प्राथमिक शाळेत मातीकामाचा स्वतंत्र वर्ग होता. मातीकामाच्या तासाला मऊ
चिकणमातीचा एकएक गोळा मिळायचा. मस्त असायची ती माती! एकदा थोडीशी चाखून पाहिली
होती, काय छान चव होती! मग मातीकामाच्या तासाला चिमूटभर माती तोंडात जायला लागली, अर्थात
सगळ्यांची नजर चुकवून हं. शाळा भरायच्या आधी शिपाईकाका रोज मातीचा गोळा बनवायचे.
ते पाहायला, कधी कधी तुडवायला जाम मजा यायची.
एकदा सकाळी उठले तर डोळा हा सुजलेला, उघडेचना. रांजणवडी नव्हती किंवा डोळेही
आलेले नव्हते, म्हणजे असं घरातले बोलत होते. मला तर डोळे आले म्हणजे काय कळतच नव्हतं,
डोळे आहेतच की आपल्याला, मग आत्ता आलेत म्हणजे काय? पण ही बडबड तेव्हा कोणी ऐकून
घेणार नाही हे माहीत होतं आणि सगळे माझ्याकडे देत असलेलं लक्ष उगीच प्रश्न विचारून
कमी करायचं नव्हतं. मग चर्चा होऊन त्यावर तुळशीची माती लावण्यात आली. काय बरं
वाटलं, गार गार माती डोळ्यावर ठेवल्यावर! मग माती आणखीन आवडायला लागली. मला
पाटीवरची पेन्सिलही चाखायला आवडायची. तिच्या आणि मातीच्या चवीत साम्य होतं थोडं.
पण बावळट लीलूला हे पटायचंच नाही, ती आपली माती ब्याक, माती ब्याक करत बसायची.
मलाही कधी कधी माती घाण असं वाटू लागलं होतं. नेहमी छान असणाऱ्या मातीचा
पावसाळ्यात जाम चिखल व्हायचा. कपड्यावरचे डाग जाता जायचे नाहीत, कितीही घासलं तरी.
त्यातून मातीत जंतू असतात, त्यामुळे रोग होतात असं शास्त्राच्या पुस्तकात
वाचल्याने मातीपासून दूर राहावं असं वाटायला लागलं. अभ्यासाच्या पुस्तकातून माती
वेगळ्याच अर्थाने भेटायला लागली. माती केली म्हणजे वाट लावली, मातीमोल म्हणजे
शून्य किंमत, माती चारली म्हणजे एखाद्याला हरवलं, माती खाल्ली म्हणजे वाईट काम
केलं. पण मातीचं महत्वही अभ्यासातून कळत होतं. मातीचा थर नसेल तर वनस्पती वाढत
नाहीत, धान्य पिकत नाही, मातीची धूप झाल्याने पर्यावरणाची हानी होते हे समजल्यावर
पुन्हा बरं वाटलं.
माती खाणे हा आजार आहे असं कळल्यावर मात्र मी हबकले. म्हणजे आपण आजारी होतो की
काय? पण आजार म्हणजे तर ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब वगैरे. कोणाकोणाला कावीळ,
कांजिण्या असे काय काय आजार होतात. आपल्याला तर तसं काहीच होत नाहीये मग माती खाणे
हा आजार कसा काय बुवा? मग याबद्दल ज्याला, त्याला विचारायला सुरुवात केली. खनिजाची
किंवा आणखी कशाची तरी शरीरात कमी असेल तर माती खावीशी वाटते असं कळलं. जंत झाले तर
माती खावीशी वाटते की माती खाल्ल्याने जंत होतात यावर एकमत नव्हतं. त्यामुळे
डोक्यातला गोंधळ जोरातच वाढला.
माझ्या एका मैत्रिणीचा काका आदिवासींमधे काम करत होता. त्याचा जगभरच्या
आदिवासींवर खूप अभ्यास होता म्हणे. त्याला मी विचारलं, माती खाणं हा आजार आहे का
म्हणून. त्याने सांगितलं, हो आणि नाहीही. मी बुचकळ्यात, अशी दोन उतरं कशी काय, एकच
उत्तर पाहिजे – हो किंवा नाही. शाळेत असंच तर शिकवतात. मग असं कळलं की काही समाजात
हा आजार समजतात तर काही समाजात अशी चाल आहे. लहान मुलं आणि स्त्रिया, बहुतेकदा
गरोदर स्त्रिया माती खातात. प्राणीही माती खातात, त्यातून शरीराला काही आवश्यक घटक
मिळतात म्हणे. काही आदिवासी समाजात तर समारंभपूर्वक माती खातात म्हणजे खरीखुरी
माती खातात. हात्तिच्या, म्हणजे योग्य-अयोग्य असं लोक ठरवतात होय? हे शाब्बास,
माझी मातीची आवड परत उफाळून आली.
एकदा एक विज्ञानकथा वाचत होते. परग्रहावरचे जीव येऊन जमेल तितकी पृथ्वीवरची
माती घेऊन जातात, कारण काही उगवायला त्या ग्रहावर मातीच नसते. या कथेतले
पृथ्वीवासीही माती म्हणजे घाण असं समजत असतात, पण हे पाहिल्यावर त्यांना मातीचं
महत्व कळतं अशी काहीशी गोष्ट होती.
जन्मानंतर बाळाची नाळ मातीत पुरतात. काही धर्मात मेल्यावर माणसांना पुरतात हे
पुढे कळत गेलं. ‘आपली माती’ चा अर्थ कळला. लोक कामानिमित्ताने जगभर जातात पण
म्हातारपणी त्यांना आपल्या ठिकाणी परतावंसं वाटतं, आपल्या मातीची ओढ लागते हे
कळलं. पण मोठा प्रश्न पुढे आहे तो म्हणजे ‘इतक्या वर्षांनी ती माती तशीच राहते की
बदलते?’
hyavar vichar kela nahi tar vachane maatit...
ReplyDeleteहो दीपा, खरंय! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ReplyDelete