Sunday, August 25, 2019

लंडन क्षणचित्रे - ब्रिटिश म्युझियम


१. गोष्ट माणसाची
माझा अभ्यासाचा विषय समाजशास्त्र, मानवी सांस्कृतिक-सामाजिक घडामोडींत मला विशेष रस आहे. ब्रिटिश म्युझियम म्हणजे माझ्यासारखीला पर्वणीच. इथे तब्बल ८० लाख वस्तू आहेत. मेसोपोटेमिया (सुमेरियन, असिरिअन, बाबिलोन साम्राज्य इ.), इजिप्त, युरोप, द. अमेरिका, अशिया अशा मुख्य संस्कृतींची दालनं इथे आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळ पाहता guided tour करायची हे ठरवलं होतंच. रॉसेल हा आयरिश आर्किऑलॉजिस्ट टूर गाईड होता. या टूरसाठी एकूण आठ जण येणार होते पण पाच जण आले नाहीत. अजून दोन इटालियन होते, त्यांना फार रस आहे असं वाटलं नाही. सुरुवातीलाच रॉसेलने सांगितलं,  I am going to tell you stories of major civilizations. मला तरी दुसरं काय हवं होतं आणि ही जणू माझ्यासाठीची स्पेशल टूर सुरु झाली. रॉसेलकडून काही नवीन गोष्टी कळल्या, काही आधी वाचनात आल्याने माहीत होत्याच. म्युझियम पाहताना या  सगळ्याची संगती मनात लागत होती. मानवी समाजाची आणि वेगवेगळ्या संस्कृतींची गोष्ट थोडक्यात पण संगतवार लिहून ठेवायची हे मी तेव्हाच ठरवलं होतं. 

Entrance of British Museum
तर गोष्ट सुरु होते माणसाची. माणसाची उत्क्रांती आफ्रिका खंडात झाली, तिथून माणसं जगभर पसरली. होमो म्हणजे माणूस प्राण्यातही अनेक प्रजाती होत्या. कालौघात त्या नष्ट झाल्या आणि अनुकुलनासाठी अधिक सक्षम असे होमो सेपिअन्स म्हणजे Wise Man म्हणजे आपण टिकलो. सर्वात अलिकडच्या काळात म्हणजे अंदाजे ४० हजार वर्षापूर्वी नामशेष झालेली प्रजाती म्हणजे होमो निअँदोथॉल. एकोणिसाव्या शतकात जर्मनीतील निअँदो खोर्‍यात प्रथम या मानवाचे अवशेष मिळाले त्यावरून हे नाव पडलं. हिमयुगात शिकार करण्याचे तंत्र, शस्त्रे त्यांच्याकडे होती मात्र वातावरण बदलाबरोबर तंत्रज्ञान विकसित करण्यात ते कमी पडले. होमो सेपियन्सबरोबर त्यांचे संघर्ष झाले, यात अर्थात Wise Man वरचढ ठरला. मात्र अलीकडच्या संशोधनातून निअँदोथॉल आणि होमो सेपियन्सच्या संकराचे पुरावे समोर आले आहेत. बदलत्या वातावरणाशी अनुकूलन साधण्यातली असमर्थता, होमो सेपियन्सशी संघर्ष तसेच होमो सेपियन्सशी संकरातून याच प्रजातीत त्यांचे सामावून जाणे अशा तीन शक्यता त्यांच्या नामशेष होण्यामागे सांगितल्या जातात.  
  
होमो सेपियन्सच्या Hunter-gatherer टप्प्यात शिकारीसाठी योग्य डावपेच, अधिक चांगली शस्त्रे याबाबत माणसे शिकत गेली. साधारण १५ ते २० हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यावर स्थैर्य आले आणि माणसांना उसंत मिळाली. चाकाच्या शोधाने माणसाच्या प्रगतीला चाकाचीच गती मिळाली. त्यातून तंत्रज्ञान, कला, कायदे, नागरी व्यवस्था असा सारा विकास होत गेल्याचं मानलं जातं. अशा अनेक समृद्ध संस्कृती/सभ्यता पृथ्वीवर नांदल्या, लुप्त झाल्या, नव्या संस्कृती आल्या आणि मानवी जीवनाचे चक्र अव्याहत सुरु राहिले.

२. इजिप्त दालन

काही वर्षांपूर्वी इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीबद्दल वाचताना रोझेटा स्टोनविषयी समजलं, तेव्हा हे पाहायलाच हवं अशी तीव्र इच्छा झाली होती. आताच्या ब्रिटिश म्युझियमच्या भेटीत रोझेटा स्टोनच नव्हे तर महत्वाच्या मानवी संस्कृतींचा मोठा ठेवा पुढे आला. प्रथम आम्ही गेलो ते इजिप्त दालनात, जे अपेक्षितच होतं. नील नदीच्या खोर्‍यात फुललेली ही पुरातन संस्कृती (इ. स. पूर्व ३००० ते इ.स. ६४०) मोठ-मोठ्या बांधकामांसाठी प्रसिद्ध, पिरॅमिड तर सात आश्चर्यांपैकी एक. पपायरस वनस्पतीवर प्रक्रिया करून त्याचा कागदासारखा वापर त्यांनी केला, त्यावरूनच पेपर हा शब्द आला आहे.

या दालनात रामसिस द ग्रेट (राज्यकाळ इ.स.पूर्व १२७९-१२१३) या फेरोचा (सम्राट) पुतळा लक्ष वेधून घेत होता. राज्य/देश या संकल्पना प्राथमिक अवस्थेत असताना या सम्राटाने धर्माच्या सूत्राने लोकांना एकत्र बांधलं. साम्राज्यविस्तार केला. राज्यव्यवस्थेची घडी बसवली. सरासरी आयुर्मान ३५-४० वर्षे असताना हा फेरो नव्वद वर्षे जगला आणि त्याने ६७ वर्ष राज्य केलं. अबू सिम्बेल सारखी अनेक मोठी बांधकामं याच्या काळात झाली. सर्वात शक्तिमान फेरो म्हणून हा ओळखला जातो.
रामसीस द ग्रेट 

रोझेटा स्टोन
बोलता बोलता आमची चर्चा इजिप्शिअन हायरोग्लिफवर आली आणि आता आपण इथली सर्वात प्रसिद्ध गोष्ट पहाणार आहोत असं रॉसेलने जाहीर केलं. ते काय याचा अंदाज होताच आणि माझी उत्सुकता शिगेला पोचली. मात्र रोझेटा स्टोनच्या आधी त्याने एक फलकसदृश्य वस्तू दाखवली ज्यावर जवळून हायरोग्लिफ पाहता आली. हायरोग्लिफ म्हणजे प्राचीन इजिप्शियन लिपी ज्यात अक्षरं, शब्द आणि चित्रं यांचा समावेश होतो. काळाच्या ओघात या लिपीचा वापर थांबला तसे कुणी जाणकारही राहिले नाहीत. नंतरच्या काळात इजिप्तमधील वास्तू जगासमोर आल्या तरी या अनाकलनीय लिपीमुळे कशाचाच अन्वयार्थ लागेना. नेपोलियनच्या इजिप्त मोहिमेदरम्यान इ. स. १७९९ मध्ये रोझेटा या गावी एक पाषाणस्तंभ फ्रेंच सैनिकांना सापडला. फ्रेंच अधिकार्‍याने त्याचे महत्व जाणले, यानंतर या मजकुरावर काम सुरु झाले. या अभ्यासातून लक्षात आले की एकच मजकूर प्राचीन हायरोग्लीफ, डेमोटिक आणि प्राचीन ग्रीक लिपीत आहे. तज्ञांच्या ३० वर्षांच्या मेहनतीतून हायरोग्लिफ उलगडत गेली आणि प्राचीन इजिप्तबद्दल जगाला माहीत झाले. इजिप्तवरील दालनात पुतळे, ममी, शवपेट्या अशा अनेक वस्तू आहेत, त्यावर नजर टाकली. पुन्हा एकदा  रोझेटा स्टोन डोळ्यात भरुन घेताना मनात येत होतं, आपल्या सिंधू संस्कृतीचीही अशी काही चावी सापडली तर काय बहार येईल !!

No comments:

Post a Comment