Sunday, December 19, 2010

मुक्काम लातूर

प्रसंग १

एका घरासमोर मी उभी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत हे घर होतं. आता दगडमातीचा एक ढिगारा, त्यातच घरातल्या वस्तू विखुरलेल्या. चिल्ल्यापिल्ल्यांचे फोटो, फाटलेली वह्यापुस्तकं,खेळणी. काही दिवसांपूर्वीचं नांदतं, गजबजलेलं घर. डोळे कधी वहायला लागले ते कळलंच नाही..........

प्रसंग २

भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास चालू आहे. भूकंपग्रस्त कुटुंबांकडून प्रश्नावल्या भरून घ्यायचं काम आमचा गट करतोय. मनावर प्रचंड ताबा ठेवायला लागतोय. एका भूकंपग्रस्त कुटुंबातला पुरुष समोर बसलाय. जरा हरवल्यासारखा दिसतोय. जवळचं कुणीतरी गेलं असणार. आमचे टीम लीडर त्याला समजावत आहेत. माहिती देण्यास त्याने होकार दिल्यावर मी पुढे सरसावलेय, लिहून घ्यायला. नाव, गाव इ. झाल्यावर कुटुंबातल्या माणसांची नावं व त्यांची माहिती मी त्याला विचारतेय. मीही विचारताना धास्तावलेली कारण कुटुंबातलं कुणी मृत्युमुखी पडलं असल्याची शक्यता आहेच. एक एक नाव तो सांगतोय. एकत्र मोठं कुटुंब दिसतंय. बारावं नाव लिहून झालं आणि तो धिप्पाड, उंचनिंच माणूस ढसाढसा रडत कोसळला.बारा जणांच्या कुटुंबातला हा एकमेव माणूस वाचला, कुठे बाहेरगावी गेला होता म्हणून. त्याचं सगळं कुटुंब संपलंय. मी जागच्या जागी थिजलेली.........

प्रसंग ३

एका गावाच्या बाहेर माळरानावर भूकंपग्रस्तांसाठीचे तात्पुरते निवारे उभे केले आहेत. बाजूलाच एका धार्मिक संस्थेचा डेरा लागलाय ज्यांनी लोकांच्या जेवणाची जबाबदारी घेतलेय. वेळ संध्याकाळी पाच सव्वापाचची. सत्संग चालू आहे. मागील बाजूला शिबिरात स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सत्संग संपल्यावर लोक उठायला लागले तोच कानावर दवंडीचा आवाज येतोय. तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलतर्फे सांगण्यात येतंय, कुणी एक सात वर्षाची मुलगी तिथे मरून गेलेय, कुणी शोधात असेल तर ओळख पटवून अमुक दिवसात ताब्यात घ्यावं नाहीतर.........

प्रसंग ४

एका गावातलं काम पूर्ण झालंय. संध्याकाळचे सहा-साडेसहा, हवा थोडी थंड आहे. गावच्या रस्यावरून फिरताना अंगावर काटा येतोय. जिकडेतिकडे उद्धस्त घरं. गावातली मंडळी आसऱ्याला गावाबाहेर माळरानावर. पण हे काय? दहा बारा कुत्री गावात येतायत. ढिगाऱ्यात काहीबाही उकरतायत. गावातच राहणारी ही कुत्री. भुकेसाठी त्यांनाही माळरानावर जावं लागलंय. सोबतचा गावकरी सांगतोय, रोज दिवसातून दोनतीन वेळा कुत्री गावात येतात.सगळीकडे फिरतात, आपल्या धन्यांची घरं बघत, ढिगारे उकरत.

तेवढयात त्यातल्या एका कुत्र्याने जोरात रडायला सुरूवात केली. कातरवेळ आणखी कातर होत गेली..........

प्रसंग ५

भूकंपग्रस्त गावांना जागतिक पातळीवर मदत सुरू झालेय. गावागावात STD booth लागलेत.त्याचा ताबा सरपंच किंवा गावातल्या प्रबळ लोकांकडे. ताबा म्हणजे अक्षरश: ताबा. गेले चार तास इथे सर्व्हेचं काम चाललंय, सरपंचांनी त्यात लक्ष घालणं अपेक्षित आहे. पण इथले सरपंच फोनपासून हलतच नाहीयेत. काही वेळाने मात्र ते आले आणि जातीने लक्ष घालू लागले. जरा नीट विचार केल्यावर लक्षात आलं की इतका वेळ दलित कुटुंबांची माहिती घेण्याचं काम सुरू होतं, आता सरपंचाच्या भावकीतल्या कुटुंबांबरोबर काम चालू आहे. चर्चा काय चाललेय त्यांच्यामधे, ह्या xxx चं (म्हणजे दलितांचं) काय नुकसान झालंय? साध्या गवताच्या घरात तर राहतात. खरं नुकसान पक्क्या घरात राहणाऱ्यांचंच झालंय पण कसा फायदा करून घेतायत बघा इ. इ.

सवर्णांपैकीच एक बाईही आलेय. पण ती काहीच बोलत नाहीये. तिच्यावर कसलंतरी दडपण असावं. आता ही गुंतागुंत आम्हाला थोडी कळायला लागलेय. मी सहकाऱ्याला खुणेनेच सांगून,काहीतरी बहाणा करून त्या बाईला बाहेर घेऊन आलेय. आता मात्र ती पटापटा बोलतेय. गावच्या एका पुढाऱ्याची ती भावजय. मला माहीत आहेत ते, सकाळी त्यांनीच गाव दाखवलं होतं. यांची प्रॉपर्टी वादात आहे. दिरांनी तिच्या नवऱ्याला फसवून धोत्र्याच्या बिया खायला घातल्या होत्या,त्यातून तो वाचला. ती सांगतेय, जेवढं शक्य असेल तेवढं नुकसान दाखवा आमचं; काही मिळालं तर आत्ताच मिळेल, कज्जेदलालीला मी कुठवर पुरणार?

प्रसंग

भूकंपाचं संकट पुरेसं नाही की काय म्हणून आत्ता संध्याकाळी उशीरा जोरात पाऊस आलाय.आमच्या रहायच्या जागेचा बंदोबस्त बरा आहे पण तात्पुरत्या निवाऱ्यातल्या माणसांचं काय झालं असेल? दिवसभराच्या अनुभवामुळे आणि पावसामुळे सगळे चिडीचूप बसलेत. दिवसभर मन आवरताना केवढी धडपड होते. संध्याकाळी कुणाचा तरी बांध फुटतोच.

तेवढयात एक बातमी येते, पुण्यात मोठा भूकंप झालाय. आम्ही सगळे पुण्याचेच. एकच हलकल्लोळ चाललाय. एकदोघी जोरजोरात रडायला लागल्यात. सगळ्यांची मन:स्थिती इतकी नाजूक की तर्काने विचार करायची शक्तीच नुरल्यासारखं झालंय. इथे भूकंपाने माजवलेला हा:हाकार पाहिल्यावर मनाचा एकच धोशा आपल्या माणसांचं काय?

काही जणांनी भानावर येऊन बातमीची शहनिशा केली तेव्हा तसं काही नसल्याचं कळलं आणि निश्वा:स सुटले. पण त्या अर्ध्या तासाने चरचरून दाखवून दिलं की आपत्तीत सापडलेल्यांची मन:स्थिती काय होत असेल?

Friday, December 10, 2010

रावेरी, गहू आणि सीता

कामानिमित्ताने मी फिरत असते. विदर्भात तर अनेक वेळा जाणे होते. नुकतीच यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात मी गेले होते. राळेगावमध्ये रावेरी गावात काम होतं. काम पार पडल्यावर मला निघायला थोडा वेळ होता त्यामुळे जरा गावात फेरफटका मारायला सहकाऱ्यांसोबत निघाले. गावात सीतेचं मंदिर आहे ते पहायचं ठरवलं. मंदिराचा विषय निघाल्यावर सगळेच काही माहिती सांगायला लागले. हे सीतेचं भारतातील एकमेव मंदिर, इथे वाल्मिकींचा आश्रम होता, लवकुशासोबत सीता इथे राहिली असा त्या बोलण्याचा गोषवारा होता. माझी उत्सुकता चाळवली गेली. आधी अनेकदा इथे येऊन याचा उल्लेख कसा आला नाही याचं आश्चर्य वाटत होतं.

मंदिर दिसायला लागल्यावर लक्षात आलं, जुनं हेमाडपंथी मंदिर, आधी ढासळलेल्या स्थितीत होतं, आता जीर्णोद्धार सुरू आहे. बोलताना कळलं की शेतकरी संघटनेने भूमिकन्या सीतेच्या या स्थानाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. अगदी नुकताच याचा लोकार्पण सोहळा झाला, ज्यावेळी हजारोंच्या संख्येने महिला जमल्या होत्या. त्यामुळेच स्थानिक पातळीवर सध्या हे मंदिर चर्चेत आहे. पुण्यामुंबईकडे अर्थातच ही बातमी नव्हती.

मंदिराची देखभाल करणाऱ्या तरुणाने मंदिर उघडून दाखवलं. गाभाऱ्यात शिवलिंग, वर समोर काळ्या पाषाणातली सीतेची म्हणून दाखवण्यात येणारी छोटेखानी मूर्ती. गाभाऱ्यात तसा अंधारच होता आणि ग्रामीण भागातील नियमाप्रमाणे वीज नव्हती तरी flash वापरून mobile camera ने फोटो काढला. बाहेर आले पण यामागील कथेचा नीट उलगडा होत नव्हता. तिथे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केलेला banner होता. त्यावरून कळलेली कथा अशी; गरोदर सीतेला रामाने वनात सोडून दिलं. ती वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागली. लवकुशाचा जन्म झाल्यावर (म्हणजे हे लवकुशाचे जन्मस्थान?) सीतेने स्थानिक लोकांकडे गहू मागितले. पण तिला कोणी ते दिले नाहीत. मग रागावून सीतेने ‘इथे कधीही गहू पिकणार नाही’ असा शाप दिला. (शाप? आणि सीतेने? Banner वर लिहिल्याप्रमाणे आधुनिक काळात हायब्रीड गहू येईपर्यंत इथे गहू पिकत नव्हता.) पुढे रामाने अश्वमेघ योजला. त्या यज्ञाचा घोडा लवकुशानी इथेच अडवला. त्यासाठी हनुमानालाही त्यांनी बांधून ठेवलं. जवळच हनुमानाचं मंदिर आहे. मूर्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत आडव्या स्थितीत आहे. अशी सारी रोचक कथा माहित झाली.

रामसीता वनवासात असतानाची अनेक स्थानं भारतभरात दाखवली जातात. पण उत्तर रामायणाशी निगडित स्थानाबद्दल मी प्रथमच ऐकत होते. अर्थात हा माझ्या अल्प ज्ञानाचाही परिणाम असेल. पण या साऱ्या कथेने काही प्रश्न मनात उभे राहिले. सीतेचं मंदिर म्हणताना गाभाऱ्यात शिवलिंग आहे ते कसं काय? क्षमाशील सीतेच्या शापाची कथा तर फारच विस्मयजनक वाटली कारण संपूर्ण रामायणात तिने फक्त सोसलेलंच दिसतं. ज्यांनी सीतेवर अन्याय केले त्यांना तिनी शापले नाही मग गहू दिले नाहीत या कारणावरून शाप? हे पटत नाही. की तिच्याही क्षमाशीलतेचा अंत झाला होता? रामाने सीतेचा त्याग केला याचा आपल्यालाही राग येतो आणि तिने मुकाटपणे सोसले याचाही. लोकपरंपरेतही हा सल आहे म्हणून तर सहज ओव्या बनतात;

राम गं म्हणू राम, नाही सीतेच्या तोलायाचा, हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलायाचा

आख्ख्या भारतात सीतेचं हे एकमेव मंदिर हेही खरं नाही. हरयाणातलं सीतामाई मंदिर, बंगळुरूजवळचं सीतेचं मंदिर, बिहारमधलं सीतामढी तशी आणखीही काही असतीलच. नवल म्हणजे रावेरीला सीता मंदिरात यात्राही भरते, कधी? तर रामनवमीला. मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

शेजारच्या मंदिरात कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या त्या महाबली हनुमानाची बंदिस्त मूर्ती (मुळात लवकुशानी बांधलेली आणि सध्या कडी कुलुपात असलेली) पाहून गंमत वाटली आणि वाईटही. शक्तीमान मारुतीनी बापलेकाची भेट व्हावी म्हणून लवकुशाकडून हे बंधन घालून घेतलं असणार असं वाटलं. सीतेचं आणि मारुतीचंही हार्दिक नातं आहेच. लोकपरंपरेत मारुती स्त्रियांना रक्षणकर्ता वाटत आला आहे. “राजा मारबती उभा पहाऱ्याला, जीव माझा थाऱ्याला” यासारख्या ओव्यांवरून हे स्पष्ट दिसतं. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच.

तर मनात असे असंख्य विचार उमटवून गेलेली ही रावेरीची भेट, अजून खूप काही वाचायला, समजून घ्यायला हवं याची जाणीव करून देणारी.......

Wednesday, December 1, 2010

सकाळी उठून

ग्रामीण किंवा आदिवासी भागात फिरताना विशेषत: रहाताना, एका भीषण प्रश्नाला तोंड दयावं लागतं. कदाचित शहरात जन्मल्याने व वाढल्याने हा प्रश्न गंभीर वाटत असेल. पण गावकरी विशेषत: स्त्रियांना आणीबाणीच्या प्रसंगी तरी हा प्रश्न गंभीर वाटत असणार. मी बोलतेय ते संडास किंवा अलीकडचा शब्द (जरा सभ्य?) ‘शौचालयाच्याउपलब्धतेबद्दल. आता निर्मल ग्रामकिंवा संपूर्ण ग्रामीण स्वच्छतायासारख्या मोहिमांमुळे अनेक ठिकाणी संडास बांधले गेले आहेत. पण त्यातले वापरण्यालायक फारच कमी असतात हे नक्की.

सुरुवातीला मी ज्या भागात काम करत होते तिथे लोक दिवसभर शेती व उपजीविकेच्या अन्य कामात असायचे. त्यामुळे मीटिंग (बैठक म्हणलं तर कुणालाच कळत नाही) रात्रीच घेता येत असे. माझं रहाण्याचं ठिकाण होतं तालुक्याला म्हणजे ४० ते ५० कि. मी. अंतरावर. मीटिंग सुरू व्हायला साडेआठ वाजून जात. माणसं जमून चर्चा पूर्ण होईपर्यंत दीडदोन तास सहज जात. मीटिंग संपायला अकरा वाजून जात असत. गावकरी एकत्र आले म्हणजे मीटिंग झाल्यावर भजनाचा कार्यक्रम अनेकदा होई, त्यातून ताई रोज थोडयाच येतात त्यामुळे जास्तीत जास्त भजनं ऐकवायची चढाओढ लागे. अर्थात मी हे खूप enjoy केलं. काही भजनं मला अजूनही पाठ आहेत. तर सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा उशीर झाल्याने मुक्काम गावातच असे.

आदिवासी घरात क्वचितच गुरांचा वेगळा असा गोठा असतो. गुरे घरातच किंवा ओटीवर बांधतात. त्यामुळे घरात पिसवा असतातच. त्यांच्या चाव्यांना तोंड देत झोपायचं म्हणजे..............!!! त्यातून रात्रभर गुरांचे आवाज, वीज असली तर लाईट रात्रभर सुरूच नाहीतर मिट्ट काळोख. पण खरी कसरत असते ती सकाळी झाड्याला म्हणजे सकाळी परसाकडे जायची. संडास नसल्याने निव्वळ वाच्यार्थाने नव्हे तर खरोखरच परसाकडे म्हणजे हागंदरीकडे (मळमळायला लागलं ना?) जायला लागतं. एक नोंद करायलाच हवी ती म्हणजे ग्रामीण भागापेक्षा आदिवासी गावे खरोखरच स्वच्छ असतात आणि रान असल्याने आडोशाचीही बरी सोय असते. पण तरीही माझ्यासारख्या शहरी मुलीला पहाटे उजाडायच्या आत असं लपूनछपून जायचं म्हणजे शिक्षाच वाटायची. घरातली एखादी बाई सोबत करायची. मग वस्तीपासून थोडं दूर, थोडा आडोसा पण तरीही सुरक्षित जागा शोधण्याची कसरत करायची. कोणी येत तर नाही ना या ताणाखाली चाहूल घेत कसाबसा तो विधी उरकायचा. साप किरडू याचंही भय वाटायचं. कधी आडवेळेलाम्हणजे दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळी जावं लागलं तर फारच कठीण प्रसंग ओढवे. एकतर अशा वेळी माणसांचा वावर ही मुख्य अडचण. दुसरी भीती वाटायची ती प्राण्यांची. आपण बसलो आणि एकदम शेळ्या किंवा गुरांचा कळप अंगावर आला तर? एकदा अशा वेळी गुरं धावत येताहेत असे आवाज यायला लागले. पटकन उठून बाजूला थांबले. एक कळप निघून गेला. म्हटलं आता निवांत तर परत तेच आवाज. असा प्रकार दोनतीनदा झाल्यावर नाद सोडला. ती वेळ (आणि त्यावेळी ती जागा) गुरं परतण्याची असते ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली.

बिलकुल खाजगीपणा नसणे (म्हणजे त्यावेळी सुद्धा) म्हणजे काय याचा अनुभव घेत होते. घरातली बाई सोबतीला असली तर आधार वाटायचा पण लाजही वाटायची. तेव्हा पक्का संडास म्हणजे जिथे कोणत्याही व्यत्ययाविना जाता येणे ही किती अत्यावश्यक बाब आहे हे लक्षात आलं आणि ती सुविधा आपल्याला सहज मिळत असल्याने नशीबवान असल्यासारखेही वाटले.

आज ग्रामीण भागात संडास ही गोष्ट खूप चर्चेचा, राजकारणाचा आणि निधी मिळवायचा विषय झाली आहे. अलीकडे शासकीय योजनांत शौचालय हा शब्द वापरला जातो जो ग्रामीण भागात सगळेच शच्छालयकिंवा स्वच्छालयअसा उच्चारतात. संडासापेक्षा सभ्य शब्द म्हणून शौचालय निवडला का असं म्हणावं तर दुसरीकडे हागणदारीमुक्ती’(!) सारखे शब्दही शासकीय वापरात दिसतात. अनेक ठिकाणी संडास बांधले गेले असले तरी त्याचा वापर कुठे फाटी (सरपण) भरून ठेवण्यासाठी, कुठे बाथरूम म्हणून होताना दिसतो तर कुठे देखभालीचं तंत्र माहीत नाही वा देखभाल करायचीच नाही त्यामुळे बांधलेले संडास वापराविना तसेच पडून असतात. संडास नसल्याने बायांची किती कुचंबणा होते हे बायांकडून अनेकदा ऐकले आहे. (स्वानुभवही आहेच) तसेच अंधार पडल्यावरच जायची सोय असल्याने पोटाचे अनेक विकार होतात असंही अनेक अभ्यासातून दिसतं.

गावात वर्गणी काढून जत्रा-उरूस होतात. oil paintच नव्हे तर संगमरवर बसवलेली मंदिरेही उभी राहतात, गावच्या प्रवेश कमानीसाठी लाखो रुपये खर्च होतात मात्र स्वच्छतेचा प्रश्न जिथल्या तिथे राहतो. कधी कुणी मंत्री वा कलेक्टर गाव पाहायला येणार असेल तर गावातल्या बायांची सगळ्यांना हटकून आठवण होते ती गाव स्वच्छ करायला आणि VIPs ना ओवाळायला. पण बायांच्या सुविधांचा प्रश्न कुणाच्याच अजेंड्यावर येत नाही.