मिळून साऱ्याजणीच्या दिवाळी (२०१२) अंकात ‘Personal
is Political’ ही घोषणा केट मिलेट या अमेरिकन स्त्रीवादी
अभ्यासक-कार्यकर्तीने दिली असा उल्लेख आहे. ते वाचून Personal is Political बाबतचे अनेक संदर्भ आठवले, ते पडताळून पाहिले. साधारण ४०-४२ वर्षापूर्वी हा वाक्प्रयोग
केला गेला. थोडं त्या इतिहासात डोकवावं असं वाटल्याने हा लेखनप्रपंच.
अमेरिकेत १९६० नंतर नवडाव्या चळवळीतल्या अनेक स्त्रियांचा तिथे भ्रमनिरास झाला
आणि त्यातून स्वायत्त स्त्रीचळवळीला चालना मिळाली. केट मिलेटचा ‘Sexual Politics’ हा निबंध
१९६७ साली प्रकाशित झाला. ह्या निबंधात केटने राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण नव्हे
तर एकूणच सत्तासंबंध
हे भान दिलं होतंच. मात्र ‘Personal
is Political’ हा
वाक्प्रयोग त्यानंतर आला. ह्या वाक्प्रयोगाचं श्रेय कॅरोल हानिश या अमेरिकन
स्त्रीवादी अभ्यासक-कार्यकर्तीला दिलं जातं. आयोवा राज्यात वाढलेल्या कॅरोलने
ड्रेक विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पुरा केला. तिचा सामाजिक चळवळीशी
संबंध आला तो मिसिसिपी नागरी हक्कांच्या लढ्यातून. या लढयात ३-४ वर्षे काम
केल्यावर कॅरोल १९६७ मधे Southern Conference
Education Fund (SCEF)च्या न्यूयॉर्क ऑफीसमधे रूजू झाली. ‘New York Radical
Women’ या जहाल स्त्रीवादी (Radical
Feminist) गटात ती कार्यरत होती. मिस अमेरिका सौंदर्यस्पर्धेचा निषेध करण्याची कल्पना
कॅरोलची होती. १९६८ मधे स्पर्धेच्या वेळी निदर्शने करण्यात आली. तेव्हा केलेल्या पथनाट्यात निदर्शकांनी ‘स्त्रियांच्या छळाची साधने’ (सौंदर्य प्रसाधने, अंतर्वस्त्रे इ.) ‘Freedom Trash’ मधे फेकली. यातूनच ‘Bra-burning’ ची दंतकथा जन्माला आली असं कॅरोल नोंदवते. २००३ सालच्या एका
मुलाखतीत कॅरोलने सांगितलं “आम्हाला काही जाळण्यास परवानगी नव्हती,
आम्ही काही वस्तू म्हणजे उंच टाचेचे बूट,
अंतर्वस्त्रे, प्रसाधने वगैरे फेकून दिली.” मिस अमेरिका स्पर्धेच्या निषेधाला ३५ वर्षे पूर्ण
झाल्यानिमित्ताने अमेरिकेत रेडिओवर ही मुलाखत प्रसारित करण्यात आली.
‘The Personal is Political’ हा जो कॅरोलचा निबंध प्रकाशित झाला ते मूळचं एक टिपण होतं.
कॅरोलची एक सहकारी डोरोथी (डॉट्टी) झेलनरने ‘Consciouness
Raising’ ची एक
उपचारपद्धती म्हणून संभावना करून स्त्री-मुक्ती चळवळ खरोखर ‘राजकीय’ आहे का, असा सवाल केला होता. त्याला उत्तर म्हणून केलेल्या टिपणाचं
शीर्षक होतं, ‘Some
Thoughts in Response to Dottie’s Thoughts on a Women’s Liberation Movement’. नंतर हे टिपण ‘Personal
is Political’ अशा
शीर्षकाखाली ‘Notes
from the Second Year: Women’s Liberation in 1970’ ह्या संग्रहात प्रकाशित करण्यात आलं. शुलामिथ फायरस्टोन आणि
अँन कोएट ही या संग्रहाची संपादक जोडी. रोचक भाग असा की या शीर्षकाचं श्रेय कॅरोल
संपादकांना देते. कॅरोलनी नोंदवल्याप्रमाणे कॅथी साराचाइल्डने हे टिपण निबंध
म्हणून प्रकाशित करता येण्याची शक्यता संपादकांच्या लक्षात आणून दिली. (कॅथी
साराचाईल्डचे मूळ नाव कॅथी अमाथेक, आईचे नाव सारा
म्हणून तिने साराचाईल्ड असे नाव घेतले.) त्यानंतर संपादकांनी तो निबंध संपादित
करून ह्या शीर्षकासहित प्रसिद्ध केला.
१९६०च्या दशकात Consciousness
Raising वा जाणीवजागृती हा अमेरिकन स्त्रीवादी चळवळीचा
कृती-कार्यक्रम होता. New
York
Radical
Women गटाने असे जाणीवजागृती गट सुरु केले. ही लाट अमेरिकेत
पसरली. आपल्या आयुष्यातील प्रश्नांवरच्या चर्चा स्त्रिया ह्या गटांतून करत. ‘स्त्री’ म्हणून आपल्याला कशा प्रकारच्या दडपणुकीला सामोरं जावं
लागतं याची उदाहरणे कोणी देईल का असा एका चर्चेत अँन फोरेचा प्रश्न होता. तिने
पुढे म्हटलं, “I need to know it to raise
my own consciousness.” यावर कॅथी साराचाईल्डच्या मनात ‘Consciousness
Raising’ याच शब्दप्रयोगाचा विचार आला आणि या गटाने तो अंमलात आणला.
स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न हे निव्वळ ‘वैयक्तिक’ नसून ते ‘व्यवस्थात्मक’ पातळीवरील सत्तासंबंधांचे प्रश्न आहेत हे भान आणण्याचा या
गटांनी प्रयत्न केला. जाणीवजागृती म्हणजे स्वत:ला आणि इतरांना राजकीय जाणीव विकसित
होण्यासाठी मदत करणे. ‘राजकीय’ म्हणजे पक्षीय/निवडणुकांचे राजकारण नसून, एकूणच सत्तासंबंध असा व्यापक अर्थ इथे अभिप्रेत आहे. ‘स्त्रियांना आपल्या दुय्यमत्वाची जाणीव नाही,
ती निर्माण करायला हवी’ या गृहितातून चर्चा होत असत.
New York Radical Women गटाच्या या चर्चा-बैठका SCEF च्या कार्यालयात होत असत. SCEF ने या बैठका घेण्यास परवानगी दिली होती,
तसंच कॅरोलच्या विनंतीनुसार स्त्री-मुक्ती कार्यक्रमाच्या
शक्यता दक्षिणेत पडताळून पाहण्याच्या कामासही SCEF ची मान्यता होती. तरीही SCEF चे कर्मचारी – स्त्रिया व पुरुष – या गटात एकत्र येणाऱ्या स्त्रियांवर टीका करू लागले,
असं कॅरोल नोंदवते. अशा चर्चांना ते Naval gazing - आत्ममग्न चिकित्सा, वैयक्तिक उपचार गट असं म्हणत आणि हे निश्चितच ‘Political’ नाही असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्रिया (फक्त
व्यवस्थेमुळे) दडपल्या गेल्या आहेत हे ते कधी कधी मान्य करत. समान कामाला समान
वेतन आणि काही हक्क हवेत हे त्यांना मान्य होतं मात्र तथाकथित वैयक्तिक प्रश्नांना
सार्वजनिक आयाम देण्याच्या प्रयत्नांची ते खिल्लीच उडवत. पुरुषांनी घरकाम व
अपत्यसंगोपनात मदत करावी या मागणीची स्त्री व तिच्या जोडीदारातील वैयक्तिक प्रश्न
म्हणून संभावना करत. जर स्त्रिया स्वत:साठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वत:च्या
आयुष्याची जबाबदारी घेतली तर अशा स्वायत्त स्त्री-चळवळीची गरजच नाही असा त्यांचा
दावा होता. वैयक्तिक पुढाकारातून ज्याची सोडवणूक होणार नाही,
ते ‘क्रांती’ सोडवेल मात्र स्त्रियांनी तोंड बंद ठेवून (नेमून दिलेले)
काम केले तरच, असा काहीसा सूर होता. कॅरोलनी नोंदवल्यानुसार ‘स्त्रियांच्या दडपणुकीत पुरुषांचा फायदा आहे’
असं म्हणणं म्हणजे पापच होतं. अशा प्रकारे स्वायत्त स्त्रीचळवळ थांबवण्याचे किंवा तिला
सोयीस्कर वाटेवर नेण्याचे प्रयत्न चालू होते. स्वायत्त स्त्रीचळवळीच्या ह्या
संघर्षातून या निबंधातील सिद्धांकन पुढे आले आहे, असं कॅरोल म्हणते.
राजकारण या संज्ञेला व्यापक अर्थ देणाऱ्या या निबंधाच्या
सुरुवातीला कॅरोल उल्लेख करते तो डाव्या चळवळीतील ‘उपचार’ विरुद्ध ‘उपचार आणि राजकारण’ (Therapy
v/s Therapy and Politics) ह्या वादाचा. उपचार हा अनुचित शब्दप्रयोग आहे कारण उपचारात
आजार आणि त्यावरचा इलाज अभिप्रेत आहे. उपचारपद्धती म्हणजे वैयक्तिक पर्यायांशी
जुळवून घेणे. पण इथे मुळात बऱ्या नसलेल्या पर्यायांशी ‘adjust’ करायचं नसून वाईट परिस्थिती बदलायची आहे,
असं कॅरोल मांडते. वैयक्तिक अनुभवांच्या आधारे प्रश्नांची
उत्तरं शोधणारी आणि त्यातून सामायिक निष्कर्षाप्रत जाणारी ही छोटी छोटी चर्चासत्रं
म्हणजे एक प्रकारची राजकीय कृतीच असल्याचे ती म्हणते. कार्यकर्ती म्हणून समोर
आलेल्या पेचावर ती म्हणते, “”माझ्या स्वत:च्या वैयक्तिक प्रश्नांविषयी बोलायला मी अशा
सत्रात जात नाही कारण चळवळीतली स्त्री म्हणून स्वतंत्र, नि:स्वार्थी, सक्षम आणि आयुष्यावर नियंत्रण असलेली स्त्री असण्याचं
माझ्यावर दडपण आहे. माझ्या आयुष्यात प्रश्न आहेत असं म्हणणं म्हणजे माझं दुबळेपण
मान्य करणं. अशावेळी राजकीय कृती म्हणजे (चळवळीतली स्त्री म्हणून) मला जे काही ‘सांगितलं’ गेलं आहे ते बोलण्यापेक्षा मला जे ‘खरोखर’ वाटतं त्याचा शोध घेणे. ह्या चर्चांतून आम्हाला उमजलं की
आमचे वैयक्तिक प्रश्न हे राजकीय प्रश्न आहेत आणि त्यावर वैयक्तिक उपाय नाही.
सामूहिक उपायांसाठी सामूहिक कृतीची गरज असते. मी ह्या बैठकांना जाते कारण (नागरी
हक्क) चळवळीतल्या चार वर्षात मिळाली नाही अशी राजकीय समज मला या चर्चांतून मिळाली.
माझ्या डोळ्यावरचा नकली चष्मा गळून पडला आणि ‘स्त्री’ म्हणून माझं आयुष्य काय आहे याची जाणीव झाली”.
मात्र काही बाबतीत ही चर्चासत्रं उपचारात्मक होती हे
नाकारून चालणार नाही हे सांगताना ती दोन गोष्टींचा उल्लेख करते;
एक म्हणजे अपराधीपणाच्या (स्वत:ला दोष देण्याच्या) भावनेतून
सुटका आणि प्रथमच स्वत:बद्दल, स्वत:च्या आयुष्याबद्दल विचार. इथे कॅरोल लीलिथ मधील एका
व्यंगचित्राचा संदर्भ देते, जे म्हणतं “I am Changing. My mind is
growing muscles”. अर्थात मार्क्स, लेनिन, एंगल्स, माओ, हो यांचाच शब्द अखेरचा असं जे मानतात त्यांना असे गट म्हणजे
वेळेचा अपव्ययच वाटेल, अशी कोपरखळीही मारते.
ह्या निबंधातील सिद्धांकन New York Radical
Women च्या ‘Pro-woman’ (स्त्री समर्थन) तटातून आलं आहे, असं कॅरोल नमूद करते. हा निबंध लिहिण्याच्या सहा महिने आधी
मिस अमेरिका स्पर्धा-निषेधाच्या निमित्ताने गटाबाहेर जाऊन कृती करण्याची गरज
अनेकींच्या लक्षात आली होती. मात्र ह्या कृतीच्या निमित्ताने निदर्शकांत तट पडल्याचे दिसते. स्त्रिया स्वत:च चेहरा रंगवून,
अडचणीचे कपडे-उंच टाचेचे बूट घालून आपल्या दुय्यमत्वाला
खतपाणी घालतात, असं मानणाऱ्या तटाला ‘Anti-woman’ म्हटलं गेलं. १९६८ मधे मिस अमेरिका स्पर्धेविरोधात केलेल्या
निदर्शनात काही निदर्शकांनी सहभागी स्त्रियांवर टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर
सौंदर्याचे भ्रामक मापदंड लादणारे आयोजक सोडून स्त्रीवादी कार्यकर्त्याच सहभागी
स्त्रियांच्या दृष्टीने ‘शत्रू’ बनल्या. Pro-woman भूमिकेनुसार सहभागी स्त्रियांचा नव्हे तर त्यांच्यावर ते
लादणाऱ्या समाजाचा समाचार घ्यायला हवा. मेकअप केलेल्या स्त्रियांना चांगलं वागवलं जात असेल
आणि मेकअप न केलेल्या स्त्रियांना ‘आजारी’ म्हटलं जात असेल तर अशा परिस्थितीत मेकअप केलेली स्त्री
दडपशाहीला हातभार लावते, असं म्हणता येत नाही. म्हणून स्त्रियांच्या दमनासाठी
स्त्रियांना जबाबदार धरता येत नाही. मात्र हे प्रतिपादन अतिसुलभ असल्याची टीका
झाली. जर स्त्रियांचं वर्तन ही दमन करणाऱ्या समाजात अपरिहार्यता असेल तर स्त्रिया
ही व्यवस्था कधीतरी बदलू शकतील का? असा सवाल Anti-woman भूमिकेच्या पुरस्कर्त्यांनी उपस्थित केला. निबंधातील
प्रतिपादनाच्या केंद्रस्थानी Pro-woman भूमिका आहे. स्त्रियांच्या स्थितीसाठी सतत त्यांनाच जबाबदार
धरणं,
सामान्य स्त्रियांना अज्ञानी समजणं योग्य नाही असं कॅरोल
म्हणते. सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा चळवळीतल्या स्त्रियांना जास्त समजतं हा विचार
तिने नाकारला. आपण ‘त्यांचं’ ऐकायला हवं कारण त्या चळवळीत नसण्याची अनेक चांगली कारणं
त्यांच्याकडे असू शकतात. स्त्रियांना स्वत:ला स्त्रीवादी का म्हणवून घ्यावंसं वाटत
नाही यामध्ये आपल्या विचार आणि कृतीमध्ये काही दोष नाही ना हे पाहायला हवं अशी
मांडणी कॅरोलने केली आहे.
ह्या काळातील स्त्रीवादी चळवळीला दुसरी लाट (Second
wave) म्हटलं जातं. अमेरिका व इग्लंडमध्ये १९वे शतक आणि विसाव्या
शतकाच्या पूर्वाधापर्यंत (१९२०) मतदानाच्या हक्कासाठी झालेल्या चळवळीला पहिली लाट
म्हणलं जातं. १९६० नंतरच्या ह्या दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादी चळवळीत
विचार/सिद्धांकनाचे अनेक प्रवाह होते. त्यात जहाल स्त्रीवादी सिद्धांकन जोरकसपणे
पुढे आलेलं दिसतं. केट मिलेट, शुलामिथ फायरस्टोन ह्या त्यात आघाडीवर होत्या. जहाल
स्त्रीवाद्यांनी पुरुषसत्ताक समाजातील लैंगिक राजकारण पुढे आणलं,
लिंगावर आधारित दमन हे प्राथमिक असल्याचं त्यांनी जाहीर
केलं. साहजिकच पुरुषसत्ता आणि त्यातील लिंगाधारित भूमिकांना आव्हान हे त्यांचं
लक्ष्य बनलं. केट मिलेटने लैंगिक नातेसंबंध हे सत्तासंबंध असतात हा विचार मांडला.
पाश्चात्त्य समाजातील पुरुषसत्ता आणि साहित्याची चिकित्सा करताना लिंग वा लैंगिकता
हा राजकीय घटक म्हणून दुर्लक्षित राहतो अशी मांडणी केली. शुलामिथ फायरस्टोनने
मार्क्सवादी सिद्धांकन पद्धतीचा वापर करून मानवी समाजाचा इतिहास हा लिंगांमधील
द्वंद्वाचा आहे असं मांडताना स्त्रियांचे दुय्यमत्व जैविकतेशी जोडले. अर्थात जहाल स्त्रीवादी विवेचनावर खूप टीका झाली,
हे विवेचन अनैतिहासिक आहे ह्या आक्षेपाबरोबरच फक्त
लिंगाधारित दमनाला प्राथमिकता दिल्याने दमनाचे इतर अनेक आयाम दुर्लक्षित झाल्याची
टीका झाली. जगभरातील स्त्रियांना निव्वळ जैविक साम्य गृहीत धरून एकाच कोटीक्रमात
बघणे हे फसवे होते.
समलिंगी (लेस्बिअन) स्त्रीवाद्यांनी स्त्री-दमनाच्या
पुरुषकेंद्रित विश्लेषणाला प्रश्नचिन्ह लावले. ‘जहाल स्त्रीवाद्यांचा समलैंगिक चळवळीला पाठिंबा
होता आणि दोहोंत
सुरुवातीला फारसे ताण नव्हते, मात्र १९७० नंतर काही लेस्बियन
कार्यकर्त्यांनी अलगतेची भूमिका घेतली ज्यांचा मुख्य आक्षेप भिन्नलिंगी संबंध
असलेल्या स्त्रियांबद्दल होता, पुरुषांशी संबंध म्हणजे
त्यांच्या दृष्टीने शत्रूशी संबंध ठेवल्यासारखे (Sleeping with the enemy) होते’,
असं १९९९ मधील एका भाषणात कॅरोलने नोंदवलं आहे. हळूहळू लिंग ह्या मुद्द्यावरील वादाने उग्र स्वरूप धारण केलं. या
वादाच्या काळाला तर स्त्रीवादी लिंग युद्ध (Feminist
Sex Wars) म्हटलं जातं. लिंगविषयक अनेक मुद्द्यांवर ह्या काळात धारदार चर्चा झाल्या;
ज्या कडवट बनत गेल्या. अश्लील साहित्य (Pornography), वेश्याव्यवसाय, लैंगिक कल, लिंगभाव अस्मिता (Gender
identities) अशा अनेक मुद्द्यांवरील भूमिकांसंदर्भातले हे वाद होते. ह्याच काळात स्त्रीवाद्यांनी लावून धरलेल्या समान हक्कांसाठी कायद्यात बदलाच्या मागणीचा (Equal
Rights Amendment) पराभव झाला. त्यात Post feminist प्रतिपादनांचीही भर पडली, ज्यांनी स्त्रीवादी संकल्पना आणि सिद्धांकनावर टीका केली.
स्त्रीवादाच्या प्रस्तुततेलाच त्यांनी आव्हान दिलं. अनेक इतिहासकार मानतात की ह्या
घडामोडीतून १९८० च्या दशकात दुसरी लाट थांबल्यासारखी झाली मात्र यातूनच
स्त्रीवादाच्या तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला.
पहिल्या व दुसऱ्या लाटेतल्या स्त्रीवादी ज्या बदलांसाठी
लढल्या,
ते तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद्यांना जन्मत:च मिळाले आहेत.
त्यामुळे त्या स्वत:कडे सक्षम आणि खंबीर म्हणून पाहतात. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद
हा ‘अधिक संधी आणि कमी लिंगभेद’ अशा आत्मविश्वासावर उभा राहिला. आधीच्या चळवळीपेक्षा आमची
चळवळ वेगळी असल्याचं त्यांनी जाहीर केलं. हा स्त्रीवाद जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत उदयाला आला.
साम्यवादाचे पतन, वाढता धार्मिक-वांशिक मूलतत्त्ववाद,
माहिती व जैवतंत्रज्ञानाचे लाभ व धोके ह्यासारख्या
प्रक्रियांचा हा काळ आहे. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद अमेरिकेत ‘Grrl feminism’ तर युरोपमध्ये ‘New
Feminism’ म्हणून ओळखला जातो. ह्या काळात कडव्या ख्रिश्चन संघटनांनी ‘जगण्याचा हक्क’ ह्या मुद्दा घेऊन कायदेशीर गर्भपातावर हल्ले केले. १९९१ मधे
अनिता हिलने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश क्लेरन्स थाँमस लैंगिक
छळाचे आरोप ठेवले तेव्हा प्रसारमाध्यमांनी तिची कुचेष्टा केली. ह्या घटनांनंतर
तरुण स्त्रीवाद्यांचा निषेध प्रकट होऊन ह्याविरोधात संघटित जाणीव निर्माण झाली.
ह्या जाणीवेतून ‘Riot
Grrrl’ चळवळीची सुरुवात झाली असं साधारणपणे दिसतं. ह्या घटनांवर
प्रतिक्रिया लिहिताना जेन स्मिथ हिने माउंट प्लेझंटला झालेल्या वांशिक दंग्याचा
संदर्भ घेत, अँलिसन वूल्फला लिहिलं, आता मुलींच्या दंग्याची सुरुवात करायला हवी. काही काळातच
ह्या दोघींनी काही समविचारी मुलींसोबत Riot
Grrrl ची सुरुवात केली. प्रौढ स्त्रीला ‘Girl’ म्हणणं प्रस्थापित संकेतानुसार अवमानकारक समजलं जातं.
स्त्रीवाद्यांनी ही अर्थछटा नाकारली. गुरगुराट ध्वनित करणारे दोन/तीन r त्यांनी girl ह्या शब्दात जोडले. तरुण मुलींशी जोडून घेण्याची रणनीती
ह्यात दिसते. Riot
Grrrl ही पंक रॉक शैलीतली स्त्रीवादी चळवळ आहे. मुलींनी गिटार
उचलून जोरात गाणे म्हणजे केवळ मजा नव्हती तर त्याकडे एक मुक्तिदायी कृती म्हणून
पाहिलं गेलं. ‘बिकिनी किल’ आणि ‘ब्रॅटमोबाईल’ हे दोन बँडस् ह्या चळवळीशी पहिल्यापासून संबंधित होते.
स्त्रीवादाची सक्षमीकरणाची रणनीती आणि पंक रॉकची ‘Do
it Yourself’ शैली ह्यांचा मिलाफ करत, पंकरॉक ह्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात Riot Grrrl बँडस् नी स्वत:ची जागा निर्माण केली. या बँडस् मधे पुरुषही
आहेत. संगीताच्या माध्यमातून लिंगभावाचे अनेक मुद्दे मांडणारा Riot
Grrrl, तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादाचा एक महत्वपूर्ण अविष्कार आहे.
असे काही गट युरोप-अमेरिकेत कार्यरत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी
उपयोगाची ओळख इतर अनेकींना करून देणारे; असे काही गट स्वत:ला Cyber
Grrls किंवा Net
Grrls म्हणवतात.
तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादी सिद्धांकन हे बहुविध आहे. त्यात
स्थानिक,
राष्ट्रीय व राष्ट्रसीमांच्या पलीकडे जाणाऱ्या
कृतीवादाबरोबर ठळकपणे दिसते ती वैयक्तिक प्रतिकाराची नीति. स्त्रियांना सरसकट एकाच
कोटीक्रमात बसवणाऱ्या आधीच्या स्त्रीवादावर टीका करत;
हा स्त्रीवाद स्त्रियांमधील भिन्नता,
संदिग्धता आणि बहुविधतेकडे बघतो. त्यांच्या मते ‘राजकीय’ हे अपरिहार्यपणे ‘वैयक्तिक’ आहे. त्यामुळे बहुविध अस्मिता घेऊन वैयक्तिक संघर्ष
करण्यावर इथे भर आहे. डल्लास कुलन या प्राध्यापिकेने विद्यार्थिनी Personal
is
Political कडे कसं बघतात हे नोंदवलं आहे. विद्यार्थिनींच्या मते ‘मी स्वत:ला स्त्रीवादी म्हणून निश्चित केलं असेल तर
स्त्रीवाद ही माझी राजकीय भूमिका आहे आणि म्हणून माझ्या सर्व कृतींना राजकीय अर्थ
आणि महत्व आहे’. रोजच्या आयुष्यातील लिंगभेद तपासणं, त्यावर प्रश्न उभे करणं, त्याला (वैयक्तिक) प्रतिकार करणं ही रणनीती तिसऱ्या लाटेतील
अनेक स्त्रीवाद्यांनी घेतली आहे. आपण स्वत:ही दमनव्यवस्थेचा भाग असतो हे स्पष्ट
भान या स्त्रीवादाने आणलं आहे. ख्रिस्तीन डोसा लिहिते,
‘दर मिनिटाला माझा कोणीतरी
उपयोग करून घेत असतं, कोणीतरी माझी उपेक्षा करत असतं,
आणि मी दुसऱ्या व्यक्तीची. (जणू काही) दुरुपयोगाची व्यवस्थाच कार्यरत आहे;
त्यात मी नेमकी कुठे आहे हे मला कळायला हवं’.
सर्व प्रकारचं दमन हे एकमेकाशी जोडलेलं आहे हे सांगताना ती
पुढे म्हणते; ‘एडस् विरुद्ध लढायचं असेल तर समलैंगिकतेबद्दल वाटणाऱ्या भीतीशी लढायला हवं,
या भीतीशी लढायचं असेल तर वंशवादाविरुद्ध लढायला
हवं........इ. इ’. जागतिकीकरणाच्या गुंतागुंतीच्या काळात (लिंगभाव)
अस्मितांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिन्न्तेच्या राजकारणाकडे जायला हवं,
जिथे सर्व सहभागी विशिष्ट राजकीय मुद्दे आपले मानतील आणि ते
साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील असं काही स्त्रीवादी मांडतात. पण ते कसं ह्याची मांडणी नीटशी दिसत
नाही. मात्र दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादावर टीका करतानाही त्यांचं ‘वैयक्तिक’ प्रश्नांचं ‘राजकीय’ आकलन तिसऱ्या लाटेतील स्त्रीवाद्यांना महत्वाचं वाटतं. ह्या
संदर्भात नोमी लॅम लिहिते की जुन्या, गुळगुळीत झालेल्या ‘वैयक्तिक म्हणजे राजकीय’ च्या सूत्राकडे मी परत येते कारण ते ‘खरं’ आहे. तिसऱ्या लाटेतील स्त्रीवादी मानतात की राजकारण हे
रोजच्या आयुष्यातून पुढे येतं कारण (जे) वैयक्तिक (ते) अजूनही राजकीयच आहे.
भारतीय स्त्रीवादी चळवळीला Personal is Political हे भान महत्वाचं वाटतं किंबहुना त्याभोवतीच चळवळीतला कृतीवाद
उभा राहिलेला दिसतो. ह्याचा ऐतिहासिक आढावा घेणंही रोचक ठरेल मात्र तो स्वतंत्र
लेखाचा विषय आहे. तरीही जाता जाता अलीकडे वारंवार प्रत्ययाला येणारा एक मुद्दा
नमूद करण्याची गरज वाटते. आजच्या परिस्थितीत स्त्रीवादी राजकारण उभे रहाताना इतर
अनेक धोक्यांबरोबर त्याचे मामुलीकरण होण्याचा धोका दिसतो आहे. दिल्ली बलात्कार
घटनेनंतरच्या निदर्शनांतून, अशा प्रश्नांना केवळ शासनसंस्था जबाबदार असल्याचं चित्र उभं
राहिलं कारण निदर्शकांची मुख्य मागणी ही कायद्यात बदलाची होती. आपल्या समाजातला दुसरा कल म्हणजे ‘एक तास दिवे बंद’ किंवा ‘बस डे’ सारख्या कृती. प्रश्नामागची राजकीय गुंतागुंत न बघता,
अशा ‘अ’राजकीय वैयक्तिक कृतींची गोळाबेरीज म्हणजे त्यावरचं उत्तर
असं काहीसं हे चित्र आहे. जागरूकता निर्मितीसाठी ह्या कृती उपयुक्त आहेतच. मात्र
कृतीवाद ह्या मर्यादेतच थांबला तर त्यात प्रश्नाचे आणि त्याच्या सोडवणुकीचे
मामुलीकरण होण्याचा धोका दिसतो. तसंच कोणत्याही प्रश्नाची जबाबदारी समाजातील
निव्वळ एखाद्या घटकावर ढकलण्यातही हाच धोका आहे. अशा परिस्थितीत Personal is Political चे भारतीय आणि जागतिक संदर्भातील सर्वंकष भान घेऊन,
मुख्य म्हणजे लिंगभावाच्या सातत्याने बदलत्या भूमिका आणि
अस्मिता लक्षात घेऊन स्त्रीवादी राजकारण पुढे जायला हवं.
प्रसिद्धी: मिळून साऱ्याजणी, मार्च २०१३
माहितीपूर्ण लेख. आपण आज अनेक गोष्टी ज्या गृहित धरतो त्यासाठी अनेक व्यक्तींनी लढा दिला आहे ही जाणीव जागी राहणं महत्त्वाचं आहे. अशा लेखांच त्यात योगदान असतं.
ReplyDeleteधन्यवाद सविता!
ReplyDeleteखूपच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
ReplyDeleteखूपच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
ReplyDeleteखूपच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
ReplyDelete