“नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”
या प्रश्नासाठी सनातन किती आतूर होता? आता आपण खरे फक्कड असं त्याला वाटलं. त्याच्या shorts, jeans shirt मुळे त्याला कोणी परिक्रमावासी समजत नव्हते असं त्याला वाटत होतं. टुरीस्ट कंपन्या सध्या वाहनाने २१ दिवसात परिक्रमा घडवत असूनही तो पायीच निघाला होता. किती वर्षं तो यासाठी धडपडत होतं पण कधी रजा नाही म्हणून कधी घरची अडचण म्हणून जमलं नव्हतं. मात्र यावेळी त्याने चंगच बांधला, चार नाहीतर चांगला सहा महिन्याचा वेळ हाताशी ठेवला होता. त्याच्या पत्नीची तब्येत जरा ठीक नव्हती. मग तिला आणि मुलींना तिच्या माहेरी सोडून तो निघाला. आईवडील घुश्शातच होते पण तरी तो निघाला.
मजल दरमजल करत पायपीट चालू झाली आणि आला शूलपाणेश्वर या अरण्याचा टप्पा. आपल्याच नादात चालत असताना सनातन भानावर आला या प्रश्नाने, “नर्मदे हर! परिकम्माबासी हो?”
त्याने प्रश्नकर्त्याकडे पाहिलं. खूपच मळकट कपड्यातला, अगदी कंटाळलेला वाटणारा माणूस समोर उभा होता. सनातनला वाटलं, बरी सोबत मिळाली जंगलातून जाताना. त्याने होकारार्थी उत्तर दिलं. भूक लागली होतीच. फराळाचे पदार्थ काढले, त्या माणसालाही काही दिलं. त्या माणसाने निर्विकारपणे ते स्वीकारलं. एका झाडाखाली बसून ते फराळ करू लागले. त्या माणसाने डोक्याला फडकं गुंडाळलं होतं, त्यातून उग्र वास येत होता. जखम वगैरे आहे की काय असा विचार करतानाच सनातन शहारला. “थोडं तेल आहे तुझ्याकडे? जरा जखमेवर लावायचंय” स्वत:च्या डोक्याकडे हात दाखवत तो विचारात होता. सनातन थरथरू लागला, धक्क्याने पडायला आला. “तू... तुम्ही अश्वत्थामा तर नाही?” तो कसबसं बोलला, तोंडाला कोरड पडली होती.
तो माणूस हसायला लागला. “हो, तुझ्यासारखे लोक म्हणजे विरंगुळा रे जरा, नाहीतर इतका कंटाळा येतो.” सनातन अजूनही धक्का बसलेल्या स्थितीतच होता. “तू, तुम्ही खरंच अमर आहात? हे विचारताना त्याची दृष्टी सहजच फराळाकडे गेली.
“हो. पण खाण्याचं म्हटलास तर जगायला मला त्याची गरज नाही, नाहीतर अन्नपाणी त्यागून मी जीवन संपवलं नसतं का? हं, पण खाण्यापिण्याची कमी मात्र कधी कधी जाणवते, मग परिक्रमावासी, मठातले फक्कड किंवा गावकरी यांच्याकडून काहीतरी मिळतं.” आता सनातन सावरायला लागला होता. हा खरंच अश्वत्थामा असेल? हा आपली खेचत तर नसेल. पण संभाषणात मजा वाटू लागल्याने त्याने ते चालू ठेवायचे ठरवले.
“तुम्हाला माझी भाषा कशी येते?”
“इथे ज्या प्रांतातून लोक येतात त्या बहुतेक भाषा मला येतात. नाहीतरी टाईमपास काय करणार रे? अरे हुशार आहे आहे मी, पटकन शिकतो. काही भाषा तर आठवड्यातही आत्मसात केल्यात मी.”
“तुम्ही इथे रहायचं का ठरवलं?” सनातनचा आणखी एक उत्सुक प्रश्न.
“खूप फिरलो. जग खूप बदललं. आता तर आधुनिक व्यवस्थेत हवं तिथे फिरता येत नाही, लगेच ID मागतात. मग म्हटलं बरंय रानातच राहावं. हवं तेव्हा माणसांचा संपर्क नाहीतर विजनवास. परिक्रमावासी सोडून फार कोणी येतही नाही इथे.”
“तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही ना? हे ID, टाईमपास तुमच्या तोंडून ऐकून..म्हणजे...”
“अरे असं काय करतोस? आजूबाजूला काय चाललंय हे माहित आहे मला. मागे एकदा बुऱ्हाणपूरला गेलो होतो तेव्हा सिनेमापण पहिला होता एक. एकदा रेल्वेनेही प्रवास केलाय पण तिकीट चेकरने उतरवून दिलं, तिकीट नव्हतं ना? पैसेही नव्हते. पण माणसांनी खूप बदल घडवले हं, तंत्रज्ञानामुळे कष्ट किती कमी झाले! प्रवासाची, संपर्काची साधनं किती वेगवान, कधी कधी टी. व्ही. पाहतो गावात, एकाचा सेलफोनही पहिला होता, छान छान!” खूप दिवसांनी बोलायला मिळाल्यासारखं तो बोलत होता.
“आधुनिक काळात कसं वाटतंय? म्हणजे तुमचा काळ खूप जुना ना?” सनातनची भीड चेपू लागली होती.
“अरे, आधुनिक हा शब्द तुला कळावं म्हणून वापरला. मला काय सारं सारखंच. आजचा दिवस उद्या भूतकाळात जमा होणार, भूत-वर्तमान-भविष्य सारंच अनंत.”
“तुम्हाला खरंच शाप मिळाला? म्हणजे.. ते... काय घडलं नेमकं?” जरा चाचरतच पण तो माणूस मोकळेपणी बोलतोय म्हणून सनातनने विचारलं.
“एकूणच technology, खरंच विलक्षण आहे, मला शिकवशील हा कसा वापरायचा?” सनातनच्या कॅमेऱ्याकडे बघत तो जरा तुच्छतेने, थोडं विस्मयाने म्हणाला. सनातनच्या प्रश्नाकडे लक्ष नव्हतं की तो तसं दाखवत होता कोण जाणे? सनातनने त्याला फोटो कसे काढायचे दाखवलं. digital camera असल्याने लगेच ते फोटोही दाखवले. त्या माणसानेही फोटो काढले, आता battery संपत आली होती. सनातनच्या मनात विलक्षण कल्पना आली “तुमचा कुणी फोटो काढलाय, मी काढू?” त्याने धीर करून विचारलं. निर्विकारपणे त्या माणसाने होकार दिला. सनातनने क्लिक केलं आता फोटो बघणार, इतक्यात कॅमेरा बंद झाला, battery संपलीच. सनातनला आपल्या भावनांवर ताबा ठेवायला फार धडपड करायला लागली. नंतर बघू असा विचार करून त्याने मनाची समजूत काढली. आता मघापासून छळणारा प्रश्न सनातनने विचारला, “तुम्ही इथे प्रत्येकाला भेटता?” “नाही, मला हवं त्यालाच. तुला मी भेटलो त्याला खास कारण आहे.” आपण खास असल्याचं वाटून, न राहवून त्याने कारण विचारलं.
“मी सध्या अभ्यास करतोय आणि प्रयोगही.” Technology बद्दलच्या त्याच्या भावना सनातनच्या लक्षात आल्या होत्याच. तो उत्सुकतेने कान देऊन ऐकू लागला.
“मला अमरत्वाचा शाप आहे हे तुला माहीतच आहे. हा शाप किती भयानक आहे याची तुला कल्पना नसेल. कधीही न संपणारं हे रखरखीत एकसुरी जीवन. विचार कर, सुटकाच नाही यातून. मग मी माझ्यासारखी माणसं शोधतोय.”
सनातनला काही बोध होईना. तो जरा गोंधळला, “तुमच्यासारखी म्हणजे?”
“मला हा अमरत्वाचा शाप का मिळाला? झोपलेल्या पांडव शिबिरावर मी हल्ला केला. पांडवांवर चालवलेल्या ब्रह्मास्त्राने मी उत्तरेच्या गर्भातल्या जीवाची हत्या केली. पश्चात्ताप झाला मला पण व्हायचं ते होऊन गेलं होतं. आता विचार करतोय हाच शाप पुढे कुणावर चालेल का? पण अट एकच तो माणूस माझ्यासारखा हवा. माझे काही प्रयोग यशस्वी झालेत.” अर्धवट उमजलेल्या, अर्धवट गोंधळलेल्या स्थितीत सनातन त्याच्याकडे पाहू लागला. “इतकी वर्षं मी माझ्या सोबतीला कुणी मिळेल का, कसं म्हणून धडपडत होतो. पण आता तुमच्या technologyमुळे कळलं की माझ्यासारखी माणसं आहेत जगात. तुम्ही मुलीचा गर्भ शोधून मारता. ते बघ तिकडे.” सनातनने तिकडे पाहिलं. काही शे पुरुष तिथे होते. “हे सारे आता माझ्याबरोबर आहेत, कायमचे. मलाही काहीतरी कारण असं अंतहीन जगायला.”
सनातन नीट पाहू लागला. त्यातले अनेक जण थकलेले दिसत होते. अनेक जण मानसिक स्वास्थ्य हरवलेले, जीवनरस संपलेले पण तरीही जगणारे होते. तो भयानक समूह पाहून सनातन हादरला. “यात स्त्रिया का नाहीत असा प्रश्न तुला पडेल, मी तो विचार केला होता पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की त्यातल्या अनेकींचं जगणं शापितच आहे. त्यामुळे वाटलं की मरू दे त्यांना शांतपणे.” तो सांगत राहिला. आता सनातनला घाम फुटला. “मी... नाही... मला... गर्भपात बायकोच्या तब्येतीसाठी... मला जाऊ दे.”
“खोटं बोलू नकोस, खरं तर तंत्रज्ञान आरोग्यासाठीच आहे पण तुम्ही.., महिन्यापूर्वी तू जे बायकोला करायला लावलंस, तिसरी मुलगीही होती म्हणूनच ना? आता तुला, तुझ्या आईवडीलांना मुलगा हवाय. तोपर्यंत तू तिला छळणार. हो की नाही? आता तुझी सुटका नाही. तुला यावंच लागेल.” त्या माणसाने सनातनचा हात धरला. बाकीचे पुरुषही त्याच्याकडे सरकू लागले. तो धडपड करू लागला, ओरडायला तोंडातून आवाज फुटेना. एका धक्क्यासरशी तो खाली पडला आणि त्याला जाग आली. विलक्षण घाबरलेल्या अवस्थेत, स्वत:वर ताबा मिळवत तो बसून राहिला. सकाळ होत होती. परिक्रमा संपवून तो रेल्वेने परत चालला होता. काही वेळाने तो हुशारला, तोंड धुवून आला. सहप्रवाशांनी चौकशी केली, चहापाणी दिलं. त्यानंतर डोळे मिटून तो शांत बसून राहिला. राहूनराहून त्याच्या नजरेसमोर पत्नीचा चेहरा येत होता. खूप विचारांती त्याने मनाशी काही ठरवले.
त्याच्या गावी स्टेशनवर मित्र आले होते. त्याला उतरवून घेतल्यावर साहजिकच मित्रांनी विचारलं, “मग काय मिळालं परिक्रमेत?” त्या स्वप्नानंतर प्रथमच मोकळेपणाने हसत सनातन उत्तरला, “आत्मज्ञान!”
आत्मज्ञान होण्यासाठी माणसांना कोणीतरी दुसर का भेटावं लागत कायम? story line वेगळी आहे. पूर्ण कथा विकसित करता येईल का?
ReplyDelete