Saturday, May 19, 2012

रस्ता


लहानपणी एकट्याने हिंडायची मर्यादा म्हणजे वाड्याचे दार. पुढेच रस्ता असल्याने आम्हा बारक्या पोरांना कोणी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडायला सक्त मनाई होती. त्यामुळेच की काय, वाड्यालगतच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन येणे हाही पराक्रम वाटायचा. मोकळ्या वेळात आमचा मुक्काम दारालगतच्या पायऱ्यांवर असायचा. रस्त्याचा तो पट्टा जणू पाठ झाला होता.
उन्हाळ्याच्या दिवसात रात्री मजाच, कारण सगळेच बाहेर बसत वा खेळत असल्याने रस्त्यावर मनमुराद भटकता येई. एकदा आम्ही असेच बसलेलो असताना एक साहेब विचारत आले, हा रस्ता कुठे जातो? आधी मला हसायलाच आलं. पण मग भीती वाटली खरंच रस्ता कुठे गेला तर? मी त्यांना म्हटलं, रस्ता कुठे नाही जात, इथेच असतो. हं त्यावरून माणसं मात्र इकडे तिकडे जातात. त्यांनी हसून मग मोठ्या माणसांकडे मोर्चा वळवला. मग कोणीतरी त्यांना सांगितलं, हा रस्ता मंडईकडे जातो. मला वाटलं रस्ते कसे चालतील? असं काय म्हणतात हे सगळे?
एकदा सकाळी रस्त्यावर, वाड्यापासून थोड्या लांब अंतरावर दोन तीन मोठे खड्डे दिसले. आम्ही उडालोच, कधी झाले हे खड्डे? असे कसे रस्त्यांना खड्डे होतात? मग आमची डोकी सुरु झाली. कुणी खड्डे पाडले असतील का? रस्त्याला त्रास झाला असेल. त्यावर पशा म्हणाला, चल छोड, रस्त्यांना काही दुखत नाही. रोज एवढ्या गाड्या जातात तेव्हा कधी आवाज तरी येतो का रस्त्याचा? मजबूत असतात ते?
मजबूत असतात तर मग खड्डे कसे होतात? कुणाची तरी शंका. मग आम्ही पुन्हा विचार करू लागलो. राणी म्हणाली,काल मी मंडईत गेले होते किनई, तिथे पण रस्त्याला असेच मोठे खड्डे होते. मग माझं विचारचक्र की काय ते जोरातच सुरु झालं. सगळे म्हणतात हा रस्ता इकडे जातो, तो तिकडे जातो म्हणजे रस्ता चालत असणार आणि त्यामुळेच ते मंडईतले खड्डे इकडे आले असणार. तसं मी म्हणाले, पण सगळ्यांना नाही तर राणी आणि दिप्याला फक्त. बाकी सगळे काय म्हणतील ते सांगता येत नाही. राणी आणि दिप्या विचारात पडले, असं कसं होईल? जादूच्या गोष्टीत नाही का गालीचा उडवतात? आणि त्या कोणीतरी नाही का भिंत चालवली? मग रस्ते न चालायला काय झालंय, हळूहळू त्या विचारात आम्ही घुसायला लागलो.
दुसऱ्या दिवशी बघायचे, खड्डे इथेच असतील तर मग रस्ते चालत नाहीत, पण खड्डे नसले तर चालतात, असे ठरले. मग कधी एकदा सकाळ होते यातच घरी गेलो. आईनी खीरपुरी केली होती जेवायला, मग काय! त्यात सगळं विसरायला झालं. रात्री मामाकडे जायचं ठरलं, मी तिथे राहण्याचा हट्ट करणार हे नक्की. आई तयारीतच होती. मामाकडे दोन दिवस कसे गेले कळलं नाही, रस्त्याचा पार विसर पडला. घरी येताना रस्त्याकडे नीट पाहिलं तर खड्डे गायब, रस्ता पूर्वीसारखाच गुळगुळीत. चला म्हणजे रस्ते चालतात तर, मी मनातल्या मनात टाळ्या पिटल्या. राणी नि दिप्याला बोलावलं, त्यांनी आधीच पाहिलं होतं. ही गम्मत कोणालाच सांगायची नाही असं आम्ही ठरवलं. 
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरात आवाज येऊ लागला, खण....खण....खण बाहेर जाऊन पाहिलं तर दोन तीन माणसे रस्त्याला काहीतरी करत होती. दिप्या म्हणाला, रस्ता खणतायत, नक्कीच दुखत असणार, केवढा ओरडतोय बघ तो रस्ता. आम्ही त्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांना काही सांगू लागलो तर त्या आवाजात काहीच कळेना. शेवटी त्यांनी आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही निमूट दुकानाच्या पायऱ्यावर जाऊन बसलो, ते काय करतायत ते बघत. मग त्यांनी रस्त्याला खड्डे पाडले, का कोण जाणे? म्हणजे रस्त्याला असे खड्डे पाडता येतात तर! आम्ही उत्सुकतेने बघू लागलो.    
तेवढ्यात एक काका येऊन त्यांना ओरडू लागले. परवाच या इथले खड्डे बुजवले, रस्ता चांगला केला नि आज परत कशाला खोदता वगैरे. आधी जिथे खड्डे होते तिथेच हात दाखवून ते ओरडत होते. म्हणजे ते खड्डे कोणीतरी बुजवले होते, रस्ता चालला नव्हताच. माझा हिरमोडच झाला.  पण मग वाटलं रस्ता चालत नाही म्हणजे हा रस्ता इथून कुठेच जाणार नाही, नेहमी राहणार आमची सोबत करायला, आम्हाला चालायला, रात्री खेळायला. डोक्यातलं चक्र थांबेपर्यंत ‘काम चालू रस्ता बंद’ झाला होता. ऐन दुपारी रस्ता एकदम मोकळा, मग काय ‘रस्ता बंद पण आमचा खेळ चालू’............!