१
रोजच्याप्रमाणे दादा फिरायला बाहेर पडले. उन्हं उतरू लागली होती. ही नेहमीची फेरी दादा शक्यतो चुकवत नसत. रमत गमत ते चालू लागले. खिशात सहज हात घातला तर पाकीट लागलं नाही. विसरलं असेल असा विचार करत ते निघाले. फार लांब न जाता ते जवळच फिरून आले. चहापाणी झाल्यावर कपडे बदलताना त्यांना पाकीटाची आठवण झाली. कपाट, drawer, सारं शोधून झालं. शेवटी त्यांनी माईंना सांगितलं. इतरत्र शोधल्यावर माईंना दादांच्या खिशाची आठवण झाली. फिरायला जाताना घातलेल्या pant च्या खिशातच, मात्र दादांनी न पाहिलेल्या खिशात पाकीट होते. "अलीकडे फार विसरभोळेपणा करता हं तुम्ही" असं पुटपुटत त्या गेल्या. दादांना आता आश्चर्य वाटत होतं, पाकिटासाठी नेहमीचा खिसा न बघता आपण दुसरा खिसा का चाचपडत होतो? ते जरा गोंधळले.
एकदा पाकीट सापडलं की निवांतपणे पेपर मधले काही लेख वाचायचं त्यांनी ठरवलं होतं. पेपर हातात घेतला पण आपल्यला काय वाचायचं होतं हेच त्यांना आठवेना. "असा मनाचा गोंधळ का उडतोय? हिने अजून चहा का नाही दिला?" त्यांनी माईंना चहा द्यायला सांगितलं. माई जरा गोंधळल्या पण परत हवा असेल असं वाटून त्यांनी फार काही न बोलता चहा केला. “अलीकडे हे जरा जास्तच गोंधळतात. वय झालं, विसरभोळेपणा होणारच" असं म्हणत त्या कामाला लागल्या.
दिवस जात होते. दादांचं गोंधळलेपण वाढत होतं. माईही थकत चालल्या होत्या. त्यांचा मुलगा श्री आणि त्याचं कुटुंब नोकरीनिमित्ताने बाहेरगावी होतं. नातवाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुढल्या महिन्यात श्री येईल तेव्हा ह्यांचं नीट check up करून घ्यायचं माईंनी ठरवलं.
दुपारचं जेवण झालं की माई थोडा वेळ झोपत आणि मग आजूबाजूच्या मैत्रिणींकडे गप्पा मारायला जात. ५ पर्यंत त्या परत येत आणि मग दादा बाहेर पडत. आज अशाच त्या ५-५.१५ ला घरी आल्या. दादा बाहेरच खुर्चीत बसले होते, विचारात दिसत होते. माईंना पाहिल्यावर ते म्हणाले, "अगं चंद्रकांत आला होता, माझा वर्गमित्र." मग त्याला थांबवलं का नाही वगैरे माई विचारू लागल्या. त्याकडे दादाचं लक्षच नव्हतं. चंद्रकांत पैशाच्या अडचणीत आहे, मुलगा बघत नाही, त्याला पैशाची खूप गरज आहे असं ते सांगत राहिले. "परत आले की आपण त्यांना मदत करू" माईंनी सुचवलं.
दादा फिरायला गेले ते आठ वाजून गेले तरी परतले नाहीत. माई काळजी करत होत्या पण तेवढ्यात ते आले. वाटेत त्यांना चंद्रकांत भेटला होता, खूप काय बोलत होता, रडत होता असे ते म्हणाले. ते खूप चिडलेले होते, चंद्रकांतच्या मुलाला शिव्या देऊ लागले. त्याला ५००रु. दिल्याचे त्यांनी माईंना सांगितले. माईंनी पाकीट पाहिलं, ५००ची एक नोट कमी होती.
दादा हिशोब लिहायला बसले, अलीकडे हातही थरथर करायचे, विशेषत: लिहिताना. त्यांनी दिलेला एक चेकही नुकताच परत आला होता, सही जुळत नाही म्हणून. आता मात्र सगळे व्यवहार आपल्याला हातात घ्यावे लागणार हे माईंनी ओळखलं, श्री आल्यावर joint account चं काम करून घ्यायचं त्यांनी ठरवलं.
चंद्रकांत दादांना भेटतच होता. अधून मधून दादा त्याला पैसे देत होते. पण तो नेमका आपण नसतानाच का दादांना भेटतो हे माईंना कळेना. त्यांनी दादांना खूप छेडलं पण ते काही नीट बोलेनात. एकदा तर दादांनीच माईंना ‘कोण चंद्रकांत’ म्हणून विचारलं. मग मात्र माई दुसऱ्या दिवशी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची दादांनी व्यवस्थित उत्तरं दिली पण माईंच्या अनुभवावरून त्यांनी neuro physician कडे जाऊन काही तपासण्या करायला सांगितल्या. ते ठिकाण लांब होतं आणि तपासण्या खर्चिक, त्यामुळे ८-१० दिवसात श्री आल्यावर तिकडे जायचं ठरलं.
दुपारी दादा जोरजोरात कुणाशी तरी बोलत होते त्यामुळे माईंना जाग आली. दादा एकटेच कुणाशी तरी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. "अगं चंद्रकांत आलाय, तुला भेटायचं होतं ना, जरा चहाही कर." असे म्हणून त्यांनी 'चंद्रकांत' आणि माईची ओळख करून दिली. "चंद्रकांतला थोडे पैसे हवेत" असं म्हणत ते हजार रुपये पुढे करू लागले. आता मात्र माई हादरल्या, त्यांनी दादांना गदागदा हलवले, भानावर आणण्याचा प्रयत्न केला. हळूहळू दादा भानावर आले, पण माईंच्या प्रश्नांनी चांगलेच गोंधळले, त्यांना काही सुचेचना. हळूहळू ते आत गेले आणि पडून राहिले. "ह्यांना वेडबिड तर लागलं नाही ना?" माई चिंता करत होत्या.
दुसऱ्या दिवशी रात्री दादांनी जोरात आरडाओरडा केला, खिडकीवर चोर आहे म्हणून. माईंनी कशीबशी समजूत घातली, लाईट लावून त्यांना नीट सारं काही दाखवलं तेव्हा ते शांत झाले. श्री सकाळी येणारच आहे तेव्हा काय ते बघावं असं म्हणून त्या दादांचं डोकं चोळू लागल्या. दादा झोपले, हळूहळू माईंनाही झोप लागली.
पहाटे माई जोराच्या आवाजाने धसकून जाग्या झाल्या. दादा जोरजोरात बोलत होते, त्या बाहेर आल्या. दारातच मुलगा, सून नि नातू उभे होते आणि दादा त्यांना जोरात शिव्या देत होते. आजूबाजूची मंडळीही डोकावू लागली होती. माईंना काही कळेना. "आईवडलांना सांभाळायला नको, आपल्यातच मश्गुल असता, बापाचे problems काय कळणार तुला? उद्या तुझा मुलगाही मोठा होईलच ना, तेव्हा कळेल." या माऱ्याने सारेच स्तंभित झाले, श्री त्यांना काही समजावू लागला. माईही पुढे झाल्या, आधी घरात चला म्हणू लागल्या. सगळे कसेबसे घरात आले पण दादांचा पट्टा काही थांबेना. मुलाचं नि आपलं सारं काही बरं असताना हे असं काय बडबडतायत ते माईंना कळेना. श्रीलाही हाच प्रश्न पडला होता.
"तुझ्या बापाची काय स्थिती झाल्ये जाऊन बघ एकदा. पैसे उसने घेऊन घर चालवतोय तो. मी दिलेत त्याला अनेकदा पैसे. हिला विचार, इथेही आला होता तो."
आता मात्र श्री खूपच चिडला, सून कावरीबावरी झाली, नातू तर घाबरून रडायला लागला. श्रीने जरा दरडावूनच दादांना गप्प बसायला सांगितलं. त्यामुळे दादा आणखीनच चिडले. त्या गोंधळातही माईंच्या थोडं थोडं लक्षात येऊ लागलं, दादा श्रीला चंद्रकांतचा मुलगा समजतायत की काय? त्या पुढे होऊन श्रीला सांगण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात दादांना हातोडी दिसली आणि बेभानपणे त्यांनी श्रीवर वार केला. माईंनी त्यांना निकराने ढकलून दिलं. घाव वरवरच बसला तरी श्रीच्या डोक्यातून रक्ताची धार लागली.
दादा थकून खाली पडले होते तरी त्यांची बडबड चालूच होती. दादांना ढकलल्यावर माईंच्या पायातलं बळ गेलं. डोळ्यातून घळघळ येणारी आसवं वाहू देत त्या शून्य नजरेने तिथेच बसून राहिल्या.
२
आज नाना खूप उशिराने घरी परतले. नानी अगदी कंटाळून गेल्या होत्या. त्यांनी घुश्शातच जेवणाचं ताट आदळलं आणि त्या झोपायला निघून गेल्या.
“हल्ली ह्यांचा लहरीपणा फार वाढायला लागलाय.” नानीचं विचारचक्र सुरु झालं. “किती सरळमार्गी माणूस. घराची काळजी घेणारा, आपल्यालाही घरकामात मदत करणारा. अधून मधून सिनेमा दाखवणारा, मुलांकडे नीट लक्ष देणारा. पण हल्ली जरा विक्षिप्त वागतात. संधी मिळाली की बाहेर पडतात. परवा फोनवर कुणाशी बोलत होते, पण काय ते कळलंच नाही. कधी न ऐकलेली नावं, माहीत नसलेले संदर्भ. काही विचारायला गेलं तर धड बोलत नाहीत.” हे काय चाललंय याची नानी चिंता करत होत्या.
नाना सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुन्हा गावाकडे रहायला आले. मुलं शहरात स्थिरावली होती. नानीलाही शहरातलं जीवन आवडत नव्हतंच. त्यामुळे दोघं सुखानी परतले. रहस्यकथा, गुन्ह्यावरील कथा-कादंबऱ्या नानांना फार आवडत. बाकी त्यांना कुठलाच शौक नव्हता. दक्षता किंवा पोलीस टाईम्स ते आवडीने वाचत. तेवढ्या वाचनाच्या नादाबद्दल नानी कधीकधी तक्रार करत. पण बाकी सारं छान चाललं होतं.
सकाळी नानी जरा तणतण करतच होत्या. नाना जवळ आले नी एकदम इंग्लिशमधे काहीतरी बोलू लागले. बिचाऱ्या आठवी पास नानींना काही कळेना. खूप वेळ इंग्लिशमधे बोलल्यावर ते शांत झाले. नानी गप्पच झाली होती. “दोन तीन दिवसात ती येईल, काम नीट केलं पाहिजे.” असं ते पुटपुटत होते. कोण येणार आहे, जेवायला येणार असेल तर आधी सांगा वगैरे नानींनी चालू केलं पण त्यांच्याकडे नानांनी एक विचित्र नजर टाकली. चहा पिऊन ते बाहेर पडले.
रात्री ते नानीजवळ बोलत होते, नानी अर्धवट झोपेत, नानाचं इंग्लिश–मराठीत बोलणं सुरु होतं. यावरून नानींना थोडंसं कळलं ते असं; कोणीतरी कोट्याधीश माणूस आहे. त्याने वयाने खूप तरुण मुलीशी लग्न केलं आहे. तिचा कोणी प्रियकर आहे आणि ते दोघं मिळून त्याचा काटा काढणार आहेत. नानी उठून बसल्या आणि त्यांच्या अंगावर ओरडल्या, “तुमचा काय संबंध याच्याशी? नाही त्या भानगडीत पडू नका.” नाना गडबडून उठले आणि एक रहस्य कादंबरी खाली पडली. “नाना गोष्ट सांगत होते तर”, नानीनी नि:श्वास टाकला.
पण हळूहळू नानांचं असंबध्द बोलणं वाढत होतं. कधी कधी ते आपल्यालाही ओळखत नाहीत की काय असं नानींना वाटे. ते तिच्याकडे जळजळीत नजरेने पाहत. अशा वेळी नानी घाबरून जाई, तिने मुलांना फोन केला. त्यांना यायला सांगितलं, ते आल्यावर काय ते करायचं ठरलं. काही बाहेरचं असेल म्हणून नानींनी नारळ फोडणं, अंगारे धुपारे चालू केले.
“दोघं लोणावळ्याला गेली आहेत, मजा मारायला माझ्या पैशावर. त्यांच्या मागावर रहा. Report me every minute. Shoot her if possible, but take care, nobody should see you.” नाना जोरात बोलत होते. नानी धावत आल्या. त्यांना हाका मारू लागल्या. पण नाना म्हणाले, “कोण तू? इथे कशाला आलीस? चल चालायला लाग.” त्यांनी नानींना घराबाहेर काढलं. नानींनी जोरात गळा काढला. बराच वेळ नानी मुसमुसत बाहेरच थांबल्या. नाना बाहेर आले, नानींना पाहून म्हणाले, “कुठे गेली होतीस? मला भूक लागल्ये. खायला दे.” नानींनी खायला दिलं, आता मात्र त्यांचा धीर सुटला. ताबडतोब त्यांनी थोरल्या मुलाला फोन केला आणि थोडक्यात काय ते सांगून लगेच निघून यायला सांगितलं. तोही लगेच निघतो म्हणाला. तेवढ्यात बाहेर काही आवाज आला म्हणून त्या धावल्या. नाना कपाटं, टेबलाचे खण हुडकत होते, काहीतरी शोधत होते. सुपारी सुपारी असं बडबडत होते. इथे त्यांच्या सुपारी शोधण्याचे नवल करत नानींनी आतून त्यांना सुपारी आणून दिली. त्यावर त्यांच्याकडे एक अनोळखी कटाक्ष टाकून नाना बाहेर निघून गेले.
त्यांनी केलेला पसारा आवरताना नानींना नोटांच्या दोन जाड गड्ड्या सापडल्या, एवढे पैसे पाहून त्यांची छातीच दडपली. "काय व्यवहार चालतात यांचे", आल्यावर नानांशी नीट बोलायचं त्यांनी ठरवलं. त्यांना मुलाबाळांची शपथ घालायची, आणि प्रेमानी सारं त्यांच्याकडून काढून घायचं त्यांनी ठरवलं. या विचारांनी नानींना बळ आलं, त्यांनी नानांच्या आवडीचा स्वयंपाक केला.
नाना आले ते त्यांच्या नादातच होते. पण पोटभर जेवले. जेवण झाल्यावर नानी जवळ येऊन बसल्या. त्या मुलगा येणार असल्याचे सांगू लागल्या. “बाहेर कुणाला भेटता, इतका वेळ कुठे जाता?” असे अगदी सौम्यपणे त्या विचारू लागल्या. नानांनी रुद्रावतार धारण केला. तोंडाचा अमर्याद पट्टा सुरु झाला. “तू कोण मला विचारणारी? एवढं गोडधोड केलंस, पैसे कुठून आणलेस? माझ्या जिवावर मजा मारतेस आणि कोण मुलगा? कोण येणारे? त्याची भर करतेस होय?”
नानी हतबुध्द झाल्या, काय करावं त्यांना सुचेना. एकदम त्यांना दुपारी सापडलेल्या नोटांची आठवण झाली. त्यांनी नोटांच्या गड्ड्या नानांसमोर टाकल्या आणि काही बोलणार तोच नाना गरजले, “माझे पैसे चोरतेस? तुझ्याशी लग्न करतानाच मी विचार करायला हवा होता. एवढ्या संपत्तीला वारस मिळेल म्हणून तुला घरात आणलं तर तुझे हे उलटे धंदे. माझ्याच जिवावर उठलीस, त्या साल्याला सुपारी देऊनही लोणावळ्यातच काम उरकायला जमलं नाही. थांब मीच धडा शिकवतो तुला.”
नानींना या गोष्टीचा अर्थ थोडाथोडा लक्षात यायला लागला होता. नाना स्वत:ला तो ‘कोट्याधीश’ तर समजत नाहीत? या विचारांनी त्यांना धस्स झालं. त्या जिवाच्या कराराने नानांना समजावू लागल्या, त्यांनी नानांचे पाय धरले. त्यांना ढकलून नाना बाहेर आले. अंगणात एक जड लोखंडी गज पडला होता. क्षणात तो उचलून ते आत गेले आणि त्यांनी नानींवर हल्ला केला. बेभानपणे ते घाव घालत राहिले. काही वेळाने दमून बाजूला बसून राहिले. नानींनी कधीच या जगाचा निरोप घेतला होता. त्याचवेळी मुलगा घरात शिरला. रक्ताच्या थारोळ्यात निश्चेष्ट पडलेली आई आणि तिच्याकडे भ्रमिष्टासारखे बघणारे वडील हे दृश्य त्याचं स्वागत करत होतं.
मला वाटलं या आजारात फक्त 'विस्मृती' होते .. माणस दुस-या भूमिकेतही जाऊ शकतात हे माहिती नव्हत!
ReplyDeleteविस्मृती प्रामुख्याने 'Alzheimer's disease'मध्ये होते. स्वत: दुसऱ्या भूमिकेत जाणे किंवा दुसऱ्या माणसाला वेगळंच कोणी समजणे हे split personality disorder मध्ये होऊ शकतं. schizophrenia मध्ये mania, excessive spending ही लक्षणंही दिसतात.
ReplyDeleteअशा आजारांचं निदान करणं अनेकदा गुंतागुंतीचं असतं. खरं तर Alzheimer's disease ची ही लिंक द्यायला हवी होती, ती आता दिली आहे.
World Schizophrenia Day 24th May च्या निमित्ताने एकूणच मानसिक आजाराविषयी लिहावंसं वाटलं.