Sunday, July 31, 2011

RSP


आठवीत आल्यावर आमच्या वर्गाला RSP आहे हे कळलं. आधी ते काय असतं माहीतच नव्हतं. दादा मागे एकदा म्हणाला होता RSP म्हणजे रेल्वे संडास पोलीस. म्हणजे पोलिसांचा गणवेश करून रेल्वेचे संडास साफ करायचे. पण संडास साफ करायला पोलिसाचा ड्रेस कशाला ते मला कळत नव्हतं, मग मी त्याला हजार प्रश्न विचारले. तो वैतागला असणार, पण थोडक्यात मला कळलं ते असं, रेल्वेतून खूप माणसं तिकीट न काढता प्रवास करतात आणि TC आल्यावर संडासात लपतात. त्यांना पकडायचं काम RSP चं. मला कितीतरी दिवस हे खरंच वाटत होतं. पण हळूहळू RSP म्हणजे काय ते कळलं. आठवीची शाळा सुरु झाल्यावर आम्हाला RSPचा युनिफॉर्म आणायला सांगितला. हे आम्ही घरी जाऊन सांगितल्यावर दादाला त्या चेष्टेची आठवण झालीच आणि त्याचं चिडवणं संपेचना. मी गळा काढायच्या बेतातच होते तोच त्याच्या मित्राने हाक मारल्याने तो निघून गेला. 
मग तो युनिफॉर्म म्हणजे शिट्टी, टोपी आणि shoulders आणले. मग एक दिवस एक पोलीससाहेब शाळेत अवतरले. त्यांनी RSP म्हणजे रोड सेफ्टी पेट्रोलबद्दल बरीच माहिती सांगितली. त्यातला रस्त्यावरची सुरक्षा हा भाग कळला पण पेट्रोल ही काय भानगड आहे ते कळत नव्हतं आणि त्या साहेबांचा आवाज किंवा जीभ जड असल्याने काही शब्द कळतच नव्हते. त्यातून मागल्या बाकावरच्या मुली इतक्या खुसफुसत होत्या की बास.
पुढल्या आठवड्यापासून एक हवालदार यायला लागले, ते एकदम खणखणीत बोलायचे. त्यांच्याकडून ते पेट्रोल नसून patrol म्हणजे सुरक्षित वाहतुकीसाठी केलेली फेरी असं काहीतरी असल्याचं कळलं. ग्राउंडवर ते आमच्याकडून काही व्यायाम प्रकार करून घ्यायचे, एक........दोन........तीन......चार वाले. त्यांची एक सवय म्हणजे ते सतत बोलायचे. व्यायाम प्रकार करताना ते "एक.......दोन......तीन...." चालू करणार आणि मधेच बोलायला लागणार. मग त्यांनी ४ म्हणलं का? हात खाली घ्यायचे का? अशी आमची चुळबुळ सुरु व्हायची. त्यात काही हात वर, काही खाली; काही खाली की वरच्या दुग्ध्यात खांद्यावर असं चालू असायचं. एकदा असंच आमचे हात वर असताना त्यांचा लांबच्या लांब पट्टा सुरु झाला म्हणजे तोंडाचा. सहज वर आभाळात लक्ष गेलं तर एक निळाशार पतंग उडताना दिसला, इतकं मस्त वाटत होतं बघायला. मी इतकी दंग झाले की पतंगाशीच पोचले म्हणजे मनाने. जागी झाले, म्हणजे संस्कृतच्या बाईंच्या शब्दात 'मर्त्यलोकात' आले तेव्हा पट्ट्यातून जोरात आवाज येत होताचार चार चार. दचकून मी हात खाली घेतले. म्हटलं आता आहे आपली, पण ते काय बोलले नाहीत. बाकीच्यांना काय, दात काढायला संधीच.   
दुसऱ्या सहामाहीत आम्हाला शाळेबाहेरच्या चौकात traffic control साठी न्यायला लागले. रहदारीला शिस्त लावणे आणि आधी ती आपल्या अंगी बाणवणे असा दोन कलमी की काय तो कार्यक्रम होता. सुरुवातीला सगळी रहदारी म्हणजे माणसं आमच्याकडे वळून वळून बघायची. लोकांना शिस्त लावण्याचं काम जोरातच सुरू होतं. “हीच शिस्त तुमच्याही अंगी कायम राहायला हवी, असेच देशाचे आदर्श नागरिक बनतात” असं आम्हाला आमचे हवालदार सांगत असायचे.
शाळेतल्या मुली हे काम करतायत म्हटल्यावर लोक ऐकायचे. कोणी रहदारीचा नियम तोडला की शिट्ट्या वाजल्याच. शिट्टी वाजवायला जाम मजा यायची, त्यामुळे त्याबाबतीत आमचा उत्साह दांडगा होता. कधी कधी एखाद्या बाजूच्या पाचसहा शिट्ट्या एकदम जोरदार वाजायच्या.  माणसं दचकून इकडे तिकडे व्हायची, कुणीकुणी आहे तिथेच थांबायची. दोनतीन छोटी मुलं घाबरून रडलीही होती एकदा. शिट्ट्यांनी गोंधळ वाढतोच आहे हे पाहून मग आमच्या शिट्टी वाजवण्यावर गदा आली. मग त्यातली मजाही कमी झाली.
शाळेच्या जवळच एक काका होते. ते आसपास फिरून चिवडा विकायचे. त्यांना आमचं फार कौतुक वाटायचं. दर शनिवारी ते आम्हाला चिवडा खायला द्यायचे, पैसे न घेताच आणि मग चिवडा विकताना जोरदार म्हणायचे, “चिवडा खाऊन पोरी हुश्शार.”
वार्षिक परीक्षा जवळ आली होती. RSPचं एक दोन दिवसांचंच काम बाकी होतं. एका संध्याकाळी मी शाळेकडे गेले होते, तिथल्या दुकानातून वह्यापेन वगैरे घ्यायला. शाळेपुढच्या चौकात गर्दी जमली होती, अपघात झाल्यामुळे. त्या दृश्याने मला घेरीच यायला लागली. त्या माणसावर  पांढरा कपडा टाकला होता. तरी डोक्यापासून रक्ताचा मोठा ओघळ वाहिलेला दिसत होता. त्या माणसाच्या चपला कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत होत्या. मला खूपच भीती वाटायला लागली. तेवढयात लोकांच्या बोलण्यावरून कळलंच, ते चिवडेवाले काका होते. काकांना टेम्पोची जोरदार धडक बसून ते जागीच ठार झाले होते. माझे हातपायच लटपटायला लागले. कशीबशी घरी पोचले ती आजाऱ्यासारखीच. नंतर दोनतीन दिवस शाळेत जाऊ नाही शकले. trafficचं कामही तोवर संपलं होतं. पण RSP चा अर्थ आणि त्याची गरज मला नीटच समजली होती.       

4 comments:

  1. मि नववीत असताना मला MCC होत RSP काय आहे ते माहिती नव्हत लेख वाचल्यावर समजल.........धन्यवाद.........

    ReplyDelete
  2. मला तुझी ही style खूप आवडली. प्रकाश संतांच्या लेखनाची आठवण आली. मुलांच्या भावविश्वातले लेखन आपल्याकडे जवळपास नाहीच. त्यातल्या त्यात असलेले फास्टर फेणे, गोट्या आणि त्यातही मुलांचे मनोविश्व उलगडणारा लंपन ही सगळी मुलेच. त्यामुळेच या वयातल्या मुलींचे विश्व शोधणारे तुझे लेखन महत्त्वाचे आहे. Keep it up.

    ReplyDelete
  3. :-) RSP. All acronyms have its secrets when we come across them .. slowly the meaning evolves ..

    ReplyDelete
  4. धन्यवाद वैभव, पोस्ट वाचून comment दिल्याबद्दल.

    @वाटसरू, धन्यवाद, खरंच मुलींच्या भावविश्वबाद्द्ल नाही फारसं लिहिलं गेलंय. संत माझे अत्यंत आवडते लेखक आहेत, त्यामुळे तो प्रभाव अपरिहार्य! हे लिहिण्यात मजा येतेय हे खरं.

    @aativas, :-)

    ReplyDelete