Friday, February 3, 2017

पार्च्ड आणि पिंक


पार्च्ड आणि पिंक हे दोन्ही सिनेमे स्त्री-मुक्तीचा उद्गार म्हणून चांगलेच चर्चेत आले. एकतर ते साधारण एकाच वेळेत सिनेमाघरात होते आणि दोन्ही चित्रपटात काही वरवरची साम्ये दिसतात. दोन्ही चित्रपटात तीन नायिका (Protagonist) आहेत. दोन्ही चित्रपटातल्या नायिकांना पुरुषी अत्याचाराला सामोरं जावं लागलं आहे. पार्च्डमधल्या तीन स्त्री व्यक्तीरेखांचा दर्जा वेगवेगळा आहे, म्हणजे पुरुषांशी असलेल्या नात्यासंबंधात वेगवेगळा आहे, अर्थात त्यावर आजही स्त्रीचा सन्मान ठरतो हे खरे आहेच. रानी विधवा आहे, लाजो विवाहित पण मूल नसलेली आणि बिजली ही नर्तकी आणि वेश्याव्यवसाय करणारी आहे. चित्रपट म्हणून पार्च्ड, मला फारसा आवडला नाही. या चित्रकथेत काही बलस्थाने आहेत, जी पूर्वार्धात थोड्याफार प्रमाणात फुलतात. या भागात सिनेमा उत्सुकता चांगलीच टिकवून ठेवतो. मध्यंतर होताना रानी (तनिष्ठा बॅनर्जी) आपल्या मुलाला सांगते, “मर्द बादमे बन, पहले इन्सान बनने की कोशिश कर।” हे सरप्राइज वाटलं तरी ते सकारात्मक आहे. पार्च्ड मधल्या तिघींमध्ये मला त्यातल्या त्यात रानी ही व्यक्तिरेखा सशक्त वाटली. जीवनाच्या अनुभवातून तिला आलेलं शहाणपण परिपक्वतेकडे जातं. यामध्ये अर्थातच सुनेला, सासूच्या टिपिकल मानसिकतेतून वागवण्यासारखे टप्पे आहेतच. तरीही शेवटी ही रानी सुनेला, तिच्या प्रियकरासोबत रवाना करण्यासारखा निर्णय घेते, हे पाहणे फार ह्रद्य  आहे.
रानी-बिजलीसोबत मनसोक्त फिरणारी, अगदी चावट बोलणारी, बसमध्ये बसल्यावर खिडकीबाहेर डोके काढून मोकळी हवा चाखणारी लाजो (राधिका आपटे) स्वातंत्र्याकांक्षी वाटते, पण अत्याचारी नवऱ्याला मात्र कधीच विरोध करत नाही. पुरुषी अत्याचाराला कधीच प्रतिकार न करणारी लाजो, मूल हवे म्हणून अनोळखी माणसाशी संग करते ही बाब त्या व्यक्तिरेखेचा स्वाभाविक विकास वाटत नाही. रानीची १५ वर्षाची सूनही लग्न मान्य नाही म्हणून स्वत:चे केस बारीक कापून आपल्या परीने प्रतिकार करते. पण वयाने प्रौढ, भरतकामात प्रवीण आणि त्यातून कमावणारी लाजो मात्र नवऱ्याचा मार खातच रहाते.
बिजली (सुरवीन चावला) ही नौटंकीमध्ये नाचणारी आहे. पुरुषांच्या भावना चाळवणारे नृत्य करणे आणि जास्त पैसे देणाऱ्या गिऱ्हाईकांची शय्यासोबत करणे हा तिचा पेशा आहे. रानीच्या नशेत असलेल्या नवऱ्याला बिजली घरी पोचवायला जाते तेव्हा रानी तिच्याशी माणुसकीने वागते, तिला जेवायला देते. तेव्हापासून रानी आणि बिजली खास मैत्रिणी होतात (अर्थात हे बिजलीच्या बोलण्यातून कळते). रानी आणि लाजोही शेजारणी. एकमेकीशी सुखदु:ख, बहुधा दु:खच शेअर करणाऱ्या. मग या तिघी घट्ट मैत्रिणी होत जातात. त्यांच्या मजेदार सहलीत त्या रानीच्या सुनेलाही सहभागी करून घेतात तेव्हा खरेच माझ्या डोळ्यात पाणी आले.
किशन हा त्या गावातला तरुण, वेगळी वाट चालतो आहे. गावातल्या स्त्रियांना काही प्रशिक्षण/काम देऊन सक्षम करायचा प्रयत्न करतो आहे, त्याची पत्नी मणिपूरची आहे. तिला स्थानिक लोक विदेशी समजतात, स्थानिक तरुण ज्यात रानीचाही मुलगा आहे ते तिला कायम त्रास देत रहातात. पुरुषी अत्याचारी मानसिकता अधिक गडद करण्यासाठी या व्यक्तिरेखेची योजना केल्यासारखे वाटते. किशन ही एकमेव पुरुष व्यक्तिरेखा समंजस आहे. बाकी सगळे पुरुष अत्याचारी, बाईच्या मनाचा बिलकुल विचार न करणारे आहेत. लाजोच्या नवऱ्याला आपण मूल जन्माला घालू शकत नाही हे माहीत आहे. तरीही तो लाजोला वांझ म्हणून मारहाण करतो. तिला दिवस गेल्यावरही रांड म्हणून निर्दयपणे मारहाण करतो. त्यामुळे अत्याचारी पुरुष आणि बळी स्त्री अशाच घिस्यापिट्या प्रतिमा दिसत राहतात. लाजोचा अत्याचारी नवरा घरात अपघाताने जळून मरतो तेव्हा बाहेर रावणदहन सुरु असते ही अशीच गुळगुळीत प्रतिमा.
बिजली बिनधास्त आहे मात्र तिलाही स्पर्धा, पुरुषी अत्याचाराची भीती आहेच. तिला सामान्य आयुष्य जगावेसे वाटते. तिच्यासोबत काम करणारा राजू तिला जीवनात सोबत करेल असे वाटत असतानाच तो तिचा दलाल होऊ पाहतो. ‘खुदकी कदर करना सीख’ असे बिजलीला सांगणारा राजू, तिच्या शरीराच्या सौद्यातच रस दाखवतो तेव्हा इथेही शेवटी सगळे पुरुष असेच, हा विचार दिसतो.
या तीन स्त्रियांमधील सशक्त आणि एकमेकीना बळ देणारे नाते ही या कथेची जमेची बाजू. पण तरीही चित्रपटाचा शेवट अतिरंजित वाटतो. शेवटी तिघीजणी आपला मार्ग शोधायचे ठरवून एकमेकींच्या सोबतीने मोठ्या जगात (मुंबईत) जायचे ठरवतात. ही ही स्वातंत्र्याची एक गुळगुळीत प्रतिमा. या तीनही व्यक्तिरेखा, त्यांची सामाजिक-भौतिक परिस्थिती पहाता, खरेतर प्रतिकाराच्या किंवा अगदी स्वातंत्र्याच्या दिशेने जाणाऱ्या काही जागा त्यांच्या भवतालात आहेत, त्यांचा शोध या स्त्रियांसाठी स्वाभाविक ठरला असता. मात्र त्या निघून जायचे ठरवतात आणि त्याचे रानीच्या तोंडी येणारे स्पष्टीकरण फारच लंगडे वाटते. ‘किशनने आपल्याला कौशल्य शिकवले आहे त्याच्या बळावर कुठेही काम करून राहू’ हे रानीचे म्हणणे फार भाबडे वाटते, त्या व्यक्तिरेखेच्या शहाणपणाशीही ते जुळत नाही. अशा या ढोबळपणामुळे, गुळगुळीत प्रतिमांमुळे आणि व्यक्तीरेखांच्या अस्वाभाविक वर्तनामुळे पार्च्ड बेगडी वाटतो.   
आता पिंककडे बघू. पिंक मधल्या तिघी तरुणी शहरी, कमावत्या, स्वतंत्र विचारांच्या आणि बाईच्या पारंपारिक प्रतिमेत अजिबात न बसणाऱ्या आहेत. एकदा मीनल (तापसी पन्नू), फलक (कीर्ती कुल्हारी) आणि अँड्रीया (अँड्रीया तरीयांग) रात्री रॉकशो पहायला जातात. तिथे ओळखीच्या तरुणाबरोबर आलेल्या, त्याच्या मित्रांशी त्यांचा परिचय होतो. ते या तरुणींना डिनरला बोलावतात, सगळे ड्रिंक घेतात. ते तरुण चतुराईने तिघींना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन जातात. तिथे त्यांच्यावर जबरदस्ती करू पाहतात. बळजबरी करू पहाणार्‍या तरुणाच्या डोक्यात मीनल बाटली फोडते, तो गंभीर जखमी होतो. त्या पोलीस तक्रार करू पाहतात पण पोलीस त्यांना परावृत्तच करतात. त्यानंतर या मुलींवरच खुनाचा प्रयत्न, वेश्याव्यासाय यासारखे गुन्हे दाखल होतात. आधी घाबरलेल्या पण प्रतिकार केल्याशिवाय ही छळवणूक थांबणार नाही याची जाणीव झालेल्या त्या लढतात. यात एक अनुभवी निवृत्त वकील, दीपक सहगल (अमिताभ बच्चन) त्यांचं वकीलपत्र घेतो.
मला पार्च्डपेक्षा पिंक आवडला आणि तो महत्वाचा वाटतो ते दोन-तीन कारणांसाठी.....
·      तरुणींचे/स्त्रियांचे’ स्वातंत्र्य पिंक अधोरेखित करतो, ते करताना साचेबद्ध प्रतिमांना तो आव्हान देतो. उदा. अमिताभच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद; एखादी तरुणी रात्री बाहेर असेल, तरुणांबरोबर डिनरला गेली असेल, ड्रिंक घेतलं असेल तर जणू काही ती शरीरसंबंधासाठी उपलब्ध आणि तयार आहे असे गृहित धरणाऱ्या मानसिकतेवर पिंक प्रश्नचिन्ह लावतो. असे पुरुषाने केले तर त्यात फारसे वावगे ठरत नाही या दुटप्पीपणावरही नेमकेपणाने बोट ठेवतो. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीनेही पैसे घेतले पण नंतर तिने संमती मागे घेतली तर तो अधिकार तिला असायला हवा इथपर्यंत पिंक पोचतो.
·      म्हणजेच पिंक तथाकथित नैतिकतेच्या घोळात; स्त्रीचे चारित्र्य आदि अडकत नाही, तर व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार हा मुद्दा प्रमाण धरून सिनेमातली अर्ग्युमेंटस पुढे जातात. इथे नाट्यमय पद्धतीने हा वकीलच, मीनलला तिच्या कौमार्यासंबंधी प्रश्न विचारतो. त्या प्रश्नोत्तरातून तिचे आधी झालेले शरीरसंबंध हे तिच्या संमतीने झाले आहेत, तिच्या इच्छेविरुद्ध नाहीत हे फार स्पष्टपणे पुढे येतं आणि ‘नो’ म्हणजे ‘नो’ च, तो नकारच आहे आणि पुरुषांनी तो मान्य करायलाच हवा हे ही. 
·      मेट्रोसिटी मध्ये स्वतंत्र रहाणाऱ्या तरुणींपुढचं गुंतागुतीचं वास्तव सिनेमा प्रभावीपणे दाखवतो. तिन्ही तरुणी या वेगळ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. त्यातली एक हिंदू, एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन आहे. मीनल दिल्लीची, दिल्लीत कुटुंब असूनही स्वतंत्र राहणारी. फलक लखनौची, बऱ्याच आर्थिक विवंचना असलेली आणि अँड्रीया मेघालयची आहे ज्याला आपण सरसकट नॉर्थइस्ट म्हणतो. तिच्या निमित्ताने तिकडच्या तरुणींना अन्य भारतीय तरुणींपेक्षा पुरुषी छळाचा अधिक सामना करावा लागतो हे चित्र पुढे येतं. सुनावणीतही इतर कोणाला त्यांचे राज्य विचारले जात नाही फक्त मेघालयाच्या तरुणीला विचारले जाते, हेही वास्तव पुढे येतं. 
·   त्या तिघी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी, स्वातंत्र्यासाठी लढायचं ठरवतात किंबहुना त्यांना कायदेशीर लढाई लढावीच लागते. अर्थातच हा प्रतिकार कायद्याच्या मार्गाने जाणारा वैयक्तिक प्रतिकार आहे.
इथे मला Third wave feminism च्या वैयक्तिक प्रतिकाराच्या नीतीची आठवण येते. पाश्चिमात्य जगात स्त्रीवादी चळवळीच्या तीन लाटा किंवा टप्पे दिसतात. पहिला टप्पा होता स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा या लढ्याचा. चळवळीच्या दुसर्‍या टप्प्यात लिंगभावाच्या सत्तासंबंधांचे भान आले. ‘जे जे वैयक्तिक ते ते राजकीय’ हा वाक्प्रयोग यावेळी आला म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न हे निव्वळ ‘वैयक्तिक’ नसून ते ‘व्यवस्थात्मक’ पातळीवरील सत्तासंबंधाचे प्रश्न आहेत हे भान या टप्प्यावर आले. त्यानंतर नव्वदच्या दशकात स्त्रीवादाची तिसरी लाट आली असे सर्वसाधारणपणे मानले जाते. भारतातील स्त्री-वादी चळवळीचे असे टप्पे होतात का हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मात्र पिंकमधल्या तिघी, त्यांची जीवनशैली आणि त्यांची प्रतिकाराची नीती ही तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादाच्या नीतीसारखी आहे, त्याची मला वाटणारी कारणे अशी......
·      पहिल्या व दुसर्‍या लाटेतल्या स्त्री-वादी, ज्या बदलांसाठी लढल्या ते तिसर्‍या लाटेतील स्त्री-वाद्यांना जन्मजात मिळाले आहेत, त्यामुळे त्या स्वत:कडे सक्षम आणि खंबीर म्हणून पहातात. हा स्त्री-वाद ‘अधिक संधी आणि कमी लिंगभेद’ अशा आत्मविश्वासावर उभा राहिला. पिंक मधल्या मुली दिल्लीसारख्या शहरात स्वतंत्रपणे रहात आहेत. साहजिकच त्या सक्षम आणि खंबीर आहेतच. आजच्या तरुणींना त्यांच्या आई-आजीपेक्षा निश्चितच जास्त संधी मिळाली आहे, कमी भेदभाव वाट्याला आले आहेत म्हणूनच त्या हवे ते शिकून, मनाजोगतं काम करू शकत आहेत.
·      हा स्त्री-वाद स्त्रियांमधील भिन्नता आणि बहुविधतेकडे, बहुविध अस्मिता असलेल्या स्त्रियांच्या  अधिकारांकडे तो सजगपणे बघतो. पिंक मधील तिघीही अशा वेगवेगळी ओळख असलेल्या आहेत. या स्त्रीवादाच्या मते ‘राजकीय’ हे अपरिहार्यपणे ‘वैयक्तिक’ आहे. त्यामुळे बहुविध अस्मिता घेऊन वैयक्तिक संघर्ष करण्यावर इथे भर आहे. पिंक मधील तिघींचा लढा वैयक्तिक आहे, त्यांच्यामागे ना मिडिया आहे ना त्या कुठल्या संस्था-संघटनेकडे गेल्या आहेत. जरी हा लढा वैयक्तिक असला तरी तो समस्त स्त्रियांच्या दृष्टीने प्रस्तुत आहे. पुन्हा अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी असलेले सेफ्टी मॅन्युअलबाबतचे संवाद पाहावेत. ते समस्त मुली/स्त्रियांकडे पुरुषी नजर कशी बघते हे प्रभावीपणे दाखवतात आणि तितक्याच जोरकसपणे त्याचा विरोध करतात.
पिंक पहाताना जाणवलेल्या अन्य काही बाबींचा उल्लेख करणे महत्वाचे वाटते. अमिताभ बच्चन वकीलाच्याच भूमिकेतच दाखवले आहेत हे विशेष, नाहीतर त्यांच्या महानायक प्रतिमेमुळे त्यांची व्यक्तिरेखा ‘स्त्रियांचा तारणहार’ अशी झुकू शकली असती, जे या सिनेमात होत नाही हे नोंदवायला हवे. सिनेमात काही समजदार, संवेदनशील पुरुष व्यक्तिरेखा आहेत आणि असंवेदनशील स्त्री व्यक्तिरेखाही. उदा. त्या तरुणी रहात असतात तो घरमालक, न्यायाधीश आणि अर्थातच मुलींची बाजू लढवणारा वकील तर स्त्री पोलीस अधिकारी मुलींच्या विरोधात backdated तक्रार दाखल करून घेते आणि खोटी साक्षही देते. यामुळे संवेदनशीलता ही लिंगावर अवलंबून नसते हे दाखवत हा सिनेमा वास्तवाच्या अधिक जवळ जातो. या सर्व कारणांसाठी, आज शिकून-कमावत्या होऊन स्वतंत्रपणे जगू पाहणाऱ्या तरुणींसाठी पिंक महत्वाचा आहे आणि हे बदल समजून घ्यायला तरुणांसाठीही.

प्रसिद्धी: मिळून सार्‍याजणी, फेब्रुवारी २०१७

2 comments: