"दहा वीस तीस चाळीस . .. .. . . शंभर"
डबडा ऐसपैसमधे सुकडीवर राज्य होतं. सगळी मोठी मुलं नि आमच्यासारखी बारकीपण, एकत्र खेळत होती. मी, दिप्या, राणी आणि संगी आम्ही चौघंच बारकी. बाकी वाड्यातली सगळी मोठी पोरंपोरी. दादाला माझी काळजी. मला नेहमी सांगतो, एक कोणीतरी आऊट झाल्याशिवाय तू आउट होऊ नको. माझ्यावर राज्य आलं तर मला पार पिदवतील ही त्याला काळजी. शाळांना सुट्टी असल्याने दुपारचा चहा झाल्यावर खेळ सुरू झाला होता.
“सुकडी जरा बावळटच आहे, आता किती वेळा डबडा उडतो नि किती वेळा तिला राज्य घ्यायला लागतं” अशी चर्चा मोठया मुलीत चालली होती. मी तरी काय त्यांच्या तिथेच लपले होते म्हणून ऐकलं. सुकडी म्हणजे शकुंतला, संगी म्हणजे संगीता. चांगल्या नावांची वाट लावण्यात आम्ही एकदम बहाद्दर. दिप्याचा दादा खालून भसाडया आवाजात माडीवरच्या सुरेशला ‘सु–या’ अशी जोरदार हाक मारतो. दिप्याचे आजोबा म्हणतात, असली हाक म्हणजे पोटात सुरा खुपसल्यासारखंच वाटतं. तर असली ती नावं.
तेवढयात सुकडीचा आवाज आला, “रम्या इस्टोप”. रम्या बाहेर येईना. सुकडी शिरा ताणून ओरडत होती. मी लपले होते त्या माडीवरल्या कोप-यातल्या अडगळीतून खाली सुकडी दिसत होती. ती बोलत होती त्या दिशेला रम्याच्या शर्टची बाही दिसत होती. आश्चर्य म्हणजे तो हात हलत होता, सुकडीला बोलावत होता. सुकडी थोडी पुढे गेली. कचाकचा बोलण्यात तिचं डब्याकडे दुर्लक्ष झालं आणि रम्याचा शर्ट दिसत होता त्याच्या विरुध्द दिशेनी येऊन रम्या डबडं उडवून पळाला. नक्कीच दुसऱ्या कोणीतरी त्याचा शर्ट घालून सुकडीला उल्लू बनवलं होतं. झालं, असं पाचसात वेळा तरी सुकडीला राज्य घ्यावं लागलं. पार रडायला आली. मग तिची ती कजाग (हा शेजारच्या काकूंचा शब्द) आज्जी बाहेर आली आणि तिनी मोठया पोरांचा जो उद्धार केला तो केला. सुकडीला घेऊन ती गेली. मग मजाच गेल्यासारखं झालं.
आम्ही बारकी पोरं लगोरी खेळायला लागलो आणि मोठया पोरंपोरी कट्ट्यावर बसल्या म्हणजे वेगवेगळ्या हं. हे एक मला कळत नाही, खेळतात तर एकत्र पण गप्पा मारताना मात्र वेगवेगळे. त्यातून पोरींची इतकी खुसपूस चालली होती की त्या बाजूने नुसताच फिसफिस आवाज येत होता. पोरांचा जोरदार गोंगाट सुरू होता. दिप्याचा दादा कधीतरी मारलेल्या सिक्सरची action करून दाखवत होता. “अय्या” सुमाताई एकदम म्हणाली. त्यावर ते साहेब एकदम गडबडले पण चेहऱ्यावरून एकदम खुश झालेले वाटले.
सुकडी आणि तिची आजी बाहेर जाताना पोरांच्या तिथूनच गेल्या. “ताळतंत्र सोडलाय अगदी मेल्यांनी, आरडाओरडा काय करतील, फिदीफिदी काय करतील, घरातली इकडची काडी तिकडे करायला नको” आजींचा पट्टा जोरातच सुटला होता. तेवढयात शर्मा आंटींचा कमलेश त्याच्या जिमीबरोबर आला. जिमी म्हणजे तक्रारखोर, केसाळ कुत्रा, सारखा केकाटणारा. शर्मा आंटीच तेवढ्या आंटी आहेत, का कोण जाणे? बाकी साऱ्या काकू, मावशा नाहीतर माम्या. तेवढयात कमलेशच्या हातून जिमी सुटला आणि धावला तो थेट सुकडीकडेच. मग आजींचा लांब सुटलेला पट्टा एकदम छोटा होऊन थांबलाच. त्या भरभर चालत जाऊन दिसेनाशा झाल्या. पोरं हसून हसून पार पडायला आली.
जिमी परत आला आणि त्याने सम्याच्या पायाला खांब समजून आपला कार्यक्रम सुरू केला. मग सम्याची आणि कमलेशची चांगलीच जुंपली. आम्ही बारकी पोरं तर हसूनहसून लोळायला आलो होतो. मग सम्या आणखीनच चिडला. आमच्याकडे मोहरा वळवणार तोच त्याच्या बाबांची दणदणीत हाक ऐकू आली, मग तो पळालाच घरी.
मग कुणाकुणाचे बाबा आणि काही जणांची आईपण यायची वेळ झाली त्यामुळे कुणीकुणी घराकडे जायला लागले. एव्हाना आम्ही कट्टयावर बसून पत्ते चालू केले होते. खेळायला जाम मजा येत होती. पण आता अंधारायलाही लागलं होतं. अजून आम्हाला कोणी बोलावलं कसं नाही हा विचार मनात येत नाही तोवर दिप्याला बोलावणं आलंच. आमची चौकडी मोडलीच. राणी म्हणाली म्हणून आम्ही पाच तीन दोन खेळायला लागलो पण काय मजा येईना. मग हळूहळू घरी निघालो ते उद्या संध्याकाळी कायकाय करायचं ते ठरवतच.
No comments:
Post a Comment