Sunday, December 19, 2010

मुक्काम लातूर

प्रसंग १

एका घरासमोर मी उभी आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वीपर्यंत हे घर होतं. आता दगडमातीचा एक ढिगारा, त्यातच घरातल्या वस्तू विखुरलेल्या. चिल्ल्यापिल्ल्यांचे फोटो, फाटलेली वह्यापुस्तकं,खेळणी. काही दिवसांपूर्वीचं नांदतं, गजबजलेलं घर. डोळे कधी वहायला लागले ते कळलंच नाही..........

प्रसंग २

भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास चालू आहे. भूकंपग्रस्त कुटुंबांकडून प्रश्नावल्या भरून घ्यायचं काम आमचा गट करतोय. मनावर प्रचंड ताबा ठेवायला लागतोय. एका भूकंपग्रस्त कुटुंबातला पुरुष समोर बसलाय. जरा हरवल्यासारखा दिसतोय. जवळचं कुणीतरी गेलं असणार. आमचे टीम लीडर त्याला समजावत आहेत. माहिती देण्यास त्याने होकार दिल्यावर मी पुढे सरसावलेय, लिहून घ्यायला. नाव, गाव इ. झाल्यावर कुटुंबातल्या माणसांची नावं व त्यांची माहिती मी त्याला विचारतेय. मीही विचारताना धास्तावलेली कारण कुटुंबातलं कुणी मृत्युमुखी पडलं असल्याची शक्यता आहेच. एक एक नाव तो सांगतोय. एकत्र मोठं कुटुंब दिसतंय. बारावं नाव लिहून झालं आणि तो धिप्पाड, उंचनिंच माणूस ढसाढसा रडत कोसळला.बारा जणांच्या कुटुंबातला हा एकमेव माणूस वाचला, कुठे बाहेरगावी गेला होता म्हणून. त्याचं सगळं कुटुंब संपलंय. मी जागच्या जागी थिजलेली.........

प्रसंग ३

एका गावाच्या बाहेर माळरानावर भूकंपग्रस्तांसाठीचे तात्पुरते निवारे उभे केले आहेत. बाजूलाच एका धार्मिक संस्थेचा डेरा लागलाय ज्यांनी लोकांच्या जेवणाची जबाबदारी घेतलेय. वेळ संध्याकाळी पाच सव्वापाचची. सत्संग चालू आहे. मागील बाजूला शिबिरात स्वयंपाकाची तयारी चालू आहे. सत्संग संपल्यावर लोक उठायला लागले तोच कानावर दवंडीचा आवाज येतोय. तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलतर्फे सांगण्यात येतंय, कुणी एक सात वर्षाची मुलगी तिथे मरून गेलेय, कुणी शोधात असेल तर ओळख पटवून अमुक दिवसात ताब्यात घ्यावं नाहीतर.........

प्रसंग ४

एका गावातलं काम पूर्ण झालंय. संध्याकाळचे सहा-साडेसहा, हवा थोडी थंड आहे. गावच्या रस्यावरून फिरताना अंगावर काटा येतोय. जिकडेतिकडे उद्धस्त घरं. गावातली मंडळी आसऱ्याला गावाबाहेर माळरानावर. पण हे काय? दहा बारा कुत्री गावात येतायत. ढिगाऱ्यात काहीबाही उकरतायत. गावातच राहणारी ही कुत्री. भुकेसाठी त्यांनाही माळरानावर जावं लागलंय. सोबतचा गावकरी सांगतोय, रोज दिवसातून दोनतीन वेळा कुत्री गावात येतात.सगळीकडे फिरतात, आपल्या धन्यांची घरं बघत, ढिगारे उकरत.

तेवढयात त्यातल्या एका कुत्र्याने जोरात रडायला सुरूवात केली. कातरवेळ आणखी कातर होत गेली..........

प्रसंग ५

भूकंपग्रस्त गावांना जागतिक पातळीवर मदत सुरू झालेय. गावागावात STD booth लागलेत.त्याचा ताबा सरपंच किंवा गावातल्या प्रबळ लोकांकडे. ताबा म्हणजे अक्षरश: ताबा. गेले चार तास इथे सर्व्हेचं काम चाललंय, सरपंचांनी त्यात लक्ष घालणं अपेक्षित आहे. पण इथले सरपंच फोनपासून हलतच नाहीयेत. काही वेळाने मात्र ते आले आणि जातीने लक्ष घालू लागले. जरा नीट विचार केल्यावर लक्षात आलं की इतका वेळ दलित कुटुंबांची माहिती घेण्याचं काम सुरू होतं, आता सरपंचाच्या भावकीतल्या कुटुंबांबरोबर काम चालू आहे. चर्चा काय चाललेय त्यांच्यामधे, ह्या xxx चं (म्हणजे दलितांचं) काय नुकसान झालंय? साध्या गवताच्या घरात तर राहतात. खरं नुकसान पक्क्या घरात राहणाऱ्यांचंच झालंय पण कसा फायदा करून घेतायत बघा इ. इ.

सवर्णांपैकीच एक बाईही आलेय. पण ती काहीच बोलत नाहीये. तिच्यावर कसलंतरी दडपण असावं. आता ही गुंतागुंत आम्हाला थोडी कळायला लागलेय. मी सहकाऱ्याला खुणेनेच सांगून,काहीतरी बहाणा करून त्या बाईला बाहेर घेऊन आलेय. आता मात्र ती पटापटा बोलतेय. गावच्या एका पुढाऱ्याची ती भावजय. मला माहीत आहेत ते, सकाळी त्यांनीच गाव दाखवलं होतं. यांची प्रॉपर्टी वादात आहे. दिरांनी तिच्या नवऱ्याला फसवून धोत्र्याच्या बिया खायला घातल्या होत्या,त्यातून तो वाचला. ती सांगतेय, जेवढं शक्य असेल तेवढं नुकसान दाखवा आमचं; काही मिळालं तर आत्ताच मिळेल, कज्जेदलालीला मी कुठवर पुरणार?

प्रसंग

भूकंपाचं संकट पुरेसं नाही की काय म्हणून आत्ता संध्याकाळी उशीरा जोरात पाऊस आलाय.आमच्या रहायच्या जागेचा बंदोबस्त बरा आहे पण तात्पुरत्या निवाऱ्यातल्या माणसांचं काय झालं असेल? दिवसभराच्या अनुभवामुळे आणि पावसामुळे सगळे चिडीचूप बसलेत. दिवसभर मन आवरताना केवढी धडपड होते. संध्याकाळी कुणाचा तरी बांध फुटतोच.

तेवढयात एक बातमी येते, पुण्यात मोठा भूकंप झालाय. आम्ही सगळे पुण्याचेच. एकच हलकल्लोळ चाललाय. एकदोघी जोरजोरात रडायला लागल्यात. सगळ्यांची मन:स्थिती इतकी नाजूक की तर्काने विचार करायची शक्तीच नुरल्यासारखं झालंय. इथे भूकंपाने माजवलेला हा:हाकार पाहिल्यावर मनाचा एकच धोशा आपल्या माणसांचं काय?

काही जणांनी भानावर येऊन बातमीची शहनिशा केली तेव्हा तसं काही नसल्याचं कळलं आणि निश्वा:स सुटले. पण त्या अर्ध्या तासाने चरचरून दाखवून दिलं की आपत्तीत सापडलेल्यांची मन:स्थिती काय होत असेल?

4 comments:

  1. Very touching one! I read all the posts, liked it.

    ReplyDelete
  2. काटा आला अंगावर, कोयनेच्या आठवणी जाग्या झाल्या. तो भूकंप मी जवळून पहिला होता. खूप चांगलं लिहिलंय तुम्ही.

    ReplyDelete
  3. Thank you Nayan

    मधू आपलेही धन्यवाद. कोयनेच्या भूकंपाच्या माझ्या आठवणी म्हणजे श्रुती आहेत कारण तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय हे लातूर भूकंपामुळे मला खरोखर कळले.

    ReplyDelete
  4. सर्व प्रसंग अगदी थरारक. माझा जन्म अगदी त्याच काळातला—९२चा.

    [...]कातरवेळ आणखी कातर होत गेली[...]

    चेहऱ्यावरील करूण भाव आकस्मिकपणे तरारले गेले, हे वाचून—खरे तर आकांत करीत विव्हळणाऱ्या कुत्र्यांबद्दल कल्पना करण्याचे देखील धैर्य होत नाहीये.

    ReplyDelete