Friday, December 10, 2010

रावेरी, गहू आणि सीता

कामानिमित्ताने मी फिरत असते. विदर्भात तर अनेक वेळा जाणे होते. नुकतीच यवतमाळमध्ये राळेगाव तालुक्यात मी गेले होते. राळेगावमध्ये रावेरी गावात काम होतं. काम पार पडल्यावर मला निघायला थोडा वेळ होता त्यामुळे जरा गावात फेरफटका मारायला सहकाऱ्यांसोबत निघाले. गावात सीतेचं मंदिर आहे ते पहायचं ठरवलं. मंदिराचा विषय निघाल्यावर सगळेच काही माहिती सांगायला लागले. हे सीतेचं भारतातील एकमेव मंदिर, इथे वाल्मिकींचा आश्रम होता, लवकुशासोबत सीता इथे राहिली असा त्या बोलण्याचा गोषवारा होता. माझी उत्सुकता चाळवली गेली. आधी अनेकदा इथे येऊन याचा उल्लेख कसा आला नाही याचं आश्चर्य वाटत होतं.

मंदिर दिसायला लागल्यावर लक्षात आलं, जुनं हेमाडपंथी मंदिर, आधी ढासळलेल्या स्थितीत होतं, आता जीर्णोद्धार सुरू आहे. बोलताना कळलं की शेतकरी संघटनेने भूमिकन्या सीतेच्या या स्थानाचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. अगदी नुकताच याचा लोकार्पण सोहळा झाला, ज्यावेळी हजारोंच्या संख्येने महिला जमल्या होत्या. त्यामुळेच स्थानिक पातळीवर सध्या हे मंदिर चर्चेत आहे. पुण्यामुंबईकडे अर्थातच ही बातमी नव्हती.

मंदिराची देखभाल करणाऱ्या तरुणाने मंदिर उघडून दाखवलं. गाभाऱ्यात शिवलिंग, वर समोर काळ्या पाषाणातली सीतेची म्हणून दाखवण्यात येणारी छोटेखानी मूर्ती. गाभाऱ्यात तसा अंधारच होता आणि ग्रामीण भागातील नियमाप्रमाणे वीज नव्हती तरी flash वापरून mobile camera ने फोटो काढला. बाहेर आले पण यामागील कथेचा नीट उलगडा होत नव्हता. तिथे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केलेला banner होता. त्यावरून कळलेली कथा अशी; गरोदर सीतेला रामाने वनात सोडून दिलं. ती वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागली. लवकुशाचा जन्म झाल्यावर (म्हणजे हे लवकुशाचे जन्मस्थान?) सीतेने स्थानिक लोकांकडे गहू मागितले. पण तिला कोणी ते दिले नाहीत. मग रागावून सीतेने ‘इथे कधीही गहू पिकणार नाही’ असा शाप दिला. (शाप? आणि सीतेने? Banner वर लिहिल्याप्रमाणे आधुनिक काळात हायब्रीड गहू येईपर्यंत इथे गहू पिकत नव्हता.) पुढे रामाने अश्वमेघ योजला. त्या यज्ञाचा घोडा लवकुशानी इथेच अडवला. त्यासाठी हनुमानालाही त्यांनी बांधून ठेवलं. जवळच हनुमानाचं मंदिर आहे. मूर्ती हातपाय बांधलेल्या अवस्थेत आडव्या स्थितीत आहे. अशी सारी रोचक कथा माहित झाली.

रामसीता वनवासात असतानाची अनेक स्थानं भारतभरात दाखवली जातात. पण उत्तर रामायणाशी निगडित स्थानाबद्दल मी प्रथमच ऐकत होते. अर्थात हा माझ्या अल्प ज्ञानाचाही परिणाम असेल. पण या साऱ्या कथेने काही प्रश्न मनात उभे राहिले. सीतेचं मंदिर म्हणताना गाभाऱ्यात शिवलिंग आहे ते कसं काय? क्षमाशील सीतेच्या शापाची कथा तर फारच विस्मयजनक वाटली कारण संपूर्ण रामायणात तिने फक्त सोसलेलंच दिसतं. ज्यांनी सीतेवर अन्याय केले त्यांना तिनी शापले नाही मग गहू दिले नाहीत या कारणावरून शाप? हे पटत नाही. की तिच्याही क्षमाशीलतेचा अंत झाला होता? रामाने सीतेचा त्याग केला याचा आपल्यालाही राग येतो आणि तिने मुकाटपणे सोसले याचाही. लोकपरंपरेतही हा सल आहे म्हणून तर सहज ओव्या बनतात;

राम गं म्हणू राम, नाही सीतेच्या तोलायाचा, हिरकणी सीतामाई, राम हालक्या दिलायाचा

आख्ख्या भारतात सीतेचं हे एकमेव मंदिर हेही खरं नाही. हरयाणातलं सीतामाई मंदिर, बंगळुरूजवळचं सीतेचं मंदिर, बिहारमधलं सीतामढी तशी आणखीही काही असतीलच. नवल म्हणजे रावेरीला सीता मंदिरात यात्राही भरते, कधी? तर रामनवमीला. मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

शेजारच्या मंदिरात कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या त्या महाबली हनुमानाची बंदिस्त मूर्ती (मुळात लवकुशानी बांधलेली आणि सध्या कडी कुलुपात असलेली) पाहून गंमत वाटली आणि वाईटही. शक्तीमान मारुतीनी बापलेकाची भेट व्हावी म्हणून लवकुशाकडून हे बंधन घालून घेतलं असणार असं वाटलं. सीतेचं आणि मारुतीचंही हार्दिक नातं आहेच. लोकपरंपरेत मारुती स्त्रियांना रक्षणकर्ता वाटत आला आहे. “राजा मारबती उभा पहाऱ्याला, जीव माझा थाऱ्याला” यासारख्या ओव्यांवरून हे स्पष्ट दिसतं. प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर असतंच.

तर मनात असे असंख्य विचार उमटवून गेलेली ही रावेरीची भेट, अजून खूप काही वाचायला, समजून घ्यायला हवं याची जाणीव करून देणारी.......

5 comments:

  1. प्रत्येक गोष्टीतील सगळा दोष बाईवर ढकलायचा हे चिरंतर चालूच आहे गं....वाचून खरंच मनात खूप उद्वेग निर्माण झाला.कितीही प्रयत्न केले तरी ही मानसिकता बदलेल अस वाटत नाही.

    ReplyDelete
  2. सितेची कहाणी खुपच विचारत पडणारी आहे. मुख्यत्वे करून सितेने दिलेला शाप !!!

    ReplyDelete
  3. रावेरीतील सीतेचे मंदिर आणि तिथे भरणारि जत्रा याबद्दल समजले पण रामायणातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित नाही. अनेक प्रसंग आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित नाही. असे काही वाचले कि त्या गोष्टी जाणून घ्यायची इच्छा होते.

    ReplyDelete
  4. रावेरीतील सीतेचे मंदिर आणि त्याची कथा आवडली; पण रामायणातील अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग आहेत जे आपल्याला माहित नाही. रामायणातील गोष्टीबद्दल काही वाचले अथवा ऐकले तर त्यातील अनेक गूढ गोष्टीबदल जाणून घ्यायची इच्छा होते.

    ReplyDelete
  5. मनीषा प्रयत्न तर चालू ठेवायला हवेच.

    दीपा, खरंच ही कथा विचारात पाडणारी आहे.

    दिशा, दोन comments? अशा अनेक गोष्टी कळण्यासाठी वाचनाची खूप मदत होते.

    ReplyDelete