Monday, April 16, 2012

वरसई

वरसई, ता. पेण, जि. रायगड. बाळगंगेच्या तीरावरचं चिमुकलं गाव. गावातला वैजनाथ (शंकर) पंचक्रोशीत प्रसिद्ध. शिवरात्रीला मोठा उत्सव असतो. शिवरात्र आणि त्रिपुरी उत्साहाने साजरी होते. कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच इथे मुख्यत्वे भातशेती आहे. भात निघाल्यावर वाल घेतात. या पट्ट्यातले कडवे वाल प्रसिद्ध आहेत. 

वरसई हे माझ्या आईच्या आत्याचं गाव. लहानपणी फार नाही पण किमान दोनतीन सुट्ट्यात तरी वरसईला गेल्याचं आठवतंय. तेव्हा वरसई फाट्यापर्यंतच एसटी होती. तिथून बैलगाडीत बसून पुढे. बरीच भावंडे एकत्र असल्याने खेळायला खूप मिळायचं. नदीवर जाणे, विहिरीचे पाणी काढणे, म्हशीचे नुकतेच काढलेले दूध पिणे ही शहरी आयुष्यात नसलेली आकर्षणंही होतीच. अर्थात लहान असल्याने, फार काम करावं लागत नसल्याने ते सुखाचं वाटत असणार. नाहीतर इतके पाहुणे आल्यावर घरच्या बाईचं जे होतं ते होतं. पुन्हा इतक्या छोटया गावात, सगळ्यांचे स्वयंपाक-पाणी करायचे म्हणजे..... पण त्या आजीच्या घरी नेहमी राबता असायचा. 

हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतीच शिवरात्रीला मी वरसईला जाऊन आले, अनेक वर्षांनी. देवळात गेल्यावर अनेक गोष्टी आठवू लागल्या. देवळात माडीवर सनई चौघडा चालू होता.  वैजनाथाच्या देवळात आम्ही दुपारी खेळायचो, तेव्हा एका दुपारी मी कुतूहलाने चौघड्यावर थाप मारली होती. तिथल्या काकांनी शुकशुक करून खाली जाऊन खेळायला सांगितलं होतं म्हणजे तिथून हाकललंच होतं. इतकी वर्षं झाली, हा प्रसंग मला कधी आठवला नव्हता. पण त्या जागी गेल्यावर क्षणात स्मृती सेवेला हजर झाली आणि तो प्रसंग समोर उभा राहिला. त्याचं नवल करतच दर्शन घेतलं. चांगलीच गर्दी होती. नंतरच्या गप्पात कळलं, आज उत्सवामुळे गावात गर्दी. दोन दिवसांनी गावातली नव्वद टक्के घरं कुलुपबंद. 

वरसई तसं कोणाला माहित असण्याची शक्यता नाही. या भागात १९८९ मध्ये मोठा पूर आला होता, ज्यात अनेक बळी गेले. त्या पुराचे उल्लेख स्थानिकांच्या बोलण्यात हमखास येतात. तेव्हा कदाचित वरसईचं नाव पेपरमध्ये आलं असेल. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना कदाचित 'माझा प्रवास' हे गोडसे भटजींचं पुस्तक माहित असेल. ५७च्या (म्हणजे १८५७) बंडाच्या ऐन धामधुमीत वरसई गावचे गोडसे भटजी उत्तरेत गेले होते. घरची अतिशय गरिबी होती. धर्मस्थळी जाऊन काही प्राप्ती होईल या विचाराने ते उत्तरेत निघाले. वाटेत झाशीला ते बंडात सापडले. पुढे सुखरूप परत आले. गोडसे भटजी कल्याणला भारताचार्य वैद्यांकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे पूजा सांगायला जात. भारताचार्य तेव्हा कॉलेजविद्यार्थी होते. गोडसे भटजींच्या तोंडून त्यांच्या प्रवासाच्या कथा ते नेहमी ऐकत. त्यांनी भटजींना हे सारं लिहून काढायला सांगितलं आणि संपादित करून यथावकाश ते पुस्तक स्वरुपात प्रकाशित केलं. मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन हा मान त्याला मिळाला. पण त्याबरोबरच त्या कालखंडाचा तो महत्वाचा दस्तावेज ठरला. कल्याणला माझे काका रहात असल्याने तिथे मी अनेकदा जाते, राहते. हे वैद्य कुटुंबही आमच्या माहितीचं. त्यामुळे वरसईचा धागा तसाही जोडला गेला आहे. 


(या पुस्तकावरील लेखासाठी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11939678.cms इथे जा)


आता बाळगंगेवर कामार्ली गावी मोठं धरण होतंय. नव्वद टक्के काम झालं आहे. त्यामुळे वरसई (आणि अनेक गावं) काही काळातच पाण्याखाली जातील. नुकसान भरपाईबद्दल नीट काही कळत नाहीये. काही गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. समितीला आपल्या मर्यादा माहित आहेत. धरण तर आपण रोखू शकणार नाही मग योग्य पुनवर्सन यासाठी धडपड चालू आहे. 

मन उदास व्हायला लागलंच. पण नंतर वाटलं, शब्दश: गाव आत्ता उठत असलं तरी ही प्रक्रिया केव्हाच सुरु झाल्ये. मुंबई-पुण्यात अनेक कुटुंबं फार वर्षापासून रहात आहेत, तिथलीच बनली आहेत. जगण्यासाठी, विकासाच्या संधीसाठी भारतातली अनेक गावं अशी वर्षानुवर्षं विस्थापित होतच आहेत. गावातली लोकंही हे जाणून आहेतच. प्रत्यक्षात नाही तर भविष्यात आपलं गाव मनात, स्मृतीत, श्रुतीत राहील हे लोकांनी पुरतं ओळखलं आहे. म्हणूनच गाव आहे तोवर शिवरात्रीला तरी येऊन, ते बघून जायची धडपड अनेकजण करतात, मी ही त्यातलीच एक........

4 comments:

  1. टिपण आवडलं. 'विकास' (हे प्रकरण एकदा समजून घेतलंच पाहिजे!) आणि विस्थापन हे जुने शत्रू पुन्हा एकदा समोरासमोर येत आहेत हे वाचून विषाद वाटला....

    उत्पल

    ReplyDelete
  2. khup chhan lihila aahes pan khup udas hi aahe. arthat tyala sadhya tari kahi ilaj nahi. khar na? visthapanashivay vikas karaycha nahi kinva vhayacha nahi hi mansikta joparyant badlat nahi toparyant he ase bhutkalatache aani vartmanachehi aaple hisse nasht zalele aapan baghanar aahot.

    ReplyDelete
  3. गोडसे भटजींचा '(माझा) प्रवास' वाचल्याने वरसई ओळखीच वाटत उगाचच! गाव उठण्याची प्रक्रिया आता कदाचित शेवटास येत चालले आहे म्हणून ती जास्त उदास करते - कारण आता काही आशा नाही ...पण नव्या पिढीच्या आठवणी नव्या जागांशी राहतील .. अशाच ..

    ReplyDelete
  4. हो उत्पल, विकास हे प्रकरण खरंच गांभीर्याने समजून घ्यायलाच हवं आहे, आपल्याला.

    खरंय तुझं अमिता पण विकासाचे पेचही फार गुंतागुंतीचे आहेत. यात केवळ विनाश आहे असं मला वाटत नाही. प्रत्येक बदलात, पडझडीत नव्या संधी असतातच. पण त्यासाठी काय किंमत द्यायची हा प्रश्न आहेच. बघ म्हणूनच म्हणते हा पेच अवघड आहे.

    हो ना आतिवास, हे चक्र तर अव्याहत चालत राहणार.

    ReplyDelete