“अरेच्या नाटकाचं नाव बदललं की
काय? अंडरग्राउंड चा फाउंड? शिवाजी प्रकटला (माफ करा) शिवाजी राजे प्रकटले की काय?”
कुठून तरी
जरब बसवणारा आवाज आला, “कोण तो शिवाजी, शिवाजीराजे म्हणतोय? छत्रपती म्हणा, पायाशी
तरी बसायची लायकी आहे का तुमची?”
म्हणजेच
आम्ही शिकलो; शिवाजी महाराज थोर होते, त्यांच्यापुढे उभं राहायची आपली लायकी नाही.
आता लायकीच काढल्यावर; त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत होते तरी मनातले प्रश्न मनातच.
जसे महाराज आम्हाला दाखवले गेले तसेच आम्ही बघितले. आम्हाला लहानपणापासून दिसलेला
शिवाजी कसा? (पुन्हा चुकले; शिवाजी नाही शिवाजी महाराज!)
पुण्यात सोन्याचा नांगर चालवणारे शिवाजी महाराज!
पुण्यात सोन्याचा नांगर चालवणारे शिवाजी महाराज!
स्वराज्याचं तोरण बांधणारे
शिवाजी महाराज!
शाहिस्तेखानाची बोटे तोडणारे
शिवाजी महाराज!
अफझलखानचा कोथळा बाहेर काढणारे
शिवाजी महाराज!
आग्र्याहून चातुर्याने सुटका
करून घेणारे शिवाजी महाराज!
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ शिवाजी
महाराज!
‘हिंदू’पदपातशहा शिवाजी महाराज!
जुलमी मुसलमान
राजवटीविरुद्ध हिंदू धर्मरक्षणार्थ उभे ठाकलेले शिवाजी महाराज!
या सगळ्या वर्णनविहारात गरीब
रयतेच्या कल्याणासाठी झटणारा तो राजा कुठे गेला? शिवाजीराजे कळले ते गड-किल्ले,
मोहिमा, लढाया, गनिमी कावा या संदर्भातच. म.फुल्यांनी गौरवलेला कुळवाडी भूषण राजा
आम्हाला समजलाच नाही कधी. शूद्र समजल्या गेलेल्या कुळात त्यांनी जन्म घेतला.
जातीवादी व्यवस्थेत त्यांची अतुलनीय कामगिरी राज्याभिषेकासाठी पुरेशी ठरली नाही.
राजपुतानातल्या शिसोदिया वंशाशी संबध दिसल्यावरच त्यांचे क्षत्रियत्व मान्य
करण्यात आले. पण इथल्या ब्राह्मणांनी नाहीच मानले तेव्हा राज्याभिषेकासाठी काशीहून
गागाभट्टाना आणावे लागले.
शेतजमिनीची
मोजणी करणारा राजा, शेतसाऱ्याची न्याय्य व्यवस्था बसवणारा राजा, दुष्काळात सारा
माफ करणारा, परंपरागत उद्योगात अडकून पडलेल्या बलुते-अलुतेदारात स्वराज्याची भावना
जागवणारा, त्यांना लढायला उभं करणारा आमचा राजा कधी ठळकपणे पुढे आलाच नाही. स्त्रियांच्या
बाबतीत न्याय्य भूमिका घेणारा, त्यांचा सन्मान राखणारा राजा आम्हाला दाखवला गेला
तो फक्त कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या संदर्भात. (तोही त्यांच्या तोंडी
घातलेल्या कपोलकल्पित अनुदार उद्गारातून – अशीच आमची आई असती तर आम्हीही सुंदर
झालो असतो वगैरे वगैरे) पण स्त्री सन्मानाची कैक उदाहरणे पुढे आलीच नाहीत.
शिवाजीराजांच्या कारभारातील
मुद्द्यावर आम्ही क्वचितच बोललो. त्यांचा आर्थिक कार्यक्रम काय होता? अन्य
राजवटीसंदर्भातली त्यांची धोरणे काय होती? त्यांनी रयतेला पाणीपुरवठा, पीक,
सरंक्षण, बाजारव्यवस्था यासाठी नेमकं काय काय केलं, आम्हाला माहीत नाही. अनेक
मावळ्यांना पारंपारिक उद्योगातून म्हणजेच जातीव्यवस्थेतून बाहेर काढून लढायला बळ
देणारा राजा, आम्हाला दिसला नाही. काही संशोधकांनी हे प्रयत्न केले पण ‘शिवाचा
अवतार म्हणजे शिवछत्रपती’ या भव्यदिव्य प्रतिमेची आम्हाला भूल पडली होती. आमचे
इतिहासाचे ज्ञान म्हणजे पुस्तकी, तेही शालेय पुस्तकापुरतेच. सनसनावळ्या तोंडपाठ
म्हणजे इतिहास पक्का. पुस्तकात इतिहासावर असलेले धडे शिकून आम्ही मार्क मिळवले पण
इतिहासाने शिकवलेले धडे?
शिवाजी म्हणजे मुसलमानांना
डिवचण्यासाठी असलेली ‘हिंदूंची’ जागीर नाही की अन्य जातींना कमी लेखण्यासाठी
‘मराठा’ जातीची, ना कोणत्या प्रांताची. आपला राजा अशी कोणाची मक्तेदारी नाही. तो
सामाजिक समतेची आस असणाऱ्या साऱ्या लोकांचा राजा आहे. म्हणजेच हा राजा गोब्राह्मणप्रतिपालक
नाही तर शूद्रांचा, नाडलेल्या रयतेचा राजा आहे, मग तो असणार त्याच्या गरीब-शोषित
रयतेबरोबरच. म्हणूनच तो भीमनगर मोहल्ल्यात ‘भूमिगत’ नाहीये तर तिथे तो सापडलाय,
त्याच्या रयतेच्या ज्ञानात, विचारात आणि कृतीत. मग भेटणार ना आपल्या राजाला?
टीप: ‘शिवाजी अंडरग्राउंड इन
भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविषयी हा लेख आहे, हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच.
पुण्यात इतक्यात आहे का प्रयोग या नाटकाचा?
ReplyDeleteसकाळला पाहायला हवं, मध्यंतरी आठवड्यातून दोन प्रयोग होत होते.
ReplyDelete