ग्यानबाची एचार्डी अर्थात
समृद्धीच्या शोधाची गोष्ट
एचआरडी, कौन्सेलिंग हे शब्द आणि त्या गोष्टींचा प्रत्यक्ष वापर आज आपल्या आयुष्यात रुळला आहे.
अगदी वैयक्तिक-कौटुंबिक प्रश्नांसाठी कौन्सेलरकडे जाण्यात आज कमीपणा वाटत नाही.
समस्यांचा स्वीकार आणि त्यावर विवेकाने मार्ग शोधण्याची तयारी आज अनेक जणांची
असते. काही प्रमाणात बदलेले हे समाजमानस ह्या मुक्कामावर येण्यामागे मोठा प्रवास
आहे आणि त्यात वनारसे दंपतीसारख्या मानसशास्त्रज्ञांचे योगदान मोठे आहे. डॉ. श्यामला वनारसे लिखित ‘ग्यानबाची एचार्डी
अर्थात समृद्धीच्या शोधाची गोष्ट’ ह्या पुस्तकाद्वारे हा मोलाचा ऐवज खुला झाला
आहे. हे पुस्तक म्हणजे त्या आणि त्यांचे
पती डॉ. सुधीर वनारसे ह्यांनी मनुष्यबळ विकास क्षेत्रात मानसशास्त्राच्या केलेल्या
उपयोजनाचा दस्तावेज आहे. त्याबरोबरच इतरांना मदत करताना, स्वत:चा मार्ग शोधणार्या
ह्या मानसशास्त्रज्ञ दांपत्याची आत्मकथाही आहे. ‘मनुष्यबळ संसाधन विकास’ असं ह्या
क्षेत्राचं जडजंबाळ नाव, पण काम मात्र सर्वसामान्य माणसांसोबतचं, ज्यांचा
प्रतिनिधी हा ग्यानबा. त्या ग्यानबासाठी विकसित केलेली भारतीय तोंडवळ्याची
मनुष्यबळ विकासपद्धती म्हणजेच ‘ग्यानबाची एचार्डी’.
सुरुवातीला दोघांच्या जडणघडणीचा, कौटुंबिक पार्श्वभूमीचा
भाग येतो. दोघातलं साम्य सांगताना त्या म्हणतात, “एकूण वैज्ञानिक विचारावरचा
विश्वास, पैशाबाबत आणि घर चालवताना कामाबाबत माझंतुझं करायचं नाही हा विश्वास आणि आपापल्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याची
तयारी”. पुस्तक वाचत जाताना एका विवेकी, समंजस सहजीवनाचे आणि प्रयासपूर्वक आकाराला
आणलेल्या वस्तुनिष्ठ कामाचे दर्शन होत जाते. दोघांच्या स्वभावातले फरकही त्यांनी
किंचित मिश्किलपणे अधोरेखित केले आहेत.
डॉ. सुधीर आणि डॉ. श्यामला सुरुवातीला मानसशास्त्राचे
प्राध्यापक होते. मात्र शिक्षणक्षेत्रातले साचलेपण आणि मानसशास्त्राच्या
उपयोजनाच्या पातळीवर असलेला अंधार ह्यातूनच त्यांना ‘औद्योगिक क्षेत्राला उपयुक्त
अशी व्यावसायिक मानसशास्त्रीय सेवा देण्याचा’
मार्ग दिसला. ह्याच्या
केंद्रस्थानी होता, माणसं घडवण्याचा विचार. त्या काळाचा विचार करता कारखान्यांमधला
बहुसंख्य कामगार वर्ग हा ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेला, ‘कृषीसंस्कृतीत
मुरलेला, वारकरी पंथातली माणुसकीची भावना बाळगणारा’ होता. त्यामुळेच भारतीय तोंडवळ्याची
पद्धती विकसित करायला हवी, ही गरज वनारसे दंपतीनी ओळखली आणि कष्टपूर्वक तिला आकार दिला. सत्तरच्या
दशकाच्या अखेरीस त्यांनी मानसशास्त्रीय सल्ला आणि सेवा देणारं ‘सेंटर फॉर
सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस’ सुरु केलं आणि जवळजवळ पंचवीस वर्षे अनेक कंपन्यांसाठी
प्रशिक्षणे घेतली. व्यक्तिविकास, कौशल्य विकास, कामाच्या ठिकाणचे संबंध, कामाच्या
प्रेरणा, महत्वाकांक्षा ह्या सार्यावर सहभागींना विचारासाठी प्रवृत्त करण्यावर या
कामाचा भर होता. कुठेही तुमचे प्रश्न मांडा आम्ही उपाय सांगतो असे न म्हणता
आपापल्या प्रश्नावर मार्ग आपणच शोधायचा आहे, त्यासाठी आम्ही मदत करू हा विचार स्पष्ट
होता. समोरच्यात जे काही कामाला आवश्यक आहे ते उजळवण्याची ही प्रशिक्षकांची भूमिका आणि लोकांना आपण मदत करतो
आहोत तर त्यांची शक्ती वाढली पाहिजे हे त्यांच्या प्रशिक्षणाचे सूत्र राहिले आहे. या कालखंडात बदलत गेलेल्या ग्यानबाचे चित्रणही नेमकेपणाने पुस्तकात आले आहे.
‘सेंटर फॉर सायकोलॉजिकल सर्व्हिसेस’ची ‘चोख काम आणि रोख
दाम’ ही स्पष्ट भूमिका आणि त्या संदर्भात विनामोबदला काम, त्यागाचाच बोलबाला पण
कामाच्या उत्तरदायित्वाचा अभाव ह्या सगळ्या परिस्थितीचे लेखिकेने केलेले विश्लेषण
मुळातूनच वाचायला हवे. आपल्या समाजात कार्यस्थळी असणार्या मानवी नातेसंबंधाबाबत, पंचवीस
वर्षांच्या ह्या कामाच्या अनुभवातून त्या लिहितात, “आपल्याकडे कामाच्या जागी
अधिकाराच्या उतरंडीला आणि संबंध चांगले राखण्याला फार महत्व आहे असे दिसते. काम बाजूला
पडलं तरी चालेल पण संबंध ताणायला नकोत. कामावर रोखठोकपणे वागण्याऐवजी माणसे आब
राखून, तानमान पाहून, स्वत:चा वरचष्मा राहील याची काळजी घेताना दिसतात. पण
कामाच्या जागी काम होण्याला अग्रक्रम मिळतोच असं नाही.”
तसंच कामाच्या जागी कौटुंबिकता आणण्याच्या भारतीयांच्या
मानसिकतेबाबत त्या म्हणतात, “कुटुंब आपल्या समाजाचं आणि मानसिक घडणीचं मर्मस्थान
खरं पण ते सारा वेळ सगळीकडे कशाला वागवायचं? व्यापक पातळीवर समृद्ध जीवनासाठी
कार्यसंस्कृती आणि नागरिकत्व ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत.”
ह्या दंपतीचा संयमी, विवेकी दृष्टीकोण अनेक पानांतून प्रतीत
होतो. ‘पैसाच साध्य’ हा विचार वेगाने पसरण्याच्या काळात पैशाबद्दल त्या लिहितात,
“पैसा म्हणजे आपण मांड ठोकू असा घोडा आणि दिशा ठरवणारे आपण त्यावरचे स्वार. आम्ही
जेव्हा नव्या संसारात काही गोष्टी घ्याव्या असा विचार करत असू तेव्हा सुद्धा वस्तू
अशी घ्यायची की ‘पुन्हा बघायलाच नको’ या विचारानंच निवड व्हायची.” पुढे त्या कंसात
लिहितात, “मजेची गोष्ट आहे, खरोखर माझी खाट १९६३ साली घेतली तीच आजही आहे. एका
आयुष्याच्या हिशेबात ‘पर्मनंट’ ही व्याख्या पुरेशी आहे.”
एचार्डी ट्रेनिंग म्हणजे ‘मेंदूची धुलाई’ ह्या तत्कालीन
समजापासून ते ‘अधिक चांगल्या माणूसपणाकडे’ इथपर्यंतच्या आकलनाचा प्रवास हा अतिशय
नेटकेपणाने इथे मांडला आहे. कामाच्या ठिकाणी, वरचे म्हणजे मलई खाणार हा कामगारांचा
दृष्टीकोन तर कामगारांकडे तुच्छतेने पाहण्याची ‘वरच्यांची’ दृष्टी अशी आव्हाने या
कामात होती. अशा द्वंद्वातून वाट काढणारा ‘सुसंवादातून विकास’ हा वनारसे दंपतीचा
दृष्टीकोन हजारोंना प्रेरणा देणारा ठरला. ‘एचार्डीच्या आख्यानाचा’ शेवट करताना
त्या जे लिहितात ते फार महत्वाचं आहे, “आततायी भावनिक लढे किंवा ‘जितं मया’ चे
उद्रेक ह्यात गोते खाण्यापेक्षा आपलं छोटंसं आयुष्य आपणच आपल्याला हवं तेवढं
व्यापक करून एक आत्मनिर्भरतेचं निर्भय उदाहरण बनायचं.” साठा वाटांच्या एचार्डीचे सुकाणू संयमाच्या आणि
विवेकनिष्ठेच्या हाती देऊन सुफळसंपूर्ण करता येईल हाच गजर करत हे आख्यान संपते.
ओघवती भाषा, चपखल मराठी शब्दांचा वापर, नेटकी मांडणी आणि
त्याला साजेसे मुखपृष्ठ यामुळे हा दस्तावेज वाचनीय (आणि आशयामुळे अनुकरणीय) झाला
आहे.
पूर्वप्रसिद्धी: अक्षर वाड्॰मय, जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०१५
ग्याग्यानबाची
एचार्डी अर्थात समृद्धीच्या शोधाची गोष्ट
श्यामला
वनारसे
मूल्य:
रु. २००/-
प्रकाशक
सेंटर
फॉर सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस
‘आवर्तन’, ५, हिल व्ह्यू सोसायटी
४६/४,
एरंडवणे, पौड रस्ता, पुणे ४११०३८
फोन: ०२०
२५४३६४९१
उपलब्धता:
साधना मिडिया सेंटर-पुणे, www.menakabooks.com
No comments:
Post a Comment