Sunday, December 19, 2010

मुक्काम लातूर

प्रसंग १

एका घरासमोर मी उभी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत हे घर होतं. आता दगडमातीचा एक ढिगारा, त्यातच घरातल्या वस्तू विखुरलेल्या. चिल्ल्यापिल्ल्यांचे फोटो, फाटलेली वह्यापुस्तकं,खेळणी. काही दिवसांपूर्वीचं नांदतं, गजबजलेलं घर. डोळे कधी वहायला लागले ते कळलंच नाही..........

प्रसंग २

भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास चालू आहे. भूकंपग्रस्त कुटुंबांकडून प्रश्नावल्या भरून घ्यायचं काम आमचा गट करतोय. मनावर प्रचंड ताबा ठेवायला लागतोय. एका भूकंपग्रस्त कुटुंबातला पुरुष समोर बसलाय. जरा हरवल्यासारखा दिसतोय. जवळचं कुणीतरी गेलं असणार. आमचे टीम लीडर त्याला समजावत आहेत. माहिती देण्यास त्याने होकार दिल्यावर मी पुढे सरसावलेय, लिहून घ्यायला. नाव, गाव इ. झाल्यावर कुटुंबातल्या माणसांची नावं व त्यांची माहिती मी त्याला विचारतेय. मीही विचारताना धास्तावलेली कारण कुटुंबातलं कुणी मृत्युमुखी पडलं असल्याची शक्यता आहेच. एक एक नाव तो सांगतोय. एकत्र मोठं कुटुंब दिसतंय. बारावं नाव लिहून झालं आणि तो धिप्पाड, उंचनिंच माणूस ढसाढसा रडत कोसळला.बारा जणांच्या कुटुंबातला हा एकमेव माणूस वाचला, कुठे बाहेरगावी गेला होता म्हणून. त्याचं सगळं कुटुंब संपलंय. मी जागच्या जागी थिजलेली.........

प्रसंग ३

एका गावाच्या बाहेर माळरानावर भूकंपग्रस्तांसाठीचे तात्पुरते निवारे उभे केले आहेत. बाजूलाच एका धार्मिक संस्थेचा डेरा लागलाय ज्यांनी लोकांच्या जेवणाची जबाबदारी घेतलेय. वेळ संध्याकाळी पाच सव्वापाचची. सत्संग चालू आहे. मागील बाजूला शिबिरात स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सत्संग संपल्यावर लोक उठायला लागले तोच कानावर दवंडीचा आवाज येतोय. तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलतर्फे सांगण्यात येतंय, कुणी एक सात वर्षाची मुलगी तिथे मरून गेलेय, कुणी शोधात असेल तर ओळख पटवून अमुक दिवसात ताब्यात घ्यावं नाहीतर.........

प्रसंग ४

एका गावातलं काम पूर्ण झालंय. संध्याकाळचे सहा-साडेसहा, हवा थोडी थंड आहे. गावच्या रस्यावरून फिरताना अंगावर काटा येतोय. जिकडेतिकडे उद्धस्त घरं. गावातली मंडळी आसऱ्याला गावाबाहेर माळरानावर. पण हे काय? दहा बारा कुत्री गावात येतायत. ढिगाऱ्यात काहीबाही उकरतायत. गावातच राहणारी ही कुत्री. भुकेसाठी त्यांनाही माळरानावर जावं लागलंय. सोबतचा गावकरी सांगतोय, रोज दिवसातून दोनतीन वेळा कुत्री गावात येतात.सगळीकडे फिरतात, आपल्या धन्यांची घरं बघत, ढिगारे उकरत.

तेवढयात त्यातल्या एका कुत्र्याने जोरात रडायला सुरूवात केली. कातरवेळ आणखी कातर होत गेली..........

प्रसंग ५

भूकंपग्रस्त गावांना जागतिक पातळीवर मदत सुरू झालेय. गावागावात STD booth लागलेत.त्याचा ताबा सरपंच किंवा गावातल्या प्रबळ लोकांकडे. ताबा म्हणजे अक्षरश: ताबा. गेले चार तास इथे सर्व्हेचं काम चाललंय, सरपंचांनी त्यात लक्ष घालणं अपेक्षित आहे. पण इथले सरपंच फोनपासून हलतच नाहीयेत. काही वेळाने मात्र ते आले आणि जातीने लक्ष घालू लागले. जरा नीट विचार केल्यावर लक्षात आलं की इतका वेळ दलित कुटुंबांची माहिती घेण्याचं काम सुरू होतं, आता सरपंचाच्या भावकीतल्या कुटुंबांबरोबर काम चालू आहे. चर्चा काय चाललेय त्यांच्यामधे, ह्या xxx चं (म्हणजे दलितांचं) काय नुकसान झालंय? साध्या गवताच्या घरात तर राहतात. खरं नुकसान पक्क्या घरात राहणाऱ्यांचंच झालंय पण कसा फायदा करून घेतायत बघा इ. इ.

सवर्णांपैकीच एक बाईही आलेय. पण ती काहीच बोलत नाहीये. तिच्यावर कसलंतरी दडपण असावं. आता ही गुंतागुंत आम्हाला थोडी कळायला लागलेय. मी सहकाऱ्याला खुणेनेच सांगून,काहीतरी बहाणा करून त्या बाईला बाहेर घेऊन आलेय. आता मात्र ती पटापटा बोलतेय. गावच्या एका पुढाऱ्याची ती भावजय. मला माहीत आहेत ते, सकाळी त्यांनीच गाव दाखवलं होतं. यांची प्रॉपर्टी वादात आहे. दिरांनी तिच्या नवऱ्याला फसवून धोत्र्याच्या बिया खायला घातल्या होत्या,त्यातून तो वाचला. ती सांगतेय, जेवढं शक्य असेल तेवढं नुकसान दाखवा आमचं; काही मिळालं तर आत्ताच मिळेल, कज्जेदलालीला मी कुठवर पुरणार?

प्रसंग

भूकंपाचं संकट पुरेसं नाही की काय म्हणून आत्ता संध्याकाळी उशीरा जोरात पाऊस आलाय.आमच्या रहायच्या जागेचा बंदोबस्त बरा आहे पण तात्पुरत्या निवाऱ्यातल्या माणसांचं काय झालं असेल? दिवसभराच्या अनुभवामुळे आणि पावसामुळे सगळे चिडीचूप बसलेत. दिवसभर मन आवरताना केवढी धडपड होते. संध्याकाळी कुणाचा तरी बांध फुटतोच.

तेवढयात एक बातमी येते, पुण्यात मोठा भूकंप झालाय. आम्ही सगळे पुण्याचेच. एकच हलकल्लोळ चाललाय. एकदोघी जोरजोरात रडायला लागल्यात. सगळ्यांची मन:स्थिती इतकी नाजूक की तर्काने विचार करायची शक्तीच नुरल्यासारखं झालंय. इथे भूकंपाने माजवलेला हा:हाकार पाहिल्यावर मनाचा एकच धोशा आपल्या माणसांचं काय?

काही जणांनी भानावर येऊन बातमीची शहनिशा केली तेव्हा तसं काही नसल्याचं कळलं आणि निश्वा:स सुटले. पण त्या अर्ध्या तासाने चरचरून दाखवून दिलं की आपत्तीत सापडलेल्यांची मन:स्थिती काय होत असेल?

Friday, December 10, 2010

रावेरी, गहू आणि सीता

कामानिमित्ताने मी फिरत असते. विदर्भात तर अनेक वेळा जाणे होते. नुकतीच यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात मी गेले होते. राळेगावमध्ये रावेरी गावात काम होतं. काम पार पडल्यावर मला निघायला थोडा वेळ होता त्यामुळे जरा गावात फेरफटका मारायला सहकाऱ्यांसोबत निघाले. गावात सीतेचं मंदिर आहे ते पहायचं ठरवलं. मंदिराचा विषय निघाल्यावर सगळेच काही माहिती सांगायला लागले. हे सीतेचं भारतातील एकमेव मंदिर, इथे वाल्मिकींचा आश्रम होता, लवकुशासोबत सीता इथे राहिली असा त्या बोलण्याचा गोषवारा होता. माझी उत्सुकता चाळवली गेली. आधी अनेकदा इथे येऊन याचा उल्लेख कसा आला नाही याचं आश्चर्य वाटत होतं.

मंदिर दिसायला लागल्यावर लक्षात आलं, जुनं हेमाडपंथी मंदिर, आधी ढासळलेल्या स्थितीत होतं, आता जीर्णोद्धार सुरू आहे. बोलताना कळलं की शेतकरी संघटनेने भूमिकन्या सीतेच्या या स्थानाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. अगदी नुकताच याचा लोकार्पण सोहळा झाला, ज्यावेळी हजारोंच्या संख्येने महिला जमल्या होत्या. त्यामुळेच स्थानिक पातळीवर सध्या हे मंदिर चर्चेत आहे. पुण्यामुंबईकडे अर्थातच ही बातमी नव्हती.

मंदिराची देखभाल करणाऱ्या तरुणाने मंदिर उघडून दाखवलं. गाभाऱ्यात शिवलिंग, वर समोर काळ्या पाषाणातली सीतेची म्हणून दाखवण्यात येणारी छोटेखानी मूर्ती. गाभाऱ्यात तसा अंधारच होता आणि ग्रामीण भागातील नियमाप्रमाणे वीज नव्हती तरी flash वापरून mobile camera ने फोटो काढला. बाहेर आले पण यामागील कथेचा नीट उलगडा होत नव्हता. तिथे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केलेला banner होता. त्यावरून कळलेली कथा अशी; गरोदर सीतेला रामाने वनात सोडून दिलं. ती वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागली. लवकुशाचा जन्म झाल्यावर (म्हणजे हे लवकुशाचे जन्मस्थान?) सीतेने स्थानिक लोकांकडे गहू मागितले. पण तिला कोणी ते दिले नाहीत. मग रागावून सीतेने ‘इथे कधीही गहू पिकणार नाही’ असा शाप दिला. (शाप? आणि सीतेने? Banner वर लिहिल्याप्रमाणे आधुनिक काळात हायब्रीड गहू येईपर्यंत इथे गहू पिकत नव्हता.) पुढे रामाने अश्वमेघ योजला. त्या यज्ञाचा घोडा लवकुशानी इथेच अडवला. त्यासाठी हनुमानालाही त्यांनी बांधून ठेवलं. जवळच हनुमानाचं मंदिर आहे. मूर्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत आडव्या स्थितीत आहे. अशी सारी रोचक कथा माहित झाली.

रामसीता वनवासात असतानाची अनेक स्थानं भारतभरात दाखवली जातात. पण उत्तर रामायणाशी निगडित स्थानाबद्दल मी प्रथमच ऐकत होते. अर्थात हा माझ्या अल्प ज्ञानाचाही परिणाम असेल. पण या साऱ्या कथेने काही प्रश्न मनात उभे राहिले. सीतेचं मंदिर म्हणताना गाभाऱ्यात शिवलिंग आहे ते कसं काय? क्षमाशील सीतेच्या शापाची कथा तर फारच विस्मयजनक वाटली कारण संपूर्ण रामायणात तिने फक्त सोसलेलंच दिसतं. ज्यांनी सीतेवर अन्याय केले त्यांना तिनी शापले नाही मग गहू दिले नाहीत या कारणावरून शाप? हे पटत नाही. की तिच्याही क्षमाशीलतेचा अंत झाला होता? रामाने सीतेचा त्याग केला याचा आपल्यालाही राग येतो आणि तिने मुकाटपणे सोसले याचाही. लोकपरंपरेतही हा सल आहे म्हणून तर सहज ओव्या बनतात;

राम गं म्हणू राम, नाही सीतेच्या तोलायाचा, हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलायाचा

आख्ख्या भारतात सीतेचं हे एकमेव मंदिर हेही खरं नाही. हरयाणातलं सीतामाई मंदिर, बंगळुरूजवळचं सीतेचं मंदिर, बिहारमधलं सीतामढी तशी आणखीही काही असतीलच. नवल म्हणजे रावेरीला सीता मंदिरात यात्राही भरते, कधी? तर रामनवमीला. मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

शेजारच्या मंदिरात कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या त्या महाबली हनुमानाची बंदिस्त मूर्ती (मुळात लवकुशानी बांधलेली आणि सध्या कडी कुलुपात असलेली) पाहून गंमत वाटली आणि वाईटही. शक्तीमान मारुतीनी बापलेकाची भेट व्हावी म्हणून लवकुशाकडून हे बंधन घालून घेतलं असणार असं वाटलं. सीतेचं आणि मारुतीचंही हार्दिक नातं आहेच. लोकपरंपरेत मारुती स्त्रियांना रक्षणकर्ता वाटत आला आहे. “राजा मारबती उभा पहाऱ्याला, जीव माझा थाऱ्याला” यासारख्या ओव्यांवरून हे स्पष्ट दिसतं. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच.

तर मनात असे असंख्य विचार उमटवून गेलेली ही रावेरीची भेट, अजून खूप काही वाचायला, समजून घ्यायला हवं याची जाणीव करून देणारी.......

Wednesday, December 1, 2010

सकाळी उठून

ग्रामीण किंवा आदिवासी भागात फिरताना विशेषत: रहाताना, एका भीषण प्रश्नाला तोंड दयावं लागतं. कदाचित शहरात जन्मल्याने व वाढल्याने हा प्रश्न गंभीर वाटत असेल. पण गावकरी विशेषत: स्त्रियांना आणीबाणीच्या प्रसंगी तरी हा प्रश्न गंभीर वाटत असणार. मी बोलतेय ते संडास किंवा अलीकडचा शब्द (जरा सभ्य?) ‘शौचालयाच्याउपलब्धतेबद्दल. आता निर्मल ग्रामकिंवा संपूर्ण ग्रामीण स्वच्छतायासारख्या मोहिमांमुळे अनेक ठिकाणी संडास बांधले गेले आहेत. पण त्यातले वापरण्यालायक फारच कमी असतात हे नक्की.

सुरुवातीला मी ज्या भागात काम करत होते तिथे लोक दिवसभर शेती व उपजीविकेच्या अन्य कामात असायचे. त्यामुळे मीटिंग (बैठक म्हणलं तर कुणालाच कळत नाही) रात्रीच घेता येत असे. माझं रहाण्याचं ठिकाण होतं तालुक्याला म्हणजे ४० ते ५० कि. मी. अंतरावर. मीटिंग सुरू व्हायला साडेआठ वाजून जात. माणसं जमून चर्चा पूर्ण होईपर्यंत दीडदोन तास सहज जात. मीटिंग संपायला अकरा वाजून जात असत. गावकरी एकत्र आले म्हणजे मीटिंग झाल्यावर भजनाचा कार्यक्रम अनेकदा होई, त्यातून ताई रोज थोडयाच येतात त्यामुळे जास्तीत जास्त भजनं ऐकवायची चढाओढ लागे. अर्थात मी हे खूप enjoy केलं. काही भजनं मला अजूनही पाठ आहेत. तर सांगायचा मुद्दा म्हणजे एवढा उशीर झाल्याने मुक्काम गावातच असे.

आदिवासी घरात क्वचितच गुरांचा वेगळा असा गोठा असतो. गुरे घरातच किंवा ओटीवर बांधतात. त्यामुळे घरात पिसवा असतातच. त्यांच्या चाव्यांना तोंड देत झोपायचं म्हणजे..............!!! त्यातून रात्रभर गुरांचे आवाज, वीज असली तर लाईट रात्रभर सुरूच नाहीतर मिट्ट काळोख. पण खरी कसरत असते ती सकाळी झाड्याला म्हणजे सकाळी परसाकडे जायची. संडास नसल्याने निव्वळ वाच्यार्थाने नव्हे तर खरोखरच परसाकडे म्हणजे हागंदरीकडे (मळमळायला लागलं ना?) जायला लागतं. एक नोंद करायलाच हवी ती म्हणजे ग्रामीण भागापेक्षा आदिवासी गावे खरोखरच स्वच्छ असतात आणि रान असल्याने आडोशाचीही बरी सोय असते. पण तरीही माझ्यासारख्या शहरी मुलीला पहाटे उजाडायच्या आत असं लपूनछपून जायचं म्हणजे शिक्षाच वाटायची. घरातली एखादी बाई सोबत करायची. मग वस्तीपासून थोडं दूर, थोडा आडोसा पण तरीही सुरक्षित जागा शोधण्याची कसरत करायची. कोणी येत तर नाही ना या ताणाखाली चाहूल घेत कसाबसा तो विधी उरकायचा. साप किरडू याचंही भय वाटायचं. कधी आडवेळेलाम्हणजे दिवसाढवळ्या किंवा संध्याकाळी जावं लागलं तर फारच कठीण प्रसंग ओढवे. एकतर अशा वेळी माणसांचा वावर ही मुख्य अडचण. दुसरी भीती वाटायची ती प्राण्यांची. आपण बसलो आणि एकदम शेळ्या किंवा गुरांचा कळप अंगावर आला तर? एकदा अशा वेळी गुरं धावत येताहेत असे आवाज यायला लागले. पटकन उठून बाजूला थांबले. एक कळप निघून गेला. म्हटलं आता निवांत तर परत तेच आवाज. असा प्रकार दोनतीनदा झाल्यावर नाद सोडला. ती वेळ (आणि त्यावेळी ती जागा) गुरं परतण्याची असते ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली.

बिलकुल खाजगीपणा नसणे (म्हणजे त्यावेळी सुद्धा) म्हणजे काय याचा अनुभव घेत होते. घरातली बाई सोबतीला असली तर आधार वाटायचा पण लाजही वाटायची. तेव्हा पक्का संडास म्हणजे जिथे कोणत्याही व्यत्ययाविना जाता येणे ही किती अत्यावश्यक बाब आहे हे लक्षात आलं आणि ती सुविधा आपल्याला सहज मिळत असल्याने नशीबवान असल्यासारखेही वाटले.

आज ग्रामीण भागात संडास ही गोष्ट खूप चर्चेचा, राजकारणाचा आणि निधी मिळवायचा विषय झाली आहे. अलीकडे शासकीय योजनांत शौचालय हा शब्द वापरला जातो जो ग्रामीण भागात सगळेच शच्छालयकिंवा स्वच्छालयअसा उच्चारतात. संडासापेक्षा सभ्य शब्द म्हणून शौचालय निवडला का असं म्हणावं तर दुसरीकडे हागणदारीमुक्ती’(!) सारखे शब्दही शासकीय वापरात दिसतात. अनेक ठिकाणी संडास बांधले गेले असले तरी त्याचा वापर कुठे फाटी (सरपण) भरून ठेवण्यासाठी, कुठे बाथरूम म्हणून होताना दिसतो तर कुठे देखभालीचं तंत्र माहीत नाही वा देखभाल करायचीच नाही त्यामुळे बांधलेले संडास वापराविना तसेच पडून असतात. संडास नसल्याने बायांची किती कुचंबणा होते हे बायांकडून अनेकदा ऐकले आहे. (स्वानुभवही आहेच) तसेच अंधार पडल्यावरच जायची सोय असल्याने पोटाचे अनेक विकार होतात असंही अनेक अभ्यासातून दिसतं.

गावात वर्गणी काढून जत्रा-उरूस होतात. oil paintच नव्हे तर संगमरवर बसवलेली मंदिरेही उभी राहतात, गावच्या प्रवेश कमानीसाठी लाखो रुपये खर्च होतात मात्र स्वच्छतेचा प्रश्न जिथल्या तिथे राहतो. कधी कुणी मंत्री वा कलेक्टर गाव पाहायला येणार असेल तर गावातल्या बायांची सगळ्यांना हटकून आठवण होते ती गाव स्वच्छ करायला आणि VIPs ना ओवाळायला. पण बायांच्या सुविधांचा प्रश्न कुणाच्याच अजेंड्यावर येत नाही.

Wednesday, November 17, 2010

जेवण (Dinner)









कामाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राबाहेरच्याही ग्रामीण-आदिवासी भागात जात असते. अशा प्रकारच्या कामाला माझी सुरूवात झाली ती गेल्या १३-१४ वर्षांपासून. शहरातच जन्मल्याने आणि वाढल्याने ग्रामीण भागाशी फारशी ओळख नव्हती. कधी कॉलेजच्या अभ्यास सहलीला, सुट्टीला अधूनमधून कोकणात, पण चार आठ दिवसांच्यावर राहायचा प्रसंग फारसा आलं नव्हता. नाही म्हणायला लातूरच्या भूकंपात मदतकार्यासाठी १० दिवस गेले होते पण तो आपत्तीचा अनुभव होता नि माणुसकी असल्याचा आणि नसल्याचाही. पण त्यावर पुन्हा कधीतरी. तर आत्ता लिहिते आहे ते ग्रामीण-आदिवासी भागातल्या माझ्या सुरुवातीविषयी.

पुणे जिल्ह्याचाच आदिवासी भाग. काही एक काम सुरू करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच काही गावं पाहायला गेले होते. बरोबर दोन तीन सहकारी होते. त्यातला एका ताईंचा या भागाशी चांगला परिचय होता. तशी नवखी मीच होते. एका गावाहून दुसरीकडे पोचायला public transport मुळे उशीर झाला आणि मग एका गावातच मुक्काम करायचे ठरले. त्यातल्या त्यात परिचिताचे घर शोधले. वेळ संध्याकाळची होती. म्हणजे रात्रीचे जेवण त्या कुटुंबात होणार हे त्यांनीही सहज (!) गृहीत धरले. आम्ही घरात गेल्यापासून मी बघत होते, घरातला छोटा मुलगा एका खेकड्याच्या पायाला दोरा बांधून खेळत होता. त्याला इजा होईल अशी मला भीती वाटली पण खेकड्याची नांगी मोडल्याचे कळले. घरातल्यांनी नंतर जेवणाविषयी विचारले. जे कराल ते चालेल असे सांगितले कारण आपल्यासाठी त्यांना वेगळे काही करायला लागू नये हा विचार होता. आमच्या ताईंनी दूधभात चालेल असे सांगितले कारण घरात दुभती दोन जनावरे होती आणि भात तर काय आदिवासींचे मुख्य अन्न. तेव्हा ही दृष्टी अर्थातच मला नव्हती. (आता त्या मानाने बरं कळतं पण तरीही कधीकधी विकेट उडतेच.)

थोडया वेळाने ताटे आली. बघते तर काय? 'तो' खेकडा, ज्याच्याशी काही वेळापूर्वी तो मुलगा खेळत होता, 'तो' जणू माझ्या पोटात जायची वाट पाहत असल्यासारखा माझ्यासमोरच्या ताटात पडलेला, अर्थात मरून! 'त्या' ला बांधलेल्या दोऱ्याचे टोकही तसेच होते; त्यावरून तर 'तो' च हा खेकडा हे मला ओळखता आले. माझ्या पंजाच्या आकाराचा अख्खा खेकडा, त्यासोबत थोडा रस्सा. हा कसा खायचा आता, आपल्याला तर खेकडा कसा खातात माहीत नाही, काय करावे? (आताही मी मासेखाऊ झाले असले तरी अजून खेकडा नाही खाऊ शकत) माझा चेहरा पडल्याचे माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. माझी पंचाईत नक्की उघड उघड दिसत असणार. त्यांनी मला काही विचारायला सुरूवात केली. मी कसंबसं सांगितलं की मला खेकडा नको पण थोडा भात आणि रस्सा चालेल. रस्साभाताचा एक घास घेतला मात्र, तिखटजाळ रश्शाने जीभ जणू जळायला लागली. आणखी प्रदर्शन नको म्हणून तिखटाने आलेला ठसका पाण्याने कसाबसा थांबवला. चपळाईने दूधभातासाठी आणलेल्या दुधातलं थोडं दूध भातावर घेतलं. दूधभातावर साखर घेऊन खाण्याच्या पद्धतीचं त्या क्षणी मनोमन कौतुक करत त्यात साखरही घातली आणि जेवण साजरं केलं.

हा प्रसंग घडला जूनच्या सुरुवातीला. एक पाऊस पडून गेला होता. अशा वेळी जमिनीतल्या बिळातून खेकडे (किरवं) वर येतात. ते पकडून खातात. त्यामुळे त्या दिवशी जेवणात 'तो' होता. तिथे भाजीपाला उपलब्ध नसतोच त्यामुळे कोरडयास असं काही करतात. त्यातून आधीचं धान्य संपत आलेलं असतं, पुढचं घरात येण्यासाठी अख्खा खरीप हंगाम सरायचा असतो. जेवण तिखट. त्यामुळे पाणी प्यायला लागून पोट लवकर भरतं. अन्नाच्या तुटवडयाच्या काळात याचा उपयोग (?) होतो असं आदिवासी बायांनीच एका चर्चेत सांगितलं होतं.

एरवी भातात साखर या प्रकाराला मी नाक मुरडलं असतं पण त्या दिवशी दूध आणि साखर होती म्हणूनच माझ्या पोटात दोन घास गेले आणि पचले. ते पचले नसते तर काय झालं असतं? नको नको, तो विचारही नको वाटतोय पण त्याविषयीही कधीतरी लिहायला हवं.

तर सुरुवातीच्या काळात माझी फजिती करणारे असे प्रसंग अनेकदा आले त्यावर मी लिहिनच. अशा प्रसंगातून जे उलगडायचं ते कधी निखळ आनंद देणारं (म्हणजे इतरांना. कारण फजिती माझी झालेली असायची), बऱ्याचदा आपल्या स्वत:च्या मर्यादा दाखवणारं तर कधी फार भेदक, डोळे झडझडून उघडायला लावणारं असे.

जेवण (Lunch)



पुन्हा एक धावपळीचा दिवस. एक काम संपत नाही तोवर दुसरं हजर, करता करता दिवस कसा गेला ते कळलंच नाही. आता ऑफिसमधून निघायला हवं. पार्किंगमध्ये जाताना भारद्वाज, किंगफिशर यांनी दर्शन दिलं. सुदैवाने मी ज्या ठिकाणी मी काम करते ते कॅम्पस हिरवंगार आहे आणि अनेक पक्ष्यांचं निवासस्थानही. पक्ष्यांच्या बाबतीत माझं ज्ञान तसं थोडकंच आहे पण काही सहकाऱ्यांमुळे यात थोडी भर पडलेय म्हणजे माझ्या ज्ञानात. कावळे, चिमण्या, साळुंक्या, कबुतरं या सामान्यपणे दिसणाऱ्या पक्षांबरोबरच इतर अनेक पक्षी इथे दिसतात जसे बुलबुल, सातभाई, पोपट, कोकीळ, घार, दयाळ, शिंजीर आणि कितीतरी. भारद्वाज आणि किंगफिशरचा उल्लेख आधी आलेलाच आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद ठरवलं तर इथे घेता येऊ शकतो. काही वेळा अनाहूत पाहुणेही येतात, भटकी कुत्री, डुकरं वगैरे, कधीतरी माकडंही येतात.

पण काही जीव मात्र सगळ्यांना घाबरवून सोडतात. लक्षात आलंच असेल की मी सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल बोलतेय. आजच त्यामुळे धमाल उडाली होती. तसे कधी कधी साप दिसतातच. पण ते जरा माणसांच्या वावरापासून जरा दूर, झाडापाचोळ्यात असतात. आजचा म्हटलं तर वाटेत होता. (तो आमच्या की आम्ही त्याच्या?) जेवणाच्या सुट्टीत कॅंटीनला जाताना वाटेच्या जरा बाजूलाच तो लांबलचक साप दिसला. सुरुवातीच्या काही जणांनी समंजसपणे शांत राहून, सुरक्षित अंतरावरून त्याचं निरीक्षण केलं. त्याला ज्या दिशेनी जायचं होतं ती बाजू मात्र आता गजबजायला लागली होती. त्यामुळे लोकांनी एकमेकांना सावध करायला सुरूवात केली. कुजबुज, भीतीदायक चीत्कार यांचे आवाज माणसांच्या संख्येनुसार वाढायला लागले. तसे सापलाही चाहूल लागली असावी. तो (ती?) जागीच थांबला आणि पाचोळ्यात निघून गेला. जाणकारांच्या मते ती धामण होती म्हणजे बिनविषारी. सुटकेचे नि:श्वास सुटले. तरीही सावधपणेच माणसं जेवायला गेली. सापांवर चर्चा सुरूच होती. ज्यांना आजचा साप पाहता आला नव्हता त्यांच्यापेक्षा तो बघणाऱ्यांना अर्थातच महत्व आले. ज्यांनी प्रथम पहिला ते तर VIP झाले होते.

ताज्या प्रसंगाच्या वर्णनातला रोचकपणा कमी झाल्यावर संभाषणाची गाडी अर्थातच वळली ती आधी पाहिलेल्या सापांकडे. आधी अनुभवलेले असे अनेक प्रसंग वर्णिले जाऊ लागले. इतरांच्या excitement ला हसताना मीही त्या संभाषणाचा भाग कधी झाले ते मला कळलंच नाही. मीही याआधी या कॅम्पसवर साप पहिले होतेच की! पहिल्यांदा reception च्या पायऱ्यांवर पहिला तो तर नाग होता. काही उत्साही सहकाऱ्यांनी त्याचे फोटो काढून LAN वर टाकले होते. त्यानंतर एकदा असाच रस्त्याकडेच्या झाडांलगत, मान उंचावत जाणारा साप पहिला होता. एकदा संध्याकाळी उशीराने गाडी घेऊन बाहेर पडताना रस्त्यातच आडवा होता. त्याने रस्ता पार केल्यावरच पुढे जाता आलं. तर सगळ्यांना असे पाहिलेले, ऐकलेले साप आठवत होते. ज्ञात असणारे सर्व साप नजरेसमोर दिसायला लागले. बघता बघता अनेक सापांचा खच पडला; विषारी-बिनविषारी-फुरशी-मण्यार-धामण-नाग-अजगर आणि कितीतरी. पहावं तिकडे साप!

तेवढयात दाराजवळच्या टेबलावर बसलेल्यांच्या अंगात अभूतपूर्व चपळाई आली. तिथे बसलेले दारापासून शक्य तेवढं दूर आतल्या बाजूला पळाले. त्यांच्या जवळच्या टेबलांवरही अस्वस्थ हालचाल सुरू झाली. पण मग सारं पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागलं. कॅन्टीनच्या दारापुढील corridor मधून पठ्ठया सळसळत गेला म्हणे. आतल्या बाजूचं टेबल पकडणाऱ्यांनी मनातल्या मनात स्वत:ला शाबासकी दिली ज्यात मीही होते. मग मात्र हळूहळू सर्व शांत होत गेलं. जेवण करून सारे पांगले. पण जेवताना सापांचं तोंडीलावणं इतकं रंगतदार असतं हे मात्र प्रथमच कळलं. किती रंगलंय जेवण म्हणून सांगू? या सगळ्यात त्या सापाचं जेवण झालं की नाही कोण जाणे? सळसळत होता म्हणजे काही खाल्लं नसावं. तोही बेटा lunch साठीच चालला होता की काय?

ता. क. तुमच्या तोंडाला जेवताना पाणी सुटू नये म्हणून सापाचा फोटो दिलेला नाही. पण थांबा निराश होऊ नका, रात्रीच्या जेवणाचा विशेष बेत आहे पुढच्या आठवडयात!!

Thursday, November 11, 2010

सुरुवात


सध्या माझ्या मनाच्या स्थितीचं वर्णन कंटाळा किंवा साचलेपणा असं करता येईल. रुटीन अपरिहार्य असल्याने ते पार पाडणे या व्यतिरिक्त आपण काही करत नाही ही सततची जाणीव. या रुटीनमध्ये अडकून पडल्याची थोडी भावना आहेच. पण काही वेगळं करायचा उत्साहही वाटत नाहीये. वाचनही जरा सोपं, विरंगुळा या सदरात मोडणारं चाललंय. इंटरनेट वापरत असल्याने अनेक ब्लॉग्स वाचले आहेत. काही दिवसांपासून मनात येतंय, ब्लॉग सुरु करावा का? तर अशा कंटाळलेल्या, किंचित अपराधी मन:स्थितीत ब्लॉगबाबत विचार सुरु झाले.

पुढल्या चिंता म्हणजे लिहायला सुचेल का? कुठल्या विषयांवर लिहायचं? आपण हे नियमित करू का? लिहायला सुचलं नाही तर काय? नियमितता राखता आली नाही तर अपराधी वाटेल का? इ.इ. त्यानंतर मनात येऊ लागले तांत्रिक बाबींचे विचार. म्हणजे font कुठला वापरायचा? पण choice कुठे आहे? टायपिंग शिवाजी किंवा तत्सम phonetic font मधेच करता येतं. मराठीत ब्लॉग कसा लिहायचा हे शिकून घ्यायला हवं.

आधी हाताने लिहून मग computerize करावं की थेट computer वरच काम करावं? पण सध्या थेट computer वरच काम करत असताना हा विचार का बरे डोकावला मनात? मी माझ्या अक्षरालाच miss करतेय की काय? खरंतर माझं अक्षर छान होतं, अगदी अक्षर लेखन स्पर्धेत भाग घेण्याजोगं. आता मात्र सार्वत्रिक रडगाण्याप्रमाणे लिहिलंच जात नाही. अक्षर कसं येईल ही फार पुढची गोष्ट. आणखी विचार करताना जाणवलं, आपल्याला विशेषतः कामाच्या जागी सहकाऱ्यांना एकमेकांचं अक्षर कुठे माहीत असतं? माझ्या काही सहकाऱ्यांच्या बाबतीत मला काय माहीत झालंय? अमक्याचा Times New Roman, point size 12, line spacing 1.15, तमकीचा Arial, font size 11, line spacing 1.3. मराठी टायपिंग करणाऱ्यांचे (म्हणजे कुणी असलंच तर) कृती देव किंवा शिवाजी (यात स्थलपरत्वे फरक होऊ शकतो.)

नकळत आपण किती बारकाईने बघत असतो? आणि आपल्याही काही सवयी बनत जातातच की! उदा. माझंच पहा, line spacing single असेल तर ते मला गिचमिड वाटतं आणि डबल किंवा 1.5 असेल तर जागेचा अपव्यय. मला 1.2 किंवा 1.3 spacing ठीक वाटतं. एवढंच नाही तर मोठं document वाचायचं असेल तर मला सोयीचे वाटणारे हे बदल मी करून घेते. काही जण इतके वेगवेगळे fonts वापरतात म्हणजे मोठया documents साठी, की नवल वाटतं, courier, Comic Sans MS, Arial Rounded MT Bold वगैरे. आणि Serif / Sans Serif fonts बद्दल लोक काय विचार करतात?

हे सारे पाहता आपण पुढील काळात एखादयाचं हस्ताक्षर font वरून ओळखणार की काय? एक गंमत सांगू. माझ्या आधीच्या एका कामाच्या ठिकाणी एक दोन खडूस सह(?)कारी होते आणि ते जरा वेगळे fonts वापरायचे. वेगळेपणा म्हणून नाही तर इतरांना वाचायला त्रास म्हणून अशी आमच्या कंपूची खात्री होती. हे म्हणजे computer using habits वरून एखादया माणसाविषयी खूणगाठ बांधल्यासारखेच झाले की!

पण असं बघा Bodoni Ms Rounded किंवा Chiller सारख्या fonts मध्ये पानंच्या पानं वाचायची म्हणजे डोळ्यांना शिक्षाच की! त्यांची नावंच आम्ही पाडली होती fonts वरून. मग आज काय तापलाय Chiller!! किंवा बोडणाला गेल्यामुळे Bodoni आज उशीरा येणार आहे (मनातल्या मनात हा font विकसित करणाऱ्या 'बोदोनी' ची क्षमा मागत) अशा कोटया व्हायच्या.

तर मूळ मुद्दा होता की माणसं fonts कशी निवडत असतील? Handwriting Analysis सारखा font analysis करतात का? कारण fonts कुणाच्या तरी सुलेखानातूनच निर्माण झाले ना? आज नसेल होत असा analysis तर उदया होईलही असं तंत्र विकसित. (कुणाला माहीत असल्यास माझ्या ज्ञानात भर टाकावी) त्यावरून कळेल का स्वभाव वगैरे? ते तर font जिने/ज्याने शोधले तिला/त्याला लागू होईल. पण तो font वापरणाऱ्या माणसांच्या स्वभावात काही साम्यस्थळे असतीलच की!

अरेच्या, गाडी भरकटलीच की काय माझी? पण बघा, काय लिहावे म्हणता म्हणता, जवळ जवळ दोन पानं (computer चं A 4 page हं) लिहून झाली की! म्हणजे लिहिणं खूप अवघड नाही तर, फक्त वाचणारे हवेत.

ता. क. मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबी मी शिकलेय हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल