Wednesday, November 17, 2010

जेवण (Lunch)पुन्हा एक धावपळीचा दिवस. एक काम संपत नाही तोवर दुसरं हजर, करता करता दिवस कसा गेला ते कळलंच नाही. आता ऑफिसमधून निघायला हवं. पार्किंगमध्ये जाताना भारद्वाज, किंगफिशर यांनी दर्शन दिलं. सुदैवाने मी ज्या ठिकाणी मी काम करते ते कॅम्पस हिरवंगार आहे आणि अनेक पक्ष्यांचं निवासस्थानही. पक्ष्यांच्या बाबतीत माझं ज्ञान तसं थोडकंच आहे पण काही सहकाऱ्यांमुळे यात थोडी भर पडलेय म्हणजे माझ्या ज्ञानात. कावळे, चिमण्या, साळुंक्या, कबुतरं या सामान्यपणे दिसणाऱ्या पक्षांबरोबरच इतर अनेक पक्षी इथे दिसतात जसे बुलबुल, सातभाई, पोपट, कोकीळ, घार, दयाळ, शिंजीर आणि कितीतरी. भारद्वाज आणि किंगफिशरचा उल्लेख आधी आलेलाच आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद ठरवलं तर इथे घेता येऊ शकतो. काही वेळा अनाहूत पाहुणेही येतात, भटकी कुत्री, डुकरं वगैरे, कधीतरी माकडंही येतात.

पण काही जीव मात्र सगळ्यांना घाबरवून सोडतात. लक्षात आलंच असेल की मी सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल बोलतेय. आजच त्यामुळे धमाल उडाली होती. तसे कधी कधी साप दिसतातच. पण ते जरा माणसांच्या वावरापासून जरा दूर, झाडापाचोळ्यात असतात. आजचा म्हटलं तर वाटेत होता. (तो आमच्या की आम्ही त्याच्या?) जेवणाच्या सुट्टीत कॅंटीनला जाताना वाटेच्या जरा बाजूलाच तो लांबलचक साप दिसला. सुरुवातीच्या काही जणांनी समंजसपणे शांत राहून, सुरक्षित अंतरावरून त्याचं निरीक्षण केलं. त्याला ज्या दिशेनी जायचं होतं ती बाजू मात्र आता गजबजायला लागली होती. त्यामुळे लोकांनी एकमेकांना सावध करायला सुरूवात केली. कुजबुज, भीतीदायक चीत्कार यांचे आवाज माणसांच्या संख्येनुसार वाढायला लागले. तसे सापलाही चाहूल लागली असावी. तो (ती?) जागीच थांबला आणि पाचोळ्यात निघून गेला. जाणकारांच्या मते ती धामण होती म्हणजे बिनविषारी. सुटकेचे नि:श्वास सुटले. तरीही सावधपणेच माणसं जेवायला गेली. सापांवर चर्चा सुरूच होती. ज्यांना आजचा साप पाहता आला नव्हता त्यांच्यापेक्षा तो बघणाऱ्यांना अर्थातच महत्व आले. ज्यांनी प्रथम पहिला ते तर VIP झाले होते.

ताज्या प्रसंगाच्या वर्णनातला रोचकपणा कमी झाल्यावर संभाषणाची गाडी अर्थातच वळली ती आधी पाहिलेल्या सापांकडे. आधी अनुभवलेले असे अनेक प्रसंग वर्णिले जाऊ लागले. इतरांच्या excitement ला हसताना मीही त्या संभाषणाचा भाग कधी झाले ते मला कळलंच नाही. मीही याआधी या कॅम्पसवर साप पहिले होतेच की! पहिल्यांदा reception च्या पायऱ्यांवर पहिला तो तर नाग होता. काही उत्साही सहकाऱ्यांनी त्याचे फोटो काढून LAN वर टाकले होते. त्यानंतर एकदा असाच रस्त्याकडेच्या झाडांलगत, मान उंचावत जाणारा साप पहिला होता. एकदा संध्याकाळी उशीराने गाडी घेऊन बाहेर पडताना रस्त्यातच आडवा होता. त्याने रस्ता पार केल्यावरच पुढे जाता आलं. तर सगळ्यांना असे पाहिलेले, ऐकलेले साप आठवत होते. ज्ञात असणारे सर्व साप नजरेसमोर दिसायला लागले. बघता बघता अनेक सापांचा खच पडला; विषारी-बिनविषारी-फुरशी-मण्यार-धामण-नाग-अजगर आणि कितीतरी. पहावं तिकडे साप!

तेवढयात दाराजवळच्या टेबलावर बसलेल्यांच्या अंगात अभूतपूर्व चपळाई आली. तिथे बसलेले दारापासून शक्य तेवढं दूर आतल्या बाजूला पळाले. त्यांच्या जवळच्या टेबलांवरही अस्वस्थ हालचाल सुरू झाली. पण मग सारं पुन्हा स्थिरस्थावर होऊ लागलं. कॅन्टीनच्या दारापुढील corridor मधून पठ्ठया सळसळत गेला म्हणे. आतल्या बाजूचं टेबल पकडणाऱ्यांनी मनातल्या मनात स्वत:ला शाबासकी दिली ज्यात मीही होते. मग मात्र हळूहळू सर्व शांत होत गेलं. जेवण करून सारे पांगले. पण जेवताना सापांचं तोंडीलावणं इतकं रंगतदार असतं हे मात्र प्रथमच कळलं. किती रंगलंय जेवण म्हणून सांगू? या सगळ्यात त्या सापाचं जेवण झालं की नाही कोण जाणे? सळसळत होता म्हणजे काही खाल्लं नसावं. तोही बेटा lunch साठीच चालला होता की काय?

ता. क. तुमच्या तोंडाला जेवताना पाणी सुटू नये म्हणून सापाचा फोटो दिलेला नाही. पण थांबा निराश होऊ नका, रात्रीच्या जेवणाचा विशेष बेत आहे पुढच्या आठवडयात!!

7 comments:

 1. dangi thalee baryach divasanee baghayala miLalee. I miss it here.

  ReplyDelete
 2. post चांगली आहे. सुंदर वर्णन,त्यामुळे सगळं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. आजीलाही आवडलं

  ReplyDelete
 3. ratrichyaa jevnachi (dinner chi)vaat baghtiye. bhatti changli jamun aali aahe.

  ReplyDelete
 4. पोस्ट वाचत असताना ऑफिसचा परिसर, तिथली हिरवाई, तिथलं प्राणी-पक्षी जगत, तिथले मानवी चेहरे आणि तो (मी न पाहिलेला) प्रसंग यांचे जिवंत चित्रण डोळ्यासमोर उभे राहिले. (आणि काही न लिहिलेल्या गोष्टीही..उदा. परिचित आवाजातले, त्या आवाजाच्या मालक, मालकिणीच्या स्वभावानुरूप काढलेले उद्गार). जेवणाचा फोटो फारच झकास. काय नाहरी सेंटरमधला की काय?

  ReplyDelete
 5. Thank you Sachin and Watsaru, yes the snap is from Nahari at Lachhkadi, Vansada, South Gujrath

  Thank you Sai and Manisha for your complements

  ReplyDelete
 6. good but photo of lunch plate is to good nachanichi bhakari ahe kay?

  milind

  ReplyDelete
 7. Super zala na tumcha lunch ....... bichyarya sapanchi kadhitari athavan tar zali saglyana
  ...good...mast aahe...pan mi tumach office pahil nahi te pahilyavar kalel ....hirwai...
  Thanks
  Maruti chavan

  ReplyDelete