, त्यांच्यामागे ना मिडिया आहे ना त्या कुठल्या संस्था-संघटनेकडे गेल्या आहेत. जरी हा लढा वैयक्तिक असला तरी तो समस्त स्त्रियांच्या दृष्टीने प्रस्तुत आहे. पुन्हा अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद पाहावेत. ते समस्त मुली/स्त्रियांकडे पुरुषी नजर कशी बघते हे प्रभावीपणे दाखवतात आणि तितक्याच जोरकसपणे त्याचा विरोध करतात.
पिंक पहाताना जाणवलेल्या अन्य काही बाबींचा उल्लेख करणे महत्वाचे वाटते. अमिताभ बच्चन वकीलाच्याच भूमिकेतच दाखवले आहेत हे विशेष, नाहीतर त्यांच्या महानायक प्रतिमेमुळे त्यांची व्यक्तिरेखा ‘स्त्रियांचा तारणहार’ अशी झुकू शकली असती, जे या सिनेमात होत नाही हे नोंदवायला हवे. सिनेमात काही समजदार, संवेदनशील पुरुष व्यक्तिरेखा आहेत आणि असंवेदनशील स्त्री व्यक्तिरेखाही. उदा. त्या तरुणी रहात असतात तो घरमालक, न्यायाधीश आणि अर्थातच मुलींची बाजू लढवणारा वकील तर स्त्री पोलीस अधिकारी मुलींच्या विरोधात backdated तक्रार दाखल करून घेते आणि खोटी साक्षही देते. यामुळे संवेदनशीलता ही लिंगावर अवलंबून नसते हे दाखवत हा सिनेमा वास्तवाच्या अधिक जवळ जातो. या सर्व कारणांसाठी, आज शिकून-कमावत्या होऊन स्वतंत्रपणे जगू पाहणाऱ्या तरुणींसाठी पिंक महत्वाचा आहे आणि हे बदल समजून घ्यायला तरुणांसाठीही.

प्रसिद्धी: मिळून सार्‍याजणी, फेब्रुवारी २०१७

Wednesday, December 2, 2015

शिक्षणाची गाडी चालली.....


जुलैचा महिना, स्थळ: देवगढ, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश
पावसाळ्याचे दिवस असले तरी चटका देणारं ऊन. हवेतली उमसही वाढलेली, परिणामी घामाने अखंड स्नान. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीची कामे थंडावलेली. भाताची रोपं लावणीसाठी तयार आहेत, प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. गाडी रस्त्याकडेला थांबते. तिथून गावातले रस्ते (?) संकऱ्या गल्ल्या पार करत आमची टीम एका घरासमोर उभी रहाते. कनकलताबहेन चटकन बाहेर येऊन स्वागत करते आणि मला आत घेऊन जाते. मुख्य घराच्या ओटीवर, एका बाजूला गवताने शाकारलेली छोटीशी खोली. खोलीत वीज नाही, एक खिडकी आहे त्यामुळे थोडासा उजेड. आत गेल्यावर आणखीनच उकडायला लागलं कारण साधारण १०x१५ च्या खोलीत २० महिला, एक शिक्षिका आणि मी. माझ्या येण्याने थोडीशी चुळबुळ सुरु होते. शिकणाऱ्या महिलांचा वयोगट साधारण १८ ते ५. काही महिला कुतुहलाने माझ्याकडे पाहतात. मीही हसून त्यांच्याकडे बघते आणि कनकलताकडे लक्ष वळवते. दोन-चार मिनिटात साऱ्या महिलाही शिकण्यात रमून जातात. 
उजळणीचे पाठ सुरु आहेत. कनकलताबहेन शांतपणे पाठ सुरु करते, ‘द’ की पहचान. ‘द’ दिसतो कसा हे ती कढून दाखवते. छापील कार्डवरील ठसठशीत द चे सगळे वेढेवळसे समजावून सांगते. मग प्रत्येकीला द ने सुरु होणारा एक एक शब्द सांगा, असं म्हणताच खणखणीत आवाजांची मालिका सुरु होते.

‘द’ से दार
‘द’ से दिवाल
‘द’ से दर्द
‘द’ से दम
‘द’ से दोस्ती, इति प्रभावती सरोज. ती पुढे म्हणते, जैसे मेरी और मीरा की है ! 
सहजपणे प्रभावती तिची फाईल माझ्यापुढे धरते. प्राथमिक शाळेत घोटून घेतात तसं अक्षर पण अगदी रेखीव. आपली सखी मीरा विषयी माहितीपर लिहिलेल्या चार पाच ओळी. मी न राहवून त्याचा फोटो काढते. प्रभावतीची कॉलर टाईट. इतरजणी तिच्याकडे कौतुकाने पाहतायत. आतापर्यंत काय काय शिकलो हे बहनजीना सांगा असा कनकलता त्यांना आग्रह करते. सरलाबहन उठून मणी मोजायला लागते, अस्खलित एक से सौ! शर्मिलाबहन पुस्तक काढून एक छोटासा पाठ वाचून दाखवते. सीताबहन, मीराबहन, कुसुमबहन एकेकजणी येऊन आपले नाव फळ्यावर ठळकपणे लिहितात. 
“बहोत बढ़िया!” मी उस्फूर्तपणे उद्गारते आणि विचारते, “पढ़ने के बाद कैसा लगता है?”
“बहुत अच्छा लगता है, दीदी!” सगळ्यांचा एकमुखाने जवाब.
“क्या अच्छा लगता है?” माझा पुन्हा सवाल.
पुन्हा खणखणीत जवाबांची मलिका सुरु होते.
“बस कहाँ जाती है, यह अब पढ़के समझ लेते है दीदी, किसीसे पूछना नहीं पड़ता।”
“साईन कर सकत है।”
“बेटीके स्कूल के नतीजे समझ में आने लगे है।”
“पहले सब अनपढ़ बोलके मज़ाक उड़ाते थे। अब मै बैंक जाती हूँ, पर्ची खुद लिखती हूँ और पैसा भरती/निकलवाती हूँ।“
“वोट डालने के समय हम एक साथ ही चले गए। वहा के बाबूने अंगूठा देने के लिए स्याही दी। लेकीन पेन हाथमे लेके सबने साइन किया। वह बाबू लोग तो देखतेही रह गए दीदी!”
हसरे चेहरे झळकत होते, काय नव्हतं त्यात? अभिमान, कष्टाला आलेलं यश, आत्मसन्मानाची जाणीव.......
या केंद्रात एकूण २५ महिला शिकत आहेत. समाजातल्या सगळ्या थरातल्या, मांडीला मांडी  लावून बसलेल्या.  सरोज समाजाच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. सरोज समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे डुकरे पाळणे. आज अनेकजणी शेतमजुरी करतात कारण स्वत:ची शेती नाही. कधी केंद्रात उपस्थिती कमी-जास्त होते आहे पण गळतीचं प्रमाण अत्यल्प. 
त्यांना शुभेच्छा देऊन निरोप घेत, आम्ही रास्तीपूरकडे निघतो. इथल्या केंद्रात मुस्लीम महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्याबरोबरीने ब्राह्मण, ठाकूर, कुंभार महिला शिकत आहेत. आता इथे सगळ्याजणी खांद्याला खांदा लावून पढाईसाठी लढतायत. तो रमजानचा महिना होता. रोज़े असल्याने कुणाला अशक्तपणा आलेला, तिला बाकीच्या आधार देताहेत. एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरस्वतीबहनची मेहरून्निसाबहन बरोबर गंभीर चर्चा सुरु आहे. दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या ईदचा उत्साह वातावरणात जाणवतो आहे.
मागल्या वेळी मी आले होते तेव्हा केंद्राच्या जागेला छप्पर नव्हतं. उन्हापासून बचावासाठी चार भिंतीवर मेणकापड बांधून घातले होते. तरीही उत्साहात खंड नव्हता. आता तर या खोलीवर छप्पर आले आहे. गेल्या वेळी अनुभवला तोच आनंद, तीच आत्मसन्मानाची चेहऱ्यावर झळकणारी भावना. काही १८-२० वर्षाच्या (लग्न झालेल्या) मुलीही आहेत, ज्यांनी कधीच शाळेचं तोंड पाहिलेलं नाही, पण त्यांच्या या स्कूलवर मात्र त्या फार खुश आहेत. काहींच्या मांडीवर लेकरं, काहींची आजूबाजूला खेळत आहेत. ह्या सगळ्यातून पढाई जारी आहे.... उत्साहाने, आनंदाने.
पुढचा टप्पा आहे हुसैनपूर. ज्या गावांमध्ये बाया बचतगट चालवतात वा अन्य काही माध्यमातून एकत्र येत असतात, विकासकामात सहभागी होत असतात तिथे त्यांचा आत्मविश्वास, बोलण्यातली निर्भीडता लक्षात येते. हे थोडं तसं दूरचं गाव, जिथे आतापर्यंत फार कोणी पोचलेलं नाही. रस्त्याजवळच सेंटर आहे, निंबाच्या गार गार सावलीत. इतर सेंटर्सपेक्षा हे जरा उशीराच सुरु झालं. आत जाऊन मी जरा विसावते. बाया मात्र गप्प, काही दडपण असल्यासारख्या. काही चर्चा सुरु होते पण बाया मात्र नीट बोलत नाहीयेत. काही सांगताना अडखळताहेत. हे पाहून त्यांची शिक्षिका सुशीलाबहनही गोंधळली आहे. एकजण अडखळत पुस्तकातला पाठ वाचायला लागते. ‘चूका की कहानी’ (इथे च ‘चं’द्रातला वाचावा.) चूका ही छोट्या गावातली तरुण मुलगी, आई-वडील नाहीत, भावाबरोबर दूरच्या गावी मोलमजुरीसाठी जाते. खूप संकटांचा सामना करते अशी काहीशी ही गोष्ट. माझ्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडतोय. मी त्यांना सांगते आहे, “पुस्तकं बाजूला ठेवा, लिहिता-वाचता येईल का, काही चुकणार तर नाही ना हे सगळे विचार जाऊ दे, इथे काही शाळेची परीक्षा नाही. चूकाचा दर्द तर आपल्याला जाणवतो ना? किती अडचणींचा सामना करत ती पुढे गेली. आपलीही अशीच धडपड चालू आहे ना?” बायांचे चेहरे गंभीर झालेत पण आता भीती-दडपण मावळलेय. एकेक करून त्या सांगताहेत....... 
“सही है दीदी, चूका के दुख तो हमारे दुख है।”
“हम भी कितनी मेहनत करते है दीदी, दिनभर काम तो लगाही रहता है।” 
“हम भी मजदूरी करते है, कड़ी धूप में, खेत में.....”
"हम मे से हर एक की ऐसी कहानी हो सकती है दीदी!!!"
“यह तो हमारी कहानी है...... ” 
आता अवघडलेपण संपलं होतं. बाहेरून कुणीतरी येणार म्हटल्यावर आता आपली परीक्षा असा त्यांचा समज झालेला होता. त्यामुळे सगळ्या घाबरल्या होत्या. आता दिलखुलास गप्पा सुरु झाल्या.
अक्षरं ओळखता येणं, लिहिता येणं हे महत्वाचं खरंच, त्यात या सगळ्या थोड्या पुढे-मागे असतील पण त्या अक्षरांचा अर्थ मात्र त्यांना अचूक कळला होता. त्यांना मनापासून शुभेच्छा देत, पुन्हा यायचं वचन देत मी बाहेर पडते. आता मला घामाची पर्वा नाही, जिवाची तलखी शांत होते आहे. त्यांच्याविषयीच्या आदराने मन भरून आलंय. उन्हाचा तडाखा कमी होऊन आभाळही भरून आलंय. तेवढ्यात आलाच तो, ज्याची सगळे वाट बघत होते. पाऊस बरसायला लागल्यावर सारेच चेहरे फुलले.
“पानी तो आ गया, अब खेती का काम शुरू होजाएगा” माझ्या तोंडून शब्द येतात, म्हटलं तर सहज पण आता केंद्रातल्या उपस्थितीविषयी वाटणारी काळजी त्यात डोकावते. ते जाणवून त्यांच्यातल्या एकदोघी पुढे येऊन मला दिलासा देतात, “ रोपाई के समय में कम-ज्यादा तो होगा दीदी, लेकीन हम खूब मन लगाके पढेंगे।” आणि पावसाकडे बघत पुढे म्हणतात, “जीवन तो आगे बढ़ना चाहिए ना?”
आणि त्या ‘जीवना’चे तुषार अंगावर घेत, आम्ही हसत हसत पुढे निघतो.


 

टीप: सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हा महिला साक्षरता प्रकल्प उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यात राबवला जात आहे. बाएफच्या कार्यक्षेत्रात अशा ४० केंद्रात एकूण १००४ महिला शिकत आहेत. यापैकी ६२५ महिलांनी प्राथमिक अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता त्या पुढच्या अभ्यासक्रमाची तयारी करत आहेत.