ऑड्रीयस हायनिक हा जर्मन माणूस रेडिओ स्टेशनवर पत्रकार म्हणून कार्यरत होता.
त्यावेळी अपघातात दृष्टी गमावलेला एक अंध माणूस त्याचा सहाय्यक म्हणून काम करू
लागला. सुरुवातीला ऑड्रीयसला त्या माणसाची दया आली पण नक्की त्याच्याशी कसं जुळवून
घ्यावं ते कळेना. मात्र हळूहळू ऑड्रीयसच्या लक्षात आलं की अंध असणं म्हणजे डोळस
माणसांपेक्षा काही वेगळ्या क्षमता असणं. ह्या क्षमता ओळखून ऑड्रीयसने त्याला
रेडिओच्या कामासाठी प्रशिक्षित केलं. एक प्रकारे अंध माणसाने त्याचे डोळे उघडले
आणि अशा गोष्टींवर मात करून पुढे कसं जाता येईल या विचाराला प्रेरणा दिली. आज डॉ. ऑड्रीयस हायनिक
ओळखले जातात ते ‘Dialogue in the Dark’ यासारख्या अभिनव
आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनक्षम उपक्रमांचे निर्माते म्हणून. दृष्टीखेरीज अन्य संवेदनांबाबत जागरूकता आणि अंधांबद्दल
संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीच्या ‘Dialogue in the Dark: Moving beyond sight!’ ह्या उपक्रमात अंध व्यक्ती मार्गदर्शन करतात. अशा उपक्रमांना उद्योगाचं रूप देण्याचं
यशस्वी धाडस ऑड्रीयसने केलं आहे.
ऑड्रीयसची
कौटुंबिक पार्श्वभूमी विलक्षण आहे. त्याचा जन्म १९५५चा. त्याच्या आईच्या कुटुंबातील
अनेकजण नाझी जर्मनीतील ज्यू लोकांच्या शिरकाणात बळी पडले होते तर वडिलांचे कुटुंब
हे नाझी समर्थक होते. दुसऱ्या महायुद्धात आपल्या आईने तिचे जवळपास सर्व कुटुंब
गमावले हे त्याला १३ वर्षाचा झाल्यावर समजले. ज्यू आणि नाझी अशा परस्परविरोधी
वारशामुळे, त्यातील तणावामुळे तो खूप विचार करू लागला; वगळले जाणे, परिघाबाहेर
ढकलले जाणे, समूळ उच्छेद या प्रक्रिया का घडतात? माणसं एकमेकांना हीन वा श्रेष्ठ का
लेखतात? याचा शोध तो घेऊ लागला. ह्या शोधातून सहिष्णुता, संवाद आणि देवाणघेवाण या गोष्टींचं
महत्व लक्षात आलं. पुढे रेडिओवर अंध व्यक्तीबरोबर काम करताना अंधांच्या दृष्टीहीन
जगाबद्दल ‘दृष्टी’ निर्माण झाली. त्याने अंधांसाठीच्या एका संस्थेत काम सुरु केलं.
अंधांना विशिष्ट माहितीपासून दूर ठेवलं जातं हे त्याला दिसत होतं. त्या व्यक्तींचं
(तथाकथित) अपंगत्व त्यांना (तथाकथित) धडधाकट माणसांपासून अलग पाडत होतं. माणसांमाणसांतली
ही अंतरं दूर करायला हवी हे त्याने ओळखलं आणि १९८८ मधे ‘Dialogue in the DDark’ ची सुरुवात झाली. जर्मनी, अमेरिका,
आशियातल्या अनेक देशात हा उपक्रम व्यावसायिक पद्धतीने राबवला जातो. भारतात हे
ठिकाण आहे हैदराबादेतील, इन-ऑर्बिट मॉलमधे.
कामानिमित्ताने
मी नेहमीच फिरत असते. जुलै २०१२ मधे हैदराबाद प्रवास ठरलेला होता. मग काम झाल्यावर
२-३ दिवस तिथेच सुट्टी घालवण्याचं ठरवलं. खाणे, फिरणे आणि नवनवीन अनुभव घेण्यासाठी
माझा सहचर संदीप उत्सुक असतो. इंटरनेटवरून ‘Dialogue in the Dark’ त्यानेच शोधून
काढलं. माझं काम पूर्ण झाल्यावर तो हैदराबादला आला. रमझानच्या काळात तिथे असल्याने
इफ्तारची मनसोक्त मजा घेतली आणि हैदराबादेतील इतर काही ठिकाणं पहिली. अर्धा दिवस
राखून ठेवला होता, ‘Dialogue in the Dark’ साठी. यात दोन भाग आहेत. एक प्रदर्शन
आणि दुसरं म्हणजे अंधारातलं जेवण (Lunch/Dinner). प्रदर्शन या शब्दातच काही बघणं अभिप्रेत आहे. मात्र इथलं
प्रदर्शन म्हणजे द्दृष्टीशिवाय अन्य संवेदना अनुभवणं. गर्द अंधार असलेल्या मोठ्या
दालनात जाताना हातात पांढरी काठी दिली जाते. तेथील कर्मचारी आपल्याला एका रांगेत
(म्हणजे तुम्ही जितके असाल त्यांना) एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून आत घेऊन
जातात. या आधाराची गरज भासतेच कारण आत गर्द अंधार. मोबाईल वगैरे सर्व वस्तू बाहेर
ठेवायच्या. (थोडे तरी पैसे जवळ ठेवावेत) प्रकाशाची बारीकशी तिरीपही येणार नाही अशी
आतमध्ये चोख व्यवस्था. आपल्याला आतल्या मार्गदर्शकावर सोपवलं जातं. मार्गदर्शक अत्यंत
सफाईने त्याचं काम करत असतो म्हणजे सूचना देणे, धडपड झाली तर आधार देणे,
चुकलेल्यांना योग्य मार्गाला लावणे अशा कितीतरी गोष्टी. सुरुवातीला डोळे फाडफाडून
आजूबाजूचा काही अंदाज येतोय का हे पाहण्याचा (?) प्रयत्न केला; जी डोळस माणसाची
स्वाभाविक प्रतिक्रिया असावी. नंतर त्यातली निरर्थकता लक्षात आली, इतर संवेदनांवर
लक्ष दिलं आणि या पाऊण तासाच्या प्रवासात काहीही दिसत नसताना स्पर्श, गंध, श्रवण
याद्वारे खूप गोष्टी अनुभवल्या. कुठे खडकाळ जमीन लागली तर कुठे गवताळ, थंड गुहेत
गेल्याचा आभास, प्राण्यांचे आवाज, खळाळत्या पाण्याचे सान्निध्य, बोटीत बसून
जलविहाराचा आनंद आणि बरंच काही. या फेरफटक्यात ती काठी किती महत्वाची आहे ते कळून
आलं. गंध वा स्पर्शाद्वारे काही वस्तू ओळखणं, कॅफेटेरियामध्ये खाद्यपदार्थ विकत
घेऊन अचूक पैसे देणं, खुळखुळणारा चेंडू मारून दाखवणं (!) अशा माफक परीक्षाही इथे आहेत.
अर्थात हे सारं करताना मजा तर आलीच; पण काही न दिसणं हे किती मोठं आव्हान आहे
याबद्दलची जाणीवही निर्माण होत होती. प्रदर्शन पूर्ण होऊन बाहेर येईपर्यंत जेवायची
(Lunch) वेळ झालीच होती.
जेवणासाठी
आत प्रवेश करण्यापूर्वी एक छोटी व्हीडीओ क्लिप दाखवण्यात आली. ताट म्हणजे घड्याळ
समजून काही सूचना दिल्या गेल्या. उदा.
११ च्या बाजूला ताटाबाहेर पाण्याची बाटली, १ च्या ठिकाणी ताटात वाटी इत्यादी. वर
प्रेमळ भाषेत ‘काही तुटल्याफुटल्यास पैसे वसूल होतील’ हा इशारा. पुन्हा आम्हाला आत
अंधारात नेऊन मार्गदर्शकावर सोपवण्यात आलं. त्याने योग्य जागी बसण्यास मदत केली
आणि जेवणाबाबत नेमक्या सूचना देऊन तो वाढायच्या तयारीला लागला. सूप, स्टार्टर, मेन
कोर्स आणि डेझर्ट हा नेहमीचा क्रम. तसं अंधारात जेवताना, घास तोंडात जाण्याऐवजी
नाकात जाणार नाही याची आपल्याला खात्री असते. पण एरवी जेवताना पदार्थाच्या
वासाबरोबर त्याचे दृश्य रूपही आस्वाद घेण्यात महत्वाचे ठरते. इथे मात्र गंध आणि चव
म्हणजेच आपले नाक आणि जीभ यांचीच भूमिका महत्वाची होती, सारी ज्ञानेंद्रिये तिथे
एकवटली. जेवताना आमचा मार्गदर्शक रजाक आम्हाला कुठे काय वाढलंय याबद्दल मोलाच्या
सूचना करत होता आणि आस्थेने चौकशीही; जेवण आवडतंय ना इत्यादी.
हे सारं
अनुभवत असताना आपले कान शाबूत आहेत याची खात्री झाली, कारण जेवण आणि प्रदर्शन
दोन्ही ठिकाणी मुख्य भिस्त त्यावर होती. आपल्याला दिसतं त्यामुळे इतर
ज्ञानेंद्रियांवर आपण फार कमी वेळा अवलंबतो असं लक्षात आलं. दुसरं म्हणजे इकडे
तिकडे ‘बघायला’ काही नसल्याने जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेता आला. तिसरं म्हणजे
जेवताना गप्पांचा अभूतपूर्व आनंद घेता आला. अभूतपूर्व यासाठी की इतकं विनाव्यत्यय
जेवण आपण कधीच केलं नसल्याचं जाणवलं. चौथी
गोष्ट म्हणजे पोट भरल्यावर आम्ही थांबलो. रोज जेवताना एखादा घास अंमळ
जास्त झाला तरी तो पानात दिसत असल्याने सहसा आपण तो खाऊन टाकतो. पण इथे तसं झालं
नाही. थोडे पदार्थ वाया गेले,
पण त्या दृष्टीविहीन जगात आपल्या शारीर संवेदना फार सजगपणे अनुभवता आल्या
आणि पोट भरल्याचे समाधान वाटताक्षणी आम्ही थांबलो. भरल्या
पोटाने आणि मनाने बाहेर लख्ख प्रकाशात आलो.
इथे मला आठवतोय ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक. अनेकांनी
लहानपणी तो म्हटलेला असतो. या श्लोकाची आधुनिक समतावादी आवृत्तीही आपल्याला माहीत
असेलच;
“वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे
कृषीवल
कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात
स्मरण
करुनी त्यांचे अन्न सेवा खुशाल, उदरभरण आहे चित्त होण्या विशाल”
यातला
‘चित्त विशाल होण्यासाठी उदरभरण’ हा भाग मला फार भावतो. पण थोडं यापुढे जाऊन मी
आता म्हणू शकते, उदरभरण हे दृष्टी विशाल होण्यासाठीही आहे, म्हणजे डोळस माणसांची
दृष्टी विशाल होण्यासाठी. प्रदर्शन आणि जेवणासाठी आम्हाला रोहित आणि रजाक या
मार्गदर्शकांनी मदत केली. निरोप घेण्यासाठी ते आमच्याबरोबर बाहेर आले. आम्हाला
अतिशय सफाईदारपणे मदत करणारे ते आमचे ‘मार्गर्शक’ पूर्णपणे अंध होते. ह्याचा थोडा
अंदाज होता तरीही इतका विलक्षण अनुभव देणाऱ्या त्या ‘अंध’ मित्रांना पाहून दोन
क्षण आम्ही नि:शब्द झालो. पण लगेचच लखकन् जाणीव झाली की आपण त्यांच्याशी बोलायला
हवं. आमच्या चेहऱ्यावर त्या दोन क्षणात काय भाव आले असतील, माहीत नाही. पण रोहित,
रजाकला ते दिसले नाहीत म्हणून बरंच वाटलं. कारण चुकूनही तिथे कणव दिसली असती तर
त्या अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करणाऱ्या, स्वावलंबी तरुणांना काय वाटलं
असतं? त्यांचे मनापसून आभार मानून, नुसते तोंडीच नाही तर हातात हात घेऊन; आम्ही दोघांचा
निरोप घेतला. क्षणभर मोह झाला त्यांच्याबरोबर फोटो घ्यायचा पण ती गोष्ट त्यांच्यासाठी
किती अप्रस्तुत आहे हे आम्हाला जाणवलं आणि आम्ही निघालो. उदरभरणामुळे दृष्टी खरोखर
विशाल होण्याचा हाच तो क्षण होता.......
डॉ. ऑड्रीयस हायनिकनी ‘Dialogue Social Enterprise – Moving Beyond
Differences’ ही कंपनी स्थापन केली आहे. या
अंतर्गत ‘Dialogue
in the Dark’ व्यतिरिक्त अन्य दोन सामाजिक उपक्रम डॉ. ऑड्रीयस हायनिकनी अत्यंत
व्यावसायिक पद्धतीने उभारले आहेत. एक म्हणजे ‘Dialogue in Silence-Moving beyond Speech’ जिथे मूकबधीरांबाबत
संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी ‘Sound proof’ जागेत खुणांच्या भाषेत संवाद
साधला जातो. दुसरा वृद्धांबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा उपक्रम म्हणजे ‘Dialogue with Time – The Art of
Aging’. याही ठिकाणी मूकबधीर वा वृद्ध
माणसंच मार्गदर्शक म्हणून काम करतात. Social Entrepreneur म्हणून अनेक मानसन्मान डॉ. हायनिक ह्यांना मिळाले आहेत. डॉ.
हायनिक जर्मनीतील युरोपिअन बिझिनेस स्कूलमधे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘Dialogue’ सारखे उपक्रम या शिक्षणाच्या मुख्य धारेत यावेत यासाठी ते प्रयत्नशील
आहेत. हा विचार फक्त शिक्षणाच्या पुनर्विचारापुरताच नाही तर अपंगत्वामुळे अलग
पडणाऱ्या लोकांबद्दल समाज संवेदनक्षम बनावा जेणेकरून अपंग माणसं समाजात सहज
सामावली जावी अशा व्यापक उद्देशाने ते काम करत आहेत.
पूर्वप्रसिद्धी: मिळून साऱ्याजणी, जानेवारी २०१३
No comments:
Post a Comment