Wednesday, March 6, 2013

इतिहास ‘पर्सनल इज पोलिटिकल’ चा


मिळून साऱ्याजणीच्या दिवाळी (२०१२) अंकात Personal is Political ही घोषणा केट मिलेट या अमेरिकन स्त्रीवादी अभ्यासक-कार्यकर्तीने दिली असा उल्लेख आहे. ते वाचून Personal is Political बाबतचे अनेक संदर्भ आठवले, ते पडताळून पाहिले. साधारण ४०-४२ वर्षापूर्वी हा वाक्प्रयोग केला गेला. थोडं त्या इतिहासात डोकवावं असं वाटल्याने हा लेखनप्रपंच.
अमेरिकेत १९६० नंतर नवडाव्या चळवळीतल्या अनेक स्त्रियांचा तिथे भ्रमनिरास झाला आणि त्यातून स्वायत्त स्त्रीचळवळीला चालना मिळाली. केट मिलेटचा ‘Sexual Politics’ हा निबंध १९६७ साली प्रकाशित झाला. ह्या निबंधात केटने राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण नव्हे तर एकूणच सत्तासंबंध हे भान दिलं होतंच. मात्र Personal is Political हा वाक्प्रयोग त्यानंतर आला. ह्या वाक्प्रयोगाचं श्रेय कॅरोल हानिश या अमेरिकन स्त्रीवादी अभ्यासक-कार्यकर्तीला दिलं जातं. आयोवा राज्यात वाढलेल्या कॅरोलने ड्रेक विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पुरा केला. तिचा सामाजिक चळवळीशी संबंध आला तो मिसिसिपी नागरी हक्कांच्या लढ्यातून. या लढयात ३-४ वर्षे काम केल्यावर कॅरोल १९६७ मधे Southern Conference Education Fund (SCEF)च्या न्यूयॉर्क ऑफीसमधे रूजू झाली. ‘New York Radical Women’ या जहाल स्त्रीवादी (Radical Feminist) गटात ती कार्यरत होती. मिस अमेरिका सौंदर्यस्पर्धेचा निषेध करण्याची कल्पना कॅरोलची होती. १९६८ मधे स्पर्धेच्या वेळी निदर्शने करण्यात आली. तेव्हा केलेल्या पथनाट्यात निदर्शकांनी स्त्रियांच्या छळाची साधने’ (सौंदर्य प्रसाधने, अंतर्वस्त्रे इ.) ‘Freedom Trash’ मधे फेकली. यातूनच ‘Bra-burning’ ची दंतकथा जन्माला आली असं कॅरोल नोंदवते. २००३ सालच्या एका मुलाखतीत कॅरोलने सांगितलं “आम्हाला काही जाळण्यास परवानगी नव्हती, आम्ही काही वस्तू म्हणजे उंच टाचेचे बूट, अंतर्वस्त्रे, प्रसाधने वगैरे फेकून दिली.” मिस अमेरिका स्पर्धेच्या निषेधाला ३५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अमेरिकेत रेडिओवर ही मुलाखत प्रसारित करण्यात आली.
‘The Personal is Political हा जो कॅरोलचा निबंध प्रकाशित झाला ते मूळचं एक टिपण होतं. कॅरोलची एक सहकारी डोरोथी (डॉट्टी) झेलनरने ‘Consciouness Raising’ ची एक उपचारपद्धती म्हणून संभावना करून स्त्री-मुक्ती चळवळ खरोखर राजकीयआहे का, असा सवाल केला होता. त्याला उत्तर म्हणून केलेल्या टिपणाचं शीर्षक होतं, ‘Some Thoughts in Response to Dottie’s Thoughts on a Women’s Liberation Movement’. नंतर हे टिपण ‘Personal is Political’ अशा शीर्षकाखाली ‘Notes from the Second Year: Women’s Liberation in 1970 ह्या संग्रहात प्रकाशित करण्यात आलं. शुलामिथ फायरस्टोन आणि अँन कोएट ही या संग्रहाची संपादक जोडी. रोचक भाग असा की या शीर्षकाचं श्रेय कॅरोल संपादकांना देते. कॅरोलनी नोंदवल्याप्रमाणे कॅथी साराचाइल्डने हे टिपण निबंध म्हणून प्रकाशित करता येण्याची शक्यता संपादकांच्या लक्षात आणून दिली. (कॅथी साराचाईल्डचे मूळ नाव कॅथी अमाथेक, आईचे नाव सारा म्हणून तिने साराचाईल्ड असे नाव घेतले.) त्यानंतर संपादकांनी तो निबंध संपादित करून ह्या शीर्षकासहित प्रसिद्ध केला.  
१९६०च्या दशकात Consciousness Raising वा जाणीवजागृती हा अमेरिकन स्त्रीवादी चळवळीचा कृती-कार्यक्रम होता. New York Radical Women गटाने असे जाणीवजागृती गट सुरु केले. ही लाट अमेरिकेत पसरली. आपल्या आयुष्यातील प्रश्नांवरच्या चर्चा स्त्रिया ह्या गटांतून करत. स्त्रीम्हणून आपल्याला कशा प्रकारच्या दडपणुकीला सामोरं जावं लागतं याची उदाहरणे कोणी देईल का असा एका चर्चेत अँन फोरेचा प्रश्न होता. तिने पुढे म्हटलं, “I need to know it to raise my own consciousness.” यावर कॅथी साराचाईल्डच्या मनात Consciousness Raising’ याच शब्दप्रयोगाचा विचार आला आणि या गटाने तो अंमलात आणला. स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न हे निव्वळ वैयक्तिकनसून ते व्यवस्थात्मकपातळीवरील सत्तासंबंधांचे प्रश्न आहेत हे भान आणण्याचा या गटांनी प्रयत्न केला. जाणीवजागृती म्हणजे स्वत:ला आणि इतरांना राजकीय जाणीव विकसित होण्यासाठी मदत करणे. राजकीयम्हणजे पक्षीय/निवडणुकांचे राजकारण नसून, एकूणच सत्तासंबंध असा व्यापक अर्थ इथे अभिप्रेत आहे. स्त्रियांना आपल्या दुय्यमत्वाची जाणीव नाही, ती निर्माण करायला हवीया गृहितातून चर्चा होत असत.
New York Radical Women गटाच्या या चर्चा-बैठका SCEF च्या कार्यालयात होत असत. SCEF ने या बैठका घेण्यास परवानगी दिली होती, तसंच कॅरोलच्या विनंतीनुसार स्त्री-मुक्ती कार्यक्रमाच्या शक्यता दक्षिणेत पडताळून पाहण्याच्या कामासही SCEF ची मान्यता होती. तरीही SCEF चे कर्मचारी स्त्रिया व पुरुष या गटात एकत्र येणाऱ्या ‌‍ स्त्रियांवर टीका करू लागले, असं कॅरोल नोंदवते. अशा चर्चांना ते Naval gazing - आत्ममग्न चिकित्सा, वैयक्तिक उपचार गट असं म्हणत आणि हे निश्चितच ‘Political’ नाही असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्रिया (फक्त व्यवस्थेमुळे) दडपल्या गेल्या आहेत हे ते कधी कधी मान्य करत. समान कामाला समान वेतन आणि काही हक्क हवेत हे त्यांना मान्य होतं मात्र तथाकथित वैयक्तिक प्रश्नांना सार्वजनिक आयाम देण्याच्या प्रयत्नांची ते खिल्लीच उडवत. पुरुषांनी घरकाम व अपत्यसंगोपनात मदत करावी या मागणीची स्त्री व तिच्या जोडीदारातील वैयक्तिक प्रश्न म्हणून संभावना करत. जर स्त्रिया स्वत:साठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घेतली तर अशा स्वायत्त स्त्री-चळवळीची गरजच नाही असा त्यांचा दावा होता. वैयक्तिक पुढाकारातून ज्याची सोडवणूक होणार नाही, ते क्रांतीसोडवेल मात्र स्त्रियांनी तोंड बंद ठेवून (नेमून दिलेले) काम केले तरच, असा काहीसा सूर होता. कॅरोलनी नोंदवल्यानुसार स्त्रियांच्या दडपणुकीत पुरुषांचा फायदा आहेअसं म्हणणं म्हणजे पापच होतं. अशा प्रकारे स्वायत्त स्त्रीचळवळ थांबवण्याचे किंवा तिला सोयीस्कर वाटेवर नेण्याचे प्रयत्न चालू होते. स्वायत्त स्त्रीचळवळीच्या ह्या संघर्षातून या निबंधातील सिद्धांकन पुढे आले आहे, असं कॅरोल म्हणते.
राजकारण या संज्ञेला व्यापक अर्थ देणाऱ्या या निबंधाच्या सुरुवातीला कॅरोल उल्लेख करते तो डाव्या चळवळीतील ‘उपचार’ विरुद्ध ‘उपचार आणि राजकारण’ (Therapy v/s Therapy and Politicsह्या वादाचा. उपचार हा अनुचित शब्दप्रयोग आहे कारण उपचारात आजार आणि त्यावरचा इलाज अभिप्रेत आहे. उपचारपद्धती म्हणजे वैयक्तिक पर्यायांशी जुळवून घेणे. पण इथे मुळात बऱ्या नसलेल्या पर्यायांशी ‘adjust’ करायचं नसून वाईट परिस्थिती बदलायची आहे, असं कॅरोल मांडते. वैयक्तिक अनुभवांच्या आधारे प्रश्नांची उत्तरं शोधणारी आणि त्यातून सामायिक निष्कर्षाप्रत जाणारी ही छोटी छोटी चर्चासत्रं म्हणजे एक प्रकारची राजकीय कृतीच असल्याचे ती म्हणते. कार्यकर्ती म्हणून समोर आलेल्या पेचावर ती म्हणते, “”माझ्या स्वत:च्या वैयक्तिक प्रश्नांविषयी बोलायला मी अशा सत्रात जात नाही कारण चळवळीतली स्त्री म्हणून स्वतंत्र, नि:स्वार्थी, सक्षम आणि आयुष्यावर नियंत्रण असलेली स्त्री असण्याचं माझ्यावर दडपण आहे. माझ्या आयुष्यात प्रश्न आहेत असं म्हणणं म्हणजे माझं दुबळेपण मान्य करणं. अशावेळी राजकीय कृती म्हणजे (चळवळीतली स्त्री म्हणून) मला जे काही सांगितलंगेलं आहे ते बोलण्यापेक्षा मला जे खरोखरवाटतं त्याचा शोध घेणे. ह्या चर्चांतून आम्हाला उमजलं की आमचे वैयक्तिक प्रश्न हे राजकीय प्रश्न आहेत आणि त्यावर वैयक्तिक उपाय नाही. सामूहिक उपायांसाठी सामूहिक कृतीची गरज असते. मी ह्या बैठकांना जाते कारण (नागरी हक्क) चळवळीतल्या चार वर्षात मिळाली नाही अशी राजकीय समज मला या चर्चांतून मिळाली. माझ्या डोळ्यावरचा नकली चष्मा गळून पडला आणि स्त्रीम्हणून माझं आयुष्य काय आहे याची जाणीव झाली”.
मात्र काही बाबतीत ही चर्चासत्रं उपचारात्मक होती हे नाकारून चालणार नाही हे सांगताना ती दोन गोष्टींचा उल्लेख करते; एक म्हणजे अपराधीपणाच्या (स्वत:ला दोष देण्याच्या) भावनेतून सुटका आणि प्रथमच स्वत:बद्दल, स्वत:च्या आयुष्याबद्दल विचार. इथे कॅरोल लीलिथ मधील एका व्यंगचित्राचा संदर्भ देते, जे म्हणतं “I am Changing. My mind is growing muscles”. अर्थात मार्क्स, लेनिन, एंगल्स, माओ, हो यांचाच शब्द अखेरचा असं जे मानतात त्यांना असे गट म्हणजे वेळेचा अपव्ययच वाटेल, अशी कोपरखळीही मारते.
ह्या निबंधातील सिद्धांकन New York Radical Women च्या Pro-woman’ (स्त्री समर्थन) तटातून आलं आहे, असं कॅरोल नमूद करते. हा निबंध लिहिण्याच्या सहा महिने आधी मिस अमेरिका स्पर्धा-निषेधाच्या निमित्ताने गटाबाहेर जाऊन कृती करण्याची गरज अनेकींच्या लक्षात आली होती. मात्र ह्या कृतीच्या निमित्ताने निदर्शकांत तट पडल्याचे दिसते. स्त्रिया स्वत:च चेहरा रंगवून, अडचणीचे कपडे-उंच टाचेचे बूट घालून आपल्या दुय्यमत्वाला खतपाणी घालतात, असं मानणाऱ्या तटाला ‘Anti-woman’ म्हटलं गेलं. १९६८ मधे मिस अमेरिका स्पर्धेविरोधात केलेल्या निदर्शनात काही निदर्शकांनी सहभागी स्त्रियांवर टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर सौंदर्याचे भ्रामक मापदंड लादणारे आयोजक सोडून स्त्रीवादी कार्यकर्त्याच सहभागी स्त्रियांच्या दृष्टीने शत्रूबनल्या. Pro-woman भूमिकेनुसार सहभागी स्त्रियांचा नव्हे तर त्यांच्यावर ते लादणाऱ्या समाजाचा समाचार घ्यायला हवा. मेकअप केलेल्या स्त्रियांना चांगलं वागवलं जात असेल आणि मेकअप न केलेल्या स्त्रियांना आजारीम्हटलं जात असेल तर अशा परिस्थितीत मेकअप केलेली स्त्री दडपशाहीला हातभार लावते, असं म्हणता येत नाही. म्हणून स्त्रियांच्या दमनासाठी स्त्रियांना जबाबदार धरता येत नाही. मात्र हे प्रतिपादन अतिसुलभ असल्याची टीका झाली. जर स्त्रियांचं वर्तन ही दमन करणाऱ्या समाजात अपरिहार्यता असेल तर स्त्रिया ही व्यवस्था कधीतरी बदलू शकतील का? असा सवाल Anti-woman भूमिकेच्या पुरस्कर्त्यांनी उपस्थित केला. निबंधातील प्रतिपादनाच्या केंद्रस्थानी Pro-woman भूमिका आहे. स्त्रियांच्या स्थितीसाठी सतत त्यांनाच जबाबदार धरणं, सामान्य स्त्रियांना अज्ञानी समजणं योग्य नाही असं कॅरोल म्हणते. सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा चळवळीतल्या स्त्रियांना जास्त समजतं हा विचार तिने नाकारला. आपण त्यांचंऐकायला हवं कारण त्या चळवळीत नसण्याची अनेक चांगली कारणं त्यांच्याकडे असू शकतात. स्त्रियांना स्वत:ला स्त्रीवादी का म्हणवून घ्यावंसं वाटत नाही यामध्ये आपल्या विचार आणि कृतीमध्ये काही दोष नाही ना हे पाहायला हवं अशी मांडणी कॅरोलने केली आहे.
ह्या काळातील स्त्रीवादी चळवळीला दुसरी लाट (Second wave) म्हटलं जातं. अमेरिका व इग्लंडमध्ये १९वे शतक आणि विसाव्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत (१९२०) मतदानाच्या हक्कासाठी झालेल्या चळवळीला पहिली लाट म्हणलं जातं. १९६० नंतरच्या ह्या दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादी चळवळीत विचार/सिद्धांकनाचे अनेक प्रवाह होते. त्यात जहाल स्त्रीवादी सिद्धांकन जोरकसपणे पुढे आलेलं दिसतं. केट मिलेट, शुलामिथ फायरस्टोन ह्या त्यात आघाडीवर होत्या. जहाल स्त्रीवाद्यांनी पुरुषसत्ताक समाजातील लैंगिक राजकारण पुढे आणलं, लिंगावर आधारित दमन हे प्राथमिक असल्याचं त्यांनी जाहीर केलं. साहजिकच पुरुषसत्ता आणि त्यातील लिंगाधारित भूमिकांना आव्हान हे त्यांचं लक्ष्य बनलं. केट मिलेटने लैंगिक नातेसंबंध हे सत्तासंबंध असतात हा विचार मांडला. पाश्चात्त्य समाजातील पुरुषसत्ता आणि साहित्याची चिकित्सा करताना लिंग वा लैंगिकता हा राजकीय घटक म्हणून दुर्लक्षित राहतो अशी मांडणी केली. शुलामिथ फायरस्टोनने मार्क्सवादी सिद्धांकन पद्धतीचा वापर करून मानवी समाजाचा इतिहास हा लिंगांमधील द्वंद्वाचा आहे असं मांडताना स्त्रियांचे दुय्यमत्व जैविकतेशी जोडले. अर्थात जहाल स्त्रीवादी विवेचनावर खूप टीका झाली, हे विवेचन अनैतिहासिक आहे ह्या आक्षेपाबरोबरच फक्त लिंगाधारित दमनाला प्राथमिकता दिल्याने दमनाचे इतर अनेक आयाम दुर्लक्षित झाल्याची टीका झाली. जगभरातील स्त्रियांना निव्वळ जैविक साम्य गृहीत धरून एकाच कोटीक्रमात बघणे हे फसवे होते.    
समलिंगी (लेस्बिअन) स्त्रीवाद्यांनी स्त्री-दमनाच्या पुरुषकेंद्रित विश्लेषणाला प्रश्नचिन्ह लावले. जहाल स्त्रीवाद्यांचा समलैंगिक चळवळीला पाठिंबा होता आणि दोहोंत सुरुवातीला फारसे ता नव्हतेमात्र १९७० नंतर काही लेस्बियन कार्यकर्त्यांनी अलगतेची भूमिका घेतली ज्यांचा मुख्य आक्षेप भिन्नलिंगी संबंध असलेल्या स्त्रियांबद्दल होता, पुरुषांशी संबंध म्हणजे त्यांच्या दृष्टीने शत्रूशी संबंध ठेवल्यासारखे (Sleeping with the enemy) होते’, असं १९९९ मधील एका भाषणात कॅरोलने नोंदवलं आहे. हळूहळू लिंग ह्या मुद्द्यावरील वादाने उग्र स्वरूप धारण केलं. या वादाच्या काळाला तर स्त्रीवादी लिंग युद्ध (Feminist Sex Wars) म्हटलं जातं. लिंगविषयक अनेक मुद्द्यांवर ह्या काळात धारदार चर्चा झाल्या; ज्या कडवट बनत गेल्या. अश्लील साहित्य (Pornography), वेश्याव्यवसाय, लैंगिक कल, लिंगभाव अस्मिता (Gender identities) अशा अनेक मुद्द्यांवरील भूमिकांसंदर्भातले हे वाद होते. ह्याच काळात स्त्रीवाद्यांनी लावून धरलेल्या समान हक्कांसाठी कायद्यात बदलाच्या मागणीचा (Equal Rights Amendment) पराभव झाला. त्यात Post feminist प्रतिपादनांचीही भर पडली, ज्यांनी स्त्रीवादी संकल्पना आणि सिद्धांकनावर टीका केली. स्त्रीवादाच्या प्रस्तुततेलाच त्यांनी आव्हान दिलं. अनेक इतिहासकार मानतात की ह्या घडामोडीतून १९८० च्या दशकात दुसरी लाट थांबल्यासारखी झाली मात्र यातूनच स्त्रीवादाच्या तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला. 
पहिल्या व दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादी ज्या बदलांसाठी लढल्या, ते तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद्यांना जन्मत:च मिळाले आहेत. त्यामुळे त्या स्वत:कडे सक्षम आणि खंबीर म्हणून पाहतात. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद हा अधिक संधी आणि कमी लिंगभेदअशा आत्मविश्वासावर उभा राहिला. आधीच्या चळवळीपेक्षा आमची चळवळ वेगळी असल्याचं त्यांनी जाहीर केलं. हा स्त्रीवाद जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत उदयाला आला. साम्यवादाचे पतन, वाढता धार्मिक-वांशिक मूलतत्त्ववाद, माहिती व जैवतंत्रज्ञानाचे लाभ व धोके ह्यासारख्या प्रक्रियांचा हा काळ आहे. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद अमेरिकेत ‘Grrl feminism’ तर युरोपमध्ये ‘New Feminism’ म्हणून ओळखला जातो. ह्या काळात कडव्या ख्रिश्चन संघटनांनी जगण्याचा हक्कह्या मुद्दा घेऊन कायदेशीर गर्भपातावर हल्ले केले. १९९१ मधे अनिता हिलने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश क्लेरन्स थाँमस लैंगिक छळाचे आरोप ठेवले तेव्हा प्रसारमाध्यमांनी तिची कुचेष्टा केली. ह्या घटनांनंतर तरुण स्त्रीवाद्यांचा निषेध प्रकट होऊन ह्याविरोधात संघटित जाणीव निर्माण झाली. ह्या जाणीवेतून Riot Grrrl चळवळीची सुरुवात झाली असं साधारणपणे दिसतं. ह्या घटनांवर प्रतिक्रिया लिहिताना जेन स्मिथ हिने माउंट प्लेझंटला झालेल्या वांशिक दंग्याचा संदर्भ घेत, अँलिसन वूल्फला लिहिलं, आता मुलींच्या दंग्याची सुरुवात करायला हवी. काही काळातच ह्या दोघींनी काही समविचारी मुलींसोबत Riot Grrrl ची सुरुवात केली. प्रौढ स्त्रीला Girl म्हणणं प्रस्थापित संकेतानुसार अवमानकारक समजलं जातं. स्त्रीवाद्यांनी ही अर्थछटा नाकारली. गुरगुराट ध्वनित करणारे दोन/तीन r त्यांनी girl  ह्या शब्दात जोडले. तरुण मुलींशी जोडून घेण्याची रणनीती ह्यात दिसते. Riot Grrrl ही पंक रॉक शैलीतली स्त्रीवादी चळवळ आहे. मुलींनी गिटार उचलून जोरात गाणे म्हणजे केवळ मजा नव्हती तर त्याकडे एक मुक्तिदायी कृती म्हणून पाहिलं गेलं. बिकिनी किलआणि ब्रॅटमोबाईलहे दोन बँडस् ह्या चळवळीशी पहिल्यापासून संबंधित होते. स्त्रीवादाची सक्षमीकरणाची रणनीती आणि पंक रॉकची Do it Yourself शैली ह्यांचा मिलाफ करत, पंकरॉक ह्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात Riot Grrrl बँडस् नी स्वत:ची जागा निर्माण केली. या बँडस् मधे पुरुषही आहेत. संगीताच्या माध्यमातून लिंगभावाचे अनेक मुद्दे मांडणारा Riot Grrrlतिसऱ्या लाटेतील स्त्रीवादाचा एक महत्वपूर्ण अविष्कार आहे. असे काही गट युरोप-अमेरिकेत कार्यरत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाची ओळख इतर अनेकींना करून देणारे; असे काही गट स्वत:ला Cyber Grrls किंवा Net Grrls म्हणवतात.
तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादी सिद्धांकन हे बहुविध आहे. त्यात स्थानिक, राष्ट्रीय व राष्ट्रसीमांच्या पलीकडे जाणाऱ्या कृतीवादाबरोबर ठळकपणे दिसते ती वैयक्तिक प्रतिकाराची नीति. स्त्रियांना सरसकट एकाच कोटीक्रमात बसवणाऱ्या आधीच्या स्त्रीवादावर टीका करत; हा स्त्रीवाद स्त्रियांमधील भिन्नता, संदिग्धता आणि बहुविधतेकडे बघतो. त्यांच्या मते राजकीयहे अपरिहार्यपणे वैयक्तिकआहे. त्यामुळे बहुविध अस्मिता घेऊन वैयक्तिक संघर्ष करण्यावर इथे भर आहे. डल्लास कुलन या प्राध्यापिकेने विद्यार्थिनी Personal is Political कडे कसं बघतात हे नोंदवलं आहे. विद्यार्थिनींच्या मते मी स्वत:ला स्त्रीवादी म्हणून निश्चित केलं असेल तर स्त्रीवाद ही माझी राजकीय भूमिका आहे आणि म्हणून माझ्या सर्व कृतींना राजकीय अर्थ आणि महत्व आहे’. रोजच्या आयुष्यातील लिंगभेद तपासणं, त्यावर प्रश्न उभे करणं, त्याला (वैयक्तिक) प्रतिकार करणं ही रणनीती तिसऱ्या लाटेतील अनेक स्त्रीवाद्यांनी घेतली आहे. आपण स्वत:ही दमनव्यवस्थेचा भाग असतो हे स्पष्ट भान या स्त्रीवादाने आणलं आहे. ख्रिस्तीन डोसा लिहिते, ‘दर मिनिटाला माझा कोणीतरी उपयोग करून घेत असतं, कोणीतरी माझी उपेक्षा करत असतं, आणि मी दुसऱ्या व्यक्तीची. (जणू काही) दुरुपयोगाची व्यवस्थाच कार्यरत आहे; त्यात मी नेमकी कुठे आहे हे मला कळायला हवं’. सर्व प्रकारचं दमन हे एकमेकाशी जोडलेलं आहे हे सांगताना ती पुढे म्हणते; ‘एडस् विरुद्ध लढायचं असेल तर समलैंगिकतेबद्दल वाटणाऱ्या भीतीशी लढायला हवं, या भीतीशी लढायचं असेल तर वंशवादाविरुद्ध लढायला हवं........इ. इ’. जागतिकीकरणाच्या गुंतागुंतीच्या काळात (लिंगभाव) अस्मितांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिन्न्तेच्या राजकारणाकडे जायला हवं, जिथे सर्व सहभागी विशिष्ट राजकीय मुद्दे आपले मानतील आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील असं काही स्त्रीवादी मांडतात. पण ते कसं ह्याची मांडणी नीटशी दिसत नाही. मात्र दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादावर टीका करतानाही त्यांचं वैयक्तिकप्रश्नांचं राजकीयआकलन तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद्यांना महत्वाचं वाटतं. ह्या संदर्भात नोमी लॅम लिहिते की जुन्या, गुळगुळीत झालेल्या वैयक्तिक म्हणजे राजकीयच्या सूत्राकडे मी परत येते कारण ते खरंआहे. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादी मानतात की राजकारण हे रोजच्या आयुष्यातून पुढे येतं कारण (जे) वैयक्तिक (ते) अजूनही राजकीयच आहे.
भारतीय स्त्रीवादी चळवळीला Personal is Political हे भान महत्वाचं वाटतं किंबहुना त्याभोवतीच चळवळीतला कृतीवाद उभा राहिलेला दिसतो. ह्याचा ऐतिहासिक आढावा घेणंही रोचक ठरेल मात्र तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तरीही जाता जाता अलीकडे वारंवार प्रत्ययाला येणारा एक मुद्दा नमूद करण्याची गरज वाटते. आजच्या परिस्थितीत स्त्रीवादी राजकारण उभे रहाताना इतर अनेक धोक्यांबरोबर त्याचे मामुलीकरण होण्याचा धोका दिसतो आहे. दिल्ली बलात्कार घटनेनंतरच्या निदर्शनांतून, अशा प्रश्नांना केवळ शासनसंस्था जबाबदार असल्याचं चित्र उभं राहिलं कारण निदर्शकांची मुख्य मागणी ही कायद्यात बदलाची होती. आपल्या समाजातला दुसरा कल म्हणजे एक तास दिवे बंदकिंवा बस डेसारख्या कृती. प्रश्नामागची राजकीय गुंतागुंत न बघता, अशा राजकीय वैयक्तिक कृतींची गोळाबेरीज म्हणजे त्यावरचं उत्तर असं काहीसं हे चित्र आहे. जागरूकता निर्मितीसाठी ह्या कृती उपयुक्त आहेतच. मात्र कृतीवाद ह्या मर्यादेतच थांबला तर त्यात प्रश्नाचे आणि त्याच्या सोडवणुकीचे मामुलीकरण होण्याचा धोका दिसतो. तसंच कोणत्याही प्रश्नाची जबाबदारी समाजातील निव्वळ एखाद्या घटकावर ढकलण्यातही हाच धोका आहे. अशा परिस्थितीत Personal is Political चे भारतीय आणि जागतिक संदर्भातील सर्वंकष भान घेऊन, मुख्य म्हणजे लिंगभावाच्या सातत्याने बदलत्या भूमिका आणि अस्मिता लक्षात घेऊन स्त्रीवादी राजकारण पुढे जायला हवं.
प्रसिद्धी: मिळून साऱ्याजणी, मार्च २०१३ 



Friday, February 22, 2013

अंधारातील लख्ख संवेदना


ऑड्रीयस हायनिक हा जर्मन माणूस रेडिओ स्टेशनवर पत्रकार म्हणून कार्यरत होता. त्यावेळी अपघातात दृष्टी गमावलेला एक अंध माणूस त्याचा सहाय्यक म्हणून काम करू लागला. सुरुवातीला ऑड्रीयसला त्या माणसाची दया आली पण नक्की त्याच्याशी कसं जुळवून घ्यावं ते कळेना. मात्र हळूहळू ऑड्रीयसच्या लक्षात आलं की अंध असणं म्हणजे डोळस माणसांपेक्षा काही वेगळ्या क्षमता असणं. ह्या क्षमता ओळखून ऑड्रीयसने त्याला रेडिओच्या कामासाठी प्रशिक्षित केलं. एक प्रकारे अंध माणसाने त्याचे डोळे उघडले आणि अशा गोष्टींवर मात करून पुढे कसं जाता येईल या विचाराला प्रेरणा दिली. आज डॉ. ऑड्रीयस हायनिक ओळखले जातात ते Dialogue in the Dark यासारख्या अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनक्षम उपक्रमांचे निर्माते म्हणून. दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीच्या Dialogue in the Dark: Moving beyond sight!  ह्या उपक्रमात अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. अशा उपक्रमांना उद्योगाचं रूप देण्याचं यशस्वी धाडस ऑड्रीयसने केलं आहे.  
ऑड्रीयसची कौटुंबिक पार्श्वभूमी विलक्षण आहे. त्याचा जन्म १९५५चा. त्याच्या आईच्या कुटुंबातील अनेकजण नाझी जर्मनीतील ज्यू लोकांच्या शिरकाणात बळी पडले होते तर वडिलांचे कुटुंब हे नाझी समर्थक होते. दुसऱ्या महायुद्धात आपल्या आईने तिचे जवळपास सर्व कुटुंब गमावले हे त्याला १३ वर्षाचा झाल्यावर समजले. ज्यू आणि नाझी अशा परस्परविरोधी वारशामुळे, त्यातील तणावामुळे तो खूप विचार करू लागला; वगळले जाणे, परिघाबाहेर ढकलले जाणे, समूळ उच्छेद या प्रक्रिया का घडतात? माणसं एकमेकांना हीन वा श्रेष्ठ का लेखतात? याचा शोध तो घेऊ लागला. ह्या शोधातून सहिष्णुता, संवाद आणि देवाणघेवाण या गोष्टींचं महत्व लक्षात आलं. पुढे रेडिओवर अंध व्यक्तीबरोबर काम करताना अंधांच्या दृष्टीहीन जगाबद्दल ‘दृष्टी’ निर्माण झाली. त्याने अंधांसाठीच्या एका संस्थेत काम सुरु केलं. अंधांना विशिष्ट माहितीपासून दूर ठेवलं जातं हे त्याला दिसत होतं. त्या व्यक्तींचं (तथाकथित) अपंगत्व त्यांना (तथाकथित) धडधाकट माणसांपासून अलग पाडत होतं. माणसांमाणसांतली ही अंतरं दूर करायला हवी हे त्याने ओळखलं आणि १९८८ मधे Dialogue in the DDark ची सुरुवात झाली. जर्मनी, अमेरिका, आशियातल्या अनेक देशात हा उपक्रम व्यावसायिक पद्धतीने राबवला जातो. भारतात हे ठिकाण आहे हैदराबादेतील, इन-ऑर्बिट मॉलमधे.
कामानिमित्ताने मी नेहमीच फिरत असते. जुलै २०१२ मधे हैदराबाद प्रवास ठरलेला होता. मग काम झाल्यावर २-३ दिवस तिथेच सुट्टी घालवण्याचं ठरवलं. खाणे, फिरणे आणि नवनवीन अनुभव घेण्यासाठी माझा सहचर संदीप उत्सुक असतो. इंटरनेटवरून Dialogue in the Dark त्यानेच शोधून काढलं. माझं काम पूर्ण झाल्यावर तो हैदराबादला आला. रमझानच्या काळात तिथे असल्याने इफ्तारची मनसोक्त मजा घेतली आणि हैदराबादेतील इतर काही ठिकाणं पहिली. अर्धा दिवस राखून ठेवला होता, ‘Dialogue in the Dark’ साठी. यात दोन भाग आहेत. एक प्रदर्शन आणि दुसरं म्हणजे अंधारातलं जेवण (Lunch/Dinner). प्रदर्शन या शब्दातच काही बघणं अभिप्रेत आहे. मात्र इथलं प्रदर्शन म्हणजे द्दृष्टीशिवाय अन्य संवेदना अनुभवणं. गर्द अंधार असलेल्या मोठ्या दालनात जाताना हातात पांढरी काठी दिली जाते. तेथील कर्मचारी आपल्याला एका रांगेत (म्हणजे तुम्ही जितके असाल त्यांना) एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन जातात. या आधाराची गरज भासतेच कारण आत गर्द अंधार. मोबाईल वगैरे सर्व वस्तू बाहेर ठेवायच्या. (थोडे तरी पैसे जवळ ठेवावेत) प्रकाशाची बारीकशी तिरीपही येणार नाही अशी आतमध्ये चोख व्यवस्था. आपल्याला आतल्या मार्गदर्शकावर सोपवलं जातं. मार्गदर्शक अत्यंत सफाईने त्याचं काम करत असतो म्हणजे सूचना देणे, धडपड झाली तर आधार देणे, चुकलेल्यांना योग्य मार्गाला लावणे अशा कितीतरी गोष्टी. सुरुवातीला डोळे फाडफाडून आजूबाजूचा काही अंदाज येतोय का हे पाहण्याचा (?) प्रयत्न केला; जी डोळस माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असावी. नंतर त्यातली निरर्थकता लक्षात आली, इतर संवेदनांवर लक्ष दिलं आणि या पाऊण तासाच्या प्रवासात काहीही दिसत नसताना स्पर्श, गंध, श्रवण याद्वारे खूप गोष्टी अनुभवल्या. कुठे खडकाळ जमीन लागली तर कुठे गवताळ, थंड गुहेत गेल्याचा आभास, प्राण्यांचे आवाज, खळाळत्या पाण्याचे सान्निध्य, बोटीत बसून जलविहाराचा आनंद आणि बरंच काही. या फेरफटक्यात ती काठी किती महत्वाची आहे ते कळून आलं. गंध वा स्पर्शाद्वारे काही वस्तू ओळखणं, कॅफेटेरियामध्ये खाद्यपदार्थ विकत घेऊन अचूक पैसे देणं, खुळखुळणारा चेंडू मारून दाखवणं (!) अशा माफक परीक्षाही इथे आहेत. अर्थात हे सारं करताना मजा तर आलीच; पण काही न दिसणं हे किती मोठं आव्हान आहे याबद्दलची जाणीवही निर्माण होत होती. प्रदर्शन पूर्ण होऊन बाहेर येईपर्यंत जेवायची (Lunch) वेळ झालीच होती.  
जेवणासाठी आत प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी व्हीडीओ क्लिप दाखवण्यात आली. ताट म्हणजे घड्याळ समजून काही सूचना दिल्या गेल्या. उदा. ११ च्या बाजूला ताटाबाहेर पाण्याची बाटली, १ च्या ठिकाणी ताटात वाटी इत्यादी. वर प्रेमळ भाषेत ‘काही तुटल्याफुटल्यास पैसे वसूल होतील’ हा इशारा. पुन्हा आम्हाला आत अंधारात नेऊन मार्गदर्शकावर सोपवण्यात आलं. त्याने योग्य जागी बसण्यास मदत केली आणि जेवणाबाबत नेमक्या सूचना देऊन तो वाढायच्या तयारीला लागला. सूप, स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट हा नेहमीचा क्रम. तसं अंधारात जेवताना, घास तोंडात जाण्याऐवजी नाकात जाणार नाही याची आपल्याला खात्री असते. पण एरवी जेवताना पदार्थाच्या वासाबरोबर त्याचे दृश्य रूपही आस्वाद घेण्यात महत्वाचे ठरते. इथे मात्र गंध आणि चव म्हणजेच आपले नाक आणि जीभ यांचीच भूमिका महत्वाची होती, सारी ज्ञानेंद्रिये तिथे एकवटली. जेवताना आमचा मार्गदर्शक रजाक आम्हाला कुठे काय वाढलंय याबद्दल मोलाच्या सूचना करत होता आणि आस्थेने चौकशीही; जेवण आवडतंय ना इत्यादी.      
हे सारं अनुभवत असताना आपले कान शाबूत आहेत याची खात्री झाली, कारण जेवण आणि प्रदर्शन दोन्ही ठिकाणी मुख्य भिस्त त्यावर होती. आपल्याला दिसतं त्यामुळे इतर ज्ञानेंद्रियांवर आपण फार कमी वेळा अवलंबतो असं लक्षात आलं. दुसरं म्हणजे इकडे तिकडे ‘बघायला’ काही नसल्याने जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. तिसरं म्हणजे जेवताना गप्पांचा अभूतपूर्व आनंद घेता आला. अभूतपूर्व यासाठी की इतकं विनाव्यत्यय जेवण आपण कधीच केलं नसल्याचं जाणवलं. चौथी गोष्ट म्हणजे पोट भरल्यावर आम्ही थांबलो. रोज जेवताना एखादा घास अंमळ जास्त झाला तरी तो पानात दिसत असल्याने सहसा आपण तो खाऊन टाकतो. पण इथे तसं झालं नाही. थोडे पदार्थ वाया गेले, पण त्या दृष्टीविहीन जगात आपल्या शारीर संवेदना फार सजगपणे अनुभवता आल्या आणि पोट भरल्याचे समाधान वाटताक्षणी आम्ही थांबलो. भरल्या पोटाने आणि मनाने बाहेर लख्ख प्रकाशात आलो.
इथे मला आठवतोय ‘वदनी कवळ घेता हा श्लोक. अनेकांनी लहानपणी तो म्हटलेला असतो. या श्लोकाची आधुनिक समतावादी आवृत्तीही आपल्याला माहीत असेलच;
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे
कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल
यातला ‘चित्त विशाल होण्यासाठी उदरभरण’ हा भाग मला फार भावतो. पण थोडं यापुढे जाऊन मी आता म्हणू शकते, उदरभरण हे दृष्टी विशाल होण्यासाठीही आहे, म्हणजे डोळस माणसांची दृष्टी विशाल होण्यासाठी. प्रदर्शन आणि जेवणासाठी आम्हाला रोहित आणि रजाक या मार्गदर्शकांनी मदत केली. निरोप घेण्यासाठी ते आमच्याबरोबर बाहेर आले. आम्हाला अतिशय सफाईदारपणे मदत करणारे ते आमचे ‘मार्गर्शक’ पूर्णपणे अंध होते. ह्याचा थोडा अंदाज होता तरीही इतका विलक्षण अनुभव देणाऱ्या त्या ‘अंध’ मित्रांना पाहून दोन क्षण आम्ही नि:शब्द झालो. पण लगेचच लखकन् जाणीव झाली की आपण त्यांच्याशी बोलायला हवं. आमच्या चेहऱ्यावर त्या दोन क्षणात काय भाव आले असतील, माहीत नाही. पण रोहित, रजाकला ते दिसले नाहीत म्हणून बरंच वाटलं. कारण चुकूनही तिथे कणव दिसली असती तर त्या अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या, स्वावलंबी तरुणांना काय वाटलं असतं? त्यांचे मनापसून आभार मानून, नुसते तोंडीच नाही तर हातात हात घेऊन; आम्ही दोघांचा निरोप घेतला. क्षणभर मोह झाला त्यांच्याबरोबर फोटो घ्यायचा पण ती गोष्ट त्यांच्यासाठी किती अप्रस्तुत आहे हे आम्हाला जाणवलं आणि आम्ही निघालो. उदरभरणामुळे दृष्टी खरोखर विशाल होण्याचा हाच तो क्षण होता.......



 डॉ. ऑड्रीयस हायनिकनी Dialogue Social Enterprise  Moving Beyond Differences  ही कंपनी स्थापन केली आहे. या अंतर्गत ‘Dialogue in the Dark’ व्यतिरिक्त अन्य दोन सामाजिक उपक्रम डॉ. ऑड्रीयस हायनिकनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने उभारले आहेत. एक म्हणजे Dialogue in Silence-Moving beyond Speech जिथे मूकबधीरांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी Sound proof जागेत खुणांच्या भाषेत संवाद साधला जातो. दुसरा वृद्धांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा उपक्रम म्हणजे Dialogue with Time  The Art of Aging. याही ठिकाणी मूकबधीर वा वृद्ध माणसंच मार्गदर्शक म्हणून काम करतात. Social Entrepreneur  म्हणून अनेक मानसन्मान डॉ. हायनिक ह्यांना मिळाले आहेत. डॉ. हायनिक जर्मनीतील युरोपिअन बिझिनेस स्कूलमधे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. Dialogue सारखे उपक्रम या शिक्षणाच्या मुख्य धारेत यावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हा विचार फक्त शिक्षणाच्या पुनर्विचारापुरताच नाही तर अपंगत्वामुळे अलग पडणाऱ्या लोकांबद्दल समाज संवेदनक्षम बनावा जेणेकरून अपंग माणसं समाजात सहज सामावली जावी अशा व्यापक उद्देशाने ते काम करत आहेत.   


पूर्वप्रसिद्धी: मिळून साऱ्याजणी, जानेवारी २०१३       

Wednesday, November 7, 2012

शिवाजी फाउंड इन भीमनगर मोहल्ला


अरेच्या नाटकाचं नाव बदललं की काय? अंडरग्राउंड चा फाउंड? शिवाजी प्रकटला (माफ करा) शिवाजी राजे प्रकटले की काय?
कुठून तरी जरब बसवणारा आवाज आला, कोण तो शिवाजी, शिवाजीराजे म्हणतोय? छत्रपती म्हणा, पायाशी तरी बसायची लायकी आहे का तुमची?
म्हणजेच आम्ही शिकलो; शिवाजी महाराज थोर होते, त्यांच्यापुढे उभं राहायची आपली लायकी नाही. आता लायकीच काढल्यावर; त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत होते तरी मनातले प्रश्न मनातच. जसे महाराज आम्हाला दाखवले गेले तसेच आम्ही बघितले. आम्हाला लहानपणापासून दिसलेला शिवाजी कसा? (पुन्हा चुकले; शिवाजी नाही शिवाजी महाराज!)

पुण्यात सोन्याचा नांगर चालवणारे शिवाजी महाराज!
स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवाजी महाराज!
शाहिस्तेखानाची बोटे तोडणारे शिवाजी महाराज!
अफझलखानचा कोथळा बाहेर काढणारे शिवाजी महाराज!
आग्र्याहून चातुर्याने सुटका करून घेणारे शिवाजी महाराज!
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ शिवाजी महाराज!
‘हिंदू’पदपातशहा शिवाजी महाराज!
जुलमी मुसलमान राजवटीविरुद्ध हिंदू धर्मरक्षणार्थ उभे ठाकलेले शिवाजी महाराज!
या सगळ्या वर्णनविहारात गरीब रयतेच्या कल्याणासाठी झटणारा तो राजा कुठे गेला? शिवाजीराजे कळले ते गड-किल्ले, मोहिमा, लढाया, गनिमी कावा या संदर्भातच. म.फुल्यांनी गौरवलेला कुळवाडी भूषण राजा आम्हाला समजलाच नाही कधी. शूद्र समजल्या गेलेल्या कुळात त्यांनी जन्म घेतला. जातीवादी व्यवस्थेत त्यांची अतुलनीय कामगिरी राज्याभिषेकासाठी पुरेशी ठरली नाही. राजपुतानातल्या शिसोदिया वंशाशी संबध दिसल्यावरच त्यांचे क्षत्रियत्व मान्य करण्यात आले. पण इथल्या ब्राह्मणांनी नाहीच मानले तेव्हा राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्टाना आणावे लागले.

शेतजमिनीची मोजणी करणारा राजा, शेतसाऱ्याची न्याय्य व्यवस्था बसवणारा राजा, दुष्काळात सारा माफ करणारा, परंपरागत उद्योगात अडकून पडलेल्या बलुते-अलुतेदारात स्वराज्याची भावना जागवणारा, त्यांना लढायला उभं करणारा आमचा राजा कधी ठळकपणे पुढे आलाच नाही. स्त्रियांच्या बाबतीत न्याय्य भूमिका घेणारा, त्यांचा सन्मान राखणारा राजा आम्हाला दाखवला गेला तो फक्त कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भात. (तोही त्यांच्या तोंडी घातलेल्या कपोलकल्पित अनुदार उद्गारातून – अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो वगैरे वगैरे) पण स्त्री सन्मानाची कैक उदाहरणे पुढे आलीच नाहीत.
शिवाजीराजांच्या कारभारातील मुद्द्यावर आम्ही क्वचितच बोललो. त्यांचा आर्थिक कार्यक्रम काय होता? अन्य राजवटीसंदर्भातली त्यांची धोरणे काय होती? त्यांनी रयतेला पाणीपुरवठा, पीक, सरंक्षण, बाजारव्यवस्था यासाठी नेमकं काय काय केलं, आम्हाला माहीत नाही. अनेक मावळ्यांना पारंपारिक उद्योगातून म्हणजेच जातीव्यवस्थेतून बाहेर काढून लढायला बळ देणारा राजा, आम्हाला दिसला नाही. काही संशोधकांनी हे प्रयत्न केले पण ‘शिवाचा अवतार म्हणजे शिवछत्रपती’ या भव्यदिव्य प्रतिमेची आम्हाला भूल पडली होती. आमचे इतिहासाचे ज्ञान म्हणजे पुस्तकी, तेही शालेय पुस्तकापुरतेच. सनसनावळ्या तोंडपाठ म्हणजे इतिहास पक्का. पुस्तकात इतिहासावर असलेले धडे शिकून आम्ही मार्क मिळवले पण इतिहासाने शिकवलेले धडे?

शिवाजी म्हणजे मुसलमानांना डिवचण्यासाठी असलेली ‘हिंदूंची’ जागीर नाही की अन्य जातींना कमी लेखण्यासाठी ‘मराठा’ जातीची, ना कोणत्या प्रांताची. आपला राजा अशी कोणाची मक्तेदारी नाही. तो सामाजिक समतेची आस असणाऱ्या साऱ्या लोकांचा राजा आहे. म्हणजेच हा राजा गोब्राह्मणप्रतिपालक नाही तर शूद्रांचा, नाडलेल्या रयतेचा राजा आहे, मग तो असणार त्याच्या गरीब-शोषित रयतेबरोबरच. म्हणूनच तो भीमनगर मोहल्ल्यात ‘भूमिगत’ नाहीये तर तिथे तो सापडलाय, त्याच्या रयतेच्या ज्ञानात, विचारात आणि कृतीत. मग भेटणार ना आपल्या राजाला?     
   
टीप: ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविषयी हा लेख आहे, हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच. 



Tuesday, August 28, 2012

उदरभरण आहे दृष्टी होण्या विशाल !!!!


वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्याला माहीत असतो. अनेकांनी लहानपणी म्हटलेला असतो. या श्लोकाची आधुनिक समतावादी आवृत्तीही आपल्याला माहीत असेलच;
वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे
कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल
यातला ‘चित्त विशाल होण्यासाठी उदरभरण’ हा भाग मला फार भावतो. पण थोडं यापुढे जाऊन मी आता म्हणू शकते, उदरभरण हे दृष्टी विशाल होण्यासाठीही आहे. तुम्ही म्हणजे जे स्वच्छ बघू शकतात ते हं; कधी पूर्ण अंधारात या उदरभरणाचा म्हणजे जेवण्याचा अनुभव घेतलाय? अर्थात विजेच्या अवकृपेमुळे अनेकांनी तो घेतलाही असेल. मेणबत्ती लावून Candle light dinner म्हणून वेळ साजरीही केली असेल. पण मिट्ट काळोखात, जिथे काहीच दिसत नाही, जिथे बिलकुल उजेड नाही अशा ठिकाणी कधी मुद्दाम जाऊन तुम्ही जेवला आहात का?
हे ठिकाण आहे हैदराबादमधे. Dialogue in the Dark असं या जागेचं नाव. यात दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे Exhibition याबद्दल अधिक वाचा येथे गर्द सभोवती. दुसरा भाग म्हणजे अंधारातलं जेवण (Lunch/Dinner). जेवणासाठी आत प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी व्हीडीओ क्लिप दाखवली जाते. ताट म्हणजे घड्याळ समजून काही सूचना दिल्या जातात. उदा. ११ च्या बाजूला ताटाबाहेर पाण्याची बाटली, १ च्या ठिकाणी ताटात वाटी इ.इ. वर प्रेमळ भाषेत ‘काही तुटल्याफुटल्यास पैसे वसूल होतील’ हा इशारा.
स्वयंसेवक आपल्याला एका रांगेत (म्हणजे तुम्ही जितके असाल त्यांना) एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन जातात. या आधाराची गरज भासतेच करण आत गर्द अंधार. मग आपल्याला आतल्या मार्गदर्शक स्वयंसेवकावर सोपवलं जातं. तो आपल्याला योग्य जागी बसण्यास मदत करतो. जेवणाबाबत नेमक्या सूचना देऊन जेवण वाढायच्या तयारीला लागतो. जेवण म्हणजे Four Course Meal.
तिथे दिसत तर काहीच नव्हतं. मेनूही माहीत नव्हता फक्त Veg की Non-veg ही पसंती विचारली होती. त्यामुळे आपल्यापुढे काय येणार याची उत्सुकता होती आणि ते न पाहता अनुभवण्याचीही! प्रथम रजाकने सूप आणलं. मग स्टार्टर. त्यानंतर मेन कोर्स म्हणजे Veg fried rice सारखाच प्रकार. सर्वात शेवटी desert. जेवताना आम्हाला कुठे काय वाढलंय याबद्दल तो मोलाच्या सूचना करत होता आणि आस्थेने चौकशीही; जेवण आवडतंय ना इ.     
तसं अंधारात जेवताना, घास तोंडात जाण्याऐवजी नाकात जाणार नाही याची आपल्याला खात्री असते. पण एरवी जेवताना पदार्थाच्या वासाबरोबर त्याचे दृश्य रूपही आस्वाद घेण्यात महत्वाचे ठरते. स्टार्टर वगळता बाकी काही हाताने खायचं नव्हतंच त्यामुळे नेहमी जेवताना होणारा अन्नाचा स्पर्शही नव्हता. त्यामुळे गंध आणि चव म्हणजेच आपले नाक आणि जीभ यांचीच भूमिका महत्वाची होती. सारी ज्ञानेंद्रिये तिथे आपोआप एकवटल्यासाखे वाटले.
हा जेवणाचा अनुभव फारच वेगळा होता. एकतर आपले कान नीट शाबूत आहेत याची खात्री झाली, कारण मुख्य भिस्त त्यावर होती. आपल्याला दिसतं त्यामुळे इतर ज्ञानेंद्रियांवर आपण फार कमीवेळा अवलंबतो असं लक्षात आलं. दुसरं म्हणजे इकडे तिकडे बघायला काही नसल्याने जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. तिसरं म्हणजे जेवताना गप्पांचा अभूतपूर्व आनंद घेता आला. अभूतपूर्व यासाठी की इतकं विनाव्यत्यय जेवण आपण कधीच केलं नसल्याचं जाणवलं. चौथं म्हणजे पोट भरल्यावर आम्ही थांबलो. रोज जेवताना एखादा घास अंमळ जास्त झाला तरी तो पानात दिसत असल्याने सहसा आपण तो खाऊन टाकतो. पण इथे तसं झालं नाही. थोडे पदार्थ वाया गेले, पण त्या दृष्टीविहीन जगात आपल्या शारीर संवेदना फार सजगपणे अनुभवता आल्या आणि पोट भरल्याचे समाधान वाटताक्षणी आम्ही थांबलो.
छान जेवून बाहेर लख्ख प्रकाशात आलो. मागोमाग आलेल्या अंध रजाकने आमचे आभार मानले. क्षणभर मोह झाला त्याच्याबरोबर फोटो घ्यायचा, पण ती गोष्ट रजाकसाठी किती अप्रस्तुत आहे हे आम्हाला जाणवलं. त्याचा हात हातात घेऊन आम्ही त्याचा निरोप घेतला. या उदरभरणामुळे दृष्टी खरोखर विशाल होण्याचा हाच तो क्षण होता.

टीप: Dialogue in the Dark: Moving beyond sight! दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयोग आहे. यामध्ये अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. हैदराबादला गेलात तर हा अनुभव चुकवू नका. अधिक माहितीसाठी पुढील लिंक बघा;



Sunday, June 17, 2012

माती


प्राथमिक शाळेत मातीकामाचा स्वतंत्र वर्ग होता. मातीकामाच्या तासाला मऊ चिकणमातीचा एकएक गोळा मिळायचा. मस्त असायची ती माती! एकदा थोडीशी चाखून पाहिली होती, काय छान चव होती! मग मातीकामाच्या तासाला चिमूटभर माती तोंडात जायला लागली, अर्थात सगळ्यांची नजर चुकवून हं. शाळा भरायच्या आधी शिपाईकाका रोज मातीचा गोळा बनवायचे. ते पाहायला, कधी कधी तुडवायला जाम मजा यायची.
एकदा सकाळी उठले तर डोळा हा सुजलेला, उघडेचना. रांजणवडी नव्हती किंवा डोळेही आलेले नव्हते, म्हणजे असं घरातले बोलत होते. मला तर डोळे आले म्हणजे काय कळतच नव्हतं, डोळे आहेतच की आपल्याला, मग आत्ता आलेत म्हणजे काय? पण ही बडबड तेव्हा कोणी ऐकून घेणार नाही हे माहीत होतं आणि सगळे माझ्याकडे देत असलेलं लक्ष उगीच प्रश्न विचारून कमी करायचं नव्हतं. मग चर्चा होऊन त्यावर तुळशीची माती लावण्यात आली. काय बरं वाटलं, गार गार माती डोळ्यावर ठेवल्यावर! मग माती आणखीन आवडायला लागली. मला पाटीवरची पेन्सिलही चाखायला आवडायची. तिच्या आणि मातीच्या चवीत साम्य होतं थोडं. पण बावळट लीलूला हे पटायचंच नाही, ती आपली माती ब्याक, माती ब्याक करत बसायची. मलाही कधी कधी माती घाण असं वाटू लागलं होतं. नेहमी छान असणाऱ्या मातीचा पावसाळ्यात जाम चिखल व्हायचा. कपड्यावरचे डाग जाता जायचे नाहीत, कितीही घासलं तरी. त्यातून मातीत जंतू असतात, त्यामुळे रोग होतात असं शास्त्राच्या पुस्तकात वाचल्याने मातीपासून दूर राहावं असं वाटायला लागलं. अभ्यासाच्या पुस्तकातून माती वेगळ्याच अर्थाने भेटायला लागली. माती केली म्हणजे वाट लावली, मातीमोल म्हणजे शून्य किंमत, माती चारली म्हणजे एखाद्याला हरवलं, माती खाल्ली म्हणजे वाईट काम केलं. पण मातीचं महत्वही अभ्यासातून कळत होतं. मातीचा थर नसेल तर वनस्पती वाढत नाहीत, धान्य पिकत नाही, मातीची धूप झाल्याने पर्यावरणाची हानी होते हे समजल्यावर पुन्हा बरं वाटलं.
माती खाणे हा आजार आहे असं कळल्यावर मात्र मी हबकले. म्हणजे आपण आजारी होतो की काय? पण आजार म्हणजे तर ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब वगैरे. कोणाकोणाला कावीळ, कांजिण्या असे काय काय आजार होतात. आपल्याला तर तसं काहीच होत नाहीये मग माती खाणे हा आजार कसा काय बुवा? मग याबद्दल ज्याला, त्याला विचारायला सुरुवात केली. खनिजाची किंवा आणखी कशाची तरी शरीरात कमी असेल तर माती खावीशी वाटते असं कळलं. जंत झाले तर माती खावीशी वाटते की माती खाल्ल्याने जंत होतात यावर एकमत नव्हतं. त्यामुळे डोक्यातला गोंधळ जोरातच वाढला.
माझ्या एका मैत्रिणीचा काका आदिवासींमधे काम करत होता. त्याचा जगभरच्या आदिवासींवर खूप अभ्यास होता म्हणे. त्याला मी विचारलं, माती खाणं हा आजार आहे का म्हणून. त्याने सांगितलं, हो आणि नाहीही. मी बुचकळ्यात, अशी दोन उतरं कशी काय, एकच उत्तर पाहिजे – हो किंवा नाही. शाळेत असंच तर शिकवतात. मग असं कळलं की काही समाजात हा आजार समजतात तर काही समाजात अशी चाल आहे. लहान मुलं आणि स्त्रिया, बहुतेकदा गरोदर स्त्रिया माती खातात. प्राणीही माती खातात, त्यातून शरीराला काही आवश्यक घटक मिळतात म्हणे. काही आदिवासी समाजात तर समारंभपूर्वक माती खातात म्हणजे खरीखुरी माती खातात. हात्तिच्या, म्हणजे योग्य-अयोग्य असं लोक ठरवतात होय? हे शाब्बास, माझी मातीची आवड परत उफाळून आली.  
एकदा एक विज्ञानकथा वाचत होते. परग्रहावरचे जीव येऊन जमेल तितकी पृथ्वीवरची माती घेऊन जातात, कारण काही उगवायला त्या ग्रहावर मातीच नसते. या कथेतले पृथ्वीवासीही माती म्हणजे घाण असं समजत असतात, पण हे पाहिल्यावर त्यांना मातीचं महत्व कळतं अशी काहीशी गोष्ट होती.
जन्मानंतर बाळाची नाळ मातीत पुरतात. काही धर्मात मेल्यावर माणसांना पुरतात हे पुढे कळत गेलं. ‘आपली माती’ चा अर्थ कळला. लोक कामानिमित्ताने जगभर जातात पण म्हातारपणी त्यांना आपल्या ठिकाणी परतावंसं वाटतं, आपल्या मातीची ओढ लागते हे कळलं. पण मोठा प्रश्न पुढे आहे तो म्हणजे ‘इतक्या वर्षांनी ती माती तशीच राहते की बदलते?’

Saturday, May 19, 2012

रस्ता


लहानपणी एकट्याने हिंडायची मर्यादा म्हणजे वाड्याचे दार. पुढेच रस्ता असल्याने आम्हा बारक्या पोरांना कोणी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडायला सक्त मनाई होती. त्यामुळेच की काय, वाड्यालगतच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन येणे हाही पराक्रम वाटायचा. मोकळ्या वेळात आमचा मुक्काम दारालगतच्या पायऱ्यांवर असायचा. रस्त्याचा तो पट्टा जणू पाठ झाला होता.
उन्हाळ्याच्या दिवसात रात्री मजाच, कारण सगळेच बाहेर बसत वा खेळत असल्याने रस्त्यावर मनमुराद भटकता येई. एकदा आम्ही असेच बसलेलो असताना एक साहेब विचारत आले, हा रस्ता कुठे जातो? आधी मला हसायलाच आलं. पण मग भीती वाटली खरंच रस्ता कुठे गेला तर? मी त्यांना म्हटलं, रस्ता कुठे नाही जात, इथेच असतो. हं त्यावरून माणसं मात्र इकडे तिकडे जातात. त्यांनी हसून मग मोठ्या माणसांकडे मोर्चा वळवला. मग कोणीतरी त्यांना सांगितलं, हा रस्ता मंडईकडे जातो. मला वाटलं रस्ते कसे चालतील? असं काय म्हणतात हे सगळे?
एकदा सकाळी रस्त्यावर, वाड्यापासून थोड्या लांब अंतरावर दोन तीन मोठे खड्डे दिसले. आम्ही उडालोच, कधी झाले हे खड्डे? असे कसे रस्त्यांना खड्डे होतात? मग आमची डोकी सुरु झाली. कुणी खड्डे पाडले असतील का? रस्त्याला त्रास झाला असेल. त्यावर पशा म्हणाला, चल छोड, रस्त्यांना काही दुखत नाही. रोज एवढ्या गाड्या जातात तेव्हा कधी आवाज तरी येतो का रस्त्याचा? मजबूत असतात ते?
मजबूत असतात तर मग खड्डे कसे होतात? कुणाची तरी शंका. मग आम्ही पुन्हा विचार करू लागलो. राणी म्हणाली,काल मी मंडईत गेले होते किनई, तिथे पण रस्त्याला असेच मोठे खड्डे होते. मग माझं विचारचक्र की काय ते जोरातच सुरु झालं. सगळे म्हणतात हा रस्ता इकडे जातो, तो तिकडे जातो म्हणजे रस्ता चालत असणार आणि त्यामुळेच ते मंडईतले खड्डे इकडे आले असणार. तसं मी म्हणाले, पण सगळ्यांना नाही तर राणी आणि दिप्याला फक्त. बाकी सगळे काय म्हणतील ते सांगता येत नाही. राणी आणि दिप्या विचारात पडले, असं कसं होईल? जादूच्या गोष्टीत नाही का गालीचा उडवतात? आणि त्या कोणीतरी नाही का भिंत चालवली? मग रस्ते न चालायला काय झालंय, हळूहळू त्या विचारात आम्ही घुसायला लागलो.
दुसऱ्या दिवशी बघायचे, खड्डे इथेच असतील तर मग रस्ते चालत नाहीत, पण खड्डे नसले तर चालतात, असे ठरले. मग कधी एकदा सकाळ होते यातच घरी गेलो. आईनी खीरपुरी केली होती जेवायला, मग काय! त्यात सगळं विसरायला झालं. रात्री मामाकडे जायचं ठरलं, मी तिथे राहण्याचा हट्ट करणार हे नक्की. आई तयारीतच होती. मामाकडे दोन दिवस कसे गेले कळलं नाही, रस्त्याचा पार विसर पडला. घरी येताना रस्त्याकडे नीट पाहिलं तर खड्डे गायब, रस्ता पूर्वीसारखाच गुळगुळीत. चला म्हणजे रस्ते चालतात तर, मी मनातल्या मनात टाळ्या पिटल्या. राणी नि दिप्याला बोलावलं, त्यांनी आधीच पाहिलं होतं. ही गम्मत कोणालाच सांगायची नाही असं आम्ही ठरवलं. 
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरात आवाज येऊ लागला, खण....खण....खण बाहेर जाऊन पाहिलं तर दोन तीन माणसे रस्त्याला काहीतरी करत होती. दिप्या म्हणाला, रस्ता खणतायत, नक्कीच दुखत असणार, केवढा ओरडतोय बघ तो रस्ता. आम्ही त्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांना काही सांगू लागलो तर त्या आवाजात काहीच कळेना. शेवटी त्यांनी आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही निमूट दुकानाच्या पायऱ्यावर जाऊन बसलो, ते काय करतायत ते बघत. मग त्यांनी रस्त्याला खड्डे पाडले, का कोण जाणे? म्हणजे रस्त्याला असे खड्डे पाडता येतात तर! आम्ही उत्सुकतेने बघू लागलो.    
तेवढ्यात एक काका येऊन त्यांना ओरडू लागले. परवाच या इथले खड्डे बुजवले, रस्ता चांगला केला नि आज परत कशाला खोदता वगैरे. आधी जिथे खड्डे होते तिथेच हात दाखवून ते ओरडत होते. म्हणजे ते खड्डे कोणीतरी बुजवले होते, रस्ता चालला नव्हताच. माझा हिरमोडच झाला.  पण मग वाटलं रस्ता चालत नाही म्हणजे हा रस्ता इथून कुठेच जाणार नाही, नेहमी राहणार आमची सोबत करायला, आम्हाला चालायला, रात्री खेळायला. डोक्यातलं चक्र थांबेपर्यंत ‘काम चालू रस्ता बंद’ झाला होता. ऐन दुपारी रस्ता एकदम मोकळा, मग काय ‘रस्ता बंद पण आमचा खेळ चालू’............!

   


         

Monday, April 16, 2012

वरसई

वरसई, ता. पेण, जि. रायगड. बाळगंगेच्या तीरावरचं चिमुकलं गाव. गावातला वैजनाथ (शंकर) पंचक्रोशीत प्रसिद्ध. शिवरात्रीला मोठा उत्सव असतो. शिवरात्र आणि त्रिपुरी उत्साहाने साजरी होते. कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच इथे मुख्यत्वे भातशेती आहे. भात निघाल्यावर वाल घेतात. या पट्ट्यातले कडवे वाल प्रसिद्ध आहेत. 

वरसई हे माझ्या आईच्या आत्याचं गाव. लहानपणी फार नाही पण किमान दोनतीन सुट्ट्यात तरी वरसईला गेल्याचं आठवतंय. तेव्हा वरसई फाट्यापर्यंतच एसटी होती. तिथून बैलगाडीत बसून पुढे. बरीच भावंडे एकत्र असल्याने खेळायला खूप मिळायचं. नदीवर जाणे, विहिरीचे पाणी काढणे, म्हशीचे नुकतेच काढलेले दूध पिणे ही शहरी आयुष्यात नसलेली आकर्षणंही होतीच. अर्थात लहान असल्याने, फार काम करावं लागत नसल्याने ते सुखाचं वाटत असणार. नाहीतर इतके पाहुणे आल्यावर घरच्या बाईचं जे होतं ते होतं. पुन्हा इतक्या छोटया गावात, सगळ्यांचे स्वयंपाक-पाणी करायचे म्हणजे..... पण त्या आजीच्या घरी नेहमी राबता असायचा. 

हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतीच शिवरात्रीला मी वरसईला जाऊन आले, अनेक वर्षांनी. देवळात गेल्यावर अनेक गोष्टी आठवू लागल्या. देवळात माडीवर सनई चौघडा चालू होता.  वैजनाथाच्या देवळात आम्ही दुपारी खेळायचो, तेव्हा एका दुपारी मी कुतूहलाने चौघड्यावर थाप मारली होती. तिथल्या काकांनी शुकशुक करून खाली जाऊन खेळायला सांगितलं होतं म्हणजे तिथून हाकललंच होतं. इतकी वर्षं झाली, हा प्रसंग मला कधी आठवला नव्हता. पण त्या जागी गेल्यावर क्षणात स्मृती सेवेला हजर झाली आणि तो प्रसंग समोर उभा राहिला. त्याचं नवल करतच दर्शन घेतलं. चांगलीच गर्दी होती. नंतरच्या गप्पात कळलं, आज उत्सवामुळे गावात गर्दी. दोन दिवसांनी गावातली नव्वद टक्के घरं कुलुपबंद. 

वरसई तसं कोणाला माहित असण्याची शक्यता नाही. या भागात १९८९ मध्ये मोठा पूर आला होता, ज्यात अनेक बळी गेले. त्या पुराचे उल्लेख स्थानिकांच्या बोलण्यात हमखास येतात. तेव्हा कदाचित वरसईचं नाव पेपरमध्ये आलं असेल. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना कदाचित 'माझा प्रवास' हे गोडसे भटजींचं पुस्तक माहित असेल. ५७च्या (म्हणजे १८५७) बंडाच्या ऐन धामधुमीत वरसई गावचे गोडसे भटजी उत्तरेत गेले होते. घरची अतिशय गरिबी होती. धर्मस्थळी जाऊन काही प्राप्ती होईल या विचाराने ते उत्तरेत निघाले. वाटेत झाशीला ते बंडात सापडले. पुढे सुखरूप परत आले. गोडसे भटजी कल्याणला भारताचार्य वैद्यांकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे पूजा सांगायला जात. भारताचार्य तेव्हा कॉलेजविद्यार्थी होते. गोडसे भटजींच्या तोंडून त्यांच्या प्रवासाच्या कथा ते नेहमी ऐकत. त्यांनी भटजींना हे सारं लिहून काढायला सांगितलं आणि संपादित करून यथावकाश ते पुस्तक स्वरुपात प्रकाशित केलं. मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन हा मान त्याला मिळाला. पण त्याबरोबरच त्या कालखंडाचा तो महत्वाचा दस्तावेज ठरला. कल्याणला माझे काका रहात असल्याने तिथे मी अनेकदा जाते, राहते. हे वैद्य कुटुंबही आमच्या माहितीचं. त्यामुळे वरसईचा धागा तसाही जोडला गेला आहे. 


(या पुस्तकावरील लेखासाठी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11939678.cms इथे जा)


आता बाळगंगेवर कामार्ली गावी मोठं धरण होतंय. नव्वद टक्के काम झालं आहे. त्यामुळे वरसई (आणि अनेक गावं) काही काळातच पाण्याखाली जातील. नुकसान भरपाईबद्दल नीट काही कळत नाहीये. काही गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. समितीला आपल्या मर्यादा माहित आहेत. धरण तर आपण रोखू शकणार नाही मग योग्य पुनवर्सन यासाठी धडपड चालू आहे. 

मन उदास व्हायला लागलंच. पण नंतर वाटलं, शब्दश: गाव आत्ता उठत असलं तरी ही प्रक्रिया केव्हाच सुरु झाल्ये. मुंबई-पुण्यात अनेक कुटुंबं फार वर्षापासून रहात आहेत, तिथलीच बनली आहेत. जगण्यासाठी, विकासाच्या संधीसाठी भारतातली अनेक गावं अशी वर्षानुवर्षं विस्थापित होतच आहेत. गावातली लोकंही हे जाणून आहेतच. प्रत्यक्षात नाही तर भविष्यात आपलं गाव मनात, स्मृतीत, श्रुतीत राहील हे लोकांनी पुरतं ओळखलं आहे. म्हणूनच गाव आहे तोवर शिवरात्रीला तरी येऊन, ते बघून जायची धडपड अनेकजण करतात, मी ही त्यातलीच एक........