Tuesday, July 5, 2011

टेन्शन (फ्री)

सातवीची वार्षिक परीक्षा झाली. सुट्टीत छान आराम झाला आणि फिरणंही. आठवीत आता अभ्यासाचे विषय वाढले आहेत आणि इतरही काही गोष्टी. म्हणजे 'ते' काहीतरी होतं ना मुलींना या वयात. वर्गात काही मुलींची तर इतकी खुसपूस चालते ना? काही मुली म्हणजे ‘तशा’... स्वत:ला खूप मोठं झाल्यासारखं समजतात. अधून मधून पी. टी. च्या तासाला त्यातली एखादी तरी ‘ते’ कारण सांगून आराम करणारच. त्यांच्या गप्पा तर काय, काही तरी चावट बोलत असतात. एकदा सहज कानावर पडलं की आमच्या वर्गातल्या सुविला एका मुलाने friendship मागितली आहे. अशी friendship मागतात हे मला नवीनच होतं. मला वाटायचं ज्यांच्याशी आपलं पटतं, त्यांच्याबरोबर हळूहळू आपली मैत्री होत जाते, दिप्या, राणी, संगी आणि कितीतरी जणांशी माझी मैत्री आहे तशी. पण काहीजणींकडून कळलं ही friendship वेगळी. Friendship, प्रेम, लग्न असं ते असतं. त्यांना याबाबत असलेल्या माहितीबद्दल मला आदरच वाटला. कोण कुठल्या गोष्टींचा अभ्यास करेल सांगता येत नाही.  
मलाही आपल्याला ‘तसं’ होण्याची भीती वाटत होती. पण नंतर आई आणि आमच्या डॉक्टरबाईंनी समजावून सांगितलं. सगळं कळलं नाही पण भीती कमी झाली. आता प्रत्यक्ष होईल तेव्हा बघायचं. कधीकधी टेन्शन येतं, काळजी घेता येईल ना. त्यात मनात कायकाय वेगळंच येत असतं. मधूनच घाबरायला होतं. एकदा TV वर एक सिनेमा पाहत होते तर ते हिरोहिरोईन एकमेकांच्या इतके जवळ आले की माझ्याच छातीत धडधडायला  लागलं. या सगळ्या सिनेमात प्रेम हाच विषय कसा असतो? हा प्रश्न पडला तरी ते आपल्याला पाहायला आवडतं, ते का?
मला शाळा आवडते पण शाळेत यायला जायला नाही आवडत, म्हणजे तो रस्ता नाही आवडत. शाळेजवळच्या चौकात कायम मवाली पोरं उभी असतात आणि मुलींची टवाळी करत असतात. ते काय बोलतात त्या सगळ्याचा अर्थ कळत नाही पण काहीतरी घाणेरडं बोलतात. अस्सा राग येतो ना, पण भीतीही वाटते, कसली? जाऊदे किती त्रास होतो डोक्याला, हे विचार करून? तेवढ्यात शेजारची निमावहिनी आली. डोळे लाल झालेले, तिला सासुरवास आहे म्हणे. हे आणखी एक टेन्शन. बाईला असा त्रास का होतो, आणि तो सहन का करायचा? पेपरमध्ये हुंडाबळीच्या बातम्या येतात. कुठेतरी अशी काही वाईट लोकं असतात असं मला वाटायचं पण आमच्या शेजारच्या वाड्यातही असं घडलं. 
त्यानंतर लगेचच पुण्यात अशी एक घटना घडली, सुनेला मारून टाकण्याची आणि त्यावर पेपरमध्ये खूप लिहून आलं. महिला संघटना की काय असतात त्यांनी आवाज उठवला. त्या दिवशी शाळेतून येताना लक्ष्मी रोडवरून खूप मोठा मोर्चा चालला होता आणि आश्चर्य म्हणजे घोषणा, आवाज काही नव्हतं. त्यातल्या बायांनी स्वत:ची तोंडं बांधली होती. मूक मोर्चा, निषेधाचा. शांतताच होती सगळी, ती बघ्यांमध्ये पण पसरली होती. नेहमीच्या गडबड गोंगाटाच्या रस्त्यावरच्या त्या शांततेची मला भीतीच वाटली एकदम. अंगावर सरसरून काटा आला. शेजारच्या वाड्यातली घटना आठवली, निमावहिनी आठवली. बापरे म्हणजे असं कुठेही होऊ शकतं. छातीत धडधडत होतं तरी मोर्चा पाहताना बरंही वाटत होतं, का बरं वाटतंय ते नीट कळत नव्हतं.    
चौकातली ती मवाली पोरं, मोर्चा निघून गेला तरी गप्प उभी होती. तिथे जवळच बसणारी भाजीवाली एकदम उठली आणि कडाकडा त्या पोरांना बोलू लागली. ‘तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतोय का, दिवसभर उभं राहून पोरीबाळींची छेड काढता, सुधारा पोरांनो. उद्यापासून इथे आलात तर बघा, त्या मोर्चा काढणाऱ्या संस्थेतच तक्रार करते, पोलीसातच देते तुम्हाला’, अशा अर्थाचं काहीतरी ती त्यांना बोलत होती. आजूबाजूची माणसंही तिला दुजोरा देत होती. त्या पोरांनी तिथून काढता पाय घेतला.
त्यानंतर शाळेत जाता येता ती पोरं फारशी दिसायची नाहीत, असली तरी पानटपरीजवळ गप्प उभी राहायची. हळूहळू आम्हालाही तो त्रास थांबल्याची खात्री झाली. त्या दिवशी मोर्चा पाहताना नेमकं काय बरं वाटलं ते मला आता समजलं होतं, मोर्चा पाहून भाजीवालीला धाडस आलं आणि त्यामुळे मुलींची होणारी टवाळी थांबली. आम्ही मजेत शाळेत जातयेत होतो, त्या रस्त्यावरून जायचं टेन्शन आता उरलं नव्हतं.    

Sunday, June 19, 2011

संध्याकाळ


"दहा वीस तीस चाळीस . .. .. . . शंभर"
डबडा ऐसपैसमधे सुकडीवर राज्य होतं. सगळी मोठी मुलं नि आमच्यासारखी बारकीपण, एकत्र खेळत होती. मी, दिप्या, राणी आणि संगी आम्ही चौघंच बारकी. बाकी वाड्यातली सगळी मोठी पोरंपोरी. दादाला माझी काळजी. मला नेहमी सांगतो, एक कोणीतरी आऊट झाल्याशिवाय तू आउट होऊ नको. माझ्यावर  राज्य आलं तर मला पार पिदवतील ही त्याला काळजी. शाळांना सुट्टी असल्याने दुपारचा चहा झाल्यावर खेळ सुरू झाला होता.   
सुकडी जरा बावळटच आहे, आता किती वेळा डबडा उडतो नि किती वेळा तिला  राज्य घ्यायला लागतं” अशी चर्चा मोठया मुलीत चालली होती. मी तरी काय त्यांच्या तिथेच लपले होते म्हणून ऐकलं. सुकडी म्हणजे शकुंतला, संगी म्हणजे संगीता. चांगल्या नावांची वाट लावण्यात आम्ही एकदम बहाद्दर. दिप्याचा दादा खालून भसाया आवाजात माडीवरच्या सुरेशला ‘सुया अशी जोरदार हाक मारतो. दिप्याचे आजोबा म्हणतात, असली हाक म्हणजे पोटात सुरा खुपसल्यासारखंच वाटतं. तर असली ती नावं.
तेवढयात सुकडीचा आवाज आला,  म्या इस्टोप.  म्या बाहेर येईना. सुकडी शिरा ताणून ओरडत होती. मी लपले होते त्या माडीवरल्या कोप-यातल्या अडगळीतून खाली सुकडी दिसत होती. ती बोलत होती त्या दिशेला रम्याच्या शर्टची बाही दिसत होती. आश्चर्य म्हणजे तो हात हलत होता, सुकडीला बोलावत होता. सुकडी थोडी पुढे गेली. कचाकचा बोलण्यातिचं डब्याकडे दुर्लक्ष झालं आणि रम्याचा शर्ट दिसत होता त्याच्या विरुध्द दिशेनी येऊन रम्या डबडं उडवून पळाला. नक्कीच दुसऱ्या कोणीतरी त्याचा शर्ट घालून सुकडीला उल्लू बनवलं होतं. झालं, असं पाचसात वेळा तरी सुकडीला राज्य घ्यावं लागलं. पार रडायला आली. मग तिची ती कजाग (हा शेजारच्या काकूंचा शब्द) आज्जी बाहेर आली आणि तिनी मोठया पोरांचा जो उद्धार केला तो केला. सुकडीला घेऊन ती गेली. मग मजाच गेल्यासारखं झालं.
आम्ही बारकी पोरं लगोरी खेळायला लागलो आणि मोठया पोरंपोरी कट्ट्यावर बसल्या म्हणजे वेगवेगळ्या हं. हे एक मला कळत नाही, खेळतात तर एकत्र पण गप्पा मारताना मात्र वेगवेगळे. त्यातून पोरींची इतकी खुसपूस चालली होती की त्या बाजूने नुसताच फिसफिस आवाज येत होता. पोरांचा जोरदार गोंगाट सुरू होता. दिप्याचा दादा कधीतरी मारलेल्या सिक्सरची action करून दाखवत होता. “अय्या” सुमाताई एकदम म्हणाली. त्यावर ते साहेब एकदम गडबडले पण चेहऱ्यावरून एकदम खुश झालेले वाटले.   
सुकडी आणि तिची आजी बाहेर जाताना पोरांच्या तिथूनच गेल्या. “ताळतंत्र सोडलाय अगदी मेल्यांनी, आरडाओरडा काय करतील, फिदीफिदी काय करतील, घरातली इकडची काडी तिकडे करायला नको” आजींचा पट्टा जोरातच सुटला होता. तेवढयात शर्मा आंटींचा कमलेश त्याच्या जिमीबरोबर आला. जिमी म्हणजे तक्रारखोर, केसाळ कुत्रा, सारखा केकाटणारा. शर्मा आंटीच तेवढ्या आंटी आहेत, का कोण जाणे? बाकी साऱ्या काकू, मावशा नाहीतर माम्या. तेवढयात कमलेशच्या हातून जिमी सुटला आणि धावला तो थेट सुकडीकडेच. मग आजींचा लांब सुटलेला पट्टा एकदम छोटा होऊन थांबलाच. त्या भरभर चालत जाऊन दिसेनाशा झाल्या. पोरं हसून हसून पार पडायला आली.
जिमी परत आला आणि त्याने सम्याच्या पायाला खांब समजून आपला कार्यक्रम सुरू केला. मग सम्याची आणि कमलेशची चांगलीच जुंपली. आम्ही बारकी पोरं तर हसूनहसून लोळायला आलो होतो. मग सम्या आणखीनच चिडला. आमच्याकडे मोहरा वळवणार तोच त्याच्या बाबांची दणदणीत हाक ऐकू आली, मग तो पळालाच घरी.
मग कुणाकुणाचे बाबा आणि काही जणांची आईपण यायची वेळ झाली त्यामुळे  कुणीकुणी घराकडे जायला लागले. एव्हाना आम्ही कट्टयावर बसून पत्ते चालू केले होते. खेळायला जाम मजा येत होती. पण आता अंधारायलाही लागलं होतं. अजून आम्हाला कोणी बोलावलं कसं नाही हा विचार मनात येत नाही तोवर दिप्याला बोलावणं आलंच. आमची चौकडी मोडलीच. राणी म्हणाली म्हणून आम्ही पाच तीन दोन खेळायला लागलो पण काय मजा येईना. मग हळूहळू घरी निघालो ते उद्या संध्याकाळी कायकाय करायचं ते ठरवतच.    

Sunday, June 5, 2011

डबा

शाळेच्या दारापर्यंत पोचलेच होते तोवर शाळेची घंटा ऐकू आली. आमचं हे कायम असंच. कितीही लवकर निघा पण वाटेत मैत्रिणींना हाका मारतत्यांना बरोबर घेऊन येताना वेळ कुठे पळून जातो कळतच नाही. दारातल्या आजींकडून चिंचा घ्यायच्या होत्या पण घंटा ऐकून ताशी कितीतरी मैल की काय म्हणतात त्या वेगाने वर्गातच. पाचवीत आता कुठून कुठून आलेल्या मुली होत्या. वर्गात बरीच गडबड चालू होती. चष्मिस म्हणजे आमची मॉनीटर पोरींना शांत करत होतीतिला कोण दाद देत नव्हतं ते सोडा. तेवढ्यात प्रार्थनेचा टोल पडला. मग कायजादूची कांडी फिरवल्यासारखी शांतताच.

पाचवीत आल्यावर आपण फार मोठे झालोत असं वाटतंय. आज तर मी पोळ्याही लाटल्या आणि लाटताना आईला शंभर प्रश्न विचारले. त्यात पोळी गोल न होता माझंच बोलणं ऐकतेय असं वाटत होतं म्हणजे माझ्या बाजूनेच ती लांबलचक होत होती. मग आई म्हणालीचपोळी लाटता नाही आली तरी शिंगं फुटली आहेत म्हणून. बाबांनी पहिल्यांदा असं म्हटलं तेव्हा आमचा मुक्काम काळजीने आरशासमोरच. खूप खूप वेळ पाहूनही शिंगं दिसेनाच. तेवढ्यात नमीने हाक मारलीकाचा पाणी खेळायला. मग काय शिंगांचा विसरच. नमी माझ्या काचा घेऊन गेली आहे. आज तिच्याकडून घायच्याच.
मग वर्गातल्या सगळ्याजणी एकदम माझ्याकडे पाहायला लागल्याहाक मारू लागल्या. आपण तर काही नाही केलंमगतेवढ्यात बाईंचा आवाज आलाच, "झोप झाली नाही वाटतं." म्हणजे प्रार्थनाप्रतिज्ञा संपून हजेरीचा कार्यक्रम चालला होता. मी गडबडून हजर’ म्हणाले. आमचं हे असंच. डोक्यात काय काय सुरु झाल्यावर आपण कुठे आहोत हे विसरायलाच होतं. एकदा वर्गात खूप दंगा केला म्हणून बाईंनी मागच्या बाकावर उभं केलं होतं. बाई माझ्यापेक्षा बुटक्या दिसत होत्या. उंचावरून सगळ्या पोरींची डोकी मजेदार दिसत होती. कुणाच्या वेण्याकुणाचे बोसुटलेल्या रिबिनी. पुढच्याच बाकावर बसलेल्या सुलीच्या डोक्यातली ऊ पण दिसली. मजेत चालली होती बेटीजंगलातून पायवाटेकडे म्हणजे केसातून भांगाकडे. एकदम हसूच आलं मला. बाईनी रोखून पाहिलं एकदा. काही बोलल्या नाहीतपण त्यांना काय म्हणायचं ते मला नीट कळलं, “शिक्षा केली तरी पोरी दात काढतातकाय करायचं यांना इ. इ. तर आमची गाडी अशीच भरकटत असते.
हजेरी घेऊन बाई गेल्या. पाचवीत ही एक मजाच आहे. प्रत्येक विषयाला वेगळ्या बाई. इंग्लिशच्या बाई खूप छान आहेत. म्हणजे त्या बोलतात त्यातलं सगळंच कळत नाही तरी ऐकत रहावसं वाटतं. मग मधल्या सुट्टीपर्यंत कसले कसले त्रास म्हणजे तास झाले. तोपर्यंत पोटात कावळेच कावळे. कधी एकदा डबा खातोय असं झालं होतं. या शाळेत पारावर बसून डबा खायला मजा येते, गार गार सावलीत. 
डबा काढून बाकावर ठेवला तेवढ्यात पुढल्या बाकावरच्या शमी आणि सोनीचं भांडण सुरु झालंम्हणजे मारामारीच. दोघी ऐकेनात. झिंज्या ओढतचापट्या मारत मस्तच कार्यक्रम चालला होता. मग मला एकदम भुकेची आठवण झाली. डबा घ्यावा म्हणून पुढे झाले तोवर त्यांच्या झटापटीत तो लांब उडाला. टन टीन टन न्न्न्न्न्न्न्न्न...... डब्याने चांगलाच सूर लावला, निषेधाचा की काय तो. मी तर डोळे गच्च मिटूनच घेतले. डब्याचा आवाज थांबल्यावर डोळे उघडून पाहिलं तर तो आ वासून पडला होता, म्हणजे झाकण बाजूला आणि खाऊ सगळा बाहेर. मला तर रडूच फुटलं. तेवढ्यात क्लासटीचर आल्या, कशाला कोण जाणे? पण सगळा रागरंग बघून त्यांनी शमी सोनीची जी हजेरी घेतली ती घेतली. सांडलेला डबा आणि माझं रडणं पाहून त्या माझ्याकडे आल्या नि म्हणाल्या, "चल". “पण बाई मी काही नाही केलंअसं म्हणत मी जास्तच रडायला लागले. आज नेमकी डब्यात पोळी भाजी नाही हे वर्गात पसरलेला चिवडा सांगतच होता. 
"आता काय होणार? आपली आता वरातच की काय?" डोक्यात काय काय येत होतं. चालता चालता आम्ही मोठ्या बाईंच्या ऑफिसकडे जायला लागलो. मला भीतीच वाटायला लागली. पण बाई त्या बाजूनी मला टीचर्स रूममधे घेऊन गेल्या. कितीतरी बाई तिथे डबा खात होत्याच. आमच्या बाईंनी प्रेमाने मला त्यांच्या डब्यातला मसालेभात खायला दिला. माझा डबा सांडला हे कळल्यावर इतर बाई पण काय काय द्यायला लागल्याथालीपीठबर्फीचातुकडाकेळंराजगिरा वडीसाबुदाण्याची खिचडी आणि काय काय. मग तर काय एकीकडे रडू येत होतं आणि एकीकडे मस्त वाटत होतं. आग्रह करकरून त्यांनी मला खाऊ घातल्याने पोट टम्म भरलं. मग मी सगळ्यांना तो खाऊ खूप आवडल्याचं सांगितलं. त्यावर आता डबा सांडू नको असं सगळ्या म्हणाल्या. वर्गात परत येताना मी हवेतच. वर्गात आल्यावर रंगवून सगळ्यांना सांगितलं. न खाल्लेल्या पदार्थांचीही नावं ठोकून दिली. आपल्या बाई किती चांगल्या आहेत नाईअसं ऐकणारी प्रत्येकच मुलगी म्हणून जात होती. वर्गात माझी ऐट विचारूच नका.
घरी येऊन पुन्हा आमची रेकॉर्ड सुरुसगळ्यांनी माझ्या बाईना चांगलं म्हणल्यावर मगच टकळी थांबली. रात्री झोपताना डोक्यात तोच विषय. पण तेवढ्यात काहीतरी लखकन समजल्यासारखं वाटलं. दुपारी सगळ्या बाईंनी दिलेला खाऊ खाताना आणि नंतर ती गम्मत रंगवून रंगवून सांगतानाकोणत्याच बाईंच्या डब्यात पोळी भाजी नव्हती हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.            





Saturday, May 21, 2011


   रोजच्याप्रमाणे दादा फिरायला बाहेर पडले. उन्हं उतरू लागली होती. ही नेहमीची फेरी दादा शक्यतो चुकवत नसत. रमत गमत ते चालू लागले. खिशात सहज हात घातला तर पाकीट लागलं नाही. विसरलं असेल असा विचार करत ते निघाले. फार लांब न जाता ते जवळच फिरून आले. चहापाणी झाल्यावर कपडे बदलताना त्यांना पाकीटाची आठवण झाली. कपाट, drawer, सारं शोधून झालं. शेवटी त्यांनी माईंना सांगितलं. इतरत्र शोधल्यावर माईंना  दादांच्या खिशाची आठवण झाली. फिरायला जाताना घातलेल्या pant च्या खिशातच, मात्र दादांनी न पाहिलेल्या खिशात पाकीट होते. "अलीकडे फार विसरभोळेपणा करता हं तुम्ही" असं पुटपुटत त्या गेल्या. दादांना आता आश्चर्य वाटत होतंपाकिटासाठी नेहमीचा खिसा न बघता आपण दुसरा खिसा का चाचपडत होतोते जरा गोंधळले.
एकदा पाकीट सापडलं की निवांतपणे पेपर मधले काही लेख वाचायचं त्यांनी ठरवलं होतं. पेपर हातात घेतला पण आपल्यला काय वाचायचं होतं हेच त्यांना आठवेना. "असा मनाचा गोंधळ का उडतोयहिने अजून चहा का नाही दिला?" त्यांनी माईंना चहा द्यायला सांगितलं. माई जरा गोंधळल्या पण परत हवा असेल असं वाटून त्यांनी फार काही न बोलता चहा केला. अलीकडे हे जरा जास्तच गोंधळतात. वय झालंविसरभोळेपणा होणारच" असं म्हणत त्या कामाला लागल्या. 
   दिवस जात होते. दादांचं गोंधळलेपण वाढत होतं. माईही थकत चालल्या होत्या. त्यांचा मुलगा श्री आणि त्याचं कुटुंब नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होतं. नातवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुढल्या महिन्यात श्री येईल तेव्हा ह्यांचं नीट check up करून घ्यायचं माईंनी ठरवलं. 
   दुपारचं जेवण झालं की माई थोडा वेळ झोपत आणि मग आजूबाजूच्या मैत्रिणींकडे गप्पा मारायला जात. ५ पर्यंत त्या परत येत आणि मग दादा बाहेर पडत. आज अशाच त्या ५-५.१५ ला घरी आल्या. दादा बाहेरच खुर्चीत बसले होतेविचारात दिसत होते. माईंना पाहिल्यावर ते म्हणाले, "अगं चंद्रकांत आला होतामाझा वर्गमित्र." मग त्याला थांबवलं का नाही वगैरे माई विचारू लागल्या. त्याकडे दादाचं लक्षच नव्हतंचंद्रकांत पैशाच्या अडचणीत आहे मुलगा बघत नाहीत्याला पैशाची खूप गरज आहे असं ते सांगत राहिले. "परत आले की आपण त्यांना मदत करू" माईंनी सुचवलं.
   दादा फिरायला गेले ते आठ वाजून गेले तरी परतले नाहीत. माई काळजी करत होत्या पण तेवढ्यात ते आले. वाटेत त्यांना चंद्रकांत भेटला होताखूप काय बोलत होता, रडत होता असे ते म्हणाले. ते खूप चिडलेले होते, चंद्रकांतच्या मुलाला शिव्या देऊ लागले. त्याला ५००रु. दिल्याचे त्यांनी माईंना सांगितले. माईंनी पाकीट पाहिलं५००ची एक नोट कमी होती.
   दादा हिशोब लिहायला बसलेअलीकडे हातही थरथर करायचेविशेषत: लिहिताना. त्यांनी दिलेला एक चेकही नुकताच परत आला होतासही जुळत नाही म्हणून. आता मात्र सगळे व्यवहार आपल्याला हातात घ्यावे लागणार हे माईंनी ओळखलंश्री आल्यावर joint account चं काम करून घ्यायचं त्यांनी ठरवलं. 
   चंद्रकांत दादांना भेटतच होता. अधून मधून दादा त्याला पैसे देत होते. पण तो नेमका आपण नसतानाच का दादांना भेटतो हे माईंना कळेना. त्यांनी दादांना खूप छेडलं पण ते काही नीट बोलेनात. एकदा तर दादांनीच माईंना ‘कोण चंद्रकांत’ म्हणून विचारलं. मग मात्र माई दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची दादांनी व्यवस्थित उत्तरं दिली पण माईंच्या अनुभवावरून त्यांनी neuro physician कडे जाऊन काही तपासण्या करायला सांगितल्या. ते ठिकाण लांब होतं  आणि तपासण्या खर्चिकत्यामुळे ८-१० दिवसात श्री आल्यावर तिकडे जायचं ठरलं. 
   दुपारी दादा जोरजोरात कुणाशी तरी बोलत होते त्यामुळे माईंना जाग आली. दादा एकटेच कुणाशी तरी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. "अगं चंद्रकांत आलायतुला भेटायचं होतं नाजरा चहाही कर." असे म्हणून त्यांनी 'चंद्रकांतआणि माईची ओळख करून दिली. "चंद्रकांतला थोडे पैसे हवेत" असं म्हणत ते हजार रुपये पुढे करू लागले. आता मात्र माई हादरल्यात्यांनी दादांना गदागदा हलवलेभानावर आणण्याचा प्रयत्न केला. हळूहळू दादा भानावर आलेपण माईंच्या प्रश्नांनी चांगलेच गोंधळलेत्यांना काही सुचेचना. हळूहळू ते आत गेले आणि पडून राहिले. "ह्यांना वेडबिड तर लागलं नाही ना?" माई चिंता करत होत्या. 
    दुसऱ्या दिवशी रात्री दादांनी जोरात आरडाओरडा केला, खिडकीवर चोर आहे म्हणून. माईंनी कशीबशी समजूत घातलीलाईट लावून त्यांना नीट सारं काही दाखवलं तेव्हा ते शांत झाले. श्री सकाळी येणारच आहे तेव्हा काय ते बघावं असं म्हणून त्या दादांचं डोकं चोळू लागल्या. दादा झोपले, हळूहळू माईंनाही झोप लागली.  
   पहाटे माई जोराच्या आवाजाने धसकून जाग्या झाल्या. दादा जोरजोरात बोलत होतेत्या बाहेर आल्या. दारातच मुलगासून नि नातू उभे होते आणि दादा त्यांना जोरात शिव्या देत होते. आजूबाजूची मंडळीही डोकावू लागली होती. माईंना काही कळेना. "आईवडलांना सांभाळायला नकोआपल्यातच मश्गुल असताबापाचे problems काय कळणार तुला? उद्या तुझा मुलगाही मोठा होईलच ना, तेव्हा कळेल." या माऱ्याने सारेच स्तंभित झालेश्री त्यांना काही समजावू लागला. माईही पुढे झाल्याआधी घरात चला म्हणू लागल्या. सगळे कसेबसे घरात आले पण दादांचा पट्टा काही थांबेना. मुलाचं नि आपलं सारं काही बरं असताना हे असं काय बडबडतायत ते माईंना कळेना. श्रीलाही हाच प्रश्न पडला होता. 
   "तुझ्या बापाची काय स्थिती झाल्ये जाऊन बघ एकदापैसे उसने घेऊन घर चालवतोय तो. मी दिलेत त्याला अनेकदा पैसे. हिला विचारइथेही आला होता तो." 
   आता मात्र श्री खूपच चिडलासून कावरीबावरी झालीनातू तर घाबरून रडायला लागला. श्रीने जरा दरडावूनच दादांना गप्प बसायला सांगितलं. त्यामुळे दादा आणखीनच चिडले. त्या गोंधळातही  माईंच्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलंदादा श्रीला चंद्रकांतचा मुलगा समजतायत की काय? त्या पुढे होऊन श्रीला सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात दादांना हातोडी दिसली आणि बेभानपणे त्यांनी श्रीवर वार केला. माईंनी त्यांना निकराने ढकलून दिलं. घाव वरवरच बसला तरी श्रीच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. 
   दादा थकून खाली पडले होते तरी त्यांची बडबड चालूच होती. दादांना ढकलल्यावर माईंच्या पायातलं बळ गेलं. डोळ्यातून घळघळ येणारी आसवं वाहू देत त्या शून्य नजरेने तिथेच बसून राहिल्या.  

   आज नाना खूप उशिराने घरी परतले. नानी अगदी कंटाळून गेल्या होत्या. त्यांनी घुश्शातच जेवणाचं ताट आदळलं आणि त्या झोपायला निघून गेल्या.

   “हल्ली ह्यांचा लहरीपणा फार वाढायला लागलाय. नानीचं विचारचक्र सुरु झालं. किती सरळमार्गी माणूस. घराची काळजी घेणारा, आपल्यालाही घरकामात मदत करणारा. अधून मधून सिनेमा दाखवणारा, मुलांकडे नीट लक्ष देणारा. पण हल्ली जरा विक्षिप्त वागतात. संधी मिळाली की बाहेर पडतात. परवा फोनवर कुणाशी बोलत होते, पण काय ते कळलंच नाही. कधी न ऐकलेली नावं, माहीत नसलेले संदर्भ. काही विचारायला गेलं तर धड बोलत नाहीत. हे काय चाललंय याची नानी चिंता करत होत्या.
   नाना सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुन्हा गावाकडे रहायला आले. मुलं शहरात स्थिरावली होती. नानीलाही शहरातलं जीवन आवडत नव्हतंच. त्यामुळे दोघं सुखानी परतले. रहस्यकथा, गुन्ह्यावरील कथा-कादंबऱ्या नानांना फार आवडत. बाकी त्यांना कुठलाच शौक नव्हता. दक्षता किंवा पोलीस टाईम्स ते आवडीने वाचत. तेवढ्या वाचनाच्या नादाबद्दल नानी कधीकधी तक्रार करत. पण बाकी सारं छान चाललं होतं.
   सकाळी नानी जरा तणतण करतच होत्या. नाना जवळ आले नी एकदम इंग्लिशमधे काहीतरी बोलू लागले. बिचाऱ्या आठवी पास नानींना काही कळेना. खूप वेळ इंग्लिशमधे बोलल्यावर ते शांत झाले. नानी गप्पच झाली होती. दोन तीन दिवसात ती येईल, काम नीट केलं पाहिजे.” असं ते पुटपुटत होते. कोण येणार आहे, जेवायला येणार असेल तर आधी सांगा वगैरे नानींनी चालू केलं पण त्यांच्याकडे नानांनी एक विचित्र नजर टाकली. चहा पिऊन ते बाहेर पडले.  
   रात्री ते नानीजवळ बोलत होते, नानी अर्धवट झोपेत, नानाचं इंग्लिश–मराठीत बोलणं सुरु होतं. यावरून नानींना थोडंसं कळलं ते असं; कोणीतरी कोट्याधीश माणूस आहे. त्याने वयाने खूप तरुण मुलीशी लग्न केलं आहे. तिचा कोणी प्रियकर आहे आणि ते दोघं मिळून त्याचा काटा काढणार आहेत. नानी उठून बसल्या आणि त्यांच्या अंगावर ओरडल्या, तुमचा काय संबंध याच्याशी? नाही त्या भानगडीत पडू नका. नाना गडबडून उठले आणि एक रहस्य कादंबरी खाली पडली. नाना गोष्ट सांगत होते तर, नानीनी नि:श्वास टाकला.
   पण हळूहळू नानांचं असंबध्द बोलणं वाढत होतं. कधी कधी ते आपल्यालाही ओळखत नाहीत की काय असं नानींना वाटे. ते तिच्याकडे जळजळीत नजरेने पाहत. अशा वेळी नानी घाबरून जाई, तिने मुलांना फोन केला. त्यांना यायला सांगितलं, ते आल्यावर काय ते करायचं ठरलं. काही बाहेरचं असेल म्हणून नानींनी नारळ फोडणं, अंगारे धुपारे चालू केले.
   “दोघं लोणावळ्याला गेली आहेत, मजा मारायला माझ्या पैशावर. त्यांच्या मागावर रहा. Report me every minute. Shoot her if possible, but take care, nobody should see you. नाना जोरात बोलत होते. नानी धावत आल्या. त्यांना हाका मारू लागल्या. पण नाना म्हणाले, कोण तू? इथे कशाला आलीस? चल चालायला लाग. त्यांनी नानींना घराबाहेर काढलं. नानींनी जोरात गळा काढला. बराच वेळ नानी मुसमुसत बाहेरच थांबल्या. नाना बाहेर आले, नानींना पाहून म्हणाले, कुठे गेली होतीस? मला भूक लागल्ये. खायला दे. नानींनी खायला दिलं, आता मात्र त्यांचा धीर सुटला. ताबडतोब त्यांनी थोरल्या मुलाला फोन केला आणि थोडक्यात काय ते सांगून लगेच निघून यायला सांगितलं. तोही लगेच निघतो म्हणाला. तेवढ्यात बाहेर काही आवाज आला म्हणून त्या धावल्या. नाना कपाटं, टेबलाचे खण हुडकत होते, काहीतरी शोधत होते. सुपारी सुपारी असं बडबडत होते. इथे त्यांच्या सुपारी शोधण्याचे नवल करत नानींनी आतून त्यांना सुपारी आणून दिली. त्यावर त्यांच्याकडे एक अनोळखी कटाक्ष टाकून नाना बाहेर निघून गेले.   
   त्यांनी केलेला पसारा आवरताना नानींना नोटांच्या दोन जाड गड्ड्या सापडल्या, एवढे पैसे पाहून त्यांची छातीच दडपली. "काय व्यवहार चालतात यांचे", आल्यावर नानांशी नीट बोलायचं त्यांनी ठरवलं. त्यांना मुलाबाळांची शपथ घालायची, आणि प्रेमानी सारं त्यांच्याकडून काढून घायचं त्यांनी ठरवलं. या विचारांनी नानींना बळ आलं, त्यांनी नानांच्या आवडीचा स्वयंपाक केला.
   नाना आले ते त्यांच्या नादातच होते. पण पोटभर जेवले. जेवण झाल्यावर नानी जवळ येऊन बसल्या. त्या मुलगा येणार असल्याचे सांगू लागल्या. बाहेर कुणाला भेटता, इतका वेळ कुठे जाता? असे अगदी सौम्यपणे त्या विचारू लागल्या. नानांनी रुद्रावतार धारण केला. तोंडाचा अमर्याद पट्टा सुरु झाला. तू कोण मला विचारणारी? एवढं गोडधोड केलंस, पैसे कुठून आणलेस? माझ्या जिवावर मजा मारतेस आणि कोण मुलगा? कोण येणारे? त्याची भर करतेस होय?
   नानी हतबुध्द झाल्या, काय करावं त्यांना सुचेना. एकदम त्यांना दुपारी सापडलेल्या नोटांची आठवण झाली.  त्यांनी नोटांच्या गड्ड्या नानांसमोर टाकल्या आणि काही बोलणार तोच नाना गरजले, माझे पैसे चोरतेस? तुझ्याशी लग्न करतानाच मी विचार करायला हवा होता. एवढ्या संपत्तीला वारस मिळेल म्हणून तुला घरात आणलं तर तुझे हे उलटे धंदे. माझ्याच जिवावर उठलीस, त्या साल्याला सुपारी देऊनही लोणावळ्यातच काम उरकायला जमलं नाही. थांब मीच धडा शिकवतो तुला.
नानींना या गोष्टीचा अर्थ थोडाथोडा लक्षात यायला लागला होता. नाना स्वत:ला तो ‘कोट्याधीश तर समजत नाहीत? या विचारांनी त्यांना धस्स झालं. त्या जिवाच्या कराराने नानांना  समजावू लागल्या, त्यांनी नानांचे पाय धरले. त्यांना ढकलून नाना बाहेर आले. अंगणात एक जड लोखंडी गज पडला होता. क्षणात तो उचलून ते आत गेले आणि त्यांनी नानींवर हल्ला केला. बेभानपणे ते घाव घालत राहिले. काही वेळाने दमून बाजूला बसून राहिले. नानींनी कधीच या जगाचा निरोप घेतला होता. त्याचवेळी मुलगा घरात शिरला. रक्ताच्या थारोळ्यात निश्चेष्ट पडलेली आई आणि तिच्याकडे भ्रमिष्टासारखे बघणारे वडील हे दृश्य त्याचं स्वागत करत होतं.         






Friday, April 29, 2011

स्वयंघोषित देवाचा मृत्यू

Finally god had died due to cardiac arrest disqualifying his own prophecy.

सत्य साईंचं एक चित्र जे त्यांच्या मृत्यूनंतर ठळकपणे दिसलं;
लाखो भाविक, त्यांची अपरंपार श्रद्धा, अनेकांच्या तोंडून त्यांच्या कृपेच्या अनुभवाचे वर्णन, साईंनी आपले कल्याण केले-योग्य मार्ग दाखवला अशी अनेक सामान्य भाविकांची भावना, दर्शनासाठी सामान्य भाविकांची अलोट गर्दी. लोककल्याणासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या.
VIPs चे तर ते खास गुरु. अनेक राजकारणी, खेळाडू, film stars त्यांचे भक्त होते. सचिनला अश्रू ढाळताना तर आपण पहिलंच. बहुतेक राजकारणी नेतेही तिथे उपस्थित होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीही दर्शनासाठी गेले होते. सरकारी इतमामात साईंवर अंत्यसंस्कार झाले.
दुसरं चित्र काय होतं?
सत्य साईबाबांवर अनेक आरोप झाले. कोणताही जादूगार करतो त्या पद्धतीने हवेतून सोनसाखळ्या काढणे, HMT घड्याळे काढणे वगैरे उद्योग ते करत. HMT घड्याळे त्यांनी लवकरच बंद गेली, (बहुधा त्यावरील manufacturing date मुळे) त्यांना याबाबतीत अनेकांनी आव्हान दिलं होतं. त्यांच्या tricks दाखवणाऱ्या films ही उपलब्ध आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, आश्रमातील एका खुनानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. पण याची चौकशी एका मर्यादेनंतर झाली नाही असं म्हणतात. त्यांच्या high profile राजकारणी भक्तांनी ती व्यवस्था केली असावी असंही बोललं जातं.
९६ वर्षे आपण जिवंत राहणार ही त्यांची भविष्यवाणी खरी ठरली नाही. ‘देव’ असूनही त्यांच्यावर लौकिक जगातले उपचार करावे लागलेच, ज्याला त्यांच्या शरीरानी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या भविष्यवाणीनुसार ते २०२२ ला हा देह ठेवणार होते आणि २०२३ ला त्यांच्याच एका सहकाऱ्याच्या पोटी जन्म घेणार होते.(??)
आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांच्या trust कडे असलेल्या अलोट संपत्तीचा. शिर्डीचे साईबाबा फकीर होते आणि तसेच राहिले. मात्र त्यांचा अवतार म्हणवणारे सत्यसाई सोन्याच्या सिंहासनावर बसत होते.
दुसऱ्या चित्राच्या अशा अजून अनेक छटा आहेत.
एकाच माणसाच्या या दोन चित्रांची सांगड मला घालता येत नाहीये.

Monday, March 21, 2011

Celebration

आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस नुकताच साजरा झाला. आता मार्चची अखेर आली आहे, एव्हाना सारे विसरलेही असतील. गेली काही वर्षे महिला दिन जोरदार साजरा होऊ लागला. एका दृष्टीने हे चांगलं अशासाठी की याला मान्यता मिळू लागली. पण हळूहळू त्यातला संघर्षाचा आशय हरवला आणि उत्सवीकरण चालू झाले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन वाजत गाजत पार पडला. वृत्तपत्रे रंगली, अन्य माध्यमांनीही ताल धरला. सगळ्यांचाच होता ‘स्त्री’त्वाला सलाम, स्त्री ‘शक्ती’ ला प्रणाम, स्त्रीच्या गुणांना (super woman असली तरच) अभिवादन. मग यशस्वी स्त्रियांच्या नावांची जंत्री वगैरे.......... मग काही celebrities चे interviews……. बहुतेकांची सुरूवात “मी feminist वगैरे नाही” किंवा “feminist भूमिकेतून मी बोलत नाही” म्हणजे मुद्दा मांडण्याआधीच सारवासारवीची घाई.
तर Post-Feminist उत्सवी समाजातले असे हे महिला दिन;
  • स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास अनुल्लेखाने मारणारे
  • सामाजिक रचितातील विषमतेबद्दल काही न बोलता, आपसुख निसर्गदत्त आहे त्याचाच उदो उदो करणारे, उदा. मातृत्व
  • निव्वळ ‘income generation’ म्हणजे सबलीकरण मानणारे उदा. बचतगट
  • वैयक्तिक यशाला महत्व देणारे, careerist, महात्वाकांक्षी स्त्रियांचे कौतुक करणारे
  • Celebrity महिलांच्या ‘मायलेक’ ष्टाईल मुलाखती छापणारे
आठ मार्चचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. यावेळी तर हा १०० वा महिला दिन साजरा झाला पण त्याची खबर Opinion makers ना नसावी बहुधा.
Celebrities च्याही बोलण्यात “आपण मनापासून परिश्रम केले की सारं मिळतं, विशेष सवलतींची काय गरज?” अशी विधाने वारंवार दिसतात. त्यांच्या शहरी, सुशिक्षित, मोकळ्या कुटुंबाच्या पातळीवर हे खरे असेलही. पण छोट्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या, मूलभूत सुविधांसाठी झगडणाऱ्या, शिक्षणासाठी कष्ट सोसणाऱ्या बायामुलींचे काय, शहरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांचे काय?
लिंगभावाच्या संदर्भात अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.
पण थांबा हो, सध्या celebration चा मूड आहे!