Sunday, August 25, 2019

लंडन क्षणचित्रे: १. नॅचरल हिस्टरी म्युझियम


जुलै (२०१९) मध्ये एका प्रोजेक्ट मीटिंगच्या निमित्ताने लंडनला गेले होते. काम झाल्यावर चार दिवस लंडनमध्ये फिरायचा बेत आखला. काम आटोपल्यावर लंडनमध्ये सार्वजनिक वाहतूकीने एकटीने फिरायचा पहिलाच दिवस. मात्र ही व्यवस्था अत्यंत सक्षम आणि प्रवाशांसाठी सुलभ असल्याने माईलएंड ट्यूब स्टेशनवरून ट्रेन पकडून सुखेनैव साउथ केंझिंगटनला पोचले. सबवे पार करून गेल्यावर या म्युझियमची भव्य इमारत दिसली. आवारात प्रथम समोर आला एका झाडाचा बुंधा, जो डायनासोरपेक्षाही जुना असल्याचं माहितीफलकाने सांगितलं आणि आत काय खजिना पहायला मिळणार याची उत्सुकता वाढली. आत गेल्यावर ही इमारत आणखीच सुंदर भासली. कमानी, सुंदर रंगवलेल्या तावदानांच्या खिडक्या, मोठ्ठे वळणदार जिने इमारतीच्या प्रशस्तपणात भर टाकत होते. 


चार्ल्स डार्विन
Entrance of Natural History 














प्रवेश केल्यावर समोर चार्ल्स डार्विनचा (१८०९-१८८२)  सुरेख पुतळा दिसतो. अपार मेहनत घेऊन त्याने पृथ्वीवरील प्रजातींच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीवर संशोधन केले. त्याच्या प्रसिद्ध बीगल जहाजातून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा विविध भूभागात जाऊन अभ्यास केला. असंख्य नमुने (Specimen) गोळा केले. सर्व प्रजातींची उत्पत्त्ती एका पूर्वजापासून झाली हे त्याचे गृहितक जगन्मान्य आहे आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांतही. अशा डार्विनला मानवंदना द्यायला यापेक्षा सुयोग्य जागा कुठली असणार? तर डार्विनने गोळा केलेले काही नमुने इथल्या संग्रहात आहेत, यावरून या ठिकाणाचं ऐतिहासिक मूल्य लक्षात येईल. सेन्ट्रल हॉल मध्येच ब्लू व्हेलचा सांगाडा आहे, तो लोकप्रिय आहे आणि डिप्पी हे त्याचं लाडाचं नाव आहे. इथल्या वस्तू, नमुने, अवशेषांची एकूण संख्या सुमारे आठ कोटी आहे. महत्वाचं म्हणजे म्युझियम पाहण्यासाठी काहीही शुल्क नाही. 

फॉसिल वूमन असं जिला म्हटलं जातं, त्या मेरी अनिंग (१७९९-१८४७) विषयी प्रथमच समजलं.  भूतकाळातील प्रजातींचे अवशेष शोधणं, साफ करणं, ओळखणं हे तिने अनेक वर्ष मनस्वीपणे केलं. तिने शोधलेले काही Jurassic marine fossils इथे आहेत. तिच्या या शोधांमुळे प्रागैतिहासिक काळातील जीवन आणि पृथ्वीचा स्वाभाविक इतिहास याबाबतच्या अभ्यासात मोठे बदल झाले. डार्विनचे ‘Origin of Species तिच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी प्रकाशित झालं, हे लक्षात घेतलं तर तिच्या कामाचं महत्व कळेल. कुठलाही नैसर्गिक बदल म्हणजे ईश्वरी इच्छा असं मानण्याच्या काळात ती नेटाने काम करत होती. अनेक शास्त्रज्ञ, अवशेष साफ करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी तिच्याकडे आणत. पण कोणत्याच संशोधनात तिला श्रेय देण्यात आले नाही. स्त्री असल्याने Geological Society of London चे सदस्यत्व तिला मिळाले नाही. तिच्या मृत्यूनंतर १६३ वर्षांनी, विज्ञानाच्या इतिहासातील दहा प्रभावशाली ब्रिटिश स्त्रियांमध्ये तिचा समावेश करण्यात आला.    
     

डायनासोरवर इथे स्वतंत्र दालन आहे, त्यातल्या अनेक प्रजातींचे सांगाडे, त्यांची इत्यंभूत माहिती आहे. इथे लहान मुलांची गर्दी होती, त्यांना रिझवायला डायनासोरचे दोन हलते नमुनेही ठेवलेत, तिथे सर्वात जास्त गर्दी. अन्य दालनांत अनेक प्राणी, पक्षी, खनिजे यांचे नमुने/अवशेष आहेत. आठ कोटी गोष्टी पाहणं शक्यच नव्हतं. महत्वाच्या गोष्टी पहिल्या. दुपारी ब्रिटीश म्युझियमची टूर ठरलेली होती त्यामुळे ती वेळ गाठण्यासाठी तिथून निघाले.


No comments:

Post a Comment