Sunday, June 17, 2012

माती


प्राथमिक शाळेत मातीकामाचा स्वतंत्र वर्ग होता. मातीकामाच्या तासाला मऊ चिकणमातीचा एकएक गोळा मिळायचा. मस्त असायची ती माती! एकदा थोडीशी चाखून पाहिली होती, काय छान चव होती! मग मातीकामाच्या तासाला चिमूटभर माती तोंडात जायला लागली, अर्थात सगळ्यांची नजर चुकवून हं. शाळा भरायच्या आधी शिपाईकाका रोज मातीचा गोळा बनवायचे. ते पाहायला, कधी कधी तुडवायला जाम मजा यायची.
एकदा सकाळी उठले तर डोळा हा सुजलेला, उघडेचना. रांजणवडी नव्हती किंवा डोळेही आलेले नव्हते, म्हणजे असं घरातले बोलत होते. मला तर डोळे आले म्हणजे काय कळतच नव्हतं, डोळे आहेतच की आपल्याला, मग आत्ता आलेत म्हणजे काय? पण ही बडबड तेव्हा कोणी ऐकून घेणार नाही हे माहीत होतं आणि सगळे माझ्याकडे देत असलेलं लक्ष उगीच प्रश्न विचारून कमी करायचं नव्हतं. मग चर्चा होऊन त्यावर तुळशीची माती लावण्यात आली. काय बरं वाटलं, गार गार माती डोळ्यावर ठेवल्यावर! मग माती आणखीन आवडायला लागली. मला पाटीवरची पेन्सिलही चाखायला आवडायची. तिच्या आणि मातीच्या चवीत साम्य होतं थोडं. पण बावळट लीलूला हे पटायचंच नाही, ती आपली माती ब्याक, माती ब्याक करत बसायची. मलाही कधी कधी माती घाण असं वाटू लागलं होतं. नेहमी छान असणाऱ्या मातीचा पावसाळ्यात जाम चिखल व्हायचा. कपड्यावरचे डाग जाता जायचे नाहीत, कितीही घासलं तरी. त्यातून मातीत जंतू असतात, त्यामुळे रोग होतात असं शास्त्राच्या पुस्तकात वाचल्याने मातीपासून दूर राहावं असं वाटायला लागलं. अभ्यासाच्या पुस्तकातून माती वेगळ्याच अर्थाने भेटायला लागली. माती केली म्हणजे वाट लावली, मातीमोल म्हणजे शून्य किंमत, माती चारली म्हणजे एखाद्याला हरवलं, माती खाल्ली म्हणजे वाईट काम केलं. पण मातीचं महत्वही अभ्यासातून कळत होतं. मातीचा थर नसेल तर वनस्पती वाढत नाहीत, धान्य पिकत नाही, मातीची धूप झाल्याने पर्यावरणाची हानी होते हे समजल्यावर पुन्हा बरं वाटलं.
माती खाणे हा आजार आहे असं कळल्यावर मात्र मी हबकले. म्हणजे आपण आजारी होतो की काय? पण आजार म्हणजे तर ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब वगैरे. कोणाकोणाला कावीळ, कांजिण्या असे काय काय आजार होतात. आपल्याला तर तसं काहीच होत नाहीये मग माती खाणे हा आजार कसा काय बुवा? मग याबद्दल ज्याला, त्याला विचारायला सुरुवात केली. खनिजाची किंवा आणखी कशाची तरी शरीरात कमी असेल तर माती खावीशी वाटते असं कळलं. जंत झाले तर माती खावीशी वाटते की माती खाल्ल्याने जंत होतात यावर एकमत नव्हतं. त्यामुळे डोक्यातला गोंधळ जोरातच वाढला.
माझ्या एका मैत्रिणीचा काका आदिवासींमधे काम करत होता. त्याचा जगभरच्या आदिवासींवर खूप अभ्यास होता म्हणे. त्याला मी विचारलं, माती खाणं हा आजार आहे का म्हणून. त्याने सांगितलं, हो आणि नाहीही. मी बुचकळ्यात, अशी दोन उतरं कशी काय, एकच उत्तर पाहिजे – हो किंवा नाही. शाळेत असंच तर शिकवतात. मग असं कळलं की काही समाजात हा आजार समजतात तर काही समाजात अशी चाल आहे. लहान मुलं आणि स्त्रिया, बहुतेकदा गरोदर स्त्रिया माती खातात. प्राणीही माती खातात, त्यातून शरीराला काही आवश्यक घटक मिळतात म्हणे. काही आदिवासी समाजात तर समारंभपूर्वक माती खातात म्हणजे खरीखुरी माती खातात. हात्तिच्या, म्हणजे योग्य-अयोग्य असं लोक ठरवतात होय? हे शाब्बास, माझी मातीची आवड परत उफाळून आली.  
एकदा एक विज्ञानकथा वाचत होते. परग्रहावरचे जीव येऊन जमेल तितकी पृथ्वीवरची माती घेऊन जातात, कारण काही उगवायला त्या ग्रहावर मातीच नसते. या कथेतले पृथ्वीवासीही माती म्हणजे घाण असं समजत असतात, पण हे पाहिल्यावर त्यांना मातीचं महत्व कळतं अशी काहीशी गोष्ट होती.
जन्मानंतर बाळाची नाळ मातीत पुरतात. काही धर्मात मेल्यावर माणसांना पुरतात हे पुढे कळत गेलं. ‘आपली माती’ चा अर्थ कळला. लोक कामानिमित्ताने जगभर जातात पण म्हातारपणी त्यांना आपल्या ठिकाणी परतावंसं वाटतं, आपल्या मातीची ओढ लागते हे कळलं. पण मोठा प्रश्न पुढे आहे तो म्हणजे ‘इतक्या वर्षांनी ती माती तशीच राहते की बदलते?’

Saturday, May 19, 2012

रस्ता


लहानपणी एकट्याने हिंडायची मर्यादा म्हणजे वाड्याचे दार. पुढेच रस्ता असल्याने आम्हा बारक्या पोरांना कोणी बरोबर असल्याशिवाय बाहेर पडायला सक्त मनाई होती. त्यामुळेच की काय, वाड्यालगतच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन येणे हाही पराक्रम वाटायचा. मोकळ्या वेळात आमचा मुक्काम दारालगतच्या पायऱ्यांवर असायचा. रस्त्याचा तो पट्टा जणू पाठ झाला होता.
उन्हाळ्याच्या दिवसात रात्री मजाच, कारण सगळेच बाहेर बसत वा खेळत असल्याने रस्त्यावर मनमुराद भटकता येई. एकदा आम्ही असेच बसलेलो असताना एक साहेब विचारत आले, हा रस्ता कुठे जातो? आधी मला हसायलाच आलं. पण मग भीती वाटली खरंच रस्ता कुठे गेला तर? मी त्यांना म्हटलं, रस्ता कुठे नाही जात, इथेच असतो. हं त्यावरून माणसं मात्र इकडे तिकडे जातात. त्यांनी हसून मग मोठ्या माणसांकडे मोर्चा वळवला. मग कोणीतरी त्यांना सांगितलं, हा रस्ता मंडईकडे जातो. मला वाटलं रस्ते कसे चालतील? असं काय म्हणतात हे सगळे?
एकदा सकाळी रस्त्यावर, वाड्यापासून थोड्या लांब अंतरावर दोन तीन मोठे खड्डे दिसले. आम्ही उडालोच, कधी झाले हे खड्डे? असे कसे रस्त्यांना खड्डे होतात? मग आमची डोकी सुरु झाली. कुणी खड्डे पाडले असतील का? रस्त्याला त्रास झाला असेल. त्यावर पशा म्हणाला, चल छोड, रस्त्यांना काही दुखत नाही. रोज एवढ्या गाड्या जातात तेव्हा कधी आवाज तरी येतो का रस्त्याचा? मजबूत असतात ते?
मजबूत असतात तर मग खड्डे कसे होतात? कुणाची तरी शंका. मग आम्ही पुन्हा विचार करू लागलो. राणी म्हणाली,काल मी मंडईत गेले होते किनई, तिथे पण रस्त्याला असेच मोठे खड्डे होते. मग माझं विचारचक्र की काय ते जोरातच सुरु झालं. सगळे म्हणतात हा रस्ता इकडे जातो, तो तिकडे जातो म्हणजे रस्ता चालत असणार आणि त्यामुळेच ते मंडईतले खड्डे इकडे आले असणार. तसं मी म्हणाले, पण सगळ्यांना नाही तर राणी आणि दिप्याला फक्त. बाकी सगळे काय म्हणतील ते सांगता येत नाही. राणी आणि दिप्या विचारात पडले, असं कसं होईल? जादूच्या गोष्टीत नाही का गालीचा उडवतात? आणि त्या कोणीतरी नाही का भिंत चालवली? मग रस्ते न चालायला काय झालंय, हळूहळू त्या विचारात आम्ही घुसायला लागलो.
दुसऱ्या दिवशी बघायचे, खड्डे इथेच असतील तर मग रस्ते चालत नाहीत, पण खड्डे नसले तर चालतात, असे ठरले. मग कधी एकदा सकाळ होते यातच घरी गेलो. आईनी खीरपुरी केली होती जेवायला, मग काय! त्यात सगळं विसरायला झालं. रात्री मामाकडे जायचं ठरलं, मी तिथे राहण्याचा हट्ट करणार हे नक्की. आई तयारीतच होती. मामाकडे दोन दिवस कसे गेले कळलं नाही, रस्त्याचा पार विसर पडला. घरी येताना रस्त्याकडे नीट पाहिलं तर खड्डे गायब, रस्ता पूर्वीसारखाच गुळगुळीत. चला म्हणजे रस्ते चालतात तर, मी मनातल्या मनात टाळ्या पिटल्या. राणी नि दिप्याला बोलावलं, त्यांनी आधीच पाहिलं होतं. ही गम्मत कोणालाच सांगायची नाही असं आम्ही ठरवलं. 
दुसऱ्या दिवशी सकाळी जोरात आवाज येऊ लागला, खण....खण....खण बाहेर जाऊन पाहिलं तर दोन तीन माणसे रस्त्याला काहीतरी करत होती. दिप्या म्हणाला, रस्ता खणतायत, नक्कीच दुखत असणार, केवढा ओरडतोय बघ तो रस्ता. आम्ही त्या माणसांच्या जवळ जाऊन त्यांना काही सांगू लागलो तर त्या आवाजात काहीच कळेना. शेवटी त्यांनी आम्हाला आत जायला सांगितलं. आम्ही निमूट दुकानाच्या पायऱ्यावर जाऊन बसलो, ते काय करतायत ते बघत. मग त्यांनी रस्त्याला खड्डे पाडले, का कोण जाणे? म्हणजे रस्त्याला असे खड्डे पाडता येतात तर! आम्ही उत्सुकतेने बघू लागलो.    
तेवढ्यात एक काका येऊन त्यांना ओरडू लागले. परवाच या इथले खड्डे बुजवले, रस्ता चांगला केला नि आज परत कशाला खोदता वगैरे. आधी जिथे खड्डे होते तिथेच हात दाखवून ते ओरडत होते. म्हणजे ते खड्डे कोणीतरी बुजवले होते, रस्ता चालला नव्हताच. माझा हिरमोडच झाला.  पण मग वाटलं रस्ता चालत नाही म्हणजे हा रस्ता इथून कुठेच जाणार नाही, नेहमी राहणार आमची सोबत करायला, आम्हाला चालायला, रात्री खेळायला. डोक्यातलं चक्र थांबेपर्यंत ‘काम चालू रस्ता बंद’ झाला होता. ऐन दुपारी रस्ता एकदम मोकळा, मग काय ‘रस्ता बंद पण आमचा खेळ चालू’............!

   


         

Monday, April 16, 2012

वरसई

वरसई, ता. पेण, जि. रायगड. बाळगंगेच्या तीरावरचं चिमुकलं गाव. गावातला वैजनाथ (शंकर) पंचक्रोशीत प्रसिद्ध. शिवरात्रीला मोठा उत्सव असतो. शिवरात्र आणि त्रिपुरी उत्साहाने साजरी होते. कोकणातल्या अन्य गावांप्रमाणेच इथे मुख्यत्वे भातशेती आहे. भात निघाल्यावर वाल घेतात. या पट्ट्यातले कडवे वाल प्रसिद्ध आहेत. 

वरसई हे माझ्या आईच्या आत्याचं गाव. लहानपणी फार नाही पण किमान दोनतीन सुट्ट्यात तरी वरसईला गेल्याचं आठवतंय. तेव्हा वरसई फाट्यापर्यंतच एसटी होती. तिथून बैलगाडीत बसून पुढे. बरीच भावंडे एकत्र असल्याने खेळायला खूप मिळायचं. नदीवर जाणे, विहिरीचे पाणी काढणे, म्हशीचे नुकतेच काढलेले दूध पिणे ही शहरी आयुष्यात नसलेली आकर्षणंही होतीच. अर्थात लहान असल्याने, फार काम करावं लागत नसल्याने ते सुखाचं वाटत असणार. नाहीतर इतके पाहुणे आल्यावर घरच्या बाईचं जे होतं ते होतं. पुन्हा इतक्या छोटया गावात, सगळ्यांचे स्वयंपाक-पाणी करायचे म्हणजे..... पण त्या आजीच्या घरी नेहमी राबता असायचा. 

हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतीच शिवरात्रीला मी वरसईला जाऊन आले, अनेक वर्षांनी. देवळात गेल्यावर अनेक गोष्टी आठवू लागल्या. देवळात माडीवर सनई चौघडा चालू होता.  वैजनाथाच्या देवळात आम्ही दुपारी खेळायचो, तेव्हा एका दुपारी मी कुतूहलाने चौघड्यावर थाप मारली होती. तिथल्या काकांनी शुकशुक करून खाली जाऊन खेळायला सांगितलं होतं म्हणजे तिथून हाकललंच होतं. इतकी वर्षं झाली, हा प्रसंग मला कधी आठवला नव्हता. पण त्या जागी गेल्यावर क्षणात स्मृती सेवेला हजर झाली आणि तो प्रसंग समोर उभा राहिला. त्याचं नवल करतच दर्शन घेतलं. चांगलीच गर्दी होती. नंतरच्या गप्पात कळलं, आज उत्सवामुळे गावात गर्दी. दोन दिवसांनी गावातली नव्वद टक्के घरं कुलुपबंद. 

वरसई तसं कोणाला माहित असण्याची शक्यता नाही. या भागात १९८९ मध्ये मोठा पूर आला होता, ज्यात अनेक बळी गेले. त्या पुराचे उल्लेख स्थानिकांच्या बोलण्यात हमखास येतात. तेव्हा कदाचित वरसईचं नाव पेपरमध्ये आलं असेल. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना कदाचित 'माझा प्रवास' हे गोडसे भटजींचं पुस्तक माहित असेल. ५७च्या (म्हणजे १८५७) बंडाच्या ऐन धामधुमीत वरसई गावचे गोडसे भटजी उत्तरेत गेले होते. घरची अतिशय गरिबी होती. धर्मस्थळी जाऊन काही प्राप्ती होईल या विचाराने ते उत्तरेत निघाले. वाटेत झाशीला ते बंडात सापडले. पुढे सुखरूप परत आले. गोडसे भटजी कल्याणला भारताचार्य वैद्यांकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे पूजा सांगायला जात. भारताचार्य तेव्हा कॉलेजविद्यार्थी होते. गोडसे भटजींच्या तोंडून त्यांच्या प्रवासाच्या कथा ते नेहमी ऐकत. त्यांनी भटजींना हे सारं लिहून काढायला सांगितलं आणि संपादित करून यथावकाश ते पुस्तक स्वरुपात प्रकाशित केलं. मराठीतलं पहिलं प्रवासवर्णन हा मान त्याला मिळाला. पण त्याबरोबरच त्या कालखंडाचा तो महत्वाचा दस्तावेज ठरला. कल्याणला माझे काका रहात असल्याने तिथे मी अनेकदा जाते, राहते. हे वैद्य कुटुंबही आमच्या माहितीचं. त्यामुळे वरसईचा धागा तसाही जोडला गेला आहे. 


(या पुस्तकावरील लेखासाठी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11939678.cms इथे जा)


आता बाळगंगेवर कामार्ली गावी मोठं धरण होतंय. नव्वद टक्के काम झालं आहे. त्यामुळे वरसई (आणि अनेक गावं) काही काळातच पाण्याखाली जातील. नुकसान भरपाईबद्दल नीट काही कळत नाहीये. काही गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. समितीला आपल्या मर्यादा माहित आहेत. धरण तर आपण रोखू शकणार नाही मग योग्य पुनवर्सन यासाठी धडपड चालू आहे. 

मन उदास व्हायला लागलंच. पण नंतर वाटलं, शब्दश: गाव आत्ता उठत असलं तरी ही प्रक्रिया केव्हाच सुरु झाल्ये. मुंबई-पुण्यात अनेक कुटुंबं फार वर्षापासून रहात आहेत, तिथलीच बनली आहेत. जगण्यासाठी, विकासाच्या संधीसाठी भारतातली अनेक गावं अशी वर्षानुवर्षं विस्थापित होतच आहेत. गावातली लोकंही हे जाणून आहेतच. प्रत्यक्षात नाही तर भविष्यात आपलं गाव मनात, स्मृतीत, श्रुतीत राहील हे लोकांनी पुरतं ओळखलं आहे. म्हणूनच गाव आहे तोवर शिवरात्रीला तरी येऊन, ते बघून जायची धडपड अनेकजण करतात, मी ही त्यातलीच एक........

Saturday, December 31, 2011

प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आणि प्लॅटफॉर्म नं. झीरो


हॉगवर्टझ शाळेत जाण्यासाठी किंग्स क्रॉस स्टेशनवरची लगबगनवीन विद्यार्थ्यांची पावणेदहा नंबरचा प्लॅटफॉर्म शोधण्यासाठीची गडबडत्या प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर टाकलेले सुटकेचे नि:श्वासकोणाचे अवजड समानकुणाचं घुबडकुणाचा बेडूककोणाचा उंदीर तर कुणाचा बोका. आईबाबांच्या असंख्य सूचना अर्थातच हॅरी सोडून. हॉगवर्टझच्या जादुई दुनियेकडे जायला सुरुवात होते ती प्लॅटफॉर्म नं. पावणेदहापासून. केशरी रंगाचीझुकझुक गाडीसारखी धुराचे शुभ्र ढग सोडणारी हॉगवर्टझ एक्सप्रेस. सगळा माहोल उत्साहउत्कंठा नि थोड्या भीतीचाही. 

सर्वसामान्य घरातल्या लहान मुलांसाठी आगगाडी म्हणजे भावविश्वाचा एक विशेष हिस्सा असतो. हेच नेमकं हेरून जे. के. रोलिंगने ही सुंदर कल्पना केली असणार. आपल्याकडेही मामाच्या गावाला जाणारी झुकझुक गाडी तर गाण्याच्या रुपात अमर झाली आहेआता ती तशी नसली तरी.

सर्वसामान्यांसाठी आगगाडी हे प्रवासाचं साधन. स्टेशन आणि त्यावरचे प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्याला हवी ती गाडी पकडण्याची जागा. आगगाडीचा प्रवास एकवेळ आपण एन्जॉय करतोमात्र प्लॅटफॉर्म कधी एकदा सोडतोय असं आपल्याला होतं. गाडीत डबे झाडून पैसे मागणारी मुलं अनेकांना अस्वस्थ करतात. नाईलाज म्हणून काहीजण दुर्लक्ष करतातकाहीजण पैसे काढून देतात तर काहीजण त्यांना हाकलून देतात.

अनेक कारणांमुळे घर सोडून बाहेर पडलेली ही मुलं प्लॅटफॉर्मचा आधार शोधतात आणि स्टेशनच्या चक्रव्यूहात अडकतात. कधीच इष्टस्थळी पोचू न शकणाऱ्या या मुलांचं आयुष्य तिथेच गोलगोल फिरत रहातं. हे वास्तव चपखलपणे दर्शवणारं अमिता नायडूचं 'प्लॅटफॉर्म नं. झीरोहे पुस्तक. काही कारणामुळे निराधार झाल्याने स्टेशनचा आसरा घेणारी मुलं, पांढरपेशा समाजाकडून – पोलिसांकडून होणारा छळत्यातूनही जगण्याची धडपड पण बहुतेकदा उपेक्षेच्या अंधारात हरवून जाणारं त्यांचं आयुष्य. प्लॅटफॉर्मवरचं त्यांचं वास्तव्य आणि वास्तव सांगणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून सोडणाऱ्या काही मुलांच्या कहाण्या या पुस्तकात आहेत. त्यांच्यातली दुष्मनीनवीन मुलांना सांभाळून घ्यायची वृत्तीपाच-सात वर्षाच्या मुलांना मोठ्या मुलांनी दिलेली मायात्यांचे कष्टपौगंडावस्थेत निर्माण होणारे प्रश्नसमाजाने केलेला त्यांचा वापर.... त्यांच्या उपेक्षित जिण्याच्या या साऱ्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकतं. प्लॅटफॉर्मवरच्या मुलांचं काही बरं करायची कळकळ आणि त्यातून काही काळ केलेल्या कामाच्या अनुभवातून हे पुस्तक उभं राहिलं आहेहे विशेष. ते मुळातून वाचायला हवं.

मन विषण्ण होतं ते या मुलांची यातून सुटकाच नाही की कायह्या निराश भीतीने. जगण्याच्या चटक्यांमधून ही मुलं करकरीत वास्तवाचात्यापासून कसं सुटता येईल याचा विचार करतात. प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाबद्दल त्यांना विचारलं तर ती काय म्हणतील? "क्या येडा बनते क्या, ऐसा नंबर कैसे होंगा?"  किंवा असंच काही.
पण प्लॅटफॉर्म नं. पावणेदहा आहे की नाहीहा प्रश्नच मुळी गौण आहे. खरा प्रश्न आहे प्लॅटफॉर्म नं. पावणेदहाच्या दुनियेत रंगू शकणारं बालपण ह्या व्यवस्थेत त्यांना मिळेल का?

Wednesday, October 26, 2011

हत्ती आणि गेंडा




कामानिमित्ताने मी नुकतीच नैरोबीला (केनिया) जाऊन आले. दोन दिवसांची कार्यशाळा आटपल्यावर हातात अर्धा दिवस मोकळा होता. एव्हाना अन्य सहभागींशी छान मैत्री झाली होती आणि अर्थातच दक्षिण आशियातून आलेल्यांशी अधिक मित्रत्वाचं नातं निर्माण झालं. मग आम्ही एकूण आठ जणांनी मिळून तो वेळ सत्कारणी लावायचं ठरवलं. चौकशी करून मसाई मार्केट, elephant center आणि Jiraff center असा कार्यक्रम ठरला.

David Scheldrick elephant center ला पोचायला ४५ मिनिटे लागली. त्याची वेळ ११ ते १२ अशी असते. ११ च्या थोडं आधी पोचलो नि भराभर रांग गाठली. प्रवेश मिळाला आणि आतमध्ये गेलो. चारी बाजूंनी तार लावलेला मोठा चौकोन. जाऊन जरा थांबतोय तो लांबून हत्तीची सहा-सात पिले (अक्षरश:) दुडूदुडू धावत येताना दिसली आणि सगळ्यांच्या तोंडून आनंद-आश्चर्य-कौतुकमिश्रित सीत्कार बाहेर पडले. हत्तीची पिल्ले धावत आली आणि त्यांच्यासाठी बाटल्यातून ठेवलेलं दूध त्यांनी गटागटा पिऊन टाकलं. मग ती बागडू लागली. त्यांच्या काळजीवाहकांबरोबर ती मजेत होती. सोंडेने त्यांना सारखे स्पर्श करणे, हळूच ढुशी मारणे, अंग घासणे, मागे मागे जाणे असे प्रकार चालू होते. प्रत्येकाचा काळजीवाहक म्हणजे त्याची आईच. एका पिल्लाला प्रेक्षकांच्या जवळून फिरवले. ते बेटे कुरवाळून घेत होते, लाडिकपणे सोंड गळ्यात टाकत होते. त्या १० महिन्याच्या, सर्वात छोटया पिलाच्या मी प्रेमातच पडले, त्याला कुरवाळलं, थोपटलं, त्याचं अंग खाजवलं. तेही मजेत सारं करून घेत होतं. मधेच आपली सोंड माझ्या हातात देत होतं. इतर पिल्लांचा पाणी उडवणे, वेगवेगळे आवाज काढणे असा कार्यक्रम जोरातच चालू होता, त्याला मात्र माणसाची पिल्ले घाबरून रडत होती. 



मग एक कर्मचारी  David Scheldrick Wildlife Trust ची माहिती सांगू लागला. David Scheldrick हा निसर्गवेत्ता, केनियातील प्राणी जीवनासाठी ते आयुष्यभर कार्यरत होते. (अधिक माहितीसाठी http://www.sheldrickwildlifetrust.org इथे भेट द्या.) हा ट्रस्ट हत्ती आणि गेंडा या धोक्यात आलेल्या प्राण्यांसाठी काम करतो. हस्तीदन्तासाठी हत्तींची चोरटी शिकार सुरूच आहे. यामुळे छोटी पिल्ले अनाथ होतात आणि वेळीच त्यांची काळजी घेतली गेली नाही तर मृत्युमुखी पडतात. अशा प्रसंगातून त्यांना सोडवायचं आणि वाढवायचं काम ही संस्था करते. दोन वर्षापर्यंत ही पिल्लं पूर्ण सुरक्षित वातावरणात असतात. मग त्यानंतर त्यांच्यासाठी योग्य कळपाचा शोध चालू होतो. हे अत्यंत चिकाटीचं काम. नवीन हत्तीला स्वीकारण्याची प्रक्रिया पाच वर्षापर्यंतही चालू शकते. अशी सगळी माहिती देताना त्याने भावनिक आवाहन केलं ते हस्तीदंती वस्तू न वापरण्याचं, कारण अशा वस्तूंची मागणी पूर्णत: बंद झाल्याशिवाय हत्तींची शिकार थांबणार नाही.

हत्तींची पिल्लं मजेत खेळत होती. ती फार मोठया भावनिक कदाचित शारीरिक आंदोलनातून गेली होती. आता प्रेमळ हातात ती सावरली होती. हे सगळं कुठेतरी आत खोल खोल पोचलं आणि डोळे खळखळून वाहायला लागले, आनंद, दु:ख, आदर, दिलासा, आशा या साऱ्याचं मिश्रण होतं त्या प्रतिक्रियेत. माझा हात हळुवारपणे दाबला गेला, तो समजूतदारपणा मला स्पर्शातूनही जाणवला. बाजूला पाहिलं तर एक उंच, सणसणीत काळी तरुणी उभी होती. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. सहभावाने आम्ही दोघी गलबललो, त्या पिल्लांना डोळे भरून पाहत राहिलो. नंतर ‘अग्नेस’ शी औपचारिक ओळख झाली (आणि कदाचित आम्ही इमेल वर संपर्कात राहू.) 

तिथून बाहेर आल्यावर एक गेंडा दिसला. त्याच्या शिंगासाठी झालेल्या चोरट्या शिकाऱ्याच्या हल्ल्यात त्याला आपले डोळे गमवावे लागले. त्याचा सांभाळ इथे केला जात आहे. माणसांचा लोभ, स्वार्थ पाहून दु:ख झालं, निराशा आली. पण माणसांचेच असे विलक्षण प्रयत्न पाहून मी ती निराशा निववीत राहिले. 

              

Monday, September 12, 2011

गोळी (२)



इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. तशा गोळ्यांनी धडकी भरली तरी या गोळ्यांचा आपला संबंध येण्याचे कारणच काय, हा दिलासा वाटायचा. बहुतेक वेळा गोळ्या म्हणजे खायच्या किंवा औषधाच्या गोळ्या. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी ताप यावरच्या गोळ्या माहीत होत होत्या. औषधाच्या या गोळ्यांमध्ये काही गोळ्या मजेशीरच वाटायच्या. जुलाब थांबवायची जशी गोळी असते तशी जुलाब होण्यासाठी पण असते हे कळल्यावर हसून पोट दुखायला लागलं. अनेक दुकानांवर म्हणजे औषधाच्या, Pergolax ची जाहिरात रंगवलेली असायची. त्यावर अनेक विनोदही प्रसिद्ध होते म्हणजे आमच्याआमच्यात.
झोपेच्या गोळ्या, हिंदी सिनेमामुळे आणि रहस्यकथांमुळे कळल्या. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा वाटलं, काय मस्त झोप लागत असेल ना या गोळीनी. कुठल्यातरी सिनेमात त्याला गोळ्या खायला देऊन त्याचा काटा काढून टाका असे काहीतरी डायलॉग होते. म्हणजे ही गोळी पायात काटा गेला तरी उपयोगी असते असं वाटलं. असं मी बोलून दाखवल्यावर जो काय हसण्याचा स्फोट झालाय की बास. मग कळलं की जास्त गोळ्या घेतल्या तर जीवही जाऊ शकतो. बाप रे! म्हणजे फक्त बंदुकीची गोळीच डेंजरस नसते तर अशी गोळी पण असते. आणि एखाद्याचा काटा काढणे म्हणजे त्याला मारून टाकणे? मला आपलं वाटत होतं, पायात गेलेला काटा.
फुटाच्या गोळीबद्दल प्रथम ऐकलं ते एका सिनेमाच्या गाण्यात, ‘कजाग बायको झालीस तर मी देईन फुटाची गोळी’ असे काहीतरी शब्द होते. मग फुटाची गोळी म्हणजे एखाद्याला फुटवणे अशी ज्ञानात भर पडली. म्हणजे बायको कजाग असेल तर नवरा तिला ‘फुट’ म्हणतो? आणि नवरा कजाग असला तर? पण पुरुष कुठे कजाग असतात? म्हणजे तसं कोणी म्हणत नाही. मग ते नक्की कसे असतात?  
यथावकाश महिन्याचे ‘चार दिवस कटकटीचे’ चालू झाले. हळूहळू ‘त्या’ बाबतीतलं विशेष ज्ञानही प्राप्त व्हायला लागलं. इतर वेळेला या दिवसात बाजूला बसणे हा प्रकार नव्हता पण गणपती किंवा काही पूजा असली तर मात्र..... शी! मग सगळ्या जगाला कळणार आणि वर मोठी माणसं काहीतरी म्हणणार; तांब्या उपडा घातलाय नाहीतर कावळा शिवलाय. बारक्या पोरंपोरींना तर काहीच कळायचं नाही, मग ती बावळटसारखी काहीतरी विचारत बसायची, सगळ्यांना कावळा शिवतो का? मला शिवेल का? मग शिवला तर काय होतं? एक ना अनेक. 
आजूबाजूला कुठेच अशा पूजा वगैरे प्रसंगी घरच्या बाईची अडचण आली असं दिसत नव्हतं. मग एक दिवस आईचा पिच्छाच पुरवल्यावर कळलं, हे पुढे ढकलायच्याही गोळ्या असतात. ऐकावं ते नवलच. पुढे कधीतरी कळलं, मूल होऊ नये म्हणूनही गोळ्या असतात. वर्गात काही मुलींची खुसफुस चालायचीच. त्यांच्यामुळेच खरं तर मला टी.व्ही. वरच्या ‘त्या’ जाहिराती, म्हणजे माला डी आणि निरोधच्या, कळायला लागल्या.
एकदा शेजारच्या आजी औषध घेत होत्या. मी कुतूहलाने त्यांना गोळ्यांबद्दल विचारत होते. त्या बोलता बोलता म्हणाल्या, अगं आता याच खऱ्या माझ्या मैत्रिणी. आता मरेपर्यंत, खरंतर मरण लांबावं म्हणून तर ह्यांची साथ.................!!   

Friday, August 19, 2011

गोळी (१)

समोरच्या वाण्याच्या दुकानात मस्त गोळ्या मिळतात, दुधाच्या गोळ्या म्हणतो आम्ही त्यांना. १० पैशाला १०. चघळायला मस्त वाटतं. शाळेतही खाऊ विकायला एक बाई येतात, त्यांच्याकडे पाच पैशाला एक अशी मस्त लिमलेटची गोळी मिळते. ही गोळी म्हणजे सहल किंवा स्पोर्ट स्पेशल, शाळाच वाटणार आम्हाला. माझे मामाआजोबा घरी येतात तेव्हा नेहमी आम्हाला रावळगाव टॉफी आणतात. पाणी सुटतं नुसतं तोंडाला.
शाळेच्या स्टोअर मधल्या पेपरमिंटवर तर आमचा कायम डोळा. स्टोअरअधून काही घ्यायचं असेल तर सुटे पैसे न्यायचे नाहीत. म्हणजे ८ रु. ५० पै. झाले तर आम्ही १० रु. च देणार. बहुतेकदा तिथे सुटे पैसे नसतातच त्यामुळे मग उरलेल्या दीड रुपयाच्या बदल्यात काय घ्यायचे याचे पूर्ण स्वांतत्र्य आम्हाला. त्या स्वातंत्र्यात पेपरमिंटचा नंबर वरती. वर्गातही तासाला जिभेखाली गोळी ठेवून बसलं तरी कोणाला कळत नाही. पण गोळी तोंडात टाकेपर्यंत फार काळजी घ्यावी लागते हं. नाहीतर चोंबड्या कोंबड्या काय कमी नाहीत वर्गात. एखादीने पाहिलंच, तर तिला एकतरी गोळी द्यायलाच लागते. काय करणार, गोळी तोंडात पडल्यावरच तोंड बंद राहतं ना. खूप काळजी घेऊनही त्या स्वातंत्र्याचे तुकडे असे काही वेळा वाटावे लागतात. पण हे सगळ्याच पोरी करतात त्यामुळे कधी ना कधी फिटंमफाट होतेच. तेवढंच दु:खात सुख.   
ह्या गोळ्या खूप आवडत्या तर काही गोळ्या खूप नावडत्या, बरोब्बर औषधाच्या. एकदा मला ताप आला होता. तर डॉक्टरबाईंनी गोळ्या आणि बाटलीतलं लाल औषध दिलं. तोपर्यंत औषधाची गोळी औषधालाही खाल्ली नसल्याने, ती चवीला वेगळी असते हे मला माहीतच नव्हतं. औषध म्हणून गोळी मिळाल्याने मी खुश! त्यातून त्या गोळीचा रंग इतका भारी होता ना की कधी खातेय असं झालं होतं. जेवण झाल्यावर बाबा म्हणाले आधी गोळी घे मग लाल औषध. पण मला वाटत होतं की गोळी चघळून खायची आहे, म्हणून मी हट्टाने आधी लाल औषध घेतलं. त्याची चव तर एकदम बेस्ट होती. गोळी गिळून टाक, चावू नको असं बाबा सांगत होते तरी तरी मी चाखून पहिलीच आणि मग काय थू थू च व्हायला लागलं. इतकी छान दिसणारी गोळी, इतकी कडू? शी याक! तरी ती गिळायलाच  लागली नि वर बाबांची बोलणीही. ही गोळी आजार बरा करायला चांगली असली तरी चवीला छान नसते हे मात्र कळलं.
आणखी एका गोळीबद्दल समजलं तेव्हा मला इतका आनंद झाला होता. एकदा रविवारी आळशीपणे उशिरा उठले. उठावंसं वाटतच नव्हतं. आई म्हणालीथोडी कसकस आहे, आंघोळ नको करू आज. मला काय बरंच. थोड्या वेळाने मामा आला, आमची लोळणफुगडी चालूच होती. कसकस वगैरे ऐकल्यावर तो म्हणालामग आज आंघोळीची गोळी तर!
आंघोळीची गोळी? अशी गोळी असते? ती घेता येते? ती घेऊन आंघोळ नाही केली तर चालतं? किती मज्जा! आईला भरपूर अशा गोळ्या आणून ठेवायला सांगितल्या पाहिजेत, माझ्या डोक्यात चक्र सुरु झालं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आईला म्हणलंआज आंघोळीची गोळी. ती हसून बरं म्हणाली. मी वाट पाहत होते, ती कधी गोळी देतेय. पण ती काय देईना, तिच्या कामातच होती. माझी भुणभुण  सुरु, मला आंघोळीची गोळी दे, काल मामा म्हणत होता वगैरे. मग काय, सगळ्यांना हसायला आयतंच कारण मिळालं. मला कळेना, काय प्रकार आहे. मग बाबांनी सांगितलं की असं नुसतं म्हणतात, अंघोळ करायची नसेल तर. शी! कसली ही मोठ्या माणसांची भाषा. आम्हाला कळेल असं बोलतील तर शपथ, परत चेष्टा करायला कायम पुढे. वर अशी गोळी नसते हे ऐकून मला दु:ख्ख झालं ते वेगळंच.  
त्यानंतर काही दिवसांनंतर घडलेली घटना, छातीत धडकीच भरवणारी. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना, इंदिरा गांधींना गोळ्या मारल्या. बाप रे! ही गोळी भलतीच वेगळी होती. जीव घेणारी गोळी. खूप भीती वाटली आणि सगळ्या गोळ्या छान नसतात हे अगदी नीटच कळलं.