Monday, September 12, 2011

गोळी (२)इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. तशा गोळ्यांनी धडकी भरली तरी या गोळ्यांचा आपला संबंध येण्याचे कारणच काय, हा दिलासा वाटायचा. बहुतेक वेळा गोळ्या म्हणजे खायच्या किंवा औषधाच्या गोळ्या. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी ताप यावरच्या गोळ्या माहीत होत होत्या. औषधाच्या या गोळ्यांमध्ये काही गोळ्या मजेशीरच वाटायच्या. जुलाब थांबवायची जशी गोळी असते तशी जुलाब होण्यासाठी पण असते हे कळल्यावर हसून पोट दुखायला लागलं. अनेक दुकानांवर म्हणजे औषधाच्या, Pergolax ची जाहिरात रंगवलेली असायची. त्यावर अनेक विनोदही प्रसिद्ध होते म्हणजे आमच्याआमच्यात.
झोपेच्या गोळ्या, हिंदी सिनेमामुळे आणि रहस्यकथांमुळे कळल्या. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं, काय मस्त झोप लागत असेल ना या गोळीनी. कुठल्यातरी सिनेमात त्याला गोळ्या खायला देऊन त्याचा काटा काढून टाका असे काहीतरी डायलॉग होते. म्हणजे ही गोळी पायात काटा गेला तरी उपयोगी असते असं वाटलं. असं मी बोलून दाखवल्यावर जो काय हसण्याचा स्फोट झालाय की बास. मग कळलं की जास्त गोळ्या घेतल्या तर जीवही जाऊ शकतो. बाप रे! म्हणजे फक्त बंदुकीची गोळीच डेंजरस नसते तर अशी गोळी पण असते. आणि एखाद्याचा काटा काढणे म्हणजे त्याला मारून टाकणे? मला आपलं वाटत होतं, पायात गेलेला काटा.
फुटाच्या गोळीबद्दल प्रथम ऐकलं ते एका सिनेमाच्या गाण्यात, ‘कजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी’ असे काहीतरी शब्द होते. मग फुटाची गोळी म्हणजे एखाद्याला फुटवणे अशी ज्ञानात भर पडली. म्हणजे बायको कजाग असेल तर नवरा तिला ‘फुट’ म्हणतो? आणि नवरा कजाग असला तर? पण पुरुष कुठे कजाग असतात? म्हणजे तसं कोणी म्हणत नाही. मग ते नक्की कसे असतात?  
यथावकाश महिन्याचे ‘चार दिवस कटकटीचे’ चालू झाले. हळूहळू ‘त्या’ बाबतीतलं विशेष ज्ञानही प्राप्त व्हायला लागलं. इतर वेळेला या दिवसात बाजूला बसणे हा प्रकार नव्हता पण गणपती किंवा काही पूजा असली तर मात्र..... शी! मग सगळ्या जगाला कळणार आणि वर मोठी माणसं काहीतरी म्हणणार; तांब्या उपडा घातलाय नाहीतर कावळा शिवलाय. बारक्या पोरंपोरींना तर काहीच कळायचं नाही, मग ती बावळटसारखी काहीतरी विचारत बसायची, सगळ्यांना कावळा शिवतो का? मला शिवेल का? मग शिवला तर काय होतं? एक ना अनेक. 
आजूबाजूला कुठेच अशा पूजा वगैरे प्रसंगी घरच्या बाईची अडचण आली असं दिसत नव्हतं. मग एक दिवस आईचा पिच्छाच पुरवल्यावर कळलं, हे पुढे ढकलायच्याही गोळ्या असतात. ऐकावं ते नवलच. पुढे कधीतरी कळलं, मूल होऊ नये म्हणूनही गोळ्या असतात. वर्गात काही मुलींची खुसफुस चालायचीच. त्यांच्यामुळेच खरं तर मला टी.व्ही. वरच्या ‘त्या’ जाहिराती, म्हणजे माला डी आणि निरोधच्या, कळायला लागल्या.
एकदा शेजारच्या आजी औषध घेत होत्या. मी कुतूहलाने त्यांना गोळ्यांबद्दल विचारत होते. त्या बोलता बोलता म्हणाल्या, अगं आता याच खऱ्या माझ्या मैत्रिणी. आता मरेपर्यंत, खरंतर मरण लांबावं म्हणून तर ह्यांची साथ.................!!   

3 comments:

  1. Mast.... shevat disturbing vatato....

    ReplyDelete
  2. Thank you aDesigner

    @ Gauri, yes agree! but fact of life.

    Thanks my friends who gave comments through facebook!

    ReplyDelete