
कामाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राबाहेरच्याही ग्रामीण-आदिवासी भागात जात असते. अशा प्रकारच्या कामाला माझी सुरूवात झाली ती गेल्या १३-१४ वर्षांपासून. शहरातच जन्मल्याने आणि वाढल्याने ग्रामीण भागाशी फारशी ओळख नव्हती. कधी कॉलेजच्या अभ्यास सहलीला, सुट्टीला अधूनमधून कोकणात, पण चार आठ दिवसांच्यावर राहायचा प्रसंग फारसा आलं नव्हता. नाही म्हणायला लातूरच्या भूकंपात मदतकार्यासाठी १० दिवस गेले होते पण तो आपत्तीचा अनुभव होता नि माणुसकी असल्याचा आणि नसल्याचाही. पण त्यावर पुन्हा कधीतरी. तर आत्ता लिहिते आहे ते ग्रामीण-आदिवासी भागातल्या माझ्या सुरुवातीविषयी.
पुणे जिल्ह्याचाच आदिवासी भाग. काही एक काम सुरू करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच काही गावं पाहायला गेले होते. बरोबर दोन तीन सहकारी होते. त्यातला एका ताईंचा या भागाशी चांगला परिचय होता. तशी नवखी मीच होते. एका गावाहून दुसरीकडे पोचायला public transport मुळे उशीर झाला आणि मग एका गावातच मुक्काम करायचे ठरले. त्यातल्या त्यात परिचिताचे घर शोधले. वेळ संध्याकाळची होती. म्हणजे रात्रीचे जेवण त्या कुटुंबात होणार हे त्यांनीही सहज (!) गृहीत धरले. आम्ही घरात गेल्यापासून मी बघत होते, घरातला छोटा मुलगा एका खेकड्याच्या पायाला दोरा बांधून खेळत होता. त्याला इजा होईल अशी मला भीती वाटली पण खेकड्याची नांगी मोडल्याचे कळले. घरातल्यांनी नंतर जेवणाविषयी विचारले. जे कराल ते चालेल असे सांगितले कारण आपल्यासाठी त्यांना वेगळे काही करायला लागू नये हा विचार होता. आमच्या ताईंनी दूधभात चालेल असे सांगितले कारण घरात दुभती दोन जनावरे होती आणि भात तर काय आदिवासींचे मुख्य अन्न. तेव्हा ही दृष्टी अर्थातच मला नव्हती. (आता त्या मानाने बरं कळतं पण तरीही कधीकधी विकेट उडतेच.)
थोडया वेळाने ताटे आली. बघते तर काय? 'तो' खेकडा, ज्याच्याशी काही वेळापूर्वी तो मुलगा खेळत होता, 'तो' जणू माझ्या पोटात जायची वाट पाहत असल्यासारखा माझ्यासमोरच्या ताटात पडलेला, अर्थात मरून! 'त्या' ला बांधलेल्या दोऱ्याचे टोकही तसेच होते; त्यावरून तर 'तो' च हा खेकडा हे मला ओळखता आले. माझ्या पंजाच्या आकाराचा अख्खा खेकडा, त्यासोबत थोडा रस्सा. हा कसा खायचा आता, आपल्याला तर खेकडा कसा खातात माहीत नाही, काय करावे? (आताही मी मासेखाऊ झाले असले तरी अजून खेकडा नाही खाऊ शकत) माझा चेहरा पडल्याचे माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. माझी पंचाईत नक्की उघड उघड दिसत असणार. त्यांनी मला काही विचारायला सुरूवात केली. मी कसंबसं सांगितलं की मला खेकडा नको पण थोडा भात आणि रस्सा चालेल. रस्साभाताचा एक घास घेतला मात्र, तिखटजाळ रश्शाने जीभ जणू जळायला लागली. आणखी प्रदर्शन नको म्हणून तिखटाने आलेला ठसका पाण्याने कसाबसा थांबवला. चपळाईने दूधभातासाठी आणलेल्या दुधातलं थोडं दूध भातावर घेतलं. दूधभातावर साखर घेऊन खाण्याच्या पद्धतीचं त्या क्षणी मनोमन कौतुक करत त्यात साखरही घातली आणि जेवण साजरं केलं.
हा प्रसंग घडला जूनच्या सुरुवातीला. एक पाऊस पडून गेला होता. अशा वेळी जमिनीतल्या बिळातून खेकडे (किरवं) वर येतात. ते पकडून खातात. त्यामुळे त्या दिवशी जेवणात 'तो' होता. तिथे भाजीपाला उपलब्ध नसतोच त्यामुळे कोरडयास असं काही करतात. त्यातून आधीचं धान्य संपत आलेलं असतं, पुढचं घरात येण्यासाठी अख्खा खरीप हंगाम सरायचा असतो. जेवण तिखट. त्यामुळे पाणी प्यायला लागून पोट लवकर भरतं. अन्नाच्या तुटवडयाच्या काळात याचा उपयोग (?) होतो असं आदिवासी बायांनीच एका चर्चेत सांगितलं होतं.
एरवी भातात साखर या प्रकाराला मी नाक मुरडलं असतं पण त्या दिवशी दूध आणि साखर होती म्हणूनच माझ्या पोटात दोन घास गेले आणि पचले. ते पचले नसते तर काय झालं असतं? नको नको, तो विचारही नको वाटतोय पण त्याविषयीही कधीतरी लिहायला हवं.
तर सुरुवातीच्या काळात माझी फजिती करणारे असे प्रसंग अनेकदा आले त्यावर मी लिहिनच. अशा प्रसंगातून जे उलगडायचं ते कधी निखळ आनंद देणारं (म्हणजे इतरांना. कारण फजिती माझी झालेली असायची), बऱ्याचदा आपल्या स्वत:च्या मर्यादा दाखवणारं तर कधी फार भेदक, डोळे झडझडून उघडायला लावणारं असे.