Sunday, June 5, 2011

डबा

शाळेच्या दारापर्यंत पोचलेच होते तोवर शाळेची घंटा ऐकू आली. आमचं हे कायम असंच. कितीही लवकर निघा पण वाटेत मैत्रिणींना हाका मारतत्यांना बरोबर घेऊन येताना वेळ कुठे पळून जातो कळतच नाही. दारातल्या आजींकडून चिंचा घ्यायच्या होत्या पण घंटा ऐकून ताशी कितीतरी मैल की काय म्हणतात त्या वेगाने वर्गातच. पाचवीत आता कुठून कुठून आलेल्या मुली होत्या. वर्गात बरीच गडबड चालू होती. चष्मिस म्हणजे आमची मॉनीटर पोरींना शांत करत होतीतिला कोण दाद देत नव्हतं ते सोडा. तेवढ्यात प्रार्थनेचा टोल पडला. मग कायजादूची कांडी फिरवल्यासारखी शांतताच.

पाचवीत आल्यावर आपण फार मोठे झालोत असं वाटतंय. आज तर मी पोळ्याही लाटल्या आणि लाटताना आईला शंभर प्रश्न विचारले. त्यात पोळी गोल न होता माझंच बोलणं ऐकतेय असं वाटत होतं म्हणजे माझ्या बाजूनेच ती लांबलचक होत होती. मग आई म्हणालीचपोळी लाटता नाही आली तरी शिंगं फुटली आहेत म्हणून. बाबांनी पहिल्यांदा असं म्हटलं तेव्हा आमचा मुक्काम काळजीने आरशासमोरच. खूप खूप वेळ पाहूनही शिंगं दिसेनाच. तेवढ्यात नमीने हाक मारलीकाचा पाणी खेळायला. मग काय शिंगांचा विसरच. नमी माझ्या काचा घेऊन गेली आहे. आज तिच्याकडून घायच्याच.
मग वर्गातल्या सगळ्याजणी एकदम माझ्याकडे पाहायला लागल्याहाक मारू लागल्या. आपण तर काही नाही केलंमगतेवढ्यात बाईंचा आवाज आलाच, "झोप झाली नाही वाटतं." म्हणजे प्रार्थनाप्रतिज्ञा संपून हजेरीचा कार्यक्रम चालला होता. मी गडबडून हजर’ म्हणाले. आमचं हे असंच. डोक्यात काय काय सुरु झाल्यावर आपण कुठे आहोत हे विसरायलाच होतं. एकदा वर्गात खूप दंगा केला म्हणून बाईंनी मागच्या बाकावर उभं केलं होतं. बाई माझ्यापेक्षा बुटक्या दिसत होत्या. उंचावरून सगळ्या पोरींची डोकी मजेदार दिसत होती. कुणाच्या वेण्याकुणाचे बोसुटलेल्या रिबिनी. पुढच्याच बाकावर बसलेल्या सुलीच्या डोक्यातली ऊ पण दिसली. मजेत चालली होती बेटीजंगलातून पायवाटेकडे म्हणजे केसातून भांगाकडे. एकदम हसूच आलं मला. बाईनी रोखून पाहिलं एकदा. काही बोलल्या नाहीतपण त्यांना काय म्हणायचं ते मला नीट कळलं, “शिक्षा केली तरी पोरी दात काढतातकाय करायचं यांना इ. इ. तर आमची गाडी अशीच भरकटत असते.
हजेरी घेऊन बाई गेल्या. पाचवीत ही एक मजाच आहे. प्रत्येक विषयाला वेगळ्या बाई. इंग्लिशच्या बाई खूप छान आहेत. म्हणजे त्या बोलतात त्यातलं सगळंच कळत नाही तरी ऐकत रहावसं वाटतं. मग मधल्या सुट्टीपर्यंत कसले कसले त्रास म्हणजे तास झाले. तोपर्यंत पोटात कावळेच कावळे. कधी एकदा डबा खातोय असं झालं होतं. या शाळेत पारावर बसून डबा खायला मजा येते, गार गार सावलीत. 
डबा काढून बाकावर ठेवला तेवढ्यात पुढल्या बाकावरच्या शमी आणि सोनीचं भांडण सुरु झालंम्हणजे मारामारीच. दोघी ऐकेनात. झिंज्या ओढतचापट्या मारत मस्तच कार्यक्रम चालला होता. मग मला एकदम भुकेची आठवण झाली. डबा घ्यावा म्हणून पुढे झाले तोवर त्यांच्या झटापटीत तो लांब उडाला. टन टीन टन न्न्न्न्न्न्न्न्न...... डब्याने चांगलाच सूर लावला, निषेधाचा की काय तो. मी तर डोळे गच्च मिटूनच घेतले. डब्याचा आवाज थांबल्यावर डोळे उघडून पाहिलं तर तो आ वासून पडला होता, म्हणजे झाकण बाजूला आणि खाऊ सगळा बाहेर. मला तर रडूच फुटलं. तेवढ्यात क्लासटीचर आल्या, कशाला कोण जाणे? पण सगळा रागरंग बघून त्यांनी शमी सोनीची जी हजेरी घेतली ती घेतली. सांडलेला डबा आणि माझं रडणं पाहून त्या माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, "चल". “पण बाई मी काही नाही केलंअसं म्हणत मी जास्तच रडायला लागले. आज नेमकी डब्यात पोळी भाजी नाही हे वर्गात पसरलेला चिवडा सांगतच होता. 
"आता काय होणार? आपली आता वरातच की काय?" डोक्यात काय काय येत होतं. चालता चालता आम्ही मोठ्या बाईंच्या ऑफिसकडे जायला लागलो. मला भीतीच वाटायला लागली. पण बाई त्या बाजूनी मला टीचर्स रूममधे घेऊन गेल्या. कितीतरी बाई तिथे डबा खात होत्याच. आमच्या बाईंनी प्रेमाने मला त्यांच्या डब्यातला मसालेभात खायला दिला. माझा डबा सांडला हे कळल्यावर इतर बाई पण काय काय द्यायला लागल्याथालीपीठबर्फीचातुकडाकेळंराजगिरा वडीसाबुदाण्याची खिचडी आणि काय काय. मग तर काय एकीकडे रडू येत होतं आणि एकीकडे मस्त वाटत होतं. आग्रह करकरून त्यांनी मला खाऊ घातल्याने पोट टम्म भरलं. मग मी सगळ्यांना तो खाऊ खूप आवडल्याचं सांगितलं. त्यावर आता डबा सांडू नको असं सगळ्या म्हणाल्या. वर्गात परत येताना मी हवेतच. वर्गात आल्यावर रंगवून सगळ्यांना सांगितलं. न खाल्लेल्या पदार्थांचीही नावं ठोकून दिली. आपल्या बाई किती चांगल्या आहेत नाईअसं ऐकणारी प्रत्येकच मुलगी म्हणून जात होती. वर्गात माझी ऐट विचारूच नका.
घरी येऊन पुन्हा आमची रेकॉर्ड सुरुसगळ्यांनी माझ्या बाईना चांगलं म्हणल्यावर मगच टकळी थांबली. रात्री झोपताना डोक्यात तोच विषय. पण तेवढ्यात काहीतरी लखकन समजल्यासारखं वाटलं. दुपारी सगळ्या बाईंनी दिलेला खाऊ खाताना आणि नंतर ती गम्मत रंगवून रंगवून सांगतानाकोणत्याच बाईंच्या डब्यात पोळी भाजी नव्हती हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.            

4 comments:

 1. हुजुरपागेतली मुलगी दिसतेय :-)

  ReplyDelete
 2. Comment received from Vidya Bal through Email;

  प्रिय प्रीती,
  तुझ्या ब्लोगवर मला उत्तर देता येत नाही,म्हणून ही मेलच .तू हे काय नव्याने छान स्फुट लेखन करते आहेस. तुला एकदम लिहायला व्हायला लागलय का?त्यातला मिस्किलपणा बालीशपणा मला खूप आवडला. नवीन काही लिलास तर वाचायला जरूर पाठव.

  . .विद्याताई

  ReplyDelete
 3. वा! मस्तच....लंपनच्या बहिणीची एन्ट्री झाली म्हणायची!

  छान आहे ललित लेख....आवडला...

  उत्पल

  ReplyDelete
 4. Yes Aativas

  Thank you Vidyatai for your compliment.

  Thanks Utpal, do you really feel so? I like Lampan, evergreen writing of Prakash Narayan Sant.

  ReplyDelete