Wednesday, October 26, 2011

हत्ती आणि गेंडा




कामानिमित्ताने मी नुकतीच नैरोबीला (केनिया) जाऊन आले. दोन दिवसांची कार्यशाळा आटपल्यावर हातात अर्धा दिवस मोकळा होता. एव्हाना अन्य सहभागींशी छान मैत्री झाली होती आणि अर्थातच दक्षिण आशियातून आलेल्यांशी अधिक मित्रत्वाचं नातं निर्माण झालं. मग आम्ही एकूण आठ जणांनी मिळून तो वेळ सत्कारणी लावायचं ठरवलं. चौकशी करून मसाई मार्केट, elephant center आणि Jiraff center असा कार्यक्रम ठरला.

David Scheldrick elephant center ला पोचायला ४५ मिनिटे लागली. त्याची वेळ ११ ते १२ अशी असते. ११ च्या थोडं आधी पोचलो नि भराभर रांग गाठली. प्रवेश मिळाला आणि आतमध्ये गेलो. चारी बाजूंनी तार लावलेला मोठा चौकोन. जाऊन जरा थांबतोय तो लांबून हत्तीची सहा-सात पिले (अक्षरश:) दुडूदुडू धावत येताना दिसली आणि सगळ्यांच्या तोंडून आनंद-आश्चर्य-कौतुकमिश्रित सीत्कार बाहेर पडले. हत्तीची पिल्ले धावत आली आणि त्यांच्यासाठी बाटल्यातून ठेवलेलं दूध त्यांनी गटागटा पिऊन टाकलं. मग ती बागडू लागली. त्यांच्या काळजीवाहकांबरोबर ती मजेत होती. सोंडेने त्यांना सारखे स्पर्श करणे, हळूच ढुशी मारणे, अंग घासणे, मागे मागे जाणे असे प्रकार चालू होते. प्रत्येकाचा काळजीवाहक म्हणजे त्याची आईच. एका पिल्लाला प्रेक्षकांच्या जवळून फिरवले. ते बेटे कुरवाळून घेत होते, लाडिकपणे सोंड गळ्यात टाकत होते. त्या १० महिन्याच्या, सर्वात छोटया पिलाच्या मी प्रेमातच पडले, त्याला कुरवाळलं, थोपटलं, त्याचं अंग खाजवलं. तेही मजेत सारं करून घेत होतं. मधेच आपली सोंड माझ्या हातात देत होतं. इतर पिल्लांचा पाणी उडवणे, वेगवेगळे आवाज काढणे असा कार्यक्रम जोरातच चालू होता, त्याला मात्र माणसाची पिल्ले घाबरून रडत होती. 



मग एक कर्मचारी  David Scheldrick Wildlife Trust ची माहिती सांगू लागला. David Scheldrick हा निसर्गवेत्ता, केनियातील प्राणी जीवनासाठी ते आयुष्यभर कार्यरत होते. (अधिक माहितीसाठी http://www.sheldrickwildlifetrust.org इथे भेट द्या.) हा ट्रस्ट हत्ती आणि गेंडा या धोक्यात आलेल्या प्राण्यांसाठी काम करतो. हस्तीदन्तासाठी हत्तींची चोरटी शिकार सुरूच आहे. यामुळे छोटी पिल्ले अनाथ होतात आणि वेळीच त्यांची काळजी घेतली गेली नाही तर मृत्युमुखी पडतात. अशा प्रसंगातून त्यांना सोडवायचं आणि वाढवायचं काम ही संस्था करते. दोन वर्षापर्यंत ही पिल्लं पूर्ण सुरक्षित वातावरणात असतात. मग त्यानंतर त्यांच्यासाठी योग्य कळपाचा शोध चालू होतो. हे अत्यंत चिकाटीचं काम. नवीन हत्तीला स्वीकारण्याची प्रक्रिया पाच वर्षापर्यंतही चालू शकते. अशी सगळी माहिती देताना त्याने भावनिक आवाहन केलं ते हस्तीदंती वस्तू न वापरण्याचं, कारण अशा वस्तूंची मागणी पूर्णत: बंद झाल्याशिवाय हत्तींची शिकार थांबणार नाही.

हत्तींची पिल्लं मजेत खेळत होती. ती फार मोठया भावनिक कदाचित शारीरिक आंदोलनातून गेली होती. आता प्रेमळ हातात ती सावरली होती. हे सगळं कुठेतरी आत खोल खोल पोचलं आणि डोळे खळखळून वाहायला लागले, आनंद, दु:ख, आदर, दिलासा, आशा या साऱ्याचं मिश्रण होतं त्या प्रतिक्रियेत. माझा हात हळुवारपणे दाबला गेला, तो समजूतदारपणा मला स्पर्शातूनही जाणवला. बाजूला पाहिलं तर एक उंच, सणसणीत काळी तरुणी उभी होती. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. सहभावाने आम्ही दोघी गलबललो, त्या पिल्लांना डोळे भरून पाहत राहिलो. नंतर ‘अग्नेस’ शी औपचारिक ओळख झाली (आणि कदाचित आम्ही इमेल वर संपर्कात राहू.) 

तिथून बाहेर आल्यावर एक गेंडा दिसला. त्याच्या शिंगासाठी झालेल्या चोरट्या शिकाऱ्याच्या हल्ल्यात त्याला आपले डोळे गमवावे लागले. त्याचा सांभाळ इथे केला जात आहे. माणसांचा लोभ, स्वार्थ पाहून दु:ख झालं, निराशा आली. पण माणसांचेच असे विलक्षण प्रयत्न पाहून मी ती निराशा निववीत राहिले. 

              

1 comment:

  1. Very nice,
    That means every where the same picture of लोभ, स्वार्थ
    Really at least it should be reduced

    ReplyDelete